STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Abstract

4  

Pratibha Tarabadkar

Abstract

Time Machine

Time Machine

4 mins
2

     आपल्याला कल्पनाविस्तार नावाचा मराठी भाषेतील निबंधाचा एक प्रकार असे. सूर्य उगवला नाही तर, मी मुख्यमंत्री झालो तर वगैरे वगैरे तशीच एक फॅंटसी पण असे.टाईम मशीनमध्ये बसून भूतकाळात आणि भविष्यकाळात सफर करून त्यावर अनुभव लिहायचे.अर्थात काल्पनिक! जसजसे आपण वयाने अधिक होत जातो तसतशा पूर्वीच्या आठवणी आपल्या मनात पिंगा घालू लागतात.काही चांगल्या, काही वाईट.... माझ्या मनात तीन अशा घटना आहेत ज्या आठवल्या की मन अस्वस्थ होतं, कातर होतं, वाटतं, खरंच टाईम मशीन असतं तर मी त्या घटनेचं स्वरूप बदललं असतं! माझं लहानपण मुंबईत गेलं, बऱ्यापैकी आर्थिक परिस्थितीमुळे कधी कमतरतेचा चिमटा बसला नव्हता.सिग्नलवर, देवळाबाहेर तोंड वेंगाडणारे,आपण दिसताच चेहऱ्यावर केविलवाणे भाव दाखवून आपल्यापुढे हात पसरणारे भिकारी आणि अधूनमधून त्यांच्या भक्कम कमाईच्या, आलिशान घरांच्या बातम्या पेपरमध्ये वाचून त्यांच्याबद्दल कधी कणव वाटली नव्हती. एका दिवाळीत सासरी गावी गेल्यावर फराळाच्या पदार्थांनी डबे भरगच्च भरले होते,घरभर त्याचा सुवास पसरला होता आणि भर दुपारी एक स्त्री दाराशी येऊन उभी राहिली.ठिगळं लावलेली साडी,डोईवर पदर,कडेवर लहान बाळ आणि हाताशी एक सात आठ वर्षाचा मुलगा! 'ताई,या पोराला काहीतरी द्या ना,लै भुकेला आहे तो!'तिच्या चेहऱ्यावर केविलवाणा भाव होता.तो लहान मुलगा मोठ्या आशेने माझ्याकडे बघत होता.पण मुंबईत भिकाऱ्यांचा अनुभव घेतलेल्या मी पटकन तिला नाही म्हटलं आणि हाकलून दिले 😔 दोघे बिचारे हिरमुसलेल्या चेहऱ्याने पुढच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. 'बरं झालं त्यांना हाकललंस ते!या माणसांचा काही भरवसा नाही! चोरी करण्यासाठी टेहळणी करायला सुद्धा येतात ही माणसं!'घरातील अनुभवी माणसांनी सांगितलं पण माझ्या डोळ्यासमोरून तो हिरमुसलेल्या चेहऱ्याचा चिमुरडा काही जाईना! काय हरकत होती दोन लाडू, चकल्या,शेव चिवडा दिला असता तर! पुढे भटक्या विमुक्त जाती जमातींचे साहित्य वाचले आणि त्यांचा जीवन संघर्ष बघून मुळापासून हादरले आणि राहून राहून वाटू लागले, तो छोटा मुलगा,त्याची आई त्यामधील असतील तर?मन अस्वस्थ होतं,त्यांचे ते कोमेजलेले चेहरे डोळ्यासमोर येतात आणि उदासीनता येते.मनाची अशी अवस्था झाली की... मी माझ्या मनातील टाईम मशीनमध्ये प्रवेश करते, पंचवीस वर्षे मागे जाऊन त्या मुलाला आणि त्याच्या आईला पोटभर फराळाचे पदार्थ खाऊ घालते.त्यांचे तृप्त झालेले चेहरे बघून भरून पावते.पण ते क्षणभरच! अजूनही मनाचे समाधान काही होत नाही! दुसरा प्रसंग आहे पंढरपूरचा! त्याकाळी देवळात इतकी गर्दी नसे.आम्ही विठोबा रखुमाईचे दर्शन घेऊन बाहेर आलो.देवळाच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक तेथे तैनात होते,लाकडी काठ्या घेऊन खुर्चीवर बसलेले ! एक अंध वारकरी चाचपडत देवळाची भिंत शोधत होते.बुक्का लावलेले, माळकरी बाबा!तोंडाने विठोबा माऊलीचे अखंड नाम घेत! त्यांना बघून ते सुरक्षारक्षक उठले आणि त्यांनी त्या बाबांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली.आजूबाजूला दर्शन घेणारे भक्त होते पण एकालाही वाटलं नाही की आपण त्या रक्षकांना जाब विचारावा! मी ते दृश्य पाहून अस्वस्थ झाले होते पण त्या बाबांना सुरक्षारक्षकांपासून सोडविण्याचे धाडस झाले नाही.बिचारे ते अंध वारकरी किती लांबून आले असतील माऊलीला उराउरी भेटायला आणि त्यांना अशी वागणूक?पण मीसुद्धा नुसतीच अस्वस्थ झाले! त्या रक्षकांना जाब विचारायची कृती का केली नाही?ती आठवण आली की मी पुन्हा पुन्हा उदास होते.त्या अंध बाबांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येतो. असं वाटतं,जर टाईम मशीन असतं तर मी त्यात बसून परत एकदा भूतकाळात गेले असते, त्या अंध बाबांचा हात धरून त्यांना देवळात अगदी विठोबा समोर उभे केले असते!पण.... तिसरा प्रसंग आहे चार पाच वर्षांपूर्वीचा! कुठेतरी लांबच्या प्रवासाला निघाले होते, एकटीच! सामानाचं ओझं सांभाळत कल्याण स्टेशनवर उभी होते.उन्हाळ्याचे दिवस होते, सूर्य प्रखरतेने तळपत होता.गाडीची वाट बघत सारेजण घामाघूम होऊन रुमालाने घाम टिपत होते.माझी नजर थोड्याच अंतरावर उभ्या असलेल्या चार पाच मुलांवर गेली.त्यांच्या कपड्यांवरून ती मुले भिकारी वाटत होती.लोकांनी खाऊन फेकून दिलेले आईस्क्रीमचे कप चाटत होती आणि खुशीने खिदळत होती. ते दृश्य पाहून मला किळस आली.'काय रे मुलांनो,ते लोकांनी फेकलेले कप काय चाटताय?'मी त्यांच्यावर डाफरले.ती हिरमुसलेली मुले आपल्या अंगावरच्या चिंध्या सावरत दूर गेली.मी विजयी भावाने इकडे तिकडे पाहू लागले. गाडी प्लॅटफॉर्मवर आली, गर्दीतून वाट काढत मी गाडीत चढून आपल्या सीटवर बसले.गाडी सुटली. अचानक माझ्या मनात विचार आला, माझ्याकडे पैसे होते,समोरच आईस्क्रीमचे दुकान होते मग मी का नाही त्या मुलांना आईस्क्रीमचे कप विकत घेऊन दिले?नुसतीच भाषणबाजी का केली? त्या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद पसरला असता जर त्यांना अख्खा आईस्क्रीमचा कप खायला मिळाला असता तर!का माझ्या लक्षात आलं नाही? अस्वस्थता वाढली की मी मनातल्या मनात माझ्या टाईम मशीनमध्ये शिरते आणि कल्याण स्टेशनवर पोहोचते.तिथल्या प्लॅटफॉर्मवर आईस्क्रीमचे उष्टे कप चाटणाऱ्या मुलांना समोरच्या दुकानात घेऊन जाते आणि एक एक कप त्यांच्या हातात ठेवून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद निरखते. मला कल्पना आहे की हा केवळ एक कल्पना विलास आहे पण मनात उठणारे उदासवाणे तरंग त्यामुळे काहीसे कमी होतात. चर्चमध्ये एक confession box असतो असं ऐकलं आहे.मनातील अस्वस्थ भाव व्यक्त करायची ती सुविधा आहे.मनावरील बोजा काही प्रमाणात कमीही होत असेल त्याने! माझे सुद्धा टाईम मशीन हे confession box आहे ज्यामुळे माझी अपराधी भावना काही प्रमाणात कमी होते. आज मी या विषयावर प्रथमच व्यक्त झाले जी भावना माझ्या मनात कायम ठुसठुसत होती.बाकी आपण वाचक सूज्ञ आहातच!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract