STORYMIRROR

माधवी पंकज

Classics

4  

माधवी पंकज

Classics

तिच्या छत्रीतला पाऊस

तिच्या छत्रीतला पाऊस

16 mins
446

मनोहरराव टिव्ही समोर बातम्या बघत बसले होते .. त्यांच्या सौ . शालिनीताई चहा घेऊन येतात ..


“ अहो .. चहा घ्या ..” शालिनीताई म्हणाल्या ..


“ हा असाच जर अजून एक तास पडत राहिला ना तर बघ सर्व मुंबईत पाणीच पाणी होईल .. ट्रेन बंद होतील .. बिचारे कामावर गेलेले तिकडेच अडकतील .. “ मनोहरराव चहा घेत म्हणाले ..


“ त्यात काय नवीन आहे का .. मुंबई आणि मुसळधार पाऊस हे समीकरण वर्षानुवर्षापासून चालत आलंय .. मुंबईकरांना पण याची सवय झालीये .. “ शालिनीताई म्हणाल्या ..


तेवढ्यात मनोहररावांचा फोन वाजला .. 


“ हा सोहम मला का फोन करतोय ..” मनोहरराव मोबाईल हातात घेत म्हणाले ..


“ उचला ना तो कॅाल .. काही महत्वाचं असू शकतं .. हल्लीच रागिनीचं असं झालंय ..” शालिनीताई म्हटल्या ..


“ हॅलो .. काय रे सोहम .. सर्व ठीक आहे ना .. या म्हाताऱ्याची कशी आठवण आली आज ..” मनोहररावांनी विचारले ..


“ हॅलो मन्या काका .. बाबा घरात नाहीत हो .. “ सोहम घाबरलेल्या स्वरात म्हणाला ..


“ घरात नाही म्हणजे .. कुठे गेला अन्या .. काही बोलला नाही का ? .. कुठे जातो वगैरे ..” मनोहररावांनी विचारले ..


“ काहीच माहीत नाही हो काका .. आईचा महिना होता आज .. सकाळी नैवेद्य आणि विधी केला .. दुपारी जेवून बेडरूम मध्ये आराम करायला गेले बाबा .. आम्ही पण झोपलो सकाळी लवकर उठल्यामुळे .. आता नेहा चहा साठी आवाज द्यायला गेली तर काहीच आवाजनाही आला बाबांचा म्हणून बेडरूम मध्ये जाऊन बघितलं तर बाबा नव्हते .. घरभर शोधलं बाबांना .. कुठेच नव्हते .. त्यांची छत्री शोधली घरात .. ती पण नाही .. म्हणजे बाबा कुठेतरी बाहेर गेले न सांगतां .. “ सोहम म्हणाला ..


“ छत्री नाही म्हणजे तो नक्कीच कुठेतरी गेलाय ..पण एवढ्या पावसात कुठे जाणार .. एकतर सध्या त्याची मनस्थिती ठीक नाहीये .. “ मनोहरराव म्हणाले ..


“ तेच ना काका .. आई गेल्यापासून तर बाबा अगदीच गप्प झालेत .. काहीच बोलत नाही .. आई गेल्याापासून तर ते रडले देखील नाही .. मला फार काळजी वाटतेय त्यांची .. त्यात हा धो धो कोसळणारा पाऊस .. कुठे शोधायचं त्यांना ..” सोहम काळजीने म्हणाला ..


“ सोहम आज तारीख काय आहे रे ..” मनोहररांवानी विचारलं..


“ अं तारीख .. आज १० जुलै आहे काका .. पण का विचारलंत ?..” सोहमने न कळून विचारलं ..


“ एक काम कर .. तुझी कार घेऊन ये माझ्या बिल्डिंग खाली .. मला माहीत आहे अन्या कुठे सापडेल .. “ मनोहरराव फोन कट करत म्हणाले ...


थोड्याच वेळात सोहम कार घेऊन हजर झाला .. 


“ मन्या काका कुठे जायचं आपण ..?” सोहमने विचारलं ..


“ मरीन ड्राईव्ह ला घे कार ..” मनोहरराव म्हणाले ..


सोहमने कार थांबवली .. मनोहरराव कार बाहेर आले ..


“ चल माझ्या मागे मागे ..” मनोहरराव म्हणाले .. तसा सोहम त्यांच्या मागे मागे जाऊ लागला ..थोडे पुढे गेल्यावर समुद्राच्या दिशेने तोंड करून बसलेले अनंतराव दिसले .. छत्री बंद करून बाजूलाच ठेवलेली होती .. .. वरून पाऊस धो धो कोसळत होता परंतु अनंतरावांवर काहीच फरक दिसत नव्हता .. ते जणू तंद्री लावून भूतकाळात रमले होते .. 


भूतकाळ : 


१९७५ साली 


जून महिन्याचे दिवस होते ..नुकताच पावसाळा सुरू झालेला .. 


मरीन ड्राईव्ह बस स्टॅाप वर अनंत आणि मनोहर हे दोन मित्र बसची वाट बघत होते .. गिरगावला जाणारी बस आली .. बसमध्ये चढायला बरीच गर्दी होती .. जास्त करून झेवियर्स कॅालेजची मुलं मुली होती .. अनंत आणि मनोहर कसे बसे चढले .. मनोहरला बसायला जागा मिळाली .. पुढे एक सीट रिकामी होती .. अनंत घाईघाईत खिडकीजवळ जाऊन बसला .. त्याच्या बाजूला एक मुलगी येऊन बसली .. तो काळ वेगळा होता .. असं बाजूला बसलेल्या मुलीकडे सरळ सरळ बघायला मुलांना संकोच वाटायचा .. थोड्या वेळाने त्या मुलीच इच्छित बसस्टॅाप आला .. ती उतरली .. बस गिरगावात आल्यावर मनोहर आणि अनंत उठले उतरायला .. पण अनंतच्या लक्षात आलं ती मुलगी छत्री तर बसमध्येच विसरली .. 


“ ये अन्या चल .. उतरायचं नाही का ?.. काय विचार करतोय ?.. “ मनोहरने विचारले ..


“ ए मन्या .. ही बघ छत्री .. ती माझ्या बाजूला बसलेली मुलगी इथेच विसरून गेली .. या छत्रीचं काय करायचं आता ? ... “ अनंताने विचारलं ..


“ काय करायचं काय .. घे सोबत .. तु नाही घेतली तर दुसरं कुणीतरी उचलून नेईल .. कधी भेटेल तेव्हा परत कर तिला .. आता उतर पटकन .. नाहीतर पुढच्या स्टॅापला उतरावं लागेल ..” मनोहर म्हणाला ..


“ चल चल ..” म्हणत अनंत बसमधून उतरला ..


“ अरे मन्या .. एक प्रॅाब्लेम आहे रे ..” अनंत म्हणाला ..


“ आता काय झालं ?.. “ मनोहरने विचारलं..


“ अरे त्या छत्रीवालीचं नावचं माहीत नाही आणि मी तिला नीट बघितलं पण नाही .. मग छत्री देणार तरी कशी ?.. अनंताला प्रश्न पडला.. 


“बघू ती छत्री .. अरे या छत्रीवर तर इंग्रजीत आर लिहीलाय .. म्हणजे त्या मुलीचं नाव आर वरून असणार ..” मनोहर उत्तरला ..


“ अरे पण आपण या बसला नसतोच कधी .. आपण तर चर्चगेटला आपलं लॅा कॅालेज आहे तिथल्या बसस्टॅापवरून डायरेक्ट बस पकडतो ना .. आज तर लेक्चर ॲाफ होतं म्हणून मरीन ड्राईव्हला फिरायला गेलो म्हणून ही बस पकडली .. मग ती मुलगी भेटणार कशी?.. “ अनंताने शंका विचारली ..


“ नशीबात असेल तर भेटेल .. आता चल घरी ..” मनोहर उत्तरला ..


अनंताने पण होकारार्थी मान हलवली ..


त्यानंतर नेहमी कॅालेजला जाताना अनंत ती छत्री आपल्यासोबत ठेवत होता .. न जाणे ती छत्रीवाली कधी भेटली तर तिची छत्री तिला परत देता येईल .. आणि तो क्षण लवकरच आला .. 


मनोहर आणि अनंत रेफरंस पुस्तकांसाठी ‘सेंट्रल लायब्ररी’


येथे गेले होते .. 


“ अन्या तु जागा पकड जाऊन .. मी पुस्तक शोधून आणतो ..” मनोहर म्हणाला ..


अनंताने जाऊन एक कोपऱ्यातली रिकामी जागा पकडली जेणेकरुन त्यांना कुणाचा व्यत्यय येणार नाही .. तेवढ्यात बाजूच्या खुर्चीवर दोन मुली येऊन बसल्या .. 


“ शाले माझी छत्री ..” एक मुलगी हळूच दुसरीच्या कानात कुजबुजली ..


“ कुठे आहे गं रागिणी ?..” शालूने विचारले ..


“ अगं माझ्या बाजूला बघ तो मुलगा बसलाय ना त्याच्या समोर टेबलवर ठेवलीये .. “ रागिणीने सांगितले ..


“ मग घे ना छत्री .. तुझीच आहे की ..” शालू बोलली ..


“ अगं पण ती छत्री या मुलाकडे काय करतेय..” रागिनीने विचारले ..


“ मल वाटतं हा तोच छत्री चोर आहे ज्याने तुझी छत्री चोरली .. त्याला जाब विचारायला पाहिजे आपण ..”. शालूने सुचवले ..


“ थांब विचारतेच आता त्याला मी ..” रागिणी म्हणाली ..


“ ओह मिस्टर .. तुम्हाला काही लाज वगैरे आहे की नाही ..” रागिणीने बाजूला बसलेल्या अनंताला विचारले ..


“ कोण मी .. मला काही म्हणालात का ? ...” अनंताने न समजून विचारले ..


“हो तुम्हीच .. ही माझी छत्री तुमच्याकडे कशी .. कुठे चोरली तुम्ही ..तुम्हांला माहिती आहे तुमच्या मुळे बाबा किती ओरडले मला .. हे वर्ष मला विना छत्रीचे काढावे लागले असते तुमच्या मुळे ... बाबांनी नवीनच छत्री आणून दिली होती यावर्षी आणि लगेच तुम्ही चोरली .. तुम्हांला काहीच कसं वाटलं नाही हो छत्री चोरताना ..” रागिणी एक्स्प्रेस सुसाट सुटली ...


“ ओ मिस .. काय बोलताय तुम्ही .. एकतर स्वत: छत्री विसरायची आणि वरून दुसऱ्यावर आरोप करायचे .. तुम्हाला शोभतं का हे .. उलट मी जपून ठेवली ती छत्री .. जेव्हा केव्हा तुम्ही भेटाल तेव्हा तुम्हांला परत देता येईल म्हणून मी रोज सोबत ठेवत होतो ही छत्री ..गरीब असलो तर चोर नाही आम्ही .. स्वाभिमान जागृत आहे माझा अजून .. “ अनंत संतापून म्हणाला ..


“ काय रे अन्या काय झालं .. आवाज का चढलाय तुझा एवढा .. अगदी त्या टोकापर्यंत तुझा आवाज येतोय ... ?” मनोहरने येऊन विचारलं ..


“काय चाललंय हे .. कसला आवाज आहे हा .. तुम्हांला लायब्ररीचे नियम माहीत नाहीत का .. तुमच्या मुळे इतरांना देखील त्रास होतोय.. ही काय भांडायची जागा वाटली तुम्हांला .. चला बाहेर निघा .. “ लायब्ररीयनने येऊन त्या चौघांना बाहेर काढलं ..


चौघे पण वैतागून एकमेकांकडे रागाने बघत नाईलाजाने लायब्ररी बाहेर पडले ..


“ओ मुलीसोबत कसं बोलतात हे माहीत नाही का तुम्हांला .. हाच का तुमचा शिष्टाचार ...” शालू अनंताला बोलली ..


“ अहो .. शिष्टाचाराच्या गोष्टी तुम्ही तरी करू नका .. एकतर स्वत:च छत्री विसरायची आणि वरून दुसऱ्यावर चोरीचा आरोप करायचा .. तुमची मैत्रिण बसमध्ये छत्री विसरली होती .. उलट माझ्या मित्राने तर ती छत्री जपून ठेवली .. बिचारा रोज आपल्यासोबत छत्री ठेवायचा.. तुम्ही भेटलात तर तुम्हांला देता येईल म्हणून .. आणि तुम्ही त्याच्यावरच चोरीचा आरोप केला .. “ मनोहरने पण तोडीस तोड उत्तर दिलं..


अनंताला तर खुप अपमानास्पद वाटत होतं .. एकतर चोरीचा आरोप आणि त्यात लायब्ररीमधून हाकलून दिलं .. अनंत खुपच दुखावलागेला .. त्याने सरळ मनोहरचा हात पकडला आणि आपल्या रस्त्याला लागला .. 


ते निघून गेल्यावर रागिणी काहीशी विचारात हरवली ..


“ काय गं रागिणी .. मिळाली ना छत्री .. आता कसला विचार करतेय ..” शालूने विचारले ..


“ शाले मला वाटतं तो खरंच बोलत होता गं ..त्याने खरंच छत्री चोरली नसणार ..” रागिणी म्हणाली ..


“ कशावरून वाटतंय तुला असं ..” शालूने विचारले ..


“ अगं म्हणजे बघ ना .. त्यांना कुठे माहीत होतं की आपण लायब्ररीत येणार .. आणि तो जे बोलला की ,त्याने चोरली नाही ,मीच विसरले,तो तर उलट मला भेटल्यावर छत्री परत करता येईल म्हणून रोज सोबत छत्री ठेवत होता .. हे सर्व त्याचा मित्र पण सेम बोलला .. आणितो जेव्हा ते सर्व बोलला तेव्हा त्याचा मित्र तिथे नव्हता .. तो तर खूप नंतर आला .. म्हणजे तो बोलला त्यात तथ्य आहे .. तो खरा आहे .. देवा आता मी काय करू .. किती दुखावला तो .. त्याचे डोळे भरून आले मी चोर म्हटले तेव्हा .. आता कशी त्याची माफी मागू मी ..” रागिनीला खूप पश्चाताप झाला .. 


“ अगं परत भेटेल की तो .. जशी तुझी छत्री मिळाली ..चल आता घरी ..” शालू रागिणीला समजावत म्हणाली .. 


दोघी घरी निघून गेल्या .. त्या दिवसानंतर रागिनी चार पाच दिवस सतत लायब्ररीमध्ये अनंताची माफी मागण्यासाठी जात होती .. पण स्वाभिमान दुखावलेला अनंता काही तिकडे परत फिरकला नाही ..


एक आठवड्याने रागिनी आणि शालू नवीन पुस्तके घेण्यासाठी लॅा कॅालेजजवळ असलेल्या पुस्तकांच्या दुकानात आल्या होत्या .. पुस्तके घेतल्यानंतर घरी येण्यासाठी बस पकडण्यासाठी लॅा कॅालेज बाहेर असलेल्या बस स्टॅापवर आल्या आणि जोराचा पाऊस सुरू झाला .. रागिणी आणि शालूने आपापली छत्री उघडली .. लॅा कॅालेजचे काही छत्री नसलेले विद्यार्थी पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी बस स्टॅापच्या आडोशाला येऊन उभे राहिले ..त्या मुलांमध्ये अनंत आणि मनोहर देखील होते .. 


“ काय रे मन्या .. सकाळी घरातून निघताना वाटलं नव्हतं पाऊस येईल ..म्हणून छत्री नाही आणली .. आणि हा बघ असा जोरात पडायला लागलाय .. एकतर आज दादाला इंटरव्ह्यूला जायचं होतं त्यामुळे छत्री त्याला दिली ..आमच्या दोघांत एकच छत्री आहे ना .. पण आता कसं जायचं घरी ..?” अनंताने मनोहरला विचारले ...


“ अन्या पावसाळयात पाऊस नाही पडणार तर मग कधी पडणार ..आता पाऊस थांबेपर्यंत इथेच वाट बघू ..” मनोहर म्हणाला ..


“ अरे लवकर जायचं होतं घरी .. बाजूच्या काकांच्या दोन लहान मुलांची शिकवणी सुरू केलीये आज पासून .. तेवढाच घरात हातभार ... “ अनंत म्हणाला ..


तेवढ्यात बस आली पण चढायला गर्दी होती .. 


“ मन्या एवढी गर्दी चढेपर्यंत आपण भिजून जाऊ आणि महत्वाचे म्हणजे पुस्तकं भिजतील रे .. आपण भिजलो तरी चालेल पण पुस्तक भिजून नाही चालणार .. “ अनंत म्हणाला तेवढ्यात त्याच्या डोक्यावर एक छत्री धरली कुणीतरी ..


बघतो तर छत्रीवाली ..


“ चला ..” रागिणी म्हणाली ..


“ नाही नको .. तुम्ही जा ..” अनंत काहीशा रागातच म्हणाला ..


“ मी माफी मागते तुमची .. मला माफ करा .. मी तुमच्या बद्दल गैरसमज करून घेतला पण आता तुम्हांलाच उशीर होईल .. प्लीज चला .. “ रागिणी म्हणाली .. 


अनंत नाईलाजानेच रागिणीच्या छत्रीतून बसकडे निघाला .. मनोहर देखील पाठोपाठ शालूच्या छत्रीतून निघाला ..


बसमध्ये अनंता सीटवर बसला .. रागिणी देखील बाजूला येऊन बसली .. अनंताने तोंड फिरवून घेतलं आणि खिडकीबाहेर बघू लागला.. 


“ मला खरंच खुप वाईट वाटलं .. मी खुप चुकीच्या पद्धतीने तुमच्यासोबत बोलले ..पण मला बाबा एवढे ओरडले ना छत्री वरून तो राग तुमच्यावर निघाला .. खरं तर मी तुमचे आभार मानायला हवे होते पण त्या टेबलवर तुमच्या समोर छत्री दिसली आणि मी गैरसमज करून घेतला तुमच्या बद्दल .. खरंच मी मनापासून माफी मागते .. “ रागिणी भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून अनंताची माफी मागत होती .. 


रागिणीच्या डोळ्यात पाणी पाहून अनंताला वाईट वाटलं ..


“ अहो काय करताय तुम्ही .. बसमध्ये सर्व बघताय आपल्या कडे ..” अनंत म्हणाला ..


“ बघुद्या ..तुमच्यावर आरोप करताना मी कुणी बघत असेल असा विचार नाही केला मग आता माफी मागताना लोकांचा विचार का करू..बसं तुम्ही मला माफ करा ...” रागिणी म्हणाली ..


“ हो केलं मी माफ .. होतात गैरसमज .. माणसेच आहोत आपण .. त्यावेळी मला तुमचा प्रचंड राग आलेला पण आता अजिबात राग नाही ..तुम्ही देखील तुमच्या जागेवर बरोबर होता ..” अनंत रागिणीला समजावत म्हणाला ..


“ हो पण तुम्ही एवढे कळकळीने सत्य सांगत होते आणि मी वेडी माझ्याच गैरसमजात तुमच्यावर आरोप करत सुटले ..” रागिणी म्हणाली ..


“ ठीक आहे सोडा तो विषय आता .. मला नाही राग त्याबद्दल ..” अनंत म्हणाला ..


“ तुम्ही लॅा कॅालेज मध्ये शिकतां का ..?” रागिणीने विचारले .. 


“ हो .. शेवटच्या वर्षाला शिकतो मी आणि मनोहर .. तुम्ही काय करता ..” अनंत उत्तरला ..


“ मी आणि शालू म्हणजे शालिनी आम्ही दोघी झेवियर्स मध्ये विज्ञान शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो .. “ रागिणी म्हणाली .. 


बोलता बोलता रागिणीचा स्टॅाप आला .. रागिणी आणि शालू अनंताला बाय करून उतरल्या .. मनोहर मागून पुढे अनंताच्या शेजारी बसायला आला .. 


“ काय रे काय म्हणत होती ती ..?” मनोहरने विचारलं ..


“ काही नाही रे .. माफी मागत होती .. तिला खुप अपराधी वाटत होतं .. “ अनंत उत्तरला .. 


“मग तु काय बोललास तिला ..केलंस काय माफ ..” मनोहरने विचारलं ..


“ खुप पोटतिडकीने बोलत होती रे .. डोळ्यात पाणी आलेलं अगदी तिच्या .. मग केलं माफ ... तिला पश्चाताप झाला ना मग बस झालं तर..” अनंत म्हणाला ..


“ हमम बरोबर आहे पश्चाताप होणे महत्वाचे ..चल ऊठ आपला स्टॅाप आला ..” मनोहर म्हणाला ..


त्यानंतर बऱ्याचदा रागिणी आणि शालू , अनंत आणि मनोहर यांच्या भेटी होऊ लागल्या .. 


रागिणीचा निर्मळ निरागस स्वभाव हळूहळू अनंताला आवडू लागला .. ते वयचं तसं होतं की एकमेकांकडे त्यांची मनं ओढली जात होती.. जसं अनंताला रागिणी विषयी वाटत होतं तसंच रागिणीला ही अनंताविषयी जाणवत होतं .. खुप विचार करून शेवटी अनंतने रागिणी ला मरीन ड्राईव्हवर भेटायला बोलावलं .. नेमकी तेव्हा पाऊस सुरू होता.. अनंत बस स्टॅाप वर रागिणीची वाट बघत होता ..बस आली .. रागिणी उतरली .. 


छत्री उघडली .. अनंताला छत्रीत यायला खुणावलं ..


“ अहो इकडे छत्रीत या ना .. भिजाल नाहीतर ..” रागिणी म्हणाली ..


“ हो येतो ..” अनंत आणि रागिणी एका छत्रीत मरीन ड्राईव्हच्या दिशेने चालत गेले .. काही अंतरावर गेल्यावर दोघे समुद्राकडे बघत थांबले ..तो पर्यंत पाऊस पण थांबला .. रागिणीने छत्री बंद करून ठेवली ..


“ अनंत तुम्हाला माहित आहे का या समुद्रात आणि तुमच्यात एक साम्य आहे .. “ रागिणी म्हणाली ..


“ समुद्रात आणि माझ्यात साम्य .. ते कसं काय बुवा ?.. “ अनंताने विचारले ..


“ अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा .. समुद्राचं देखील असंच आहे ना .. त्याचाही अंत नाही .. “ रागिणी उत्तरली .. 


“ अरेच्चा हा विचार मी कधी केलाच नव्हता .. पण तुम्ही बोलताय त्यात पॅाईंट आहे .. रागिणी नावाचा अर्थ नाहीत आहे काय ..? “ अनंताने विचारले ..


“ नाही ..” रागिणी उत्तरली ...


रागिणी म्हणजे एक अप्सरा .. आकाशीय अप्सरा .. आणि तु खरंच मला त्या अप्सरेसारखीच भासतेस .. माफ करा तुम्हाला तु बोललो ... “ अनंत रागिणीकडे बघत म्हणाला ..


“ इश्य् काही काय .. चालेल मला तु बोललेलं .. “ रागिणी लाजली ..


“ अगं हो खरंच .. रागिणी एक विचारू तुला ..” अनंतने विचारले ..


“ हो विचारा की ..” रागिणी म्हणाली ..


तेवढ्यात परत पाऊस सुरू झाला.. रागिणीने अनंत भिजेल या भीतीने घाईघाईत छत्री उघडली ..


“ तु आयुष्यभर माझ्यासाठी अशीच छत्री उघडशील का ?..

पाऊस येवो वारा येवो .. माझी साथ देशील का ?..

रागिणी तु आयुष्यभरासाठी माझी होशील का ?...” शेवटी अनंताने त्याचं मन मोकळं केलं ...


रागिणीने लाजेने चेहरा झाकून घेतला.. अनंताला वाटतं की रागिणी रडायला लागली .. 


“ ए रागिणी .. रडू नको गं .. तुला नाही मी आवडत तर ठीक आहे काही प्रॅाब्लेम नाही .. असं पण तुला माझ्या पेक्षा योग्य मुलगा मिळायला हवा ..मी असा फाटतां गरीब .. तुला हवी ती सुखं नाही देऊ शकणार .. मला माफ कर मी हे बोलायला नको होतं .. पण काय करू नाही राहवलं .. मनात नाही दडवून ठेवू शकलो मी .. मी किमान स्वत:ची लायकी ओळखून बोलायला हवं होतं .. माझी चूक झाली..” अनंत रागिणीला समजावत म्हणाला ..


“ नाही .. असं नका म्हणू .. तुम्ही खरंच खुप चांगले आहात आणि मला तुमच्यातली कोणता गुण सर्वात जास्त आवडतो माहितीये .. तुमचा स्वाभिमानी स्वभाव .. मला ही तुम्ही आवडता अनंत ..” रागिणीने तिच्या प्रेमाची कबुली दिली ..


“ ओह रागिणी .. खुप खुप धन्यवाद .. मी आज खूप आनंदी आहे .. रागिणी आजच्या दिवशी अजून एक मागणे आहे .. आज १० जुलै .. तु माझ्या आयुष्याचा भाग बनलीस .. या दिवशी आपण दरवर्षी हा दिवस साजरा करायला इथेच मरीन ड्राईव्ह वर यायचं .. अगदी आपण म्हातारे झालो तरी .. हा समुद्र आपल्या प्रेमाचा साक्षी आहे .. “ अनंत म्हणाला ..


रागिणीने होकारार्थी मान हलवली .. 


शिक्षण पूर्ण झाल्यावर अनंत त्याची वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली .. सेटल झाल्यानंतर अनंत रागिणीचं लग्न झालं ..त्यांच्या सोबत शालिनी मनोहरचं देखील सूत जुळलं .. त्यांनी पण लग्न केलं .. त्या दिवसापासून दरवर्षी १० जुलैला अनंत आणि रागिणी मरीन ड्राईव्हवर हा दिवस साजरा करायला यायचे ..


वर्तमान :


अनंतरावांच्या डोळ्या पुढून भूतकाळ सरसर सरकला .. तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर हात पडला .. 


“ रागिणी आलीस तू .. किती वेळ लावलास गं .. मी किती वाट बघायची तुझी .. तुला माहित आहे मी इथे बसल्या बसल्या आपल्या पहिल्या भेटीपासून ते आता पर्यंत सर्व भूतकाळ आठवत बसलो होतो .. “ अनंतराव. म्हणाले ..


“ अन्या रागिणी नाही मी आहे मनोहर ... मन्या ..” मनोहरराव उत्तरले ..


“ अरे मन्या तू काय करतोय इकडे .. मी रागिणीची वाट बघत बसलो होतो .. आज १० जुलै आहे ना .. आम्ही दरवर्षी हा दिवस इथेच साजरा करतो ..” अनंतराव म्हणाले .. 


“ माहीत आहे मला अन्या .. पण आता यापुढे हा दिवस नाही साजरा करता येणार ..” मनोहरराव म्हणाले ..


“ मन्या काय बोलतोय तू .. जरा तोंड सांभाळून बोल ..” अनंतराव चिडून म्हणाले ..


“ अन्या रागिणी नाही येणार आता .. कधीच नाही येणार .. रागिणी गेली सोडून आपल्याला .. तुला सोडून गेली तुझी रागिणी अन्या ..” हे बोलताना मनोहररावांचा कंठ दाटून आला ..


“ नाही मन्या खोटं बोलतोय तू .. माझी रागिणी अशी कशी मला सोडून जाऊ शकते .. आयुष्यभर माझी साथ देणार बोललेली ती .. अशी कशी गेली ..” अनंतरावांना आता वास्तवाची जाणिव झाली ...


“ रागिणी ऽऽऽऽऽ......” अनंतरावांनी एकच हंबरडा फोडला ... 


मनोहरराव आणि सोहम त्यांना सावरत होते .. अनंतरावांचे रुदन बघून त्यांचे ही काळीज हेलावले .. पण एक समाधान होते त्यांना अखेर अनंतरावांनी सत्य स्वीकारले .. 


सोडून गेलीस हात सखे

सोडून गेलीस तू साथ 


तुझ्या सोबत नसण्याने 

अपूर्णत्व आले जीवनास


वियोगाने रूदन करते हे हृदय

अन् रूदन करती हे नयन 


हा कोसळणारा पाऊसही 

माझ्या सवे करतो रूदन .....



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics