Sunita madhukar patil ( मधुनिता )

Fantasy Inspirational Others

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Fantasy Inspirational Others

ठेका

ठेका

4 mins
204


हळू हळू प्रखर प्रकाश मंद करत, आकाशभर आपली लाली पसरवतं मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा निसर्ग. पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणाऱ्या त्या सुंदर संध्यासमयी नाना नानी पार्कमधल्या बाकड्यावर ते दोघे एकाचवेळी विसावले. बाकावर बसताच तिने डोळे मिटून घेतले आणि इअरफोन मध्ये वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर तिच्या नाजूक बोटांनी मांडीवर हळूहळू ठेका धरला. नेमका तोच तर ठेका बाजूला बसलेल्या त्याच्या बोटांनी देखील धरला आहे हे त्याच्या डोळ्यांनी टिपलं. बराच वेळ दोघे आपापल्या विश्वात रममाण राहिले. संध्येने काजळ लेण्याआधी ते दोघे उठले आणि विरुद्ध दिशेने चालू लागले.

हे असंच तर चालू आहे गेल्या काही दिवसांपासून. पार्कमध्ये संध्यासमयी वॉक करताना कधी मागे पुढे तर कधी सोबत चालणं आणि दोघांचं आधीच ठरल्यासारखं एकाचवेळी येऊन बाकावर विसावणं. मान वाकडी करून कधी पाहिलंच तर दिसायची एकाच ठेक्यावर नाचणारी दोघांचीही बोटं.

वयोमानानुसार सुरकुतलेल्या मनगटावर सोनेरी पट्ट्याचं घड्याळ तर दुसऱ्या हाताच्या आतल्या बाजूला गोंदलेला लक्षवेधी सूर्य पण तिच्या नजरेत भरायचा तो नाचणाऱ्या बोटांचा ठेका आणि त्याचंही लक्ष तिच्या बोटांनी धरलेल्या मॅचिंग ठेक्यावर. कसं शक्य आहे? एकच गाणं ऐकत असू का आपण, कधी कधी वाटायचं दोघांनाही. हळूहळू हे सगळं सवयीचं होतं चाललं होतं दोघांनाही. एखाद्या दिवशी कोणाला यायला उशीर झाला तर दुसऱ्याची नजर कावरी बावरी होऊन शोध घ्यायची. हळूहळू एकमेकांकडे पाहून स्मित करत हास्याची देवाणघेवाण सुरू झाली पण दोघांनाही शब्दांची गरज कधी भासली नाही.


अनायासपणे जुळलेल्या या ठेक्यांचे ताल काही काळापुरते असले तरी मावळतीकडे झुकलेल्या त्यांच्या बेरंग आयुष्यात  रंग भरण्यासाठी पुरेसे होते. 


या आयुष्याच्या पटावर खेळताना ती नेहमीच एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे नेहमी इतरांच्या तालावर नाचत राहिली. कधी आईबापांच्या, कधी नवऱ्याच्या तर कधी मुलांच्या. वयोमानानुसार थकलेली, सुरकुतलेली ही जुनीपुराणी जीर्ण कळसूत्री बाहुली घरात सर्वांनाच नकोशी होती म्हणून तिची विल्हेवाट लावण्यासाठी वृद्धाश्रम नावाचं ठिकाण शोधण्यात आलं पण आपली ही बाहुली खूप मानी बरं. तिने वृद्धाश्रमात जाण्याऐवजी एकटं राहण्याचा निर्णय घेतला. हाताला असणारी चव आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद यामुळे अल्पावधितच असंख्य मुलांची मावशी होऊन त्यांचं उदरभरण केलं. यातूनच जन्म झाला तो मावशीच्या खानावळीचा. या सगळ्यात तिला साथ होती ती संगीताची. खानावळीत नेहमीच रेडिओ चालू असायचा आणि त्या संगीताच्या तालावर तिचं आयुष्य नवं वळण घेत होतं. कधी कधी न जुळलेले असंख्य ठिकाणचे असंख्य ठेके तिला अस्वस्थ करायचे. 


त्याचंही काही वेगळं नव्हतं. प्रत्येक लयीत स्वतःला ओढून ताणून आणून बसवण्याचा प्रयत्न त्याचा ही असायचा पण नेहमी कुठेतरी काहीतरी राहून जायचं आणि ठेका चुकायचा. असे असंख्य ठेके जुळवता जुळवता जगणं राहून गेलं हे त्याला खूप उशिरा समजलं आणि समजलं तेंव्हा खूप उशीर झाला होता. दमून भागून जेंव्हा त्याने आजूबाजूला पाहिलं तेंव्हा तो एकटा होता. सारं घरटं रिकामं होतं. पिलं भुर्रर्र परदेशी उडून गेली होती आणि त्याच्या सोबतीला होता तो उनसावलीत नेहमी साथ देणारा दमा, एकांत आणि संगीत..


त्या दिवशी दोघेही असेच बागेत बसले होते. तिने वाकून पाहिलं त्याची आणि तिची दोघांचीही बोटं एकाच तालाच्या ठेक्यावर नाचत होती. तो घट्ट डोळे मिटून बसला होता. तिने हळूच सोबत आणलेल्या पिशवीतून थर्मास बाहेर काढला आणि गरमागरम वाफाळलेला चहा दोन कागदी कपात ओतून त्याच्यासमोर धरला. त्यानेही न बोलता तो कप घेतला आणि अस्तांचलास जाणाऱ्या गभस्तीस न्याहाळत दोघेही चहाचा आस्वाद घेऊ लागले. 


एक अबोल आणि अबाधित नातं त्या दोघांमध्ये निर्माण झालं होतं. त्या नात्याला व्यक्त होण्यासाठी ना शब्दांची गरज होती ना स्पर्शाची. त्यांच्या नात्याला कळत होती ती फक्त मौनाची भाषा.


नेहमीप्रमाणे ती त्यादिवशी बाकावर येऊन बसली. त्याला यायला जरा उशिरचं झाला होता. थोडा अस्वस्थ जाणवला तो तिला. तिने वळून त्याच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या बोटांनी 'तुम अगर साथ देने का वादा करो' चा ठेका धरला होता. तिच्याही बोटांनी पण तर तोच ठेका धरला होता. तिच्या चर्येवर एक गोड स्मित उमटलं. इतक्यात तो उठून चालू लागला. काय झालं अचानक तो असा का निघाला हा विचार तिच्या मनात आलाच होता की तो धाडकन खाली कोसळला आणि जोरजोरात श्वास घेऊ लागला. ती घाबरली, काय करावं तिला काही कळेना. आजूबाजूच्या माणसांची मदत घेत तिने त्याला दवाखान्यात नेलं. त्याला दम्याचा अटॅक आला होता आणि रक्तदाब ही मंदावला होता.


डॉक्टरांनी रात्रभर त्याला अंडर ओब्जरवेशन ठेवलं होतं. सकाळी त्याला जाग आली तेंव्हा त्याला समोर दिसली ती आणि 'तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हूं मै,' च्या ठेक्यावर फेर धरलेली तिची नाजूक बोटं. त्याच्याही ओठात तेच तर शब्द रेंगाळत होते. त्याला उठलेलं पाहून तिने चहाचा कप त्याच्या पुढे धरला. चहा पिता पिता तिच्या मनात आलं, आमचं नातं ही ह्या गच्च भरलेल्या गरमागरम वाफाळलेल्या चहा सारखंच नाही का? याचा विस्तार पहिल्या घोटापासून सुरू होऊन संपला तरीही स्वतःकडे खुणावणाऱ्या तळापर्यंत...


या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

    


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy