Sambhaji Dudhmal

Abstract Drama

4.8  

Sambhaji Dudhmal

Abstract Drama

ताराआक्का

ताराआक्का

5 mins
491


उन्हाळ्याचे दिवस होते .अंगाची लाहीलाही होत होती . गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जसा चर्र असा आवाज येतो . तशी जमीन तापलेली होती . अशा भर उन्हात बाबुरावचं लग्नाचं वऱ्हाड ट्रक्टर मधून चाललं होतं .बाबुरावचे वडील प्रगतीशील शेतकरी तर होतेच पण ते सेवानिवृत्त मास्तर ही होते . त्यांचा पेहराव म्हणजे डोक्यावर काळी टोपी , नेहरु शर्ट , घोतर आणि गळ्याला मफलर गुंडाळलेली असायची . त्यांचे नाव कोंडीराम होते . ते कोंडीराम मास्तर म्हणून सर्व परिचित होते . 


       कोंडीराम मास्तर हे प्रगतीशील शेतकरी असल्याने , यांच्याकडे ट्रॅक्टर होतेच , शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरची त्यांना गरज होती म्हणून त्यांनी बँकेचे कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेले होते.त्यामुळे त्यांनी आपले घरचे एक ट्रककर आणि अजून दोन भाड्याची ट्रॅक्टर लावली आणि बाबुरावच्या लग्नाला निघाली. बाबुरावच्या लग्नाला एकूण तीन ट्रक्टर झाली.एक ट्रॅक्टर महिला मंडळीला तर दोन ट्रक्टर पुरुष मंडळीला होती . 


     लग्नाचे मुहूर्त दुपारच्या तीन वाजेचे होते. त्यामुळे बाबुरावचे लग्नाचे वऱ्हाड भर उन्हाचं निद्यालं होतं . ट्रक्टरच्या ट्रॉलीत बसलेली वऱ्हाड मंडळी भाजून निघत होती . सुर्य मात्र आग ओकता होता. जणू काही वऱ्हाडी मंडळींची सत्व परीक्षाच बघत होता . त्यात पोलीसांची नजर चुकून आडवाटेने निघालेले लग्नाचे वऱ्हाड दचके दुचके खात रस्त्यावरचा फुफाटा अंगावर घेत वऱ्हाड कसबसे विवाहस्थळी येऊन पोहोचले.


      वऱ्हाड मंडळी ट्रक्टर मधून उतरली वऱ्हाडी मंडळीचे अवतार बघण्यासारखे झालेले होते. वऱ्हाड मंडळी धुळीने पार माखली होती . कपडे काढून काढून झटकली तेव्हा कुठं वऱ्हाड मंडळींची कपडे जाग्यावर आली. विवाहस्थळी मुलीकडच्या लोकांनी वऱ्हाडी मंडळींचं पाणी देऊन, वाजत - गाजत स्वागत केलं .वऱ्हाड मंडळी एकदाची विवाह मंडपात सावलीला जावून विसावली. तेंव्हा कुठं त्यांना हायसं वाटलं. विवाह मंडपात एकच घाई चाललेली होती .लग्न वेळेवर लावण्यासाठी.


       विवाह मंडपात सर्व तयारी झालेली होती.भटजी आलेले होते. पाहुणे रावळे, मित्र मंडळी आणि वऱ्हाडी मंडळी सर्व आलेली होती. सर्वांचे मानपान देऊन झालेले होते.फक्त नवरदेव तेवढा मंडपात येण्याचा बाकी होता.पूर्वी हनुमान मंदिरातच नवरदेवाची कपडे चढवण्याची प्रथा होती.त्यामुळे नवरदेव बाबुरावनेही मंदिरातच कपडे चढवली आणि घोड्यावर स्वार होऊन बाबुराव सनई चौघड्याच्या गजरात विवाह मंडपात हजर झाला .भटजीने शुभ मुहूर्तावर लग्न लावून टाकले.


       विवाहस्थळावरील सर्व विधी उरकल्यानंतर नवरीकडच्या मंडळींनी भरलेल्या डोळ्यांनी नवरीला निरोप दिला.नवरदेव नवरी आणि वऱ्हाडी मंडळी निघून गेली.वऱ्हाड दिसेपर्यंत नावरीकडील मंडळी बाय बाय करत होती.मंडपात मात्र शुकशुकाट झाला होता. सर्व आलेली मंडळी आप आपल्या परीने निघून गेली होती. वऱ्हाड मंडळी एकदाची आपल्या गावी नवरीला घेऊन सुखरूप पोहचली.दुसऱ्या दिवशी पूजा आरच्या उरकुन गावातील देवदेवतांचे दर्शन बाबुराव व त्याची पत्नीने घेतले. आले होते . कोंडीराम मास्तर मात्र खूष झालेले होते.कारण त्यांच्या मनासारखी सून त्यांना मिळाली होती.


      कोंडीराम मास्तर आणि सुनेची चांगली सांगड बसली होती .कोंडीराम मास्तर सुनेला अगदी मुली सारखे जपत असत.कोडीराम मास्तरांची  सून देखणी , रूपवान, उंचपुरी होती , तिचे नाव ताराबाई होते. ताराबाई जुन्या वळणाची असल्याने ताराबाईचा पेहराव आणि राहणीमान ही जुन्या वळणाचेच होते.ताराबाई ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलगी असल्याने तिला काबाड कष्ट करण्याची सवय होती.


      ताराबाई कष्टला घाबरत नसे. ताराबाईचा आणि बाबुरावचा सुखाचा संसार चालु झालेला होता. ताराबाई माहेरचं सर्व विसरुन संसारात चांगली रमून गेली होती. सगळ्या सुखवस्तू ताराबाईच्या घरात होत्या. तिला कशाचीही कमी नव्हती.गावाच्या अगदी जवळच नदी असल्याने नदीऊन पिण्यासाठी , रोजच्या वापरासाठी पाणी आणावे लागत असे . कपडे धुण्यासाठी इतर बायकांप्रमाणे ताराबाईलाही नदीवर जावे लागत असे. पुढे नदीवर धरण झालेले असल्याने उन्हाळ्यातही नदीला पाणी असायचे.त्यामुळे गावाला कधी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही.           


       ताराबाईचा सुखाचा संसार चांगला चालू होता.पण बाबूरावला कुठून अवदसा आठवली आणि तो दारूच्या आहारी गेला.सुखाच्या संसाराला गालबोट लागले.ताराबाईच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि ताराबाईला बाबुरावचा दिवसेंदिवस त्रास होऊ लागला.कोंडीराम मास्तराने बाबुरावला अनेकदा समजावले पण काही उपयोग झाला नाही.बिन आईचं पोर म्हणून कोंडीराम मास्तराने बाबुरावला काही कमी पडू दिले नव्हते.बाबूराव दारू ढोसून आल्यावर तो काही वेळेस ताराबाईला मारहाण ही करायचा. ताराबाई मात्र सर्व काही सहन करायची.   


       बाबुराव मात्र कधी कधी चांगला वागायचा तर कधी कधी घर डोक्यावर घेयचा. बाबुरावचा मात्र इतर कोणालाही काडीचाही त्रास नव्हता.गावातील आणि गल्लीतील सर्वांशी तो चांगला वागत असे.फक्त दारू ढोसून आला की ताराबाईच्या डोक्याला त्रास मात्र होयचा.भांडायला कारण काहीच नसायचे.बाबुराव ताराबाईला शिविगाळ आणि मारहाणही करायचा.एवढ्या त्रासाला ताराबाई कधीच डगमगली नाही.खंबीरपणे ती आपला संसाराचा गाडा ओडत राहिली.


       कोंडीराम मास्तर नेहमी म्हणायचे,आमची सून म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आहे.ती आल्यापासून घर कसं भरल्या सारखं वाटतं . तिच्यामुळे घराला घरपण आलं. गल्लीतील सर्व बायका तिला ताराआक्काच म्हणायच्या . त्यामुळे ती सर्वांची ताराआक्का झाली होती.ताराआक्का सर्वांच्याच सुख दुःखात सहभागी होयची.सर्वांशी ती गोड बोलायची . तिच्यात एकमेकींना मदत करण्याची भावना होती.गल्लीतील बायकांच्या अडीअडचणीला ती धाऊन जायची.पुढे चालून ती तीन मुलांची आई झाली होती.देवाने तीन गोजिरवाणी मुलं तिच्या पदरात टाकली होती.ती संसारात मुलांचं करता करता पार रमून गेली होती. 


      ताराआक्काचा सुखाचा संसार चालू होता.तीन मुले झाली.आता तरी बाबुरावचे व्यसन सुटेल असे ताराआक्काला वाटले होते. पण बाबुरावची सवय काही केल्या जाईना.ताराआक्काचा देवावर श्रद्धा होती.एक ना एक दिवस माझ्या नवऱ्याची दारू सुटेल असा तिचा आत्मविश्वास होता . पुढे नवरात्र उत्सव जवळ आला होता.ताराआक्का दरवर्षी नवरात्रात नऊ दिवसाचे उपवास करत असे. या ही वर्षी तिने नऊ दिवसाचे उपवास धरलेले होते.गल्लीतील बायका एकमेकींना उपवासाच्या फराळासाठी घरी बोलत असत.


        सकाळचे आधारण अकरा वाजले असतील.ताराआक्का घरातील देवपूजा , फराळपाणी , मुलांचं उरकून धुणं धुण्यासाठी नदीला निघाली होती.बाहेर ओट्यावर कलाबाई उभी होती.ताराआक्का कलाबाईला मामी म्हणत असे. ताराआक्का कलाबाईला म्हणाली , मामी मी धुणं धुण्यासाठी नदीला जातेय धुणं धुवून लगेचच येते.घरी फक्त मुलंच आहेत.थोडं यांच्याकडे लक्ष द्या.मी आहेच . कलाबाई म्हणाली, मी बघते . माझं लक्ष आहे मुलांवर काळजी करू नकोस. तू जा मी बघते.ताराआक्का लगबगीने धुणं धुण्यासाठी निघून गेली .       


ताराआक्का नदीला कन्हैया काहार असेल त्याच वेळी गावातून कन्हैया काहार नदीला मासे पकडण्यासाठी निघाला होता. नदीला खडक भरपूर होती.त्या खडकावर बसून बायका धुणं धुत असत. ताराआक्का मात्र मुलं घरी असल्याने जरा पटापटा धुणं धूत होती . त्या गडबडीत ताराआक्काचा शेवाळलेल्या खडकावरून पाय घसरला आणि ताराआक्का पाण्यात पडली.नदीचे पाणी खोल होते. आणि एकच आरडाओरडा झाला. नदीवरच्या बायका मोठमोठ्यांनी ओरडत होत्या ताराआक्का पाण्यात पडली, ताराआक्का पाण्यात पडली.ती पाण्यात गटांगळ्या खात होती . वाचवा वाचवा म्हणून आकांत करत होती . 


       तेव्हड्यात कन्हैया काहार नदीला येऊन पोहोचला.त्याने मागे पुढे न बघता कपड्यासहित नदीत उडी मारली. आणि ताराआक्काला पाण्यातून बाहेर काढले.ती बेशुद्ध पडली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेलेले होते . तिला लगेचच उचलून कन्हैया काहाराने गावात आणले.आणि निवृत्ती कुंभाराच्या मडकी गाडगे करण्याच्या चाकावर ताराआक्काला गरागरा फिरवले . तिच्या नाका तोंडातून पाणी बाहेर पडले. आणि ताराआक्का हळू हळू शुध्दीवर येऊ लागली.थोड्याच वेळात ताराआक्का उठून बसली.ताराआक्काची मुलं लगेचच आईला जाऊन बिलगली. 


       ताराआक्काच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या . गल्लीतील सर्व बायका रडत होत्या.वेळ आली होती पण काळ आला नव्हता . ताराआक्काचा जीव वाचला म्हणून कलाबाईने एक जिवंत काळी कोंबडी ताराआक्काच्या डोक्यावरून ओवाळून लांब फेकून दिली . कोंबडी फाडफाड करत लांब जावून पडली.कोंडीराम मास्तर ढसा ढसा रडत होते.बायकांची मात्र कुजबुज चालू होती देवीनेच वाचवले ताराआक्काला,देवीचे उपवास कामी आले ताराआक्काला इकडे मात्र बाबुरावच्या तोंडातुन शब्द फुटत नव्हता . त्याची दारू केव्हाच उतरून उतरून गेली होती .  


      गल्लीतील बायकांनी आणि कलाबाईने ताराआक्काला घरी आणलं. कोंडीराम मास्तराने, बाबुरावाने आणि गल्लीतील सर्वांनी उन्हैया काहाराचे गौतुक केले . बाबुरावला मात्र पश्चाताप झाला.बाबुरावचा देवावर विश्वास बसला.नवरात्रीचे दिवस होते.त्यामुळे बायकोला आणि मुलांना घेऊन बाबुरावने थेट कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या अंबाबाईचे बाबुरावने सहकुटूंब दर्शन घेतले.तिथेच बाबूरावला साक्षात्कार झाला आणि देवासमोर,बायकोच्या साक्षीने शपथ घेतली की , आज पासून मी कधीही दारूला हात सुद्धा लावणार नाही . ताराआक्का देवीच्या आणि बाबुरावच्या पाया पडली. ताराआक्काने पुन्हा एकदा डोळे भरुन देवीचे दर्शन घेतले . ताराआक्काच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होती. ताराआक्काची संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा फुलासारखी फुलून,बहरून गेली होती.

 ************


Rate this content
Log in

More marathi story from Sambhaji Dudhmal

Similar marathi story from Abstract