स्वराज्य
स्वराज्य
शाहिस्तेखान चाकणच्या संग्राम दुर्गाला वेढा घालून बसला पण किल्ला मजबूत होता. आणि बिलंदर मावळे एखाद्या टोळधाडीप्रमाणे अचानक येऊन दारूगोळ्यावर पाणी ओतून जाणे ; तोफांच्या बत्ती द्यायच्या छिद्रात खिळे ठोकून त्या निकामी करून पळून जाणे ; रात्री अपरात्री अचानक गडाखाली येऊन जमतील तेवढ्या सैनिकांची कत्तल करून पळून जाणे ---- असे प्रकार करीत असत. त्यामुळे हाती काहीच लागत नसल्यामुळे शाहिस्तेखान संतापला होता. किल्ल्यावर मराठ्यांचे नेतृत्व फिरंगोजी नरसाळे करीत होते.
एकदा तर गुप्तपणे हेरांनी त्याचा दारुगोळा उध्वस्त करण्याचा कट रचला. त्यासाठी बुधाजी नावाचा हेर शाहिस्तेखानच्या सैन्यात सामील झाला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या दारुगोळ्याचा स्फोट होईल अशी व्यवस्था करुन, रायाजी व महादू अण्णा डोंगर चढून आपल्या साथीदारांजवळ आल्यावर महादू अण्णाने विचारले,
" अरेऽ रायाजी, बुधाजी कुठे दिसत नाही ?
" अण्णा योजना सफल होण्यासाठी तिंथं आपला एखादा माणूस थांबणे आवश्यक होते, त्यासाठी बुधाजीने हे कार्य स्वेच्छेने स्वीकारले."
" पण?"
" अण्णा शाहिस्तेखानचा दारुगोळा उध्वस्त करण्यासाठी आपल्यापैकीच कोणीतरी स्वतः बत्ती लावण्याशिवाय पर्याय नव्हता."
अण्णा डोळे मिटून ईश्वराची प्रार्थना करीत असतांनाच स्फोटाचा प्रचंड आवाज झाला. गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोहिमा गाजवणारा बुधाजी हेर आज स्वराज्याच्या असा कामी आला होता.
" अण्णा, योजना यशस्वी झाली. आतां आणखी कांही दिवस फिरंगोजी किल्ला लढता ठेवू शकतील."
" बुधाजीच्या बलिदानामुळे शेकडों मावळ्यांचे प्राण वाचले. अण्णा !!
गडावर फक्त ४०० मावळे सैनिक व शाहिस्तेखानकडे २०,००० सैनिक! बुधाजीच्या बलिदानामुळे मराठ्यांना लढण्यास आत्मविश्वास मिळाला होता. शाहिस्तेखानाला लढण्यासाठी पुन्हा दारुगोळा मागविल्याशिवाय पर्याय नव्हता.
इकडे पुणे उध्वस्त करण्यासाठी गाझीखान व कांही सरदारांनी पुण्यात धुडघूस घालून,रयतेची लुटमार करणे, शेतांना आगी लावणे ; घराघरात घुसून सोने चांदी लुटणे ; असे उद्योग आरंभले होते. घरंदाज स्त्रिया अब्रू वाचवण्यासाठी आगीत उड्या घेत होत्या. पुण्यात हाहा:कार माजला होता.पुण्याच्या आसपासच्या परिसरात उच्छाद मांडला गेला होता.मराठा सैनिक प्रतिकार करीत होते.राजेंच्या गैरहजेरीत स्वराज्याची धुरा जिजाऊसाहेबांकडे होती. गनिम कोणत्या भागात केव्हा अचानक आक्रमण करणार ही खबर बहिर्जी पथकाचे प्रमुख हेर नीळकंठ, महादू अण्णा व रायजी वेळोवेळी जिजाबाईंना देत होते. त्यानुसार त्या ; सैनिक तुकड्या त्या त्या भागात पाठवत होत्या.
रात्री- बेरात्री बहिर्जी पथकाचे हेर छापा टाकून मुगलांच्या छावण्यांची जाळपोळ,धान्य, दारुगोळ्याला आग लावून पसार होत होते.
गाझीखानाच्या सैन्याने बाणेर गावचा पाटील व त्यांच्या तीन बायकांना पकडून त्याचे समोर आणले.त्याने पाटलाला मारुन मारुन इतकी हालत खराब केली की, पाटील आधाराशिवाय बसू शकत नव्हते. नंतर गाझीखान पाटलांच्या बायकांकडे वळला. दोन स्त्रियांशी थोडी बदतमिजी केली. ह्या पसंत नाही म्हणत तिसर्या स्रीकडे गेला. तिच्याशी लगट करतांना पाहून पाटील विनवणी करत मनाई करु लागलेले पाहताच त्याची गर्दन उडवण्याचा हुकुम दिला. एक सैनिक पाटलाच्या गळ्यावर तलवार चालवणार ; तेवढ्यात त्या सैनिकाच्या गळ्यात खंजिर घुसला.तो ओरडत खाली कोसळला. गनिमांनी बघितले तर जिजाऊमाता घोड्यावरुन दोन्ही हातात तलवार घेऊन त्वेषाने लढत होत्या. गाझीखान चवताळून त्यांच्या अंगावर धावून गेला. दोघांची चांगलीच लढाई जुंपली. मातोश्रींच्या एका वाराने त्याचा हात तलवारीसकट खाली पडला. त्याचा पराभव झाल्याचे पाहताच बाकीचे सैनिक पळू लागलेले बघताच जिजाऊंच्या सोबतच्या सैनिकांनी बाणाचा वर्षाव करुन त्यांना लोळवले.
" शिवबा म्हणजे स्वराज्य नाही तर, स्वराज्य म्हणजे शिवबा आहे. शिवबा स्वराज्यात नाही म्हणून तुम्ही लांडगे पुणे उध्वस्त करायला निघाले ना? पुण्याची रयत प्रतिकार करायला आधीच शिकली आहे. "
असे म्हणत जिजाऊंनी गाझीखानचा गळा चिरला.
जिजाऊंनी पाटलांच्या स्त्रियांचे सांत्वन करुन, पाटलांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली. गांव बराच जळला होता. त्यांनी तिथल्या अधिकार्यावर गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी सोपवली. अशी बरीच गावे जिजाऊ साहेब, मराठा सैन्य व हेरांनी वाचवली.
शाहिस्तेखान चिंतेत होता की आता या मराठयांना कसे रोखावे ? त्याने रायबागनशी सल्ला-मसलत केली. नन्तर तिच्याच मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली संग्रामदुर्गाच्या खाली गुपचूप भुयार खणून दारू ठासून स्फोट धडवून आणला. एक बुरुज ढांसळला खरा ; पण फिरंगोजी आणि त्यांचे मावळे छातीचा कोट करून उभे ठाकले ; दुर्ग पुन्हा अजिंक्यच राहिला.
【 राजे पन्हाळ्याहून सुटून आल्यावर काही दिवसांनी फिरंगोजीना गड सोडून परत यावे लागले. 】
अफझलखानाच्या वधानंतर, जिद्दी व चिवट सिद्दी जौहरचा वेढा फोडून, राजे विशाळगडी येण्यास निघाले. राजे एक महान योध्दा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले.
राजे दोन वर्षांनी राजधानीत परतत होते जिजाऊंच्या सोबत चार वर्षाचे शंभूराजे सदरेवर आले होते. जिजाऊमाता स्वराज्याची दुसरी पिढी घडवत होत्या.
