स्वामिनी
स्वामिनी


आराम मिळावा म्हणून ताईकडे दोन दिवस राहायला गेले. गेल्यावर बघितलं तर ताईच आजारी होती त्यात तिची कामवाली बाई कालपासून आली नव्हती. ताईचीही तब्येत जरा बरी नव्हती. मनात वाटलं फारच चुकीच्या वेळी आलो का आपण इथे पण ताईलाही माझी गरज होती. बर झालं आलो अस बोलून मी कंभर कसली आणि लागले कामाला.. तेवढ्यात स्वामिनी (सगळे तिला सोमे किंवा सोमा म्हणायचे😁) आली..."ताई काय झालं तुम्हाला? चेहरा का उतरलाय? आणि हे काय अजून पडून का तुम्ही...बर नाही का काय?" भडक पिवळ्या रंगाचे साडी,कपाळावर मोठी गोल लाल टिकली, केसांचा अंबाडा आणि त्यात चाफ्याच फुल, हातभरून बांगड्या, पायात छम छम वाजणार मोठ्या नक्षीच पैंजण...पैंजण नाहीच ते...त्याला पट्ट्या म्हणता येतील. एकंदरीत पेहरावावरूनआणि भाषेवरून ताईची कामवाली बाईच वाटत होती. माझा अंदाज बरोबर निघाला आणि मी सुटकेचा श्वास सोडला😃. थोडा आराम आता आपल्यालाही मिळेल म्हणून. ताईने जस सांगितलेलं तिची बाई म्हणजे फटफटीच आहे...बोलायला लागली की थांबतच नाही...तशीच तिची फटफटी आल्यापासून सलग पंधरा मिनिटे तरी चालू होती. ताई म्हणाली जरा बर नाही ग...अशक्तपणा आहे थोडा. लगेच सोमा-"ताई मी दाबून देते पाय तुमचे.. काम थोड्या वेळाने करते." सोमाने ताई हो नको काही बोलायच्या आत पाय हातात घेऊन दाबायलाही सुरुवात केली. इकडे माझ्या हातातून भांडी घेऊन मला बाजूला बसवलं.
ताईने विचारलं काल काय झालेलं ग न यायला? अहो ताई ती कर एक कहाणीच आहे. मी कायतरी कारण द्यायचं म्हणून सांगत नाही. काल सकाळी यायला निघणार तोच म्हातारीला म्हणजे माझ्या सासूला ताप आलेला..तिला डॉक्टरकडून आणलं तर नवरा रोज तर येतोच दारू पिऊन कालही आला..आधीच तो नशेत आणि काल अजून पैसे मागायला लागला दारू प्यायला. माझ्या दोन पोरी अभ्यास करत बसलेल्या आणि त्यांच्यासमोर त्याचा तमाशा चालू होता. मी साफ नकार दिला पैसे द्यायला..इथे मरमर मरून मी कमवायचे पोरींसाठी आणि हा दारू पिण्यावर उडवणार. झालं दोघांचं भांडण आणि तो अंगावर यायला लागला माझ्या..मी पण सोडलं नाही...हातात काठीच घेतली तस घाबरला..सांगितलं त्याला न कमवता फक्त माझ्या पैशावर अशी मजा मारायची असेल तर गरज नाही तुझी..मी एकटी माझ्या मुलींना सांभाळून दाखवेन आणि तुझ्या आईलाही. निघून जा इथून...गेला निघून बडबड करत. नेहमीचंच आहे त्याच पण मुलींसमोर मला दंगा नको असतो ताई..बाप म्हणून त्यांच्या नजरेत मला त्याला उतरू द्यायचं नसत पण त्यालाच कळत नाही करणार. सासू आणि पोरींना जेवायला घातलं तोपर्यन्त आईचा फोन आला..ती खूप घाबरलेली आणि रडतही होती. तसच गेले आईकडे...आमच्या इथून अर्ध्या तासावर घर तिचं... बघते तर मोठ्या भावाची आणि लहान भावाची भांडण झालेली.. छोट्या भावाच्या डोक्यातून रक्त वाहत होत....तडक त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं...माझा लहान भाऊ खुप शांत आणि गरीब आहे...कोणाला कधी दुखवत नाही. त्याची खूप शिकायची इच्छा आहे पण आमची तेवढी परिस्थिती नाही म्हणून आता काम करत करत शिकतो. मोठा भाऊ पण जातो कामाला पण तो उनाडक्या करण्यातच हुशार. चैन करायची,पैसे उडवायचे कुठेतरी हे शौक त्याचे. घरखर्चाला मग पैसे कमी पडले की लहान भावाला मागतो..आईच वय झालं आता म्हणून तिनं कामावर जण बंद केलं. पैश्यावरूनच दोघांचं भांडण झालेलं आणि छोट्या भावाच्या डोक्यात काठी मारली. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि घरी येऊन मोठ्या भावाला चांगली ताकीद देऊन आले बघा...जमत नसेल सांभाळायला आई आणि भावाला तर तू घरातून निघून जा..त्या दोघाना तरी सुखात राहूदे.. मी आहे खंबीर त्यांना आधार द्यायला. भाऊ माझ्यासमोर काय बोलणार...त्याला माहितीये माझ्या मनात आलं की मी त्याला घराबाहेर काढेन ते. आता लहान भाऊ बरा आहे..पण लागलय ती जखम भरून यायला वेळ लागेल. यातच कालच सगळा दिवस गेला ताई...सकाळचं जेवण मी डायरेक्ट रात्रीच जेवले बघा.रात्री नवरा आला लेट पिऊनच. आणि झोपला. सकाळी घरचं आटोपलं...तिकडे भावाला ,आईला डबा दिला,पोरींना पण दिला. सासूला जेवण आणि गोळ्या देऊन आले. जाऊन परत सगळ्यांना सांभाळायच आहेच. जाऊद्या ताई माझं तर असच चालू असत...तुम्ही करा आराम.. मी काम संपवून जाते लवकर." स्वामिनी आल्यापासून बोलत होती,तिचा तो दारुडा नवरा,पोरी,सासू,आई,भाऊ सगळं डोळ्यासमोरच उभं केलं तिनं. पण एवढ्या तिच्या बोलण्यात ती कुठेच मला खचलेली,हरलेली दिसली नाही. उलट हसूनच ती सांगत होती की हे असंच चालू राहणार माझ्या आयुष्यात...हिमतीने जायचं सामोरं. तिला कदाचित कळलं नसेल की त्या दोन वाक्यात किती ताकद आहे पण तिच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं खुप काही होत. तीच बोलणं ऐकून मी विचारच करत होते की काल अशा विदारक घटना घरी घडल्या आणि आज ती बाई चेहऱ्यावर अश्रूंचा डोंगर उभा न करता हसत परिस्थितीला सामोर जायचं म्हणते. तिच्यात एकाच वेळी मी स्वतःच्या पोरींसाठी आईची माया, सासू, भाऊ आणि आईसाठी शितल छाया पाहिली,ताईवर नितांत प्रेम करणारी,काळजी घेणारी एक मैत्रीण पण पाहिली...शौर्याने,साहसाने संकटाला हरवायची हिंमत बघितली...तर दुसरीकडे नवरा आणि मोठ्या भावासाठी दुर्गा बघितली. स्वतःच्या घरासाठी, संसारासाठी, मुलींसाठी ती दररोज झटते....स्वतःच दुःख बाजूला सारून इतरांचं दुःख हलकं करते. एका स्त्रीला क्षणाक्षणाला ही देवीची रूप घेऊन संसार टिकवावा लागतो, पुढे न्यावा लागतो. स्वामिनी सारख्या असंख्य स्त्रीया आहेत ज्यांना रोज नव्याने नवीन संघर्षाचा सामना करावा लागतो आणि रोज नव्याने त्या हसत उभा असतात "मी हरले नाही" सांगायला. एक दिवस संघर्षच हार मानेल अशा स्वामिनींसमोर हे मात्र नक्की....ताईकडे जाऊन एक वेगळ्या स्वामीनीच...वेगळ्या दुर्गा च दर्शन झालं. लेख आवडल्यास लाईक,कंमेंट्स करा. शेअर करा फक्त नावासहितच