STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Abstract

4  

Pratibha Tarabadkar

Abstract

काय भुललासी वरलीया रंगा

काय भुललासी वरलीया रंगा

3 mins
0

   ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा l चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा l लहानपणी आपण शिकलेला संत चोखामेळा यांचा हा अभंग!वय लहान असल्याने त्याचा भावार्थ शिकवला होता तरीही माझ्या परीक्षार्थी मनाने त्याचा खोलवर अर्थ न समजता त्याची उत्तरे लिहीण्यातच रस घेतला होता. जसं जसं आपण मोठे होतो, जगातील वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होतो तेव्हा आपोआपच आपल्यात प्रगल्भता येते, अभंगातील दाखल्यांशी आपण संबंध जोडू लागतो. नमनाला घडाभर तेल ओतून झाले आहे.आता पुढची गंमत सांगते. आम्ही दहा बारा मैत्रिणी दक्षिण कर्नाटकात गेलो होतो.त्यातील एक मैत्रीण राधिका त्याच भागातील असल्याने ट्रीपची आखणी, बुकिंग वगैरे तिच्याकडेच सोपवले होते.अतिशय प्रामाणिक अशा आमच्या मैत्रिणीने संपूर्ण ट्रीपचा आराखडा, बुकिंग वगैरे करून आमच्या समोर ठेवला. 'उडुपीला भक्त निवास मध्ये रहायचं? तिथे हॉटेलं नाहीत का?'एकीने नाराजीने विचारले.इतरजणींनी तिची री ओढली.राधिका बिचारी गप्प बसली. प्रत्यक्षात जेव्हा आम्ही भक्तनिवास पाहिले तेव्हा आश्चर्याने थक्क झालो.इतकं आधुनिक आणि स्वच्छ भक्तनिवास? संपूर्ण भक्तनिवास आरशासारखं चकचकीत!नवी कोरी लिफ्ट, इतर साऱ्या सुविधा भक्तनिवासात उपलब्ध होत्या! शिवाय समोरचा छोटा रस्ता ओलांडला की डायरेक्ट उडुपी कृष्णाच्या देवळात! इतकी छान व्यवस्था बघून साऱ्या मैत्रिणी खूप खुश झाल्या. राधिकाच्या लक्षात आले की यांना सगळं पॉश पाहिजे आहे म्हणून वेगवेगळ्या मॉडर्न हॉटेलमध्ये ती नेत होती.पण एक दिवस असा आला की आम्ही आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघून परत आलो.प्रचंड दमलो होतो आणि भूकही लागलेली होती पण का कोण जाणे,तिथली सारी हॉटेल्स बंद होती.आता काय करायचं? सगळ्यांना प्रश्न पडला. 'मी एक सांगू का?'राधिकाने चाचरत विचारले,'हे समोरचे हॉटेल उघडे आहे, तिकडे जायचं का?' 'ते समोरचं हॉटेल?'साऱ्याजणी चित्कारल्या. ते समोरचे हॉटेल कसलं, कौलारू छप्पर असलेले एक कोंदट,अंधारी टपरी होती.प्लायवुडची बाकडी असलेली! दररोज सकाळी कामगार सदृश माणसं हातात कापडी पिशवी घेऊन या 'हॉटेलमध्ये ' नाश्ता करायला येत.या ठिकाणी आपण जायचं?सगळ्यांचा हिरमोड झाला.पण नाईलाज होता.वेडीवाकडी तोंडे करत सगळ्याजणी त्या टपरीतील प्लायवुडच्या बाकड्यांवर बसल्या.छोटेसे हॉटेल असल्याने फार पदार्थ नव्हते पण जे होते त्यापैकी प्रत्येकीने काहीतरी मागवले.प्लॅस्टीकच्या प्लेटमध्ये वाढून त्या मालक कम वेटरने आमच्यासमोर आणून ठेवले.तोंडात चमचा घातला आणि......आहाहा, काय ती चव! केवळ अप्रतिम! आनंदाने उजळलेल्या चेहऱ्याने प्रत्येकजण समोरील खाणं अक्षरशः ओरपत होत्या.उपमा म्हणू नका,अननसाचा शिरा म्हणू नका,उडुपी बन,मेदूवडा, डोसा.......काय काय मागवले याची गणतीच नव्हती! त्या बिचाऱ्या मालकाची धांदल उडाली.त्याला कळेना या शहरी बायका आपले पदार्थ इतक्या आवडीने का खाताहेत! सगळ्यांनी राधिकाला बोल लावले, आधीच का नाही इथे नेलंस आम्हाला म्हणून! राधिका म्हणाली, तुम्हाला सगळं पॉश पाहिजे होतं ना,जर इतर हॉटेल्स बंद नसती तर तुम्ही या टपरीत आला असता का? बरोबर होतं ना तिचं म्हणणं! आम्हीच 'वरलीया रंगा 'वर भुललो होतो ना! 'अहो,ही इतकी हिरवी लिंबं कशाला आणलीत?'मिस्टरांनी बाजारातून खरेदी करून आणलेली टपोरी लिंबं त्यांच्यासमोर नाचवत मी विचारलं. 'ती लिंबं नाहीत,संत्री आहेत,'अपराधी स्वरात मिस्टर म्हणाले.'बिचाऱ्याचं सकाळपासून एकही संत्र कुणी घेतलं नव्हतं,त्याने विनवणी केली मग मला नाही म्हणवेना म्हणून....' ती डझनभर संत्री बघून मी कपाळाला हात लावला.आता संपवणं भाग आहे.ते लिंबाएव्हढं संत्र सोलून मी खाऊ लागले आणि काय आश्चर्य,आपण लहानपणी ज्या लिमलेटच्या गोळ्या खात होतो अगदी तशाच चवीचं ते संत्र होतं.मी ती चिमुकली संत्री सोलून एक मिस्टरांनासुद्धा दिलं. 'किती छान चव आहे हो यांची!' मिस्टरांनी मान हलवून संमती दर्शवली.बायकोच्या लेक्चर पासून सुटका झाली याचा आनंद त्यांना लपवता येत नव्हता! त्यातून त्यांनी विक्रेत्याला सहानुभूती दाखवून आणलेली संत्री खरंच उत्कृष्ट निघाली होती! बघा, म्हणजे संत चोखामेळा यांनी किती पूर्वी म्हटलं होतं,'काय भुललासी वरलीया रंगा 'हे अजूनही किती चपखल बसते आहे! आपण वरवर बघितलेल्या गोष्टींवरून किती पटकन मत ठरवतो!आपण आता ही सवय बदलली पाहिजे ना! तुमचीही कधी अशा वरवरच्या रुपावरून फसगत झाली आहे का? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract