Sarita Sawant Bhosale

Tragedy Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Inspirational

टाळीतीलही माणूसच असतो

टाळीतीलही माणूसच असतो

4 mins
302


उंचपुरा, गव्हाळ वर्णाचा,अंगकाठी मध्यम असलेला मुलगा ऑफिसमध्ये पोहचले तर समोरच बसलेला. हातात फाईल असल्याकारणाने इंटरव्ह्यू साठीच आलेला होता हे कळलं. आत जाऊन एचआरला विचारलं तर कळलं आमच्याच टीममध्ये अजून एकाची भरती करायची आहे. आपल्या टीममध्ये नवीन मेम्बर येणार म्हणून उत्सुकता असतेच तशी मला पण होती. इंटरव्यूचे दोन्ही राउंड झाले...त्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती तरीही आमच्या मॅनेजरच तोंड पडलेलंच होतं. त्या मुलाने म्हणजे गिरीशने सगळी उत्तरं बरोबर देऊन प्रामाणिकपणे स्वतःची माहिती देताना तो LGBT समूहातील आहे हेही सांगितलं होतं. या कारणामुळेच मॅनेजर त्याला नोकरीवर ठेवावं की नाही या द्विधा मनःस्थितीत अडकला होता. तो LGBT समूहातील आहे हे कळताच आम्ही सगळेही म्युझियम मध्ये ठेवलेल्या एखाद्या पुतळ्याकढे बघतात तसे माना उंचावून तो बसलेल्या केबिनमध्ये डोकावू लागलो. काहीच वेळात कंपनीच्या CEO आल्या आणि गिरीशशी बोलून त्याच्या ज्ञानाच्या,अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी दिली. मॅनेजर मात्र नाखूश झाला. शेवटचा निर्णय CEO च्या हाती होता म्हणून नाहीतर याने तर कधीच गिरीशला ऑफिसबाहेरचा रस्ता दाखवला असता. 

    

गिरीश पहिल्याच दिवशी ऑफिसला आला तसे सगळेजण तो चालतो कसा,वागतो कसा,बघतो कसा याचं निरीक्षण करू लागले. त्याच्याशी बोलणं मात्र सगळेच जण टाळत होते. तोही स्वतःहून कोणाशी बोलत नव्हता कदाचित इतर लोकांच्या नजराच त्याच्याशी खूप काही बोलायच्या. टीममेम्बर म्हणून माझ्याशी तो गरजेपुरतं बोलत होता. त्याच्या शंका विचारायचा,कधी काही मदत मला हवी असेल तर तीही करायचा. इतर कलिग्स म्हणायचे आम्ही तर त्याच्यापासून चार हात लांबच असतो...तुही तसंच राहत जा नाहीतर कधी तो काय करेल सांगता यायचं नाही. त्याच्याशी बोलताना मला मात्र कधी विचित्र किंवा असुरक्षिततेची भावना मनात जाणवली नाही. तो प्रामाणिक होता हे त्याच्या वागण्या,बोलण्यावरून समजत होतं. तो स्त्री की पुरुष की अजून काही याचा कधीही विचार न करता मी त्याच्यासोबत एक माणुसकीच नातं जोडलं आणि त्यानेही ते माणूसकीने जपलं होत. एक दिवस ऑफिसमध्ये तो हाय हिल्स शूज घालून आला तसे सगळ्यांच्या नजरा फक्त त्याच्या त्या शूजवर खिळल्या...तो पुढे चालला की सगळे मागे दात काढायचे. कितीजण त्याची नक्कल सुद्धा करत होते. 

    

मी कुतूहलानेच त्याला विचारलं आज काय एकदम वेगळं? तो म्हणाला काही नाही मला आवडतात म्हणून घातले. मी आता समाज काय म्हणेल..त्याला काय पटेल की नाही हा विचार नाही करत कारण आम्ही कसेही वागलो तरी समाज आम्हाला फक्त हीन वागणूकच देतो. मी हा जन्म मागून नाही घेतला पण मला मिळाला आणि मी तो आनंदाने स्वीकारलाही. मी खूप चांगलं नृत्य करतो..भरतनाट्यम शिकतोय...काही बघणारे 'नाच्या' म्हणूनही मला हिणवतात...... पण ते माझं passion आहे. मी जगतो माझ्या नृत्यासोबत. पण ही लोकं त्यांच्या मुला मुलीने किंवा इतर कोणीही डान्स केला तर तोंडभरून कौतुक करतात पण आमच्यातल्या त्याच कलेला नाक मुरडतात. हा समाज आम्ही आहे तसे आम्हाला स्वीकारत नाही तर काय करू आम्ही? 

 त्यादिवशी मी पहिल्यांदा त्याचे डोळे पाणावलेले पाहिले. 


     तो कोणाशी कधी बोलत नव्हता...फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवायचा पण मॅनेजरला तो आधीपासूनच टीममध्ये नको होता त्यामुळे काही न काही कारण काढून त्याला त्रास देत होता...त्याला नको ते बोलत होता. मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत होता. गिरीशने काही काळ हे सहन केलं पण शेवटी त्यालाही स्वाभिमान होता. त्याचं अस्तित्व जिथे कोणी मान्य करत नव्हते तिथे त्याचा जीव घुसमटत होता.दोन महिन्यांनी तो स्वतःहून ऑफिस सोडून निघून गेला. जाताना मात्र मला बोलून गेला की आम्ही तुमच्याकडून काहीच मागत नाही पण माणूस म्हणून आमचे हक्क आहेत ते तरी आम्हाला द्या...आम्हालाही जगू द्या. या दोन वाक्यात तो खूप काही सांगून गेला.


   त्याच्या निमिताने एकदा स्टेशनवर एका गुंडाच्या तावडीतून मला आणि माझ्या मैत्रिणीला वाचवलेला एक तृतीयपंथी आठवला. त्या दिवसापर्यंत तरी मला त्या लोकांची भीती वाटायची पण त्यानंतर समाजात मर्द म्हणून मिरवणाऱ्या भेकड माणसाचीच भीती वाटायला लागली. तो तृतीयपंथी आहे हे कळताच त्याच्या आईवडिलांनी त्याला घराबाहेर काढलं होतं..त्यांनतर बाहेरच्या जगाने नको तितकं छळलं पण याही परिस्थितीवर मात करत तो ग्रॅज्युएट झाला...नोकरीसाठी वणवण फिरला पण कोणत्याही ठिकाणी त्याच कौशल्य न बघता केवळ त्याची ओळख वेगळी म्हणून त्याला नाकारलं गेलं. कितीतरी घरात धुणी,भांडी,लादी यासारखी कामही तो शोधायला गेला पण त्याच्या तोंडावरच दार आपटलं गेलं. रेल्वे स्टेशनवर झाडू मारायचं कामही मागुन बघितलं पण तिथेही नकारच. अखेर पोटापाण्यासाठी त्याला टाळी वाजवून पैसे मागणेच नशिबी आले. 


   तोही म्हणाला होता की आमची आहे ती ओळख स्वीकारून समाजाने आम्हाला त्याच्यात सामावून घेतलं, त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क आम्हालाही दिले तर आमच्यावर अशी टाळी वाजवत स्टेशनवर,टोलनाक्यावर, रात्री अपरात्री रस्त्यावर उभी राहायची वेळ येणार नाही. आमचे जे काही हक्क आहेत ते फक्त कागदावरच...वास्तवात आजही आम्हाला बघताच गाडीची काच वर सरकवली जाते, आमची थट्टा मस्करी केली जाते, कित्येकदा आमच्या अंगावर थुंकलही जातं. रस्त्यावरच्या जनावरालाही हा माणूस घरी नेऊन खूप जीव लावतो पण जिवंत माणसाची मात्र अशी अवहेलना करतो. लग्न,बारस यासारखा प्रसंग असेल तेव्हा आम्हाला शुभ मानलं जातं पण दुसऱ्याच दिवशी 'हिजडा' म्हणून हिणवलं जातं. आम्ही जन्माला असे आलो हा आमचा गुन्हा आहे का??


   तो प्रसंग आठवून मन बैचेन झालं...समाजाने समान संधीचे हक्क हिरावून घेतल्या मुळे उद्या गिरीशचीही अशी दुर्दशा होऊ नये या भीतीनेच मन अस्थिर झालं होतं. न्यायालयाने नुकतेच त्यांच्या अस्तित्वाला संमती दिली पण आपण त्यांना समाजातील एक घटक म्हणून स्वीकारलंय का?? 

आपला समाज त्यांना वाळीत टाकतो म्हणून त्यांना वेश्या व्यवसायही करावा लागतो....इतकी किळसवाणी,घृणास्पद वागणूक एक माणूसच दुसऱ्या माणसाला देत असताना कोणत्या समानतेचे गोडवे गावे???? आता लक्ष्मी त्रिपाठी सारख्यानी काही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून एक आदर्श डोळ्यासमोर आणि या कुत्सित हसणाऱ्या समाजासमोरही ठेवलाय पण ही उदाहरणही फक्त हातावर मोजण्याइतपतच आहेत. LGBT, वारांगना या वंचित समाजालाही आपल्या समाजात जेव्हा प्रेम,आदर,सन्मान आणि शिक्षण,नोकरी,रोजगार,राजकारण यांत समान संधी मिळेल तेव्हाचं माणुसकीचा सन्मान होतोय अस म्हणता येईल. यासाठी गरज आहे या व्यक्तींनाही माणूस म्हणून समानतेने वागवायची. त्यांचा समानतेचा हक्क त्यांना देण्याची.

 .......................................

    वरील दोन्ही घटना सत्य अनुभवावर आधारित. आपणच 'वेगळा माणूस' संबोधून वंचित ठरवलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण गरजेचं आहे. असं झालं तरच सामाजिक विषमता दूर होऊन समानतेच्या वाटेवर समाज पाऊल ठेवेल. तुम्हीही या व्यक्तींचा तिरस्कार न करता एकदा माणुसकीने वागवून बघा...त्यांच्याकडूनही सन्मानच मिळेल आणि तुम्हाला समाधानही😊.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy