२६ जुलै : एक थरारक अनुभव
२६ जुलै : एक थरारक अनुभव
(ही एक सत्यघटना आहे .. फक्त पात्रांच्या नावात आणि ठिकाणांत बदल केला आहे ...)
२६ जुलै २००५
वेळ सकाळची :
“ ए आई गं .. दे ना लवकर डब्बा .. मला उशीर होतोय गं .. माझी ट्रेन जर चुकली ना तर मला पुढे दादरला १५ मिनीटं वाट बघावी लागेल गं विरार ट्रेन साठी .. “ मानसी म्हणाली ..
“ हो गं .. हा घे डबा भरलाय .. तु खाल्लंस का काही .. उपाशी नको जाऊ बाळा .” मानसीच्या आईने विचारले ..
“ नको गं आई आता काही .. मी ॲाफिसला पोहचले की खाईन काहीतरी .. चल मी येते आता ..” मानसी म्हणाली ..
“ हो .. सावकाश जा बाळा आणि छत्री घे ..पोहचल्यावर फोन कर ..” मानसीची आई म्हणाली ..
“ अगं ॲाफिसच्या फोन वरून कसा गं फोन करायचा .. सर काही बोलत नाहीत पण मलाच पटत नाही गं ते .. या दिवाळीला बोनस मिळाला की एक मोबाईलच घेते मी .. बरं चल बाय ..” मानसी ॲाफिससाठी निघाली ..
मानसीचं ॲाफिस :
“ हाय सानिका .. कधी आलीस ..” मानसीने विचारलं ..
“ अगं पंधरा मिनिटे झालीत मला येऊन .. तुला आज का उशीर ? ..” सानिकाने विचारलं ..
“अगं नेहमीचं .. आमची सेंट्रल पावसाळ्यात बऱ्याचदा लेटच येते आणि पाऊस नसला तरी काही ना काही कारणं असतातचं .. कधी ओव्हरहेड वायरचं तुटली तर कधी सिग्नल मध्ये बिघाड झाला .. “ मानसी उत्तरली ..
“ मला तुझं कौतुक वाटतं गं .. भांडूप ते दादर आणि दादरवरून परत विरार किती ते ट्रॅव्हलिंग होतं ..जवळपास २.३० तास एका बाजूनेम्हणजे जाऊन येऊन ५ तास आणि इथले ८ तास म्हणजे टोटल १३ तास .. ग्रेट यार ..हॅट्स ॲाफ यू .. मी तर इथे बोरिवली वरून येते तरी थकून जाते ..” सानिका म्हणाली ..
( २००५ साली मेट्रो नव्हती )
“ काय करणार या पापी पोटासाठी करावं लागतं यार .. आणि आता सवय झाली गं .. काही वाटत नाही .. आधी आधी त्रास व्हायचा .. “ मानसी म्हणाली ..
“ चल चहा घेऊया ..” सानिका म्हणाली ..
“ चल चल .. काहीतरी खाऊया .. भूक लागलीये .. सकाळी तशीच निघाले .. “ मानसी म्हणाली ..
दोघी चहा घेऊन काम सुरू करतात .. दुपारी १ वाजता लंच टाईम होतो .. दोघी जेवून शतपावली साठी ॲाफिस बाहेर पडतात .. बाहेर खुपच अंधारून आलेलं असतं ..
“ अगं सानिका साडे बाराचं झालेत ना .. संध्याकाळ झाल्या सारखं वातावरण कसं झालंय .. एवढं अंधारून येत नाही कधी .. “ मानसी म्हणाली ..
“ हो ना गं .. मला वाटतं आपण परत ॲाफिस मध्ये जाऊया .. हा कधी पण कोसळेल .. “ सानिका म्हणाली ..
त्या दोघी ॲाफिस मध्ये पोहचताच खुप जोराचा पाऊस सुरू झाला ..
“ नशीब .. पटकन आलो आपण .. नाहीतर चांगलंच भिजलो असतो .. “ मानसी म्हणाली ..
“ हो गं .. बघ ना कसा कोसळतोय .. किती मोठ्या मोठ्या सरी आहेत .. आवाज किती येतोय पावसाचा .. इथे ॲाफिस मध्ये एवढा जाणवतोय तर बाहेर किती जाणवत असेल ..” सानिका म्हणाली ..
“मला तर भीतीच वाटायला लागलीये .. ट्रेन बंद नको व्हायला .. जरा मोठा पाऊस झाला की सायन कुर्ल्याला पाणी साचतं ट्रॅकवर .. “ मानसी म्हणाली ..
“ डोंट वरी गं .. मै हूं ना .. माझ्या घरी थांब मग .. “ सानिका म्हणाली ..
“ हो गं तु आहेस म्हणून आईला जास्त टेंशन नसतं माझं .. “ मानसी म्हणाली ..
मानसी आणि सानिका त्यांचे काम सुरू करतात .. दुपारचे तीन वाजत आलेले .. तेवढ्यात वॅाचमन आत धावत येतो ..
“ काय झालं काका .. एवढे घाई घाईत कुठे चाललेत ?..” सानिकाने विचारले ..
“ अहो मॅडम पाऊस बघा कसा कोसळतोय .. जशी काय ढगफुटी झालीये आपल्या मुंबईवर .. बाहेर सर्वीकडे पाणीच पाणी साचलंय .. ट्रेन तर कधीच बंद झाल्यात .. “ वॅाचमन काका सांगू लागले ..
“ अरे देवा .. आता काय करू मी ?.. “ मानसी म्हणाली ..
“ नको गं टेंशन घेऊ .. माझ्या घरी चल तू ..” सानिका म्हणाली .. मानसीने होकारार्थी मान हलवली ..
तेवढ्यात त्यांचे शिंदे सर आले ..
“ सर्वांना निघा घरी .. बाहेरची परिस्थिती अजून अवघड होण्याआधी आपापल्या घरी सेफली पोहचायला हवेत .. “ शिंदे सर सर्वांना उद्देशून म्हणाले ..
“ तु काय करणार मानसी ?.. तु तर खुप लांब राहतेस ..” शिंदे सरांनी मानसीला विचारलं ..
“ सर ती माझ्या सोबत येईल माझ्या घरी .. “ सानिका म्हणाली ..
“ ओके .. मग तुम्ही माझ्या सोबत माझ्या कार मधून या .. मला बोरिवली वरूनचं जायचंय ..तुम्हांला वाटेत ड्रॅाप करतो मी ..” शिंदे सर म्हणाले ..
“ सर मी एकदा घरी फोन करून कळवू का ?.. काळजी करत बसतील ..” मानसीने सरांना विचारले ..
“ हो .. कर ना .. “ शिंदे सर बोलले ..
मानसी शिंदे सरांच्या केबिन मध्ये जाऊन त्यांच्या टेबलवरच्या लॅन्डलाईनवरून घरच्या लॅन्डलाईनवर कॅाल लावते .. (तेव्हा सर्रास प्रत्येकाकडे मोबाईल नसायचे..)
“ हॅलो आई .. इकडे खूप पाऊस पडतोय .. तिकडे काय परिस्थिती आहे गं ?..” मानसीने आईला विचारले ..
“ हॅलो मानसी बाळा .. इकडेही खुप पाऊस आहे गं .. पाणी भरायला सुरूवात झालीये .. तु निघालीस का ?..” मानसीच्या आईने विचारले ..
“ अगं आई ट्रेन बंद झाल्यात .. दादा निघाला का ॲाफिसमधून ?.. आम्ही पण निघालोत .. मी इकडेच सानिकाच्या घरी थांबते आज..हॅलो .. हॅलो .. हॅलो आई .. माझा आवाज येतो का तुला .. तुझा आवाज येत नाही काहीच ..” मानसी आईला आवाज देत होती पण पलीकडून काहीच आवाज येईना ..
मानसी बाहेर येऊन सानिकाला म्हणते .. “अगं सानिका .. मी फोन लावला गं .. आईने उचलला पण थोडीचं बोलणं झालं आणि आवाजचं येईनासा झाला गं .. “
“ मानसी मला वाटतं फोन डेड झाला असेल पावसामुळे ..” शिंदे सर म्हणाले ..
“ पण मला हे समजेना की माझा निरोप आईला ऐकू गेला की नाही ..” मानसी काळजीने म्हणाली ..
“ हे बघ माझ्या घरी गेल्या वर काकूंना कळवू आपण .. आधी निघूया इथून ..” सानिका म्हणाली ..
“ चला आता निघूया आपण .. “ शिंदे सर बोलले ...
सर्वजण ॲाफिस लॅाक करून निघाले .. मानसी आणि सानिका शिंदे सरांसोबत त्यांच्या कार मधून निघतात .. जशी कार पुढे गेली तसतसा पाण्याचा आणि पावसाचा अंदाज येत गेला .. आजूबाजूला नजर जाईल तिकडे पाणीच पाणी पसरलेले .. सर कार खूप काळजी पूर्वक चालवत होते ..
विरार ते बोरिवली दीड तासात कापले जाणारे अंतर पार करायला आज मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्या मुळे तीन तास लागले .. कसेबसे पाण्यातून वाट काढत ते सर्व जण बोरिवलीला पोहचले .. पण पुढे एवढे पाणी साचलेले की कार पूर्ण पाण्यातबुडण्याची शक्यता निर्माण झाली .. शेवटी सरांनी जरा कमी पाणी बघून कार लावली आणि कार तिथेच सोडून चालत जाण्याचा पर्याय निवडला ..
सर , सानिका आणि मानसी एकमेकांचा हात धरून कंबरेएवढ्या पाण्यातून चाचपडत वाट काढत चालले ..
सानिकाची बिल्डिंग जवळ आली .. पण अचानक पाणी वाढायला लागलं ..
“ मानसी माझा पाय सारखा घसरतोय गं .. मला भीती वाटतेय .. “ सानिका घाबरत म्हणाली ..
“ सानिका हात पकड गं घट्ट .. आणि घाबरू नको ..” मानसी तिला धीर देत म्हणाली ..
तिथे काही तरूण मुले मदतीला आलेली .. एक लांब दोर बांधलेला त्यांनी पाण्यातून बॅलन्स सांभाळून चालण्यासाठी ..
“ सर यापुढे जाऊ नका .. पुढे खूप पाणी वाढलंय .. पुढे जाणं खुप धोकादायक आहे ..प्लीज .. को-ॲापरेट करा ..” त्या मुलांपैकी एकजण म्हणाला ..
“ ओ दादा .. अहो त्या समोरच्या रोडच्या पलीकडे माझं घर आहे हो .. आम्ही हात पकडत पकडत जातो ना .. आम्हांला जाऊद्या .. “ सानिका विनंती करत म्हणाली ..
“ अहो ताई .. नको तो हट्ट नका करू .. थोड्या वेळापूर्वी एक जोडपे नको म्हणत असताना पण गेले त्या दिशेने .. आणि पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे वाहून गेले .. पुढे काही अंतरावर एक मोठा नाला आहे .. त्या जोडप्याचा काहीच पत्ता नाही लागला .. म्हणून कळकळीने सांगतोय , ऐका माझं .. “ तो मुलगा म्हणाला ..
“सानिका , मानसी .. मला वाटतं आपण त्या मुलांचं ऐकायला हवं .. थोडावेळ आपण जरा कुठेतरी आसऱ्याला जाऊया .. थोडा वेळाने पाणी होईलच कमी .. मग जाऊ आपण तुझ्या घरी ..” सरांनी दोघींची समजूत काढली .. आणि ते सर्व दोरीच्या सहाय्याने तिथे जवळचं असलेल्या बस डेपो मध्ये आसऱ्यासाठी गेले ..
त्या डेपो मध्ये बऱ्याच बस उभ्या दिसल्या .. काही डबल डेकर बस पण दिसल्या .. डेपोत कंबरेपर्यंत पाणी भरलेले ..
“ मानसी सानिका मला वाटतं आपण बसमध्ये जाऊन बसावं .. इथे कुठेच बसू शकत नाही आपण .. कंबरेपर्यंत पाणी भरलंय चोहीकडे.. किती वेळ उभे राहणार .. त्यापेक्षा बस हा ॲाप्शन बेस्ट आहे सध्या .. “ शिंदे सर म्हणाले ..
तिघे परत एकमेकांचे हात पकडून बसमध्ये चढले ..
“ सर वरच्या मजल्यावर जागा नाहीये .. इथे खालीच बसावे लागेल आपल्याला .. वर बरीच माणसं आहेत ..“ सानिका डबल डेकर बसच्या वरच्या माळ्यावर जाऊन बघून आली ..
सानिका आणि मानसी एक रिकामी सीट बघून बसले .. सर पण एका माणसा शेजारी जाऊन बसले .. अजून तरी बस मध्ये पाणी जास्तभरले नव्हते फक्त पायापर्यंत पाणी आलेले .. पण हा आनंद जास्त वेळ नाही टिकला .. हळू हळू पाण्याची लेव्हल वाढू लागली .. पाणीसीट पर्यंत आलं .. काही लोक बसच्या टपावर जाऊन उभे राहिले .. मानसी , सानिका आणि सरांना काय करावे समजेना ..ही जागासोडून दुसरीकडे कुठे गेले तर बसायला मिळतंय ते ही मिळणार नाही .. शेवटी त्यांनी आहे तिथेच थांबायच निर्णय घेतला ..
जसा जसा वेळ जाऊ लागला तसा लोकांचा धीर खचत चालला ..मानसी आणि सानिका रडवेल्या झाल्या .. रात्री ८ - ९ दरम्यान पाणीपातळी अजून वाढून पाणी बसलेल्या लोकांच्या गळ्या पर्यंत आलं ..त्यात लाईट नसल्यामुळे मिट्ट काळोख पसरला .. आता मात्र बसमधल्या लोकांचा धीर सुटला .. सर्व जण जीवाच्या भीतीने देवाचा धावा करू लागले .. सर्वांचा तहान लागून घसा सुकला .. आजूबाजूला पाणीच पाणी असून पण ते पाणी पिता येत नव्हते.. सर्व लोक एकमेकांचा धीर वाढवू लागले ..
मानसीला भूकेने आणि तहानेने ग्लानी येऊ लागली .. सानिकाचं तिच्या कडे लक्ष गेलं ..
“ मानसी .. मानसी .. उठ .. डोळे मिटू देऊ नकोस .. “सानिका मानसीला उठवू लागली .. आजूबाजूचे लोक पण मानसीला उठवू लागले..
बसमध्ये वरच्या डेकवर असलेल्या एका आजोबांनी त्यांच्या जवळ असलेलं एकमेव सफरचंद स्वत:च्या जीवाचा विचार न करता मानसीला खायला दिलं .. सफरचंद खाल्ल्यामुळे मानसीला जरा तरतरी वाटू लागली ..
सर्व लोक एकमेकांचा हात धरून बसलेले ..पाणी ओसरायची वाट बघू लागले ..आणि येणारी सकाळ लोकांसाठी एक नवजीवन घेऊन आली .. सकाळपर्यंत पाणी बरंच ओसरले .. सर्व लोक देवाचे आभार मानून बसमधून आपापल्या इच्छुक स्थळी निघून गेले .. मानसी , सानिका आणि सर पण सानिकाच्या घरी गेले .. तिथे जाऊन फ्रेश होऊन मानसी आणि सर घरी जायला निघाले ..
सरांनी त्यांची कार चेक केली .. सुदैवाने ती सुस्थितीत दिसली .. कार बघून सरांच्या जीवात जीव आला .. सरांनी मानसीला कुर्ला स्टेशनला सोडलं आणि सर पुढे निघून केले ..
मानसीची अजून एक परिक्षा सुरू झाली .. ट्रेन बंद होत्या .. मानसीला प्रश्न पडला कुर्ला ते भांडूप जायचं कसं ? ट्रॅकवरचं पाणी ओसरलंहोतं .. मानसीला काही लोक ट्रॅकवरून चालत घरी परतताना दिसले .. तिलादेखील चालत जाण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता .. मानसीदेखील इतर लोकांसोबत ट्रॅक वरून अनवाणी चालू लागली .. या पुरात मानसीजवळ तिच्या अंगावरील कपड्यांखेरीज काहीच नाही उरले.. तिची बॅग , चप्पल सर्व पाण्यात वाहून गेले होते .. मानसीला ट्रॅकवरून कुर्ला ते भांडूप अंतर चालत पार करायला तीन तास लागले .. शेवटी मानसी भांडुपला चालत आली .. स्टेशनवरून घरांपर्यंत जायला अजून अर्धा तास लागला ..
घरी परतताना तिला एका ठिकाणी एका कारजवळ गर्दी दिसली .. मानसीने जवळ जाऊन बघितले तर कारमध्ये चार लोक गुदमरून मृत्युमुखी पडलेले दिसले .. ते बघून मानसीचे हृदय हेलावले .. कार सोडून बसमध्ये आसरा घेण्याची बुद्धी दिल्याबद्दल मानसीने मनोमन देवाचे आभार मानले .. नाहीतर आज तेही असेच कारमध्ये मृत्यूमुखी पडले असते ..
मानसी चालून चालून खूप थकलेली पण घरी जायची ओढ तिला थांबू देईना .. मानसीने घराचे दार वाजवले .. आईने दार उघडले ..
“ मानसी .. बाळा .. तु आलीस .. अहो .. ऐकलंत का ? आपली मनू आली .. सूरज ए सूरज .. मनू आली आपली .. “ आई आनंदाने बाबांना आणि सूरजला आवाज देऊ लागली ..
“ अगं तिला आत तरी येऊ दे आधी .. “ बाबा मानसीला बघून आनंदात म्हणाले ..
“ हो .. ये बाळा .. आत ये .. “ आई म्हणाली ..
मानसी आत आली तशी आईने तिला कुशीत घेतले .. आणि रडू लागली .. मानसीला देखील अश्रू आवरतां आले नाही ..
“ बाळा कुठे होतीस तु .. तुझा काहीच संपर्क होत नव्हता .. काल पण फोन मध्येच कट झाला ..आम्ही परत लावत होतो पण लागत नव्हता .. तु निघालीस एवढंच समजलं .. बाहेरची परिस्थिती बघून आणि पावसाच्या येणाऱ्या बातम्या ऐकून आम्ही नंतर तुझी येण्याची आशाच सोडली होती .. “ आई रडत रडत म्हणाली ..
“ अगं तिला जरा आंघोळ वगैरे उरकू दे .. काहीतरी खायला दे पोरीला .. पोरगी भुकेलेली असेल .. बाकी गोष्टी आपण नंतर करू ..” बाबांनी आईला सावरले ..
“ मानसी बाळा .. जा आंघोळ उरकून घे .. तुला खायला बनवते मी ..” आई म्हणाली ..
मानसी आंघोळ वगैरे उरकून आली ..
“आई दादा उठला नाही का अजून ?..” मानसीने विचारले ..
“ नाही गं .. काल खूप दमून आला तो .. रात्री तुझ्या काळजीत बराच वेळ जागा होता .. पहाटे झोपलाय ..आता उठवायला पाहिजे .. बराच उशीर झालाय ..” आईने सांगितले ..
“ मी उठवते थांब ..” मानसी म्हणाली ..
“ ए दादा .. उठ रे .. किती उशीर झालाय .. तुझी नेहमीची ७.५५ ची ट्रेन मिस होईल बरं .. “ मानसी मुद्दाम म्हणाली ..
“ काय .. उशीर झाला .. मेलो आता मी .. “ सूरज धडपडत उठला .. पण थोड्या वेळातच भानावर आला ..
“ मनू तु आलीस .. “ सूरजने रडत रडत मानसीला मिठी मारली ..
“ सकाळी आले मी दादा ..” मानसी म्हणाली ..
“ मनू तु कुठे होतीस ?.. कोणत्या परिस्थितीत होतीस ?.. आम्ही किती वाट बघितली ..” सूरजने विचारले ..
“ सर्व सांगते .. तु आधी आवरून ये .. सर्वांना एकत्रच सांगते ..” मानसी म्हणाली ..
तेवढ्यात बाजूच्या काकू आल्या ..
“ अहो मानसीची आई .. आली का मानसी ? .. बाजूच्याच काकूंनी विचारले ..
“ आली हो .. आजच सकाळी आली .. “ मानसीची आई म्हणाली ..
“ अहो आमचा छोटू सांगत होता , तो मोठा नाला आहे ना आपल्या एरियातला .. तिथे म्हणे लांबून वाहून चार प्रेतं आलीत .. कालच्या पावसात अंदाज नसेल आला पाण्याचा ..” काकूंनी सांगितले ..
मानसीला ती तरूण मुलं आठवली .. ज्यांनी त्यांना पुढे सानिकाच्या घराकडे जाण्या पासून रोखले होते .. मानसीला ती मुलं देवदूतचं भासू लागली .. त्यांनी थांबवलं नसतं तर आज आपण जिवंत नसतो .. असा विचार मानसीच्या मनात आला ..
नंतर मानसीने तिघांना एकत्रच काल ॲाफिसला पोहचल्या पासून ते घरी पोहचेपर्यंतचा वृत्तांत सांगितला .. मानसीचे कथन ऐकून सर्वांच्या डोळ्यांत पाणी तरळलं .. एवढ्या सर्व दिव्यातून मानसी परत सुखरूप घरी आली त्याबद्दल सर्वांनीच देवाचे आणि तिला पदोपदी मनुष्यरूपात भेटलेल्या देवदूतांचे आभार मानले .. आणि सर्वांनीच मुंबईकरांचं स्पिरिट अनुभवलं ...
