तो एक क्षण ( भाग ३ )
तो एक क्षण ( भाग ३ )


सलील आता सावरला. कठोर मानाने त्याने घरात पाऊल ठेवले. प्रशांतच्या बाबांना जेवण भरवून त्याची आई आवराआवर करत होती. अपघातास आता एक आठवडा झाला होता. बाबांची तब्येत आता बरी होती. सलील ला पाहून त्यांचा चेहरा प्रसन्न झाला; परंतु त्याच्या चेहऱ्यावरची अस्थिरता आईने मात्र टिपली. ती हळूच पुढे झाली आणि प्रशांत विषयी नानाविध प्रश्न विचारू लागली. तरीही सलील शांतच. त्याने हाताची मूठ घट्ट आवळली आणि निर्धार केला. झाल्या सर्व प्रकाराविषयी त्याने सांगून टाकले. त्या माता पित्याजवळ आता बोलायला शब्दच उरले नाहीत. इतक्या वेळ उत्कंठेने विचारणारी आई क्षणात शांत झाली. कंठ दाटून येईपर्यंत ओरडावे. आकांत करावा. टाहो फोडावा असे तिला वाटले.पण तरीही ती शांतच. चूक नक्की कोणाची ह्या प्रश्नात ती हरवून गेली. बाबा मात्र मुसमुसत रडत होते. हे सर्व पाहून सालीलच्या डोळ्यांसमोर स्वतःचे आईवडील उभे राहिले. आपण आयुष्यात किती मोठा गुन्हा करत आहोत याची त्याला जाणीव झाली. पापीपणाची भावना मनात दाटून आली आणि त्याने तेथून काढता पाय घेतला . दुसऱ्या दिवशी प्रशांतच्या आईबाबांना घेऊन त्याने हॉस्पिटल गाठले. खोलीत पोहोचल्यावर त्यांनी अगदी प्रशांत कडे धावत घेतली. ते सर्व पाहून प्रशांत मात्र दचकलाच .आईने त्याला मिठी मारली. ती त्याच्या सर्वांगाला गोंजारु लागली. संध्याकाळी परतल्यावर पक्षिण जशी पिलांना पंखांखाली घेते तसे तिने त्याला कुशीत घेतले. वडिलांनी त्याचा हात हातात घेतला. कोणी काहीच बोलत नव्हते. संपूर्ण शांतता. केवळ हुंदक्यांचा आवाज तेवढा येत. होता. सलील आणि प्रिया बाहेर येऊन थांबले. डॉक्टरांशी बोलले परंतु त्याच्या तब्येतीत काही सुधार नव्हता. त्या दिवसापासून हॉस्पिटलमध्ये खेटा सुरु झाल्या. आई बाबांचीही त्यांच्या पद्धतीने सुश्रुषा चालू होती. डॉक्टरांचेही प्रयत्न चालू होते. सलील न प्रियाशी त्याची ओळखही झाली. त्या दोघांची मैत्रीही त्याने जवळून पहिली. मुळातच असलेल्या स्वभावामुळे प्रिया त्याचीही काळजी घेऊ लागली. त्यालाही आपल्या आयुष्यात अशी एखादी मैत्रीण हवीहवीशी वाटू लागली . दिवस सरत होते पण प्रशांतची तब्येत अजूनच खालावत चालली होती. बघता बघता १० दिवस लोटले पण सुधारणा नाही.
एक दिवस अचानक सलीलला हॉस्पिटल मधून फोन आला. प्रिया आणि तो धावतच तिकडे गेले. प्रशांतची अवस्था आता पाहावेनाशी झाली होती. त्याने सलील ला जवळ बोलावले. आईबाबांच्या न स्वतःच्या घेतलेल्या काळजीविषयी आभार व्यक्त केले आणि सोबत एक वाचनही मागितले. कुठलाच विचार न करता सलिलने ने मान्यही केले. ” पण मित्रा एक सांगू ? काश माझ्या आयुष्यातही एक सावरणारी प्रिया असती !!” एवढे बोलून प्रशांतने शेवटचा श्वास सोडला. एका रंगीबेरंगही दिसणाऱ्या दुनियेचा शेवट हा असा होता.
ह्या सर्व घटनांना आता १० वर्ष उलटून गेली आहेत. सलील अन् प्रशांतची आई बाबा एकाच घरात राहतात . ह्या ‘आपल्या’ घराला सलील ने अगदी जबाबदारीने सांभाळले आहे. व्यसनांच्या अधीन गेलेल्यांसाठी दोघांचेही बाबा कार्यशाळा राबवतात. आई रुग्णालयात असणाऱ्यांची सेवा करतात. प्रिया …. अजूनही तशीच आहे. तितकीच अल्लड, तितकीच हसरी, समजूतदार न सलीलची तितकीच काळजी करणारी. त्याच्या प्रत्येक संकटात आणि सुखदुःखात त्याच्या सोबत असणारी. परंतु त्याची अर्धांगिनी म्हणून नाही. तर तशीच त्याची जुनी मैत्रीण म्हणून. हा निर्णय त्या दोघांचाच होता. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘पार्टनर’ आहेत ते .
खरंच ‘तो एकच क्षण’ पण सर्वांचंच आयुष्य त्याने बदलून टाकलं !!!!!