Shubhangi Belgaonkar

Others

4.4  

Shubhangi Belgaonkar

Others

एक निर्णय

एक निर्णय

7 mins
667


पी.एच.डी. ह्या डिग्रीबद्दल आणि डॉक्टरेट झालेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा कावेरीला प्रचंड अभिमान होता. लहानपणापासून तिला एवढ्या शिकलेल्या व्यक्ती म्हणजे जगातील सर्व शहाणपण त्यांनाच असत, तेच समजूतदार, तेच हुशार, तेच प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहोचलेले अस काही वाटायचं. नेहमी अशा व्यक्तींपुढे आपण काहीच नाही अस तिच्या मनात यायचं आणि म्हणूनच जेव्हा कौशिकची पी.एच.डी. चालू होती, अभ्यास, नोटस्, पसारा हे तिने खूप मनापासून सांभाळले. त्याला जेव्हा जेव्हा ताण आला तेव्हा तेव्हा त्याला मानसिक आधार दिला. त्याच्या प्रबंधाचे टंकलेखनसुद्धा तिला जमेल तसे तपासून दिले. आणि ज्या दिवशी कौशिकला डॉक्टरेट मिळाली त्यादिवशी कावेरीला जग जिंकल्याचा आनंद झाला. त्याच्या यशाने ती हुरळून गेली. मात्र कौशिकच्या लेखी आपण कोणी आहोत किंवा नाही याचा मात्र तिने त्यावेळी विचारच केला नाही.

      कावेरीला आठवायला लागल तेव्हापासूनच जेव्हा ती तिच्या काका काकूंकडे लहांची मोठी झाली. कारण तिच्या स्वतःच्या सुशिक्षित आई वडिलांचा घटस्फोट झाला. तिच्या काका, काकूंना मुलबाळ नसल्याने त्यांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवले. परंतु स्वतःचे मुल असणे आणि दुसऱ्याचे सांभाळणे यातील फरक तिला तेव्हा कळला आणि आपल्या आयुष्यात कितीही समस्या आल्यातरी आपण त्या पार करून जायच्या. मात्र घटस्फोटामुळे किती आयुष्य उध्वस्त होतात हे तिने अनुभवले असल्याने आपण कधीही स्वतःचा संसार मोडायचा नाही हा कावेरीचा निर्णय त्याच वेळी झाला.

      महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कावेरी एका विध्यार्थी संस्थेचे काम करायला लागली आणि तिथेच कावेरीची कौशिकशी ओळख झाली. कौशिक बोलायचा खूप छान, त्याचे वाचन ही भरपूर. नवीन नवीन विषय छान समजावुन सांगण्याची त्याची हातोटी. कावेरीच्या मनात त्याच्याबद्दल नितांत आदर. तो खूप हुशार आहे याची खात्री तिला झाली. मैत्रिणी बोलतांना जेव्हा एकमेकींना सांगायच्या की त्यांना कसा डॉक्टर, इंजिनिअर, बँकेत काम करणारा नवरा हवा तेव्हा कावेरी एवढंच म्हणायची की तिला स्वतःला खूप हुशार नवरा हवा.

      महाविद्यालयातील शिक्षण पूर्णही नव्हते झाले त्यावेळीच अशा काही घटना घडल्या आणि कावेरी आणि कौशिक विवाहबंधनात अडकले. एकत्र कुटुंब, स्वतःचे शिक्षण, कौशिकचे सामाजिक काम, नातेसंबंध, आला गेला यात कावेरी पूर्ण गुरफटून गेली. आपल्या आई वडिलांनी ज्या चुका केल्या त्या आपण कधीही करायच्या नाही ही जिद्द बाळगून संसारासाठी ज्या ज्या गोष्टी, त्रास काढावा लागेल तो आपण काढायचा आणि संसार यशस्वी करून दाखवायचा असाच चंग तिने बांधला.

      ज्या शिक्षण संस्थेत कावेरी काम करायची तिथेच “काम्या” सुद्धा कामासाठी आली. दोघींची घनिष्ट मैत्री म्हणता येणार नाही परंतु काही काही गोष्टी ‘काम्याच्या’ कावेरीला आवडू लागल्या. कावेरीला स्वतःला दुचाकी आणि चारचाकी गाडी चालवता यायची नाही त्यामुळे ज्या स्त्रियांना ती छान चालवता येते त्यांच्याबद्दल कावेरीला प्रचंड अभिमान वाटायचा. गाडीची किल्ली फिरवत फिरवत ‘काम्या’ येणार, छान छान नवीन पद्धतीचे कपडे घालणार, पटकन तास घेणार आणि निघून जाणार. कावेरीला ह्या सगळ्याची खूप गंमत वाटायची. जमत एकेकीला अस तिला वाटायचं.

      ‘काम्या’ कावेरी काम करत असलेल्या संस्थेत आली आणि भुरकन दुसऱ्या संस्थेत कामासाठी निघून गेली त्यानंतर सुद्धा ‘काम्या’ने तीन चार संस्था बदलल्या. ‘कावेरी’ मात्र पंचवीस वर्ष झाली तरी एकाच संस्थेत प्रामाणिकपणे काम करत राहिली आणि मोठ्या पदापर्यंत पोहोचली.

      ‘प्रेमविवाहा’ पासून सुरु झालेला कावेरी आणि कौशिक यांचा संसार आता रौप्य महोत्सवाच्याही पुढे गेलेला होता. काम्या आणि कावेरी ह्या मैत्रिणी एकाच संस्थेत बरोबर कामाला. ‘कावेरी’ आजही तिथेच चिकटून तर काम्याच्या आतापर्यंत चार-पाच संस्था बदलून झालेल्या. या दरम्यानच्या काळात कौशिकची शैक्षणिक, सामाजिक उत्तरोत्तर प्रगती होत. ‘कौशिक’ एका मोठ्या संस्थेचा पदसिद्ध सदस्य बनलेला. तर ‘काम्याही’ पी.एच.डी. झालेली. डॉक्टरेट बनून सध्या कामातून संस्थेतून काम थांबवून घरुच राहिलेली.

      कावेरीच्या माहेरच्या नातेवाईकांना, तिच्या आते-मामे बहिणी, मैत्रिणी यांना तिच्या आणि कौशिकच्या संसाराचा खूप हेवा वाटायचा आणि त्याला कारणही तसेच होते, कौशिक आणि कावेरीने आयुष्यात केलेली प्रचंड प्रगती. त्यांची दोन्ही मुले खूप शिकलेली, समंजस आणि मुख्य म्हणजे सर्व नातेसंबंध छान टिकवून ठेवलेले हे कुटुंब. काही जण तर तोंडावर या बद्दल अनेकदा बोलूनही दाखवायचे.

      कावेरीच्या सर्वच मैत्रिणी कौशिकला छान ओळखत होत्या. त्यांच्याही सतत एकमेकांशी गप्पा-टप्पा चालू असायच्या. एक दिवस कौशिक कावेरीला म्हणाला अगं तुझी ती सतत संस्था बदलणारी मैत्रीण “काम्या” तिला परत संस्था बदलायची असेल ना तर सांग तिला आमच्या संस्थेत एक जागा आहे. आणि काय कौशिक काम करत असलेल्या मोठ्या संस्थेत ‘काम्या’ दाखलही झाली.

      संस्थेच्या कामानिम्मिताने कौशिक आणि काम्या यांचे फोन, भेटी, गप्पा घरी येणे सुरु झाले. स्त्री-पुरुष निखळ मैत्री, त्याचे अनुभव सुरुवातीपासून घेत असलेल्या कावेरीला हे काही नवीन नव्हत. अनेक स्त्रिया संस्थात्मक कामानिमित्ताने कौशिक बरोबर जोडल्या गेल्या होत्या. त्यांचेही नेहमी घरी येणे जाणे, फोन असायचे. कावेरी आणि कौशिक दोघेही ‘मुक्त’ ह्या विषयावर व्याख्याने द्यायचे. त्यांनी मुलांनाही स्वतंत्र विचार करून निर्णयक्षम बनवले. आपली मते कधीही त्यांच्यावर लादली नाहीत.

      एक दिवस पहाटे ’कौशिक’ कानात हेडफोन लावून काही तरी तल्लीन होऊन ऐकतांना कावेरीने पहिले. तिने विचारले ‘काय आज एवढ एकाग्र होऊन गझल ऐकता आहे का एखादी?’ कौशिक एकदम चमकला. अचानक आलेल्या ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्याला पटकन सुचलेच नाही. तरीही तिने पुन्हा विचारले तेव्हा कौशिक म्हणाला अग ‘काम्याने’ स्वतः एक गाण गाऊन त्याचा ऑडीओ मला पाठवला तो ऐकतं होतो. कावेरी, कौशिक आणि काम्या तिघेही उच्चशिक्षित असल्याने मैत्रीत पूर्णपणे मोकळीक होती.

      सुरुवातीला काही महिने काम्याचे कौशिकला येणारे फोन, संदेश सारे काही कावेरीला माहिती होते. त्यानंतर मात्र काम, कामाचा एक भाग म्हणून ‘काम्याचे’ फोन वरील संदेश, प्रत्यक्ष फोन यांची संख्या खूपच वाढली. त्यानंतर ‘WhatsApp’ द्वारे अनेक संदेशांची देवाण घेवाण जास्त प्रमाणात होऊ लागली. त्यानंतर मात्र वेगवेगळे स्वतःचे व्हिडीओ ‘काम्या’ बनवून कौशिकला पाठवू लागली. त्याचप्रमाणे कौशिक पण व्हिडीओ, सेल्फी, फोटो, वेगवेगळ्या स्टाईल असलेले कपडे आणि त्यांचेही फोटो फोनवरून पाठवायला लागला. त्याला प्रतिसाद म्हणून ‘काम्याही’ तिचे स्टायालिश कपडे असलेले फोटो कौशिकला पाठवायला लागली. हे सर्व कावेरी आणि तिच्या मुलांनाही समजू लागले. मात्र तरीही हा सुद्धा कामाचा एक भाग असेल, आपण काही त्या दोघांसारखे पी.एच.डी. थोडे आहोत, असे समजून कावेरीने त्याचेही काही मनावर घेतले नाही.

      एक दिवस घरातल्या एका महत्वाच्या प्रश्नावर काहीतरी बोलण्यासाठी कावेरी ‘कौशिक’ जवळ गेली तेव्हा तिच्या लक्षात आले की फोन मध्ये गुंग आहे आणि पटापट फोनवरून काही पाठवतो आहे. काही डिलीट करतो आहे. म्हणून ती तिथेच उभी राहिली, त्याबरोबर कौशिक तिच्यावर खेकसला आणि म्हणाला ‘काय हे रोजचे, तुला एवढे सुद्धा मॅनेज करता येत नाही? (सांभाळता येत नाही)’. कावेरीला कळेना की आपले असे काय चुकले?

      हळू हळू दूरध्वनीची संख्या (काम्या आणि कौशिक यांच्या) चार ते पाच यावरून वीस ते पंचवीस पर्यंत गेली. ‘ WhatsApp’ वरून बोलण्याच्या वेळा कावेरीच्या लक्षात यायला लागल्या. आता कावेरी कौशिकला प्रत्येक वेळी ‘कोणाशी बोलतो आहेस? काय चालले आहे तुझे? कोणते काम सुरु आहे?’ असे सतत विचारायला लागली. मधून मधून त्याचा दूरध्वनी तपासायला कावेरीने सुरुवात केली. तेव्हा अनेक आक्षेपार्ह गोष्टी तिच्या लक्षात आल्या. अनेक वेळा कौशिक आता कावेरीशी खोटे बोलू लागला. त्याने फोन मधील ‘काम्याचे’ नाव बदलून तिच्या नंबर वर वेगवेगळ्या त्याच्या मित्रांची नावे सेव्ह केली. काम्यानेही स्वतःचे दूरध्वनी नंबर दोन, तीन नवे घेतले. अनेक वेळा आता कावेरी आणि कौशिक यांच्या संसारात ‘संवाद ‘ कमी आणि वादविवाद जास्त असेच सुरु झाले. कावेरीला वाटायचे की आपण तिघेही एकमेकांचे छान मित्र मग असे काय झाले कि काम्या आणि कौशिक आपल्याला एकदम परके होऊन गेले. कौशिकनेही आता कावेरी समोर स्वतःचे नवे रूप दाखवले. जेव्हा जेव्हा कावेरी त्याला ‘काम्याच्या’ आक्षेपार्ह फोटो व संदेशाबद्दल बोलायची तेव्हा तेव्हा तो फोन आपटायला लागला, डोके आपटून घ्यायला लागला. स्वतःच्या मुलांची खोटी शप्पथ सुद्धा घ्यायला लागला. फोनचे लॉक दररोज कसे उघडायचे हे सुद्धा बदलून ठेवायला लागला. काम्या आणि कौशिक यांचे फेसबुकवरही स्पेशल फ्रेंड (खास मित्र) ह्यातही खूप काही देवाण घेवाण व्हायला लागली.

      कावेरी आता स्वतःच्याच विचारात राहायला लागली. स्वतःला कमी लेखू लागली. आपल्यातच काही उणीव आहे म्हणून ‘२८’ वर्षाच्या संसाराला आपला नवरा कंटाळला असे तिला वाटायला लागले. ती आता सतत आजारी राहायला लागली. ‘कावेरी’ आणि ‘कौशिक’ यांच्यातील तणावलेले संबंध मुलांच्याही लक्षात आले.

      दोन्ही मुलांची लग्न होऊन त्यांच्या संसारात मुले सुखावली असे असतांना, मुलांना आपले दुःख असे सांगावे, आपला कमीपणा असा सांगावा असा विचार करत असतांना मुलेच तिला म्हणाली ‘आता तरी निर्णय घे आई’. हो हो ‘निर्णय’. खरेच स्वतःच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा ‘कावेरीने’ माझ्या संसारात असे होऊ देणार नाही असा निर्णय तर तिने लग्न करतानाच घेतला होता. खरेच तिला आज काय चूक, काय बरोबर काहीच उमगत नव्हते. कारण जवळपास ८० पेक्षा जास्त वेळेस कौशिक तिच्याशी खोट बोलला आणि वागला होता, वागत होता. स्त्री-पुरुष मैत्रीच्या नात्याला दिलेली मोकळीक हा कावेरीचा निर्णय चूक होता? कौशिकने समाज बदलाबाबत दिलेली व्याख्याने फक्त बाहेरच्या समाजापुरती होती? त्याच्या स्वतःच्या संसाराबाबत नव्हती? मुलांनी सांगितले त्याप्रमाणे ‘निर्णय’ घे आई, तेव्हा ती कोणता ‘निर्णय’ घेणार होती. तीचा कोणताही निर्णय तिच्या मुलांच्या संसाराला त्रासदायक होणार होता. समाजासमोर कावेरी आणि कौशिक यांचा बाहेरून सुंदर, छान दिसणारा संसार तिच्या एका निर्णयाने ‘उध्वस्त’ होणार होता. विहिणी, व्याही, सगेसोयरे, आप्त-इष्ट यांचे बरोबरचे संबंध जीवापाड तिने जपले. प्रत्येकाच्या अडीअडचणीला ती मदतीला धावली ह्या सगळ्यांपासून हा निर्णय तिला दूर नेणार होता.

      आणि या सगळ्यात ‘काम्याला’ काहीच फरक पडणार नव्हता. तिचे सगळे कार्यक्रम त्याच पद्धतीने व्यवस्थित सुरु होते. आज कावेरीला कळून चुकले होते, फक्त पी.एच.डी. झाले म्हणजेच माणसे हुशार होतात, समजदार होतात हा तिचा भ्रम आता निघून गेला होता. हुशार माणसांबद्दल नितांत आदर आणि प्रेम असलेल्या कावेरीला मात्र त्याच व्यक्तींबद्दल काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न पडला होता.

      अचानक काही तरी डोक्यान चमकून गेले. श्री. खळे काकांच्या कवितेतल्या कुरूप बदकाला तो ‘राजहंस’ आहे असे कळले, तसेच काहीसे झाले. कावेरीने अनेक संदेशात्मक पथनाट्ये, कथा, कविता लिहिलेल्या. स्वतःची प्रतिभा सिद्ध केली. तिला आता कौशिक आणि काम्या किती फोटो पाठवतात, एकमेकांना किती चोरून भेटतात याचा काहीच फरक पडत नव्हता कारण याचा विचार करायला तिच्याकडे वेळच नव्हता. तीच साध्य, तीच उद्दिष्ट तिच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होत आणि ती त्यासाठी सिद्ध झाली आणि तिचा ‘निर्णय पक्का झाला’...


Rate this content
Log in