तो आणि ती - "विश्वास!"
तो आणि ती - "विश्वास!"
थोडी थंडी थोडा पाऊस आणि प्रचंड ऊन काय विचित्र वातावरण होतं त्या दिवशी. मला भुक लागली होती. रिसेसनंतर लेक्चर नव्हते. वेळ होता आणि त्याला भेटाव असंही वाटत होतं. पण नको, मागे भेटले होते तेव्हाचा प्रश्न आजही आमच्या दोघात होता. असो भुक लागलेली असतांना त्याचा विचार म्हणजे जेवणाला राम-राम. कारण मनाला त्याची काळजी सतावायची मग घास गळ्यातून खाली उतरत नसायचा. पण भुकेने विजय मिळवलाच शेवटी, so मी आणि मैत्रिणी एका कॅफेत गेलो. उत्तम होता कॅफे, कोपर्यातली जागा बघुन आम्ही बसलो. ऑर्डरही दिली. मात्र काही क्षणात माझी भूक गायब झाली.
समोरच्या जागेत तो बसलेला होता. त्याला मी सहजासहजी दिसनार नव्हते मात्र तो मला स्पष्ट दिसत होता. ब्लॅक जिन्स्, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कोटमध्ये तो प्रायव्हेट टेबलवर बसला होता. शांत पण हसुन तो समोरच्या व्यक्तीसोबत बोलत होता. तो कोणासोबत होता हे मात्र मला दिसले नाही. पण तो बर्याच वेळापासुन तिथे असावा. एका क्षणाला वाटलं कि जाऊन बोलाव पण नको त्याला नाही आवडनार.
काही वेळात तो बाहेर आला. मी तिथे आहे हे त्याला कळलेही नसेल. पण मागुन एक सुंदर मुलगी बाहेर पडली. ती हसुन त्याला bye करुन निघुन गेली. तो ही एक पार्सल घेऊन त्याच्या brezza मधुन निघुन गेला. त्याने मला पाहिले? नाही? त्याला मी इथे आहे हे ही समजले नाही ?माझा राग अजुन वाढला.
एकतर कधी हा बाहेर भेटत नाही. आणि आज एका मुलीसोबत कॉफीशॉपमध्ये. बस यापुढे याला भेटायचही नाही आणि विचारायचही नाही. माझे डोळे भरले होते. मला राग आला होता वाईट वाटलं होतं कि अजुन काही माहित नाही. मी तशीच काही न खाता तिथुन निघाले. मैत्रिणींना काहीतरी बिनसलं एवढचं कळलं त्यामुळे त्यांनीही काही विचारलं नाही.
मी माझ्या घराकडे निघाले पण गाडी त्याच्या घरासमोरच थांबली. मी विचारात त्याच्या घरासमोर आले होते. दरवाजा उघडा होता. त्याची brezza बाहेरच होती म्हनजे तो घरात होता, पण ती मुलगी ती ही असेल का? मी स्कार्फ काढुन आत गेले. आजही गुलाब बहरलेलं होतं. दरवाज्यातुन आत गेले, पडदे आज सौम्य रंगाचे होते. पुरेसा उजेड हॉलमध्ये होता. समोर टिपॉयवर तेच पार्सल होतं. तो कदाचित किचनमध्ये होता. मी आवाज न करता आत आले होते.
'खाऊन घे आधी, तुला भुक नाही सहन होत,' तो किचनमधुनच ओरडला. (कोनाला? मला कि अजुन कोणाला? ती मुलगी ति इथचं आहे का?)
'पिऊ. . . . .' -तो हळुवारपणे पुन्हा म्हणाला. म्हनजे तो मलाच बोलत होता.
पुढच्याच मिनिटाला तो दोन कप चहा, प्लेटस् घेऊन बाहेर आला. त्याने कोट सोफ्याच्या बाजुला ठेवला होता. मी त्याच्या पासुन तोंड फिरवुन खुर्चीवर बसले. तो गालातच हसला. त्याने पार्सल उघडुन पॅटीस प्लेटमध्ये काढले. 'खाऊन घे आधी' तो थोडा जरब देऊन बोलला. मी ही आधी खाऊन घेतलं. भुकही लागली होती आणि या चा काही भरवसा नाही कधी याला कशाचा राग यायचा.
'निधी...' - तो
'ती कॅफेतली मुलगी' मी अधिरपणे विचारलं.
'ऐकनार आहेस कि...' तो वैतागुन म्हनाला.
'सॉरी' मी मान खाली घालून बोलले. तो मात्र गोड हसला.
निधी, ७ वर्षाची. मामा मामी आणि आजीसोबत राहते. शाळेतही हुशार आहे. तिचे आई वडील दोन वर्षापुर्वी अपघातात गेले. तेव्हापासुन आजोळी राहतेय. पण एक वर्षापासून तिच्या कस्टडीसाठी तिचे काका काकु झगडतायेत, कारण आहे तिची अमाप संपत्ती. तिचा जो कोणी लिगल गार्डियन असेल, त्यालाच अधिकार असेल ती सज्ञान होईपर्यंत. निधीची कस्टडी घेऊन त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आणि ती सज्ञान झाल्यावर सगळं काही नावावर करुन घ्यायचं असा डाव होता तिच्या काकांचा. पण अखेर निधीचे मामा केस जिंकले आणि निधी पुन्हा तिच्या आजोळी गेली.
'मी भेटु शकते निधीला?' मी अनावधानाने विचारलं.
'ती नाशिकला गेलीये कायमची. पण हो कधी आली इकडे तर तुला नक्की भेटवील.' त्याने मला आश्वस्त केलं.
'हल्ली नाते ही किती कमकुवत झालेत ना. पैसा संपत्ती यापुढे सगळं फिकं वाटतं लोकांना. नाते आपुलकी पैश्याच्या तराजुत मोजतात लोकं. आणि प्रेम ते तर उरलचं नाही कुठे. नात्यातुन विश्वास हरवत चाललाय.'
शेवटचं वाक्य मला कुठेतरी खटकत होतं. तो स्वतःच्या धुंदित बोलत होता. मी मात्र मान खाली घातली. त्याने दोन क्षण जाऊन दिले.
'सुनिता' तो एकदम म्हणाला. मी न समजुन वर पाहिल.
'कॅफेतली मुलगी.' त्याने मोहक स्मित करत उत्तर दिलं.
'मी विचारलं?' मी अजुनही रागात होते.
'निधीच्या मामाची वकील. मला माझ्या रिसर्चसाठी गायडन्स हवा होता म्हणून भेटलो होतो.' तो शांततेत बोलत होता.
'सॉरी' मी फरशीकडे पाहत बोलले.
'नात्यात विश्वास हवा.' तो माझ्याकडे रोखुन पाहत बोलला. मी मात्र त्याच्या नजरेला नजर देऊन माझा प्रश्न विचारत होते. माझा रोख ओळखुन त्याने विषय पालटला.
'एवढी रागात होतीस की नवीन पेंटिंग पाहिलीही नाही.' तो उजवा हात समोरच्या भिंतीवर दाखवुन म्हणाला.
मी क्षणभर स्तब्ध झाले. त्याने कागदावर तो प्रसंग रंगवला होता जेव्हा आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो होतो. तेच रंग तेच भाव अगदी त्या पुस्तकांची नावेही. माझ्या चेहेर्यावरचा तो भावही. 'तुझ्या एवढा कसा लक्षात हा क्षण?' मी आश्चर्याने त्याला विचारलं.
'पिऊ...काहीही झालं ना तरी मी कधीच हा क्षण विसरनार नाही. ती चिडचिडी मुलगी जिच्यावर मी.....'
तो शांत झाला त्याने वाक्य पूर्ण नाही केले. माझी नजर त्याला ते पूर्ण करायला विनवत होती पण त्याने नेहमीप्रमाणे संयम राखत माझं उत्तर मला दिलं नाही. मी प्लेटस् किचनमध्ये घेऊन गेले. तो अजुनही विचारात होता. मी बॅग घेऊन निघाले.
'तुला न आवडनार्या गोष्टी माझ्या आयुष्यातून मी हद्दपार करत राहील. मग अगदी माझं अस्तित्व संपलं तरी' तो मनापासून बोलत होता.
'का? मी का एवढी इम्पॉर्टन्ट आहे तुझ्यासाठी?' मी विचारलं.
त्याने एक थंड श्वास सोडला आणि तडक उठून जिन्यातून वर गेला. मी ही हळूवारपणे बाहेर आले. एका गुलाबाचा मन भरुन सुवास घेतला. शेजारीच सुकलेल्या जास्वंदाला बाटलीतलं पाणी घातलं आणि घराकडे निघाले. मी नजरेआड होईपर्यंत तो मला पाहत होता हे न पाहताही समजलं होतं मला...

