Shubhangi Belgaonkar

Thriller

4.0  

Shubhangi Belgaonkar

Thriller

"तो"

"तो"

2 mins
266


काही करून बब्याच्या डोळ्यासमोरून “तो” जात नव्हता. रात्र पुढे पुढे जात होती. झोप तर केंव्हाच उडाली होती. आठ वर्षांच्या त्याच्या मेंदुला प्रश्नच प्रश्न पडले होते काय खर आणि काय खोटं. सगळं काही अकल्पितच वाटत होते आणि आईचं ते किंचाळणे, घुमणे, रडणे, ओरडणे सर्व काही तो सतत अनुभवत होता आणि त्यामुळे आईची त्याला काळजी वाटत होती आणि त्याची प्रचंड भीती.

होताच "तो" तसा, बेडकाच्या बाहेर आलेल्या डोळ्यां सारखे डोळे असलेला, कवड्यांची माळ गळ्यात, हार हातात, वेग-वेगळे रंगीबेरंगी दोरे बांधलेले, अतिशय उग्र जठा वाढलेल्या, भडक रंगाचे कपडे घालून जय महाकाली असे सतत ओरडणारा.

बब्याकडे तशी सगळीच कायम कडकी. वडीलांना तर त्याने आठवायला लागल्या पासून झिंगून पडलेलेच पाहिले, मात्र आईवर बब्याचे लई प्रेम. आई दिवस भर मोल मजुरी करून जे मिळवायची ते बाप संध्याकाळी तिच्याकडून हिसकावून दारू ढोसून पडायचा. मग लई भांडण व्हायचं आणि त्यात बाप काही खायला नसेल की दारु पाजयाचा बळबळ तिला.

आणि मग एक दिवस आई कसे नुसे चेहरे करायला लागली. कधी कधी लई हसायला तर कधी लई रडायला लागली. कधी कधी झाडावरच जावून बसायची तर कधी तापाने फणफणत पाडून राहायची. आजू-बाजूच्या बाई-बापड्या बब्याला काही बाही द्यायच्या खायला आणि शाळेत खिचडी मिळते म्हणून जायचा आपला शाळेत.

आता जाणते जुने बापाला सांगायला लागले की बाईला भानामती झालीये. कोणीतरी चेटूक केलंय वाटतंय तिला. बाबाकडे न्यायला पाहिजे आणि गेले की घेवून सारेजण त्याच्याकडे. त्याचा तो अवतार पाहून बब्या लई घाबरला. बाबाने हात फिरवुन हातातून ताईत काढून दिला. लगेच दुसरा हात फिरवून हातातून कुंकू काढून दिले आणि नंतर एक लिंबू कापून त्यातून रक्त येताना दाखविले. सर्वांना सांगितले की त्याच्या आईच्या पाठी भुत लागले होते. त्याला त्याने कसे मारले. आता सर्वांनी मोठ्याने जय महाकाली असा जय जयकार केला आणि आईला घेवून सगळे घरी आले. आईचा ताप वाढतच होता. बाई-बापे ये-जा करत होते. ताईत बांधला होता आणि बाबाने दिलेले कुंकू लावत होते.

कालच शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा झाला तेंव्हा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आले होते. त्यांनी हातातून कुंकू काढणे, लिंबातून रक्त काढणे हे कोणीही कसे आम्ल आणि अल्क याचा वापर करून सहज करू शकते हे प्रयोगाद्वारे दाखविले होते. त्यामुळे छोटा जीव अस्वस्थ होता. आईची तर काळजी होतीच आणि आपण कोणाला सांगणार आपले कोण ऐकणार याची पण भीती.

एकदा बापाला सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याने केला पण बापाने बकुटे धरून त्याला घराबाहेर बसविला. रात्र पुढे जातच राहिली आणि शेवटी नको तेच झाले बब्याला पोरका करून आई निघून गेली.

तो” काही बब्याचा डोळ्यासमोरून आजही जात नाही, कारण त्याने बब्याची आई हिरावून नेली.

आज बब्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अध्यक्षपदी काम करतो. विविध ठिकाणी जावून प्रयोग करतो, जनजागृती साठी अखंड प्रयत्न करतो कारण कोणत्याच बाळाची आई त्याच्या पासून हिरावली जावू नाही म्हणून आणि कोणताच “तो” कोणाच्या आयुष्यात येवू नाही म्हणून.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller