तिचा पुनर्विवाह
तिचा पुनर्विवाह
शौनक इंजिनीअर होता. चांगल्या कंपनीत जॉब होता त्याला. शौनकला एक बहीण होती, ते दोघे मुंबई मध्ये राहायचे आणि त्याचे आई वडील गावी असायचे. गावी त्यांचं मूळ घर आणि शेती असल्यामुळे ते गावीच राहायचे. मुंबईला मुलांकडे यायचे महिन्यातून एकदा तरी. आता शौनकला चांगली नोकरी मिळालेली त्यामुळे त्यांचा टेन्शन जरा कमी झालेल. मुंबई मध्ये छोटस का होईना पण शौनकच स्वतःच घर होत. ती सोय त्याच्या आई वडिलांनी आधीच करून ठेवलेली. आता शौनकच्या आईला दोन्ही मुलांच्या लग्नाची काळजी लागलेली.कारण आतापर्यंत खूप कष्टाने दोघांना शिकवून नोकरीला लावलेलं असत तेव्हा आता सुखाचे दिवस यावे ही प्रत्येक आई सारखी सामान्य अपेक्षा शौनकच्या आईचीही होती. तसा लग्नाचा विषय काढला की शौनक बोलायचा की आधी बहिणीच करू मग मी करेन. शौनक खूपच जबाबदार आणि सरळ मार्गाने जाणारा मुलगा होता.
शौनकच्या आयुष्यात तश्या मैत्रिणी खूप होत्या कारण त्याचा स्वभाव खूप मनमिळाऊ आणि कधीही मदतीला धावून जाईल असाच होता. त्यामुळे मुलींना त्याच्यासोबत नेहमी सुरक्षितच वाटायचं.शौनकही सगळ्यांसोबत जसा मस्ती करायचा तसा कुठे काय चुकलं तर बोलूनही दाखवायचा हक्काने. शौनकला समाजात वाईट रूढी, परंपरा चालतात त्याबद्दलही खूप चीड होती. तर असा शौनक कोणाच्या सहज प्रेमात पडेल तर नवलच. अस्मि शौनकच्या अनेक मैत्रिणींमधलीच एक. दिसायला फार सुंदरही नाही आणि वाईटही नाही. नाकी डोळी छान, लाघवी चेहरा, स्मित हास्य, आणि सदा आनंदाचा वाहणारा खळाळता झरा. खूप उत्साही होती आणि शौनक सोबत तिचे विचार चांगले जुळायचे. मनातल्या मनात शौनक तिला आवडायचा पण ती कधी बोलली नाही आणि अश्यातच तिला एक स्थळ चालून आलं.तिला वडील नव्हते त्यामुळे आईने निवडलेल्या मुलाशी अस्मिने लग्न केलं.शौनकही गेलेलाच लग्नाला.
इकडे शौनकने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी मुलं बघायला चालू केलेलं. साजेसा मुलगा भेटला की बहिणीच लग्न करायचं अशी शौनकची इच्छा होती.एक दिवस अस्मि भेटते शौनकला रस्त्यात.शौनक खूप खुश होतो पण अस्मिच्या चेहऱ्यावरच ते हसू हरवलेलं असत. ती खूपच निराश,निरुत्साही आणि आयुष्यातून खूप काही गमावल्यासारखी दिसत होती.
शौनकला ती ओळखूनही न ओळ्खल्यासारखं करते आणि निघून जाते. क्षणभर शौनकला काहीच कळत नाही की नक्की काय झालं? नंतर शौनक तिच्या घरी जाऊन भेटतो तेव्हा त्याला कळत की ज्या मुलासोबत अस्मिच लग्न झालेले त्याच दुसऱ्याच मुलीवर प्रेम असत.त्याला अस्मि नको असते पण जबरदस्ती लग्न केलेलं असत.अस्मिला जेव्हा हे सगळं कळत तेव्हा ती ते घर सोडून येते. शौनकलाही कळत नाही की यात अस्मिची काय चुकी? याची शिक्षा तिला का? तिचा नवरा दुसरं लग्न करेलच पण अस्मिचा काहीच दोष नसून तिच्यावर समाज वाईट नजर ठेवून राहणार. घटस्फोटित म्हणून तिला हिनवणार आणि उद्या तिला लग्न करावं वाटलं तर तिलाही कोणी घटस्फोटित किंवा एखादा लहान मुलगा नाहीतर मुलगी असलेला माणूसच तयार होईल. तिच्या जागी एखादा मुलगा असता तर तो सहज रीतीने दुसरं लग्न करू शकेल आणि समाजात ताठ मानेने वागेलही पण अस्मि सारख्या कितीतरी जणींनाच हे सगळं का भोगाव लागत?या सगळ्या विचारांनी शौनकच डोकं बधिर होत. समाजावर राग येत होता पण आता त्याच्यासाठी महत्वाचं होत की आपल्या मैत्रिणीला सांभाळणे. तिला तीच आनंदी आयुष्य परत देणं. तिच्या चेहऱ्यावर हसू आणणे.
अस्मि एका महिन्यातच सासरहून माहेरी आलेली असते.तिच्यासाठी हा धक्का मोठा असला तरी ती हरणारी नव्हती.तिने नोकरी करायला सुरू केलं. समाज, पाहुणे, नातेवाईक येता जाता खूप बोलायचे पण शौनकच्या हिमतीने ती लढायला शिकलेली. झालं त्यात तिचा काहीच दोष नव्हता आणि आनंदी आयुष्य जगण्याचा तिचा हक्कच आहे हे शौनकने तिच्या मनावर बिंबवलेलं. तिच्यातला आत्मविश्वास त्याने परत आणलेला. रोज दोघे भेटायचे,बोलायचे, कधीतरी फिरायला जायचे.हळूहळू अस्मि पहिल्यासारखी हसायला लागलेली. व्यक्त व्हायला लागलेली आणि आतून तिला आता शौनक आवडायला लागलेला. तो एक दिवस भेटला नाही तरी ती अस्वस्थ व्हायची. पण हे सगळं बोलायची तिची हिंमत नव्हती. त्याच्या आयुष्यात अविवाहित चांगली मुलगी असावी असच तिला वाटायचं. अस्मिचा या काळात घटस्फोट झाला होता. एक बंधनातून मुक्त झाल्यासारखं वाटत होतं तिला. आणि हे सगळं शौनकमुळे शक्य झालेल. ज्यादिवशी घटस्फोट झाला त्यादिवशी अस्मि शौनकचे खूप आभार मानते आणि मनातलं जे काही होत ते त्याला सांगते कारण मनावरच ओझं तिला कमी करायचं होतं.
अर्थातच शौनकला याची कल्पना होती. यादरम्यान शौनकचीही खूप जवळची मैत्रीण, सुखदुःखाची सोबती ती झालेली. त्यामुळे शौनकलाही ती आवडू लागलेली. शौनकनेच अस्मिला लग्नासाठी विचारलं कारण समाज काय म्हणेल याची त्याला पर्वा नव्हती. त्याच्यासाठी बदल खूप महत्त्वाचा होता. ज्या मुलीची काहीच चुकी नाही तिने आयुष्यभर नसलेल्या चुकीची शिक्षा भोगावी, समाजाने तिला वाळीत टाकावं, तिला चांगला मुलगा मिळणं शक्य असताना फक्त या रूढी, परंपरा मुळे तिने विवाहित किंवा विधुर किंवा एक पालक असलेल्या मुलाशी लग्न करावं असं त्याला खरंच वाटत नव्हतं. हा बदल महत्वाचाच होता त्याच्यासाठी. आणि कोणी दुसऱ्याने तो करण्यापेक्षा "मी का नाही"? हा प्रश्न स्वतःला त्याने विचारलेला.
खूप विचारमंथन झाल्यानंतर अस्मि आणि शौनकने लग्नाचा निर्णय घेतला. त्याआधी शौनकच्या बहिणीच लग्न ठरलं आणि छान पार पडलं सुद्धा. शौनकने घरी अस्मि बदल सांगितलं. अर्थातच ती घटस्फोटित होती त्यामुळे त्याच्या घरून विरोध हा होणारच होता.अस्मिच्या घरून विरोध नव्हता कारण मुलीच चांगलंच व्हावं अस वाटत असत प्रत्येक आईला. शौनकच्याच घरून कडाडून विरोध झाला, आईने जीव देण्याची धमकीही दिली पण शौनक कोणत्याच विरोधाला जुमानला नाही. त्याला समाज सुधारक फक्त इतिहासातच ठेवायचे नव्हते, वर्तमानकाळातही आहेत हे दाखवायचं होत. शौनकही हार मानत नव्हता हे बघून त्याच्याच वडिलांनी एक दिवस मंदिरात अस्मि आणि शौनकच लग्न लावून दिल. तो दिवस दोघांच्या आयुष्यातला अनपेक्षित दिवस होता आणि तेवढाच आनंददायी पण. एक लढाई त्यांनी यशस्वीपणे लढली आणि जिंकली पण. एक वर्षांने अस्मि आणि शौनकच्या घरी गोड लक्ष्मीने जन्म घेतला आणि शौनकच्या आईचाही राग गळून पडला. आता शौनकच कुटुंब खूप आनंदात आहे अस्मिच्या खळाळत्या झऱ्याप्रमाणे.
समाप्त.