Shilpa Desai

Inspirational

2  

Shilpa Desai

Inspirational

स्वराज्याची वीरांगना : रामराणी भद्रकाली महाराणी ताराबाई

स्वराज्याची वीरांगना : रामराणी भद्रकाली महाराणी ताराबाई

4 mins
245


   इतिहासाला पराक्रमाच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात काम अनेक स्त्रियांनी केलं आहे त्यापैकी एक म्हणजे ताराबाई भोसले. हो महाराणी ताराबाई हे साक्षात छत्रपतींची सुन. मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार स्त्री. शिवाजी राजे व संभाजी राजे यांच्यामागे कणखर पणे स्वराज्याची धुरा सांभाळणारी स्त्री. संभाजीराजांच्या वधानंतर सगळे मराठी पेटून उठले होते. पण त्यांची अशी अवस्था झाली होती की त्यांच्याजवळ राजा नव्हता, फौजा नव्हत्या, खजिना नव्हता, की राज यंत्रणा नव्हती, पण तरीसुद्धा मराठी लढत राहीले. याचे कारण म्हणजे मराठ्यांची रणरागिणी राणी ताराबाई. अशा कर्तबगार भद्रकाली व्यक्तिमत्त्वामुळे मराठे लढत राहिले.


महाराणी ताराबाई म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या १६७५ मध्ये त्यांचा जन्म झाला वयाच्या आठव्या वर्षी छत्रपतींचे धाकटे पुत्र राजाराम राजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १७०० साली राजाराम महाराजांचे निधन झाले. भावी गादीचे वारस लहान असल्याने २५ वर्षीय ताराबाईने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. वैधव्याच्या नावाखाली रडत न बसता आपले दुःख बाजूला ठेवून स्वराज्याच्या रक्षणासाठी ताराबाई सिद्ध झाली. राजाराम राजे यांच्या निधनानंतर आता आपल्याला सहज पणे हिंदू स्वराज्य काबीज करता येईल व ताराबाई सारख्या निराधार स्त्रीला आपण एक हाती पराभूत करू अशी औरंगजेबाची समजूत होती त्याची ही घमेंट ताराबाईंनी उतरवली. त्यासाठी ताराबाईने विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र केले. त्यांची युद्धनीती अचाट होती. मेटाकुटीला आलेल्या मराठा साम्राज्याने पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्यास सुरुवात केली. रयतेचा आपल्या राणी वरचा विश्वास कैक पटीने वाढू लागला होता.


१७०० ते १७०७ या सात वर्षात ताराबाईंनी औरंगजेबाला बेजार केले. पंचवीस वर्षाची एक विधवा औरंगजेबासारख्या मुसद्धी सम्राटाबरोबर सतत सात वर्षे लढत होती. हा लढा त्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकला देखील. वास्तविक संभाजीराज्यांच्या वधानंतर मराठ्यांची सत्ता नामशेष करायला जास्त वेळ लागणार नाही अशी अटकळ औरंगजेबाने बांधली होती.१७०० च्या दरम्यान बादशहाने पन्हाळा काबीज करण्यासाठी आपलं सैन्य शहजादा बेदरबख्त व जुल्फिकारखान यांच्यासमवेत पाठवलं पण ५० हजार पायदळ आणि ३० हजार घोडदळ असून ही पन्हाळ्याचा वेढा यशस्वी झाला नाही. हे पाहून औरंगजेब पन्हाळ्याकडे आला. पण पन्हाळा तसा काबीज न झाल्याने वाटाघाटी झाल्या व रोख ५५ हजार रुपये मराठ्यांनी वसूल करून किल्ला दिला, पुढे विशाळगडासारखा भव्य गड लढून नाही मिळत म्हणल्यावर मोघलांनी वाटाघाटी करून तब्बल दोन लाख रुपये मोजून किल्ला ताब्यात ठेवला. अशाच रितीने मोघलांनी सिंहगड, राजगड, तोरणागड असे अनेक किल्ले काबीज केले. इ.स. १७०० साली सुरु केलेली ही मोहीम १७०४ संपली ती तोरणागड घेऊनच. यातला तोरणाच काय तो फक्त लढून मिळाला, बाकीचे किल्ले वेढा घालूनसुध्दा सर न झाल्याने त्यांना भरभक्कम रकमा मोजूनच घेतले.


इकडे ताराबाई स्वस्थ नव्हत्या, किल्लेदारांना पत्र लिहून शक्य तितका काळ किल्ला लढवा, मनुष्यहानी जास्त होऊ देऊ नका अशा आशयाची पत्रे पाठवत, प्रसंगी रसदही पाठवत अन् इकडे लष्कर मोहिमेचाही विचार करत.थोडक्यात बचावात्मक धोरण त्यांनी राबविले पण १७०२ सालानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. इकडे किल्ले लढत होतेच तर दुसरीकडे त्यांनी गुजरात, माळवा, आंध्र, कर्नाटक, तमीळनाडू अशा लष्करी मोहिमा उभारल्या.एकीकडे बादशहा किल्ले घेण्याच्या मागे लागला होता पण त्याच बरोबर मराठी फौजा मुसलमानी राज्यांवर आक्रमणे करीत होत्या, त्यामुळे कित्येकदा त्याने जुल्फिकारखानास वेढ्याच्या कामातून काढून मराठ्यांचा बंदोबस्त करायला पाठवले. मोघली फौजा आपले तळ हलवून दुसरीकडे जायला लागल्या की मराठे त्यांच्यावर हल्ले करीत. भरीस भर निसर्गही पावसाळ्याच्या रुपाने मोघली फौजांवर अवकृपा करायचा.तरीही बादशहाने मोहिम सुरुच ठेवली.


शक्य तितका काळ किल्ला लढवायचा, मनुष्यबळाची नुकसानी टाळायची, किल्ल्यावरची दिलेली रसद संपत आली की वाटाघाटीच्या बोलण्यात शत्रुला गुंतवून आणखी वेळ काढायचा अन् किल्ला शत्रुला देताना भरभक्कम रक्कम उकळूनच द्यायचा हेच धोरण ताराबाईंनी ठेवले. कारण पुढे शत्रुची पाठ वळली की हे किल्ले पुन्हा हस्तगत करुच हा विश्वास त्यांना होता. अन् तो सार्थ ठरलादेखील. गेलेले गडकिल्ले त्यांनी मोठ्या हिकमतीने हस्तगत केले जे की औरंगजेबाने फारमोठ्या प्रमाणात वित्तहानी, मनुष्यहानी अन् खूप मोठा काळ खर्च करुन घेतले होते.


किल्ले हस्तगत केल्यानंतर बादशहा मोहिम संपवून अहमदनगरला आला अन् अखेरचे दिवस आजारपणात घालवु लागला. तरीही त्याच्या फौजा लढतच होत्या ताराबाईंच्या लष्करी मोहिमाही अर्थात सुरुच होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच औरंगजेबाच्या राज्यात फौजा पाठवण्याचे धोरण ठेवले परिणामतः मराठ्याना कुठे कुठे प्रतिकार करावा हेच बादशहाला उमजत नव्हते. बादशहाचे पारडे खचत चालले तर उलटपक्षी शत्रु आरीस येण्याला आणखी थोडाच काळ लागेल हे दिसताच ताराबाईंनी मोघली प्रातांवर प्रचंड लष्कर मोहिमा उभारल्या अन् मराट्यांचा आपल्या प्रातांतील धुमाकुळ पाहण्याशिवाय बादशहाला गत्यंतर नाही राहिले.मराठ्यांच्या या शूर राणीने औरंगजेबासारख्या आशिया खंडातील सर्वांत बलाढ्य सत्ताधीशाशी सतत सात वर्षे लष्करी संघर्ष दिला.


ही गोष्ट हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अपवादात्मक व अलौकिक ठरावी इतकी महान आहे. त्यावेळचे कवी गोविंद यांनी या रणरागिणीचे वर्णन सुंदर व यथायोग्य केले आहे ते तिळ मात्र खरे आहे


दिल्ली झाली दीनवाणी |

दिल्लीशाचे गेले पाणी ||

ताराबाई रामराणी |

भद्रकाली कोपली ||

रामराणी भद्रकाली |

रणरंगी क्रुध्द झाली ||

प्रलयाची वेळ आली |

मुगल हो सांभाळा ||


१७६१ पर्यंत ताराबाईने अनेक चढउतार पाहिले कधी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागले पण यात त्यांनी कधीच मराठा साम्राज्य पणास लावले नाही शिवाजी महाराजांचे स्वप्न अबाधित राखायचे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते आणि त्यासाठी त्या आयुष्यभर सक्रिय राहील्या.

इतिहास घड्वणार एक कर्तबगार व्यक्तिमत्व ज्यांचं नाव महाराणी ताराबाई!

...................

संदर्भ

इतिहासाचे पान

मराठ्यांचा इतिहास खंड 1

चिटणीसांची बखर

प्रतिमा इमेज - सौजन्य गुगल



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational