स्वच्छ भारत,आदर्श भारत
स्वच्छ भारत,आदर्श भारत


स्वच्छ भारताची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून, शाळेपासून केली पाहिजे. गावागावात, शहरात स्वच्छतेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. स्वच्छतेचे धडे बालपणापासून विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. जसे माझे घर स्वच्छ राहिले पाहिजे तसा माझ्या आजूबाजूचा परिसरदेखील स्वच्छ राखला पाहिजे. अशाप्रकारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश हा एकाच वेळी संपूर्ण भारत स्वच्छ अभियानात उतरला पाहिजे. हा माझा देश आहे ह्या देशातील स्वच्छता राखणे हे माझे कर्तव्य आहे. मी देशाचा सेवक आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात रूजली पाहिजेत. शाळेच्या गेटवर स्वच्छतेचे घोषवाक्य असलेले फलक, चित्रासहित असावे.
स्वच्छता अभियान फक्त फोटो काढून झळकण्यापुरते नसावे. श्रेय घेण्यासाठी नसावे. ह्या कामाची सुरुवात मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कारकून, विद्यार्थी, समाज यांच्याकडून प्रामाणिकपणे कृतीत आणणे गरजेचे आहे. त्यात पद, खुर्ची ह्यापेक्षा देश सेवा सर्वांत मोठे पद आहे. भारत माझा देश तेव्हाच खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.
संत गाडगे महाराजानी माणसात देव पाहिला. स्वतः अनेक गावं हागणदारीमुक्त केली आहेत. गावागावातून स्वच्छतेचा प्रचार कृतीतून केला. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचा मंत्र शिकविला. आपल्यात फक्त काम करण्याची इच्छा शक्ती जबरदस्त पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने ठरविल्यास हे सहज शक्य आहे. स्वच्छतेच्या आड येणाऱ्या घातक रूढ़ी, परंपरा बंद झाल्या पाहिजेत. सर्व समाजसेवी संस्थानी ह्या कामात झोकून दिल्यास भारताचे आदर्श चित्र जगाला दिसेल. हीच महासत्तेच्या प्रगतीचे पहिले पाऊल असेल.