"ती" एक प्रेरणा
"ती" एक प्रेरणा
जेमतेम सहवीस सत्तावीस वर्षाची, साधारण सावळ्या रंगाची, चार फूट उंचीची, भुऱ्या डोळ्यांची, निस्तेज चेहऱ्याची, स्वभावाने गरीब आणि परिस्थितीने पिचलेली अशी मीरा दारात येऊन म्हणाली, "ताई ब्लाऊज, ड्रेस काही शिवायचं आहे का तुमचं?" नेहमी साड्या,ड्रेस किंवा जुने कपडे दान द्या अस मागणारे हात बघितले पण ही काहीतरी वेगळंच मागत होती. आजीने विचारलं का ग तू का अस विचारतेस? ती म्हणाली,"मी ब्लाऊज, ड्रेस शिवते...आताच सुरू केलंय. अजून कुणाला फारसं माहीत नाही म्हणून अस घरोघरी जाऊन विचारते...चांगलं शिवते मी ताई. बघा की एकदा माझ्याकडून शिवून...आवडल तुम्हाला मग परत पण माझ्याकडेच याल." तिच्या बोलण्यातून तिची तळमळ दिसत होती. अगदी पोटतिडकीने विनवणी करताना ओठावरील हासू सोबत डोळ्यात आलेलं पाणी लपलं नाही. भर उन्हात एक पोर काकेला आणि एक हातात घेऊन फिरत होती...घरात बोलवून पाण्यासोबत चार घास खायलाही दिले. परक्यांनी दाखवलेली एवढी काळजी पाहून हुंदका आवरला नाही तिला.
"माझं लग्न बापाने करून दिल सोळाव्या वर्षीच.माझी पण शिकायची खूप इच्छा होती पण दोन बहिणी लग्नाच्या मागे आणि आई बापाच हातावरल पोट....अशात दोन तीन एकर शेती, मोठं घर,दावणीला दुभती जनावरं अस स्थळ समोरून आल्यावर बापासमोर शिकण्याची इच्छा बोलून दाखवायची हिंमत राहिली नाही. दहा वर्षे मोठा असणाऱ्या पुरुषासोबत लग्न करून सासरी आले..नव्याचे नऊ दिवस संपले आणि दिवस रात्र शेतात कामाला जुंपल. आपलीच शेती करायला कमीपणा वाटत नव्हता पण माणूस म्हणून एक सून म्हणून बायको म्हणून मला काडीचीही किंमत नव्हती. घरात ,शेतात आणि उरलं सुरल नवऱ्यासोबत राब राब राबायचंच फक्त. दोन मुलींनंतर वंशाच्या दिव्याचा हट्ट कोणी सोडायला तयार नव्हतं म्हणून अशक्त अंगाने वंशाला जन्म दिला. प्रपंच ऊन पावसाळे झेलत चाललेला तर शेतात दुष्काळाने पीक पिकत नव्हतं. यातच कर्जबाजारी झालेल्या माझ्या नवऱ्याने आत्महत्या करून स्वतःला या चक्रातून सोडवलं आणि मला कायमच अडकवल.
माझ्या पोरांसाठी मी अडकण नाहीच म्हणत याला...असा डाव सोडून...पोरांना पोरकं करून जाणं मला तरी जमणार नाहीच. सासुसासरे थकलेत...शेती गेली...आता मलाच आधार होऊन सगळं सांभाळायचं आहे. लग्नाआधी आवड म्हणून हट्टाने शिकलेला शिवण क्लास आता आमचं पोट भरायला उपयोगी येईल. सरकारी योजनेतून मशिन घेतली आणि काम सुरू केलं. जम बसेपर्यंत घरोघरी जाऊनच कपडे मागेन... पुढे संकटांचा,कर्जाचा डोंगर दिसतोय म्हणून मी स्वतःला संपवून घेण्याइतकी कमजोर नक्कीच नाही. तीन मुलांना जन्म दिला...त्यांच्या पोटाची,भविष्याची तरतूद तर जन्मदात्यांनी करायला हवीच ना...काहीच मार्ग न शोधता... संकटांशी दोन हात न
करता...चिमुकल्या जीवांना अनाधार करून जीव कसा कोण देऊ शकतो??"
सारं काही बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होत पण लढण्याची जिद्द होती...आधार गेला म्हणून ती खचली नव्हती. आपल्या मुलांसाठी ती नशिबाशी झगडणार होती.
आज बऱ्याच वर्षांनी आजीकडे गेल्यावर मीराच घर, तिच्या घरातील अजून दोन शिलाई मशीन, शिकायला येणाऱ्या मुली, तिची तीनही मुलांचं शिक्षण सगळं पाहून नव्याने लढण्याच्या तयारीने तिने सुरुवात केलेली तो प्रसंग तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. त्यादिवशी आजीने तिच्या कामाची सुरुवात व्हावी म्हणून दोन चार कपडे शिवायला दिले...आणि त्या दिवसापासून मीरा एक एक पायरी चढत यशस्वी होत इथपर्यंत पोहचली. आज ती सगळ्यांसाठी एक प्रेरणा होती.स्वबळावर तिने स्वतःच विश्व उभं केलं ते पाहून वाटतं आत्महत्या करून प्रश्न सुटतात का? नव्व्यानव दरवाजे उघडले नाहीत तरीही शंभरावा ठोकवावाच. मार्ग त्याच दरवाजातून मिळू शकतो आणि आपण जिंकू शकतो.
मीराचं जिवंत उदाहरण अनुभवून लक्षात आलं..आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या बायकोने कर्जबाजारी झाली, दोन वेळच जेवायलाही मिळत नाही,मुलांचं भवितव्य काय उरेल या चिंतेने आत्महत्या केलेली ऐकली का??? उलट तीच तर नवरा गेल्यावर सगळं बळ एकटवून, हिंमतीने उंबरठा ओलांडून पिलांच्या पंखात उडण्याच बळ देते. त्यांना स्वबळावर उडायला शिकवते. उद्याच्या भविष्याच्या चिंतेने एकीकडे तिचा नवरा स्वतःला संपवतो तर त्याच चिंतेने ती चार भिंतीबाहेर पडून वाईट नजरांचा सामना करते,दुनियादारी बघते आणि शिकतेही. चूल आणि मूल एवढंच तीच जग असच तीच अस्तित्व समजलं जातं पण सगळं काही संपल असताना नव्याने डाव सुरू करण्याची,लढण्याची आणि जिंकायची ताकद फक्त तिच्यात असते.
शेतकऱ्याचीच बायको नाहीतर इतरही स्त्रिया ज्या अकाली विधवा झाल्या, किंवा ज्यांना नवरा हा फक्त कपाळावर कुंकू लावण्यापुरताच आहे, व्यसनाधीन होऊन संसाराला ज्याने तिलांजली दिली आहे अशा सगळ्याच खूप हिंमतीने, आत्मविश्वासाने स्वतः मधली ज्योत सदैव तेवत ठेवतात आणि आपल्यासोबत आपल्या मुलांचही आयुष्य उजळवतात. एका स्त्रीला मी कधीच कोणत्याही परिस्थितीत हरताना पहिली नाही. जगात कोणतं उच्च प्रेरणास्रोत असेल तर ती एकमेव स्त्रीच असू शकते आणि आहेच.
तुम्हाला काय वाटत?? नक्की सांगा कंमेंट्स मध्ये
लेख आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच.लेखाच्या वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. लेखात बदल केल्यास किंवा निनावी शेअर केल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.