STORYMIRROR

Abhay Tayde

Abstract Tragedy

3  

Abhay Tayde

Abstract Tragedy

स्वप्न !

स्वप्न !

8 mins
242

 मंगेश : मंजुळा म्या जातो वावरात ..

मंजुळा: आता काय आहे वावरात ? सध्याचं तर जाऊन आले..

मंगेश : अव काम आहेत लय..

मंजुळा : बरं जावा ..अहो बॅंकेचे लोक आले होते वसुली कराले.अन् नोटीस भी दिली त्यांनी दोन दिवसात पैसे जमा करा म्हणतं , नाहीतनं जमिनीवर ताबा घेण्यात येईल.

मंगेश : बरं तु नको फिकीर करू ! करतो म्या काहीतरी..चल येतो मग..( मंग्या वावराच्या रस्त्यांन जातो हातात दोर घेऊन.)

संत्या : राम राम मंगेश पाटील कुठं चालले ..

मंगेश : कुठं नाही रे संत्या ! येतो वावरातून चक्कर मारून, घरी कई गमून नाही रायल लेका ! 

संत्या: कशी गोट करून रायला ! चार महिने तर झाले लग्नाले तुया, तरी म्हणत गमून नई रायल, कई भांडण झाले का वहीनीशी ?

मंगेश : नाही रे संत्या , बायको लय साजरी भेटली मले , लय विचार करते माया ती .

संत्या : मग काय झाल ?

मंगेश : अरे बॅंकेतून ५० हजाराचं कर्ज काढलं होतं मागल्या वर्षी.मले वाटलं यंदा चांगला कापूस झाला . पूर्ण कर्ज फेडू अन् मातीच घर पाडून नवीन घर बांधू , पण कायच काय ? 

संत्या : काहून रे मंग्या ! कापूस तर लय झाला तुले झाक.

मंगेश : अरे कापूस तर इतका झाला की घरात नई मावे , पण भाव कुठं आहे बापराज्या ! पाच हजार भाव आहे कापसाले , त्याचा खर्च तर नई निघाला राज्या साधा , कुठून कर्ज फेडता? त्यात बुड्याचं छातीचं ऑपरेशन झाल.त्यातचं तर गेला पूरा पैसा ,आता तुच सांग कसं फेडू म्या कर्ज अन् कसं बांधू नवीन घर ? बेकार आहे लेका ! यंदा तर बियाणं भी बोगस निघाल .

संत्या : हो लेका मंग्या ! पण डायरेक्त बियाणचं कस काय खराब निघते रे यायचं?

मंगेश : अरे कायच काय , सार मिळून मिसळून जीव घेतात आपला !आता तुच सांग मले ते महाबीज वाले माणसं म्हणून रायले की आम्ही बी पॅक कराच्या आधी दाखवलं होतं म्हणे कृषी अधिकार्याले , त्या बियाची चाचणी पण कराले पाठवलं होतं म्हणे , पण करोनाच्यानं त्यायन काही पायल नाही वाटते म्हणे बी, अन् चाचणी पण करायची रायली म्हणे त्यायची , आता तूच सांग मले बिना बियाण चाचणीचं येयन डायरेक्ट बॅगीत भरून मार्केटात कसं काय आणलं ? अन आणलचं नई तं ईकलही ! 

संत्या : हो यार मंग्या म्या येचा ईचारच नाही केला लेका ! 

मंगेश : अरे हेच लेका आपण जव्हा आपल सोयाबीन येयले ईकतो तव्हा हजारवेळा सोयबीन निरखून पायतात . कुठं मातीचा खडा आहे काय , कुठं सोयाबीन टोचेल आहे काय ? अन् काही खडा जरी निघाला तर मग आपतच आहे. एकतर ते माल ईकत घेत नाहीत अन् घेतलाच तर मातीमोल भाव देतात राज्या ! 

संत्या : साले किती हरामखोर आहेत लेका मंग्या हे लोक ! 

मंगेश : अरे हरामखोर लय कमी शब्द झाला त्यायच्या साठी , यंदाच्या वर्षी आपलं सोयाबीन त्यायन ५२ रूपये किलोनं ईकत घेतलं एकदम टकाटक वाल बरं ,ज्यात एक भी खडा मातीचा नाही , कुठं टोचेल नाही . पण यायनं लेका त्याच सोयाबीन वर प्रक्रिया करून तेच आपलच सोयाबीन त्यायच्या बॅगीत भरून आपल्याले ७५ रूपये किलोनं ईकल.

संत्या : म्हणजे मंग्या ? आपल्या १ किंटलच्या सोयाबीनले फक्त ५२०० भाव अन् आपलंच सोयाबीन आपल्याले ३० किलोच्या बॅगीत यायन २२५० न ईकल. कमाल आहे लेका मंग्या ! 

मंगेश : म्हणजे तु ईचार कर नं, यायन बॅगीचे त भाव वाढवलेच अन् त्यात भी म्हटल ८०० ते ९०० ग्रॅम सोयाबीनचं बी कमी देल सार्याच्या बॅगीत !

एक तर सोयाबीन ची बॅग महाग दिली त्यात भी बी कमी देल अन् त्यात भी बी खराब निघाल . सांग बरं किती झाली यायची आता , म्हणजे ईचार करणं आपल्या शेतकर्याचं साधं बी भी निघू नये वावरात इतपासून यायचं नियोजन असतं लेका ! अन् उत्पादन वाढविलं तर भाव देत नाहीत आपल्या मालाले , बाहेरच्या देशात किंमत आहे पण हे बाहेर माल ईकू देत नाईत.

संत्या : हे तर मंग्या बिना पाण्याच्या हजामतीपेक्षा भी भारी काम आहे लेका , बी खराब निघाल हे तर सुरूवात आहे संकटाची पुढे - पुढे तर लय ताल आहेत बाप्पा ! जो पर्यंत आपल्या हातात मालाचे पैसे येत नाहीत तो पर्यंत संकट टपेलच आहेत आपल्यावर !

मंगेश : .हो लेका संत्या आपण भी किती विश्र्वासानं बी पेरतो मातीत, लाखो रूपये बिना गॅरंटी चं पेरण म्हणजे किती मोठा जुगार आहे . आपण एकाच गोष्टीचा ईचार करून जमीन पेरतो ' आपली जमीन आज ना उद्या जमीनचं !' पण कायच काय , सारे लोक आपल्याच लुटीवर टपेल आहेत.

संत्या : हे जरी सत्य असलं लेका ,पण मी तुले म्हणतो आपला शेतकरी जोपर्यंत एकजूट होत नई तोपर्यंत आपली लूट ठरलेली आहेच. एकजूट होऊन आवाज उठवावा लागेल आपल्याले नाहीतनं कोणी वाली नई आपला !

मंगेश : कुणी वाली असता तर कायले शेतकर्यावर मराची पाळी आली असती लेका ! लोकायले म्हणाले काय जाते ' वावर आहे तं पावर आहे ' , त्यायले काय माहित शावर च्या पाण्यासारखा घाम गाळा लागते वावरात तवा कुठं सोन्यासारखे पिक उभ रायते. करंट कसा चटकन लागते आपल्याले ,त्याच करंटवाणी या धुर्यापासूनं तं त्या धुर्यापर्यंत तासं काढा लागतात. तवा कुठं त्या करंटपासून पावर तयार होते वावरात.

संत्या : बराबर बोलला तू , पण मंग्या वावरात जरी पावर असली तरी आपल्या शेतकर्याच्या परिस्थितीत पावर आल्याशिवाय वावराले भविष्यात महत्त्व येणार नाई.

मंगेश : बरोबर , चल बा मग आपल्या गोष्टी काही संपल्या संपत नाहीत.आता म्या जातो वावरात रातीले भेटू आपण .

संत्या : जाय जाय पण वापस येजो , नाहीतन राम्या सारखा करशील तु भी , हातात दोर दिसून रायला तुया .‌

मंगेश : नाही रे संत्या , एवढी हिम्मत नाही मायात.

संत्या : बरं बरं जाय मग.

( मंगेश वावरात जातो ..अन् काटीच्या झाडावर चढतो.तेव्हा आबाला तो झाडावर दिसतो)

आबा : काय रे पोरा ! काय करून रायला झाडावर ?

मंगेश : काई नाई आबा , इंधनाचा भारा नेतो म्हटल घरी , त्यासाठी तोडून रायलो लाकडं.

आबा : बरं बरं , पायजो आरामात, पडशीनं नाहीतन! ( आबा काटीच्या झाडापासून थोडं दूर गेल्यावर मग मंग्या हातात असलेल्या दोराला फाशीचा आकार देतो .तेवढ्यात आबाच लक्ष मंगेश कडे जात)

आबा : पोरा !!!

मंगेश : आबा तुम्ही थांबा , माया जीवनात लय दु:ख आहेत. घेऊ द्या मले फाशी.

आबा : नको रे बा असं नको करू , प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फाशीचं थोडी हाय. आयुष्य म्हटलं म्हणजे संकट आले . आत्महत्या केल्यान सर्वकाही ठीक होईल असं तुले वाटते काय ? तु मेल्यावर हे हरामखोर देतील तुया उरावर आणून १ लाखाचा चेक पण त्यासाठी किती चकरा माराव्या लागतील तुया बायकोले सरकारी कचेरीत ! तरी पण तुले फाशी घ्यायची असेल तर तू बिंधास्त घेऊ शकत ,पण जातांना तुले माय एक काम कराव लागेल.

मंगेश : आबा म्या काय काम करू तुमचं ? 

आबा : काही मोठं काम नाई तुले माया संग यावं लागेल.

मंगेश : कुठं आबा ?

आबा : माया घरी भाकर खाले. भाकर खाल्ल्यावर नंतर तू मग फाशी घे की जहर पे , मले काही घेणं देणं नाई. उतर लवकर खाली.

मंगेश : बर आबा चालते , चला मग लवकर .

( आबा आणि मंग्या आबाच्या घराच्या रस्त्यान जातात. वाटेत त्यांना एक वृद्ध महिला गजर्याचा हार विकतांना दिसते)

गजरे विकणारी आजी : गजरे घ्या गजरे , दोन रूपयाला एक गजरा. गजरे घ्या हो पाटील दोन रूपयाले आहेत. फक्त ! घ्या हो गजरे.

आबा : पोरा ते बुढी दिसून रायली .

मंगेश : कोणती ती गजरा ईकणारी .

आबा : हो हो तीच.

मंगेश : आबा पण ते किती बयाडपणा करत आहे.

आबा : काय केला तिनं बयाडपणा ? 

मंगेश : पायना २ रूपयाले एक गजरा ईकून रायली.ज्या गजर्याची किंमत शहरात १० रूपये आहे.

आबा : पोरा त्याले बयाडपणा म्हणत नाहीत. त्या माऊलीच्या नवर्यानं फाशी घेतली होती. सावकाराचं कर्ज फेडता नाही आलं म्हणून , अन् दोन तान्हे पोरं अन् दीड एकर जमीन सोडून दिली या माऊलीच्या नावावर , लय संकटाचा सामना करावा लागला तिले , लोकांच्या तिच्याकडे पायण्याच्या नजरा इतक्या वाईट होत्या की तिले अब्रु कशी वाचवा कळत नव्हतं.पण तरी त्या माऊलीनं आपल्या दोन्ही पोराले मोठं केलं. उरली सुरली अर्धा एकर जमीन कसली. अन् सावकाराच्या तोंडावर व्याजासहीत कर्ज फेकून मारलं.त्या माऊलीचा एक पोरगा सैन्यात शहीद झाला अन् दुसर्या पोरानं बापासारखीचं आत्महत्या केली. दोघायच्या आत्महत्येत फक्त एक फरक होता बाप सावकाराच्या कर्जापायी मेला अन् पोरगा बॅंकेच्या कर्जापायी.‌

मंगेश : खरचं आबा !  काय सांगता ? 

आबा : पण इतकं सार दुःख या म्हातारीच्या आयुष्यात असूनही तिच्या चेहऱ्यावरचं हासणं मात्र किती जीवंत आहे.

आबा : पोरा याचचं तर नाव आयुष्य आहे. त्या मायमाऊलीनं ही आत्महत्या केली असती . इतकं सार दुखं आहे तर तिच्या आयुष्यात ! पण तिनं तसं केल नाई. तिनं तिच्या आयुष्यात आलेल्या संकटांवर देखील विजय मिळवला.पोरा या जगात शेतकर्यांन आत्महत्या केल्याच ऐकलं असेल पण शेतकर्याच्या मायनं अन् शेतकर्याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं काय ?

मंगेश : नाई आबा ! 

 आबा : अन रायला प्रश्न तिच्या गजर्याचा तर ती २ रूपयाले यासाठी गजरा ईकते की " तिच्या आयुष्यातून जरी जगण्याचा गंध निघूण गेला असेल तरी पण ते इतरांच्या आयुष्यात सुगंध पसरविण्याचं काम करते. अन् तो सुंगध गरीबापासून तर श्रीमंतापर्यंतच्या आयुष्यात कमी किंमतीत कसा दरवळता येईल ? हा ईचार करून ती २ रूपयाले गजरा ईकते. पोरा फार काही अपेक्षा नाहीत तिच्या आयुष्याकडून , पण जवा लोक तिनं बनवलेल्या गजर्याचा सुगंध घेतात तव्हा त्यायच्या चेहर्यावर येणारा भाव पायण्यासाठी, त्यायचा आनंद पायण्यासाठी ते जगते. आणि इतरांच्या आयुष्यात सुंगध पसरवून त्यांना जगवते . चल पोरा आता तुले माया घरी नेतो.

मंगेश : आबा किती दूर आणलं तुम्ही, मले वापस पण जायचं आहे बरं, नाहीतन त्या झाडाले दुसरा कोणी नंबर लावील बा.

आबा : चल रे पोरा. माया घरा माग भी एक मस्त झाड आहे. तिथ पायजो जमते काय तर तुया बजेट , हे बघ पोरा आलं माय घर .

मंगेश : आबा आजी कुठं हाय ?

आबा : पोरा आजी जाऊन बरेच वर्ष झाली. इथं माझी एक सून रायते , ते पण गेली वावरात 

मंगेश : अन् तुमचा पोरगा ? 

आबा : माया पोरगा ? चल तुले माया पोरगा दाखवतो. तो बघ त्या निंबाच्या डांगीवर जो दोर लटकवलेला आहे ना ! तिथं आहे माय पोरं (आबाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा सुरू होतात. ज्या बिना अंदाजाच्या असतात.)

मंगेश : आबा !! म्हणजे ?

आबा : पोरा, माया पोरानं फाशी घेऊन मोजून ५ दिवस झाले. कर्ज होत बॅंकेच ! त्या कर्जातून तर तो मुक्त झाला पण आमच्या जिव्हाळ्याचं काय ? पोरा संकट प्रत्येकाच्याच जीवनात आहेत मग काय प्रत्येकानचं आत्महत्याचं करायची काय ? माया भी मनात आला होता ईचार मराचा पण हिंमत काही झाली नाही , आयुष्य संपवायची ! आता तूच ठरव तुले तुय मुंडक त्या दोरात फसवायच आहे की पुन्हा जोमाने आयुष्य बसवायचं आहे. ( आबाच्या बोलण्यावर मंग्या लक्ष देतो , पण त्याची ईच्छा मात्र संपलेली असते जगण्याची. आबा गेल्यावर ,तो त्याच झाडावर चढतो.अन् डांगीले लटकलेल्या दोराला फाशी घेतो. काही दिवसांनी बॅंकेवाले त्याच्या घरी येतात. घरातल्या सगळ्या वस्तू उचलून नेतात. अन् जसा त्याच्या बायकोले हात लावतात . तसाच मंग्या आवाज देतो...)

मंगेश : सोडा मंजुळाला , सोडा..

मंजुळा : अहो काय झालं तुम्हाले ( मंग्या झोपीतून उठतो. )

मंगेश : लय खराब स्वप्न पडल होत , म्या फाशी घेतल्याचं.

मंजुळा : बस झालं ! आता खराब स्वप्न पायनं. चला जा आता वावरात , तुम्ही जगाचे पोशिंद्ये आहात. तुम्हाले हतबल होऊन चालणार नाई. काळी माय तुमची वाट पाहून रायली. यंदाच्या वर्षी आपल्याले हिरवगार स्वप्न रंगवायचं आहे बरं. हिरवगार !!


( आबा सारखा माणूस जर सर्वांना भेटला ..तर कोणी सहसा आत्महत्या करणार नाही..तो प्रत्येकाच्या आजूबाजूला असतो.फक्त त्याला शोधून मनातलं खुलेआम सांगून द्या मग तुमचं पण स्वप्न रंगेल. हिरवगार)


Rate this content
Log in

More marathi story from Abhay Tayde

Similar marathi story from Abstract