STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

तारेवरची कसरत...२

तारेवरची कसरत...२

10 mins
362

पालकांचे मुलांवर प्रेम असते म्हणून मुलांचे लाड केले जातात, हा समज खरा नाही. प्रेम व्यक्त करण्याचा लाड करणे हा एकमेव मार्ग नसतो. लाडा मागे पालकांची वेगळी मानसिकता असते....की जे आपल्याला मिळाले, किंवा जे मिळाले नाही तें सगळं मुलाना द्यायचा पालकांचा प्रयत्न असतो.... असे ' आमचेही पालकत्व' या लेखात प्रवीण कुलकर्णी म्हणतात....


खर तर मुलांचे लाड करावे की करू नये??? हा प्रश्न ऐकला की हसायला येते...निरर्थक वाटतो.... मंडळमोठी माणसे म्हणजे आजी आजोबा म्हणतात लाड मुलांचे करायचे नाहीत तर मग् कोणाचे करायचे???


लहान मुले आई बाबा, मावशी, काका, आत्या, आजी आजोबा सर्वांचीच लाडकी असतात...त्यात पहिले मूल असेल तर बघायला नको... लाड, कौतुक जरुर करावे पण त्याचे रूपांतर हे अती लाडात व्हायला नको इतकेच....


आता तुम्ही म्हणाल लाड आणि अतीलाड यात फरक कसा करणार???चला काही उदाहरण घेऊया...


अनुप आणि अंकीता याना एक मुलगी होती....दोन्ही कडे पहिली म्हणून खूप लाड व्हायचे...पण जरा जास्त वाटले की ते दोघे खंबीर व्हायचे, एक ओरडत असताना दुसरे कॊणी जवळ घ्यायचे नाही...कारण दुसऱ्या कॊणी पाठीशी घातले की ओरडणार्या व्यक्तीच्या शब्दाला किंमत रहात नाही, आणि मुलांना त्यांची चूक समजत नाही....जिथे चूक तिथे ओरडायला हवे असे आई बाबा म्हणून त्यांचे मत ठाम होते....ते कधी कोणती गोष्ट मागितली की लगेच देत नसत....उपयोगी वस्तू असेल तर नक्कीच आणून देत पण जर उपयोगी नसेल तर लगेच नाही न म्हणता, मुलीला विचारत असत, कशाला हवे तूला??? तिच्याशी बोलुन ते तिला ते पटवून देत असत की खरच ही गोष्ट आता आवश्यक नाही...आपण नंतर घेऊ असे तीचं म्हणतं असे....


या उलट सागर आणि सायली त्यांचेच नातेवाईक...अनुप चा आतेभाऊ...त्यांना पण एक मुलगी...साधारण दोघी बरोबरीच्या....पण वागण्यात खूप फरक....कारण तिने मागितले की तिला लगेच ती वस्तू तिला आणून देणे....तिने हट्ट केलेली प्रत्येक गोष्ट तिला दिली नाही ना तर ती रस्त्यावर रडत लोळते, असे परत कौतुक म्हणून तिच्या समोरच सांगायचे....त्यामुळे तिला वाटायचं आपण करतो तें बरोबर आहे...ती नाही ऐकणार....जाउदे लहान आहे असे म्हणून प्रत्येक गोष्टी देणे... असे ते करत होते....


एकदा कार्यक्रमानिमीत्त दोघे एकत्र आले....तेव्हा अगदी हाच अती कौतुकाचा विषय होता...सागरकडे...अनुप फ़क्त ऐकत होता....


सागर म्हणाला...ती राग आला की मोबाइल फेकून देते...वरून खाली टाकते....आम्ही तिला टॅब घेऊन दिलाय तिच्या ह्या वाढदिवसाला.....आता ४ वर्षाची मुलगी आणि टॅब हे लाड म्हणायचं की अती लाड तुम्हीच सांगा.....


अशी किती तरी उदाहरण आपण बघत असतो???तुम्हाला पण आजू बाजूला दिसली असतीलच....


१. मुलांना रोज आवडत असलेले खाण दिले पाहिजे मान्य पण तें पौष्टीक पण असले पाहिजे...हे पालक विसरून जातात...


२.एखादे मूल उर्मट बोलले तरी हसुन दुर्लक्ष करतात पालक....


३. काही पालक तर स्वतः च्या मुलांची चूक असली तरी, आपले तें बाब्या आणि दुसऱ्याचे कार्ट करून मोकळे होतात..


४.आमच्या हिला प्रत्येक कार्यक्रम असला की नवीन ड्रेस लागतो, जुना घालत नाही...आता ह्यात कौतुक करण्या सारखे खरेच आहे का???


५.बाहेर गावी जाताना बॅग अगदी जास्तीत जास्त गच्च भरत असतात काही पालक...का तर आपण कुठे कमी दिसू नये....


मुले नाराज झाली, त्यांचे मन दुखावले तर आपल्या पासून दुरावतील म्हणून काही पालक घाबरून ओरडत नाही...आणि मग् मुले मोठी झाली की त्याचा गैरफायदा घेतात....


खरच सर्व वस्तू दिल्या, सुख सोयी दिल्या म्हणजे उत्तम पालक का????


पालकत्व एवढ सोपं असते तर श्रीमंत पालक हे सर्वात बेस्ट ठरले असते....पण पालकांना मुलां बद्दल ओढ असते, ती असायला तर हवीच आणि व्यक्त ही व्हायला हवी....तसेच मुलांना आई बाबा आवडतात पण येतां जातात प्रत्येक गोष्टीचे लाड खरच पूरवायला हवे का??? खरच सारखे कोडकौतुक करायची गरज आहे का???


वर दिलेली यादी हवी तेवढी वाढवता येईल...पण हे सर्व अती लाडात येते....


म्हणूनच लहान असल्या पासूनच मुलांना शिस्त किंवा


तें वळण प्रत्येक पालकांनी लावायला पाहिजे...आणि त्या साठी त्यांच्या मध्ये दुमत असू नये...किंवा घरात जेवढ्या व्यक्ती असतिल त्या सर्वांच्या वागण्यात तें असायला हवे....एकमेकांवर जबाबदारी ढकलली तर, मुलांचे नुकसान होते...एकट्या आई किंवा बाबांवर टाकून उपयोग नसतो....


डॉ. फ्रीटझ रेडल यांनी शिस्ती ची तुलना हि रोड सिग्नल सोबत केली आहे...ते म्हणतात शिस्तीच्या सिग्नल चे तीन दिवे असतात....


हिरवा ----- म्हणजे होकार, मुभा, मोकळीक....


पिवळा ------ ठीक आहे आता पुरतं चालेल....


लाल------ कोणत्याही परिस्थिती मध्ये अश्या वागण्याला मुभा नाही....


हिरवा दिव्याच्या वेळी जितकी मोकळीक दिली जाईल,लाल दिव्याच्या वेळी तेवढीच कडक शिस्त असावी....


म्हणजे आपल्या चुकीच्या वागण्यावर आई बाबांच लक्ष आहे, हि जाणीव मुलाना दिलासा देते....जसे दंड होऊ नये म्हणून आपण सिग्नल चे पाळतो कारण आपल्याला माहीती असते हिरवा दिवा लागला की आपल्याला कॊणी अडवणार नाही,आपल्या सुरक्षितेसाठी हे नियम आहेत हे माहीती झाल्या मुळे लाल दिव्या च्या वेळेस थांबायला आपल्याला जड जात नाही...मुलांचे सुद्धा असेच असते....


मूल आणि पालक म्हटलं की शिस्त आली...त्या बाबतीत कोणाचे दुमत असेल असे नाही....पण ती कशी लावावी या वर मात्र बरीच मते पडतील.... मी तर म्हणेन ह्यात दोन पक्ष पडतील...एक प्रेमपक्ष आणि दुसरा शिस्तपक्ष....


पहिल्या पक्षातले पालक मुलांना अजिबात ओरडत नाहीत...त्यांच्या मते ओरडले तर मुले दुरावतात....अती शिस्तीच्या नावाखाली दबून जातात....


शिस्त पक्ष वाले प्रत्येक गोष्ट ही अशी झालीच पाहिजे असे असतात.... पण खरच या दोन्ही गोष्टी अती झाल्या तर माती होणारच....कायदा केला तरी वाईट आणि फाजील लाड सुद्धा वाईटच....ह्या दोन्ही गोष्टींचा ज्याला सुवर्णमध्य साधता आले तर तो सुजाण पालक....


जिथे शिवाजी ला ही शिवाजी घडवता आला नाही तिथे आपले काय हो???? हे माझे नाही त्यांच्या नाटकातील वाक्य आहे....


खर तर शिस्त म्हटलं की फ़क्त आई डोळ्या समोर येते...पण खरंच फ़क्त आईचं काम आहे की घरात असणार्या सर्वांची जबाबदारी??? मुले मोठी माणसे कशी वागतात तें बघूनच मोठे होतात....त्यामुळे मुलाना शिस्त लागावी वाटत असेल तर पालकांनी ती स्वतःला लावुन घ्यायला हवे...बोलून ओरडून शिस्त लावण्यापेक्षा ती आपल्या कृतीतून लावली गेली पाहिजे....


काही ठिकाणी तर मुलांना अगदी धारेवर धरले जाते,असे वागलेच पाहिजे,हे झालेच पाहिजे पण असे झाले तर मुलांच्या मनाचा कोंडमारा होतो...कारण त्यांच्या इच्छा, भावना याना मुभा नसते,पालकांचा शब्द अंतिम....हे अगदी फार पूर्वी असायच...आता पण अपवाद आहेत...


शिस्त म्हणजे कडक नियम वगैरे असतात पण त्याही पलीकडे जाऊन आपण लहान असल्या पासून जर योग्य वळण लावायचा प्रयत्न केला तर मुलांना योग्य शिस्त लागते... मूल कितीही लहान असले, तरी खेळुन झाल्यावर खेळणी आवरून ठेवणे, बाहेरून आल्यावर आपली चप्पल जागेवर ठेवणे,हात पाय धुणे...


घरात नेहमीच गोंधळ न करता कधी तरी शांत बसणे,उगाच मोठ्या आवाजात न बोलणे, मोठ्या माणसांना उलट न बोलणे, आपल्या स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवणे, हाताने जेवणे, ताट स्वच्छ करणे, दिवा लावल्यावर देवाला नमस्कार करून सर्व मोठ्यांना नमस्कार करणे ह्या सर्व गोष्टींची सवय आपल्या लावण्यावर असते...


मुले थोडी मोठे झाली की, स्वतःचे दप्तर स्वतः भरणे,शाळेतून घरी आल्यावर आपल्या वस्तू जागेवर ठेवणे,वेळेवर अभ्यास पूर्ण करणे अशी भरपूर मोठी यादी होइल.... अजून थोडे मोठे झाले की घरकामात आईला मदत करणे....


पण शिस्त ही लहानांना आणि मोठ्यांना सारखीच असावी..कारण काही घरात मोठे स्वतःच्या सोयी आणि इच्छेनुसार पाळतात पण लहान मुलांकडून अपेक्षा केली जाते म्हणून.... घरातले मोठे कसे वागतात त्याचे अनुकरण लहान मुले करतात...म्हणून पालकांनी स्वतः आधी नियम पाळायला हवे आणि मग् मुलांकडून अपेक्षा करावी....


शिस्त लावताना कौतुक आणि टिका आणि शाबासकी आणि शिक्षा याचा वापर केला आणि थोडी आपली भाषा बदलून मुलांच्या भाषेत त्यांच्याशी बोलले तर तें नक्कीच ऐकतात... तरी पण बऱ्याच जणांचे मत पडते की शिक्षा म्हणून एक तरी फटका हवा...


डॉ. रमा मराठे म्हणतात, ' आजच्या या स्पर्धेच्या युगात मुलांवरील ताण प्रचंड वाढलाय' त्यामुळे मुलां मधील आक्रमकता, एकटेपणा, अस्वस्थता, न्युनगंड वाढत आहे...


शाळा म्हटलं की वेगवेगळ्या स्पर्धा आल्या.स्पर्धा म्हटलं की त्यातून नंबर काढले जातात आणि मग् होणारी तुलना..


या तुलनेमुळेच मुलांमध्ये न्युनगंड वाढत आहे, मुले आक्रमक होतात,आणि जे मागे पडतात तें एकटे राहतात,आणि जे भाग घेतात त्यांना ते पूर्ण होईपर्यंत अस्वस्थता असते,चिडचिड वाढते. कसे ते बघण्यासाठी आपण काही उदाहरणे घेऊ...


1. सारा नेहमीं सगळ्यात पहिली,कोणताही कार्यक्रम असो तिचा नंबर ठरलेला आणि बक्षिस सुद्धा..

त्यामुळे लहान असल्या पासून तिला हार माहिती नव्हती, कौतुकाची सुद्धा एवढी सवय लागली होती तिला...आणि ती ८ वर्षाची असताना तिचे बाबा खूप आजारी झाले ते ही वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी...

तेव्हा तर खूप साऱ्या स्पर्धा असायच्या नेहमीं सगळ्यात भाग घेणारी ती,ह्या वर्षी तिला कशातच भाग घेता आले नाही,कारण बाबांना शहरात न्यायला लागले आणि ही एकटी कशी राहीलं म्हणून आई ने शाळेत जाऊन सुट्टी काढून आणली...बाबा बरे झाले घरी आल्यावर शाळेत बक्षिस समारंभ होता,सगळ्यांना बक्षिस मिळाले सगळयांचं कौतुक होत होते पण सारा मात्र गप्प होती तिला राग येतं होता,आतापर्यंत तिला एवढी ह्या सगळ्यांची सवय झाली होती की ती हार पचवू शकतं नव्हती, घरी आल्यावर जेवली नाही वस्तू फेकू लागली आईने तिला समजावले आग तूला भाग घेता आले नाही म्हणून मिळाले नाही मग् त्यात काय एवढे पण तिचा आक्रमक पणा एवढा वाढला होता की तिच्या साठी नंबर येणे हि खूप महत्वाची गोष्ट झाली होती....


2. दीया खूप हुशार पण अभ्यास सोडून तिला कशात रस नव्हता,तिची आई मात्र सारखीच तिची तुलना तिच्या मैत्रिणी सोबत करत असे, ती कशी डान्स, acting, crafting,ड्रॉइंग चांगले करते आणि तू तूला काहीच येत नाही.मुलीच्या जातीला सगळे यायला हवे.सारखे ऐकून तिच्या मनात न्युनगंड निर्माण झाला.ती एकटी राहू लागली कोणाशी बोलावसं वाटायचं नाही तिला त्यावरून पण सर्व जण बोलत असत तिला...


3.अंजली एकदम ऍक्टिव्ह, हुशार नसली तरी ढ हि नव्हती.सगळ्याची आवड होती सगळ्यात भाग घ्यायची पण त्याचा रिज़ल्ट लागे पर्यंत ही अस्वस्थ तीचं कशात लक्ष लागायचं नाही.आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तिला कॊणी काही सांगितलं की चिडचिड करायची.त्यामुळे लहान वयात टेन्शन घेऊन तिच्या हृदयाला त्रास झाला...


हल्ली खरच स्पर्धा आणि त्यातून चढाओढ बर ही फक्त लहान मुलांच्या बाबतीत आहे असे नाही तर प्रत्येक जण  दुसऱ्यांसोबत सतत तुलना करत असतात.

पण खरच प्रत्येक गोष्ट स्पर्धा म्हणून करायची असते का? कधी तरी आपल्याला आनंद मिळावा म्हणून पण करून बघायला काय हरकत आहे. तुलना करून आपण आपल्याला मिळत असलेला आनंद गमावतो असतो नाही का? मुळात दुसरा करतो म्हणून ती गोष्ट आपण करायला हवीच का? ती गोष्ट आपल्याला आवडते का? त्यातून आपल्याला समाधान मिळते का? ह्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या नाही का? जी गोष्ट आपल्याला नाही जमत पण दुसऱ्या ला जमते तर तें accept करायला शिकायला हवे. दुसऱ्या चे कौतुक पण करायला यायला हवे. मुळात हार मानता यायला हवी ती पचवायला शिकता यायला हवी.


आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यात मला किती आवडते, मला त्यातून काय मिळते, नंबर यावा म्हणून कोणतीच गोष्ट करायची नसते हे मुलाना आपण लहानपणापासूनच शिकवायला हवे...आणि तुलना करायचीच असेल तर ती स्वतःशी करा. भूतकाळाची तुलना वर्तमानकाळाशी करा, कालच्या पेक्षा आज किती प्रगती आहे ते बघा. दुसऱ्या कोणाशी तुलना करू नका.आज जे आहे त्याचा आनंद घ्या...कारण आपण जसे त्यांच्या शी वागू तसेच ते आपल्या सोबत वागत असतात.उद्यां एखादे मूल बोलले त्याची आई बघ कशी तू नाही तसे करत तर आपल्याला कसे वाटेल?? पालकांनी नेहमीच जपून भाषा वापरायला हवी,कारण मूल जसे वाढत, तसे घडते.

अश्विनी देव म्हणतात, 'पालकांनी स्वतःच्या मूल्यांबाबत स्पष्टता असेल, तरंच ते योग्य ती मूल्य मुलां पर्यंत खंबीरपणे व सजगतेने पोहचवू शकतील.म्हणजे मुलांवर संस्कार होण्यासाठी 'पालकांची सुजाणता' ही बाब आवश्यक ठरते.'


मुलांवर संस्कार कसे करावे, हा तर फारच मोठा आणि महत्वाचा प्रश्न असतो नाही का? पण खरच संस्कार हे ठरवून होतात का? तें आपोआप आपल्या मोठ्या माणसांच्या वागण्या बोलण्या मधून होत असतात.


आपण पालक मुले लहान असल्या पासून त्यांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून ते घडत जातात. लहान असताना आपण मुलांची काळजी घेतो,लाड करतो आणि त्यातून त्यांना हे माझे आहे, माझ्या साठी आहे अशी भावना तयार होते. मग् ते हट्ट करू लागतात हवे म्हणजे हवे आणि आपण त्या हट्टीपणाला काबुत ठेवायचा प्रयत्न करतो आणि संस्कार या गोष्टीची सुरूवात होते. ' नकाराचा स्वीकार' हा खरच मोठा संस्कार आहे. आणि ही सुरुवात जेवढी लवकर होईल तेवढ चांगले असते.


ही भावी पिढी घडवण्यासाठी पालकांना आधी काही मूल्य स्वतःच्या वागण्यातून दाखवायची गरज आहे. कारण "VALUES CAN NOT BE TAUGHT DIRECTLY" ते आपल्या वागण्यातून निरीक्षण करून आत्मसात करत असतात. नुसते चार संस्कृत श्लोक बोलले की संस्कार असे नसते, तर तें वागण्या बोलण्यातून दिसायला हवे. संस्कार हा काही एखादा प्रोग्रॅम नाही की तो दुसऱ्या माणसांना दाखवण्या साठी करायचा, त्याच्या मध्ये नियमितपणा हवा.


संस्कारासाठी मुले पालकांवर अवलंबून असतात, त्यामुळे पालकांनी आधी स्वतः मध्ये चांगले,सकारात्मक बदल घडवायला हवेत.कारण संस्कार हे कोणत्याही क्लास ला जाऊन शिकता येतं नाहीत किंवा विकत घेता येतं नाहीत.


काही पालक आपल्या वागण्यातून खरच दाखवून देतात, उदाहरण द्यायचे झाले तर मुलांच्या वाढदिवसाच्या वेळी गरीब मुलांना जर आवश्यक वस्तू दिल्या आणि असा वाढदिवस साजरा केला तर या अनुभवा मधून मुले खूप शिकत असतात...आणि मदत करणे ते ही निस्वार्थी पणे हा सुद्धा एक संस्कार आहे जो आपोआप त्यांच्यामध्ये रूजवला जातो.


पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आई बाबांवर अवलंबून असते.त्याच्या बऱ्या वाईट गोष्टींचा पाया लहानपणीच भरला जात असतो.

श्यामची आई या पुस्तकामधील हे वाक्य...


आणि हे खरे असले तरी बऱ्याच वेळा मूल आपल्याला घडवत असते हे मात्र नक्की,मूल होण्या आधीचा आपला स्वभाव आणि नंतरचा ह्यात खरंच खूप मोठा असतो. आपण आपल्या भोवती असलेली चौकट मुलांसाठी बदलत जातो अगदी आपल्याही नकळत...


अनेक प्रसंगात मूल नावाचे परीक्षक आपले मूल्य मापन करत असतात, तर कधी शिक्षक होऊन शिकवतात तर कधी आपले पालक होतात..


'पालकत्व' या विषयावर जेवढे बोलू तेवढे कमीच आहे, मुळात पालकत्व हे कधीच न संपणार आहे. उलट हा शब्द विस्तारीत जाणारा आहे. हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्या समोर येतात फ़क्त आई आणि बाबा..


पण खरच हा शब्द खूप विस्तारीत होणारा आहे. आजी आजोबा आणि नातवंडे, शिक्षक आणि विद्यार्थी मी तर म्हणेन हल्ली सासू आणि सून यांच्या मध्ये सुद्धा पालकत्वाचा खूप मोठा भाग दिसतो कारण हल्ली सासू बाई जाच करताना दिसत नाही तर सून बाईला प्रोत्साहन देताना दिसतायत, खरच बदलत्या काळाप्रमाणे बदलताना दिसतायत....


कसा वाटला लेख तें नक्की सांगा....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर लेखाच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. लेखात अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational