सुखी संसाराचा कानमंत्र
सुखी संसाराचा कानमंत्र


राधा काकूंना दोन मुले, अमित आणि सुमित... त्यांच्या बायका म्हणजे.. शीतल आणि नीलम दोघी जावा...
दोघी अगदी बहिणीसारख्या राहायच्या... सगळे छान होते... पण छोटी घरातली प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची.. त्यामुळे गैरसमज होऊन तिच्या माहेरचे प्रत्येक बाबतीत वेगळा अर्थ काढायचे... नवरा, सासू यांच्याबद्दल सारखे सांगितल्यामुळे जावई म्हणून मिळणारा मान त्याला मिळत नव्हता...
तिची आई सासरी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत होती... तसे चूक सासरच्या लोकांचीसुद्धा होती... राधाबाई खूप कडक होत्या... त्या सुनांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत असत.... कौतुक असे कधी नाहीच... दोन्ही मुलांचे आईपुढे काही चालत नसे... जेवणसुद्धा कमी पडून चालत नसे आणि जास्त होऊन चालत नसे... भाजीवरून पण बोलायच्या... कोणतीही वस्तू बाजारातून आणली की त्या गोष्टीला नावं ठेवायच्या...
मोठी सर्व सहन करत होती... तिचे म्हणणे इतकंच की "ओम दुर्लक्षाय नमः" प्रत्येक गोष्ट त्यांच्या हो ला हो करत असे...
काळ बदलला आहे, त्यानुसार बदलायचे सोडून त्या आम्ही असे केले तसे केले असेच ऐकवत बसत.... शीतल नावाप्रमाणे शांत होती.... ती सारे ऐकून घ्यायची काही न बोलता... नीलम मात्र याच्या उलट...
त्यामुळे वाद व्हायचे, सासूबाई आणि तिचे... शीतल स्वतः सासूबाईंसाठी काहीतरी करायची, नवीन वस्तू आणायची आणि निलमचे नाव पुढे करायची, तिला हे सुचले, तिने सांगितलं म्हणून मी आणले... जेणेकरून सासूबाई आणि नीलम यांचे संबंध चांगले व्हावे.... पण सासूबाई सगळं ओळखून होत्या....
घरात पूजा होती, मोठी म्हणून मान शीतल आणि अमितला मिळाला... निलम आधीच रागावली होती... त्यात तिच्या माहेरी ती सगळे सांगत असल्यामुळे राधाबाई आणि सुमितलासुद्धा ते मान देत नसत.... याउलट शीतलच्या आईने मानाने सर्व आणले होते... सासूबाई, जावई, सुमित नीलम यांनासुद्धा... राधाबाई तशा जुन्या विचारांच्या असल्यामुळे असला मान-पान त्यांना अपेक्षित होता... त्यामुळे त्या निलमवर अजून नाराज झाल्या होत्या...
सर्व आवरल्यावर, नीलम आणि सुमित यांचे खूप मोठे भांडण झाले... तिला वेगळे राहायचे होते आणि हा तयार नव्हता... त्याचे म्हणणं इतकंच की वहिनी करते तसे तू कर ना...तिला विचार... आईचे आता वय झालंय, बाबा गेल्यावर तिने मोठ्या कष्टाने आम्हाला वाढवले...आणि आता तिला सोडून कसे जायचे??
तिने आईला फोन केला आणि चिडून गेली आईकडे.... काही दिवस राहिली...आईकडे पूजा होती... मोठे जावई आले आणि छोटे पण... छोटे म्हणजे सुमित... तर तिला एकदम फरक जाणवला... तिने ताईला विचारलं की आई, बाबा, भाऊ सगळे सुमित सोबत त्या मानाने का वागत नाहीत?? आम्हाला ना सासरी मान ना माहेरी... खरंच आम्ही लहान ना म्हणून...
ताईने तिला बरोबर उत्तर दिले ती म्हणाली, "नीलम आपला मान हा आपण ठेवायचा असतो... त्यासाठी थोडे खोटे बोलले तरी ते चांगले असते... अगं सासू-सून, नवरा-बायको म्हटलं की भांडण होणारच पण ती भांडणं चार भिंतीच्या आत ठेवावी... सासरचा मान माहेरी आणि माहेरचा मान सासरी राखण्यासाठी थोडे खोटे बोलावेच लागते....अन् ते आपल्या संसारासाठी चांगलेच असते..."
माहेरी जाऊन आल्यापासून नीलम बदलून गेली आहे, हे शीतलला जाणवत होते... तसे जावा असल्या तरी त्यांचे नाते अगदी बहीणीसारखे होते...
शीतल म्हणाली, बदल चांगला आहे पण कशामुळे झालाय कळेल का??
नीलम हसून म्हणाली, वहिनी मला माफ करा, मी तुमची पण अपराधी आहे... पण ताईने दिलेला सुखी संसाराचा मंत्र आणि तुम्ही सांगितलेला "ओम दुर्लक्षाय नमः" या दोन्हीचे मी पालन करणार आहे... म्हणजे उशिरा का होईना पटले तुला, शीतल म्हणाली अन् दोघी हसू लागल्या...
तेवढ्यात राधाबाई आल्या... आणि म्हणाल्या, कसला मंत्र मला तरी कळू दे, शीतल घाबरून गेली त्यांना असे बघून... पण निलमने पटकन उत्तर दिले, अहो माझ्या आईने दिलाय सुखी संसाराचा मंत्र, म्हणाली, "सासूबाई, नवरा यांची सेवा करणे हे प्रत्येक गृहिणीचे कर्तव्य आहे आणि ते तुला करायलाच हवे.." आणि शीतलला डोळा मारला... सासूबाई म्हणाल्या, चला, उशिरा का होईना समजले आमच्या छोट्या सुनबाईंना... आणि त्या हसत देवळात गेल्या...
नीलम म्हणाली, कधी कधी खोटे बोलणे चांगले असते.... आणि दोघी परत हसू लागल्या....