सत्याचा विजय
सत्याचा विजय
जराशी तणतणत अनुजा तिच्या डेस्कवर येऊन बसली. आज मीटिंगमध्ये पुन्हा बॉसशी वाजलं होतं. तसा अनुजाचा मुद्दा बरोबर होता पण बोलताना जीभ घसरली अन् पुढचं रामायण घडलं. थोडं पाणी पीत तिने तिच्यासमोर असणाऱ्या कम्प्युटर वर आवडतं ब्लॉग पेज ओपन केलं. कामाच्या ठिकाणी हे करणं खर तर योग्य नसतं पण ते ब्लॉग पेज त्यांच्याच कम्पनीने डिझाइन केलेलं होत आणि आता ते बऱ्यापैकी पॉप्युलर असल्याने नवीन प्रोजेक्ट वेळी त्याचा उल्लेख नक्कीच व्हायचा.
असो. तर बघूया तरी आज काय नवीन आहे म्हणून अनुजाने ब्लॉग ओपन केला होता.
तिच्या समोर नवीन कोट म्हणजेच सुविचार आला आणि तिचं विचारचक्र सुरू झालं.
“यू कॅन गिव्ह अ पर्सन नॉलेज बट यू कान्ट मेक देम थिंक."
खरंय न नकळतच अनुजा पुटपुटली. काही लोकांना बदल करावा लागेल म्हणून सत्य नाकारणं किती सोयीचं वाटतं. पण त्याचा तोटा काय होईल हा विचार करत नसतील का अशी लोकं? स्वतःचे विचार थोडे बाजूला सारून ती पुढे वाचू लागली.
पुढे लिहिलं होतं, असं अनेक लोक वागतात अगदी पावलोपावली आपली त्यांच्याशी गाठ पडते. ही लोकं खोटया किंवा चुकीच्या बाजूने अगदी ठामपणे उभी असतात. खर तर त्यांना माहीत असत की कधी न कधी ह्यामुळे आपलं नुकसान होऊ शकत पण ते क्षणिक फायद्याचा विचार करून अस वागतात. त्याउलट जे लोक खरं किंवा योग्य काय आहे ह्याचा विचार करून वागतात त्यांना सुरुवातीला बऱ्यापैकी त्रास होतो पण त्या वागण्याचे लॉंग टर्म चांगले इफेक्ट त्यांना नक्कीच मिळतात. हे वाचल्यावर आपसूकच तिचा मूड बदलला. कारण आज न उद्या आपल्याला आपल्या कामाची योग्य ती पोचपावती मिळणार यावर तिचा ठाम विश्वास होता.
मनोमन लिहिणाऱ्याला धन्यवाद देत अनुजा प्रोजेक्टमध्ये सांगितलेले बदल करण्यात गुंतली. बदल करून होताच तिने प्रेझेंटेशन ला एक फायनल टच देत सुटकेचा श्वास सोडला. दहा मिनिटातच क्लायंट समोर तिला सगळं एक्सप्लेन करायच
ं होतं. लॅपटॉप घेऊन तिने कॉन्फरन्स हॉल मध्ये प्रवेश केला. क्लायंट बऱ्यापैकी मोठी पार्टी असल्याने आज कंपनीमधले सिनियर मेम्बरही मिटींगला हजर होते. अनुजाने प्रेझेंटेशन सुरु केलं ते जसं जस पुढे जात होतं क्लायंट नाराज होत असल्याचं अनुजाच्या लक्षात आलं. शेवटी मधेच प्रेझेंटेशन थांबवून त्यांनी अनुजाला विचारलं की आपलं जे बोलणं झालं होतं त्यानुसार इथं काहीच दिसत नाही असं का? ती काही बोलणार इतक्यात तिचे बॉस बोलले की ते मी नको अस सांगितलं कारण मला ते बदल फारसे लक्ष वेधून घेतील असे वाटले नाहीत. मधेच बोलण्या मागे बॉसला वाटलं होतं की आता क्रेडिट आपल्याला मिळून हिचं प्रमोशन कॅन्सल होईल. पण झालं उलटंच अनुजाने ते प्रेझेंटेशन बंद करून आपण अजून एक प्रेझेंटेशन तयार केले आहे असं सांगितलं आणि ते सादर करण्याची परवानगी मागितली. क्लायंट हातातून जाऊ नये म्हणून तिच्या बॉसच्या बॉसने तिला परवानगी दिली. जसजशी अनुजा एक एक मुद्दा मांडत होती तसतसा क्लायंट रस घेऊन ऐकत होता आणि प्रश्न ही विचारत होता. आधी आणि नंतरच्या प्रेझेंटेशन मध्ये मुख्य फरक होता तो टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी वापरण्याचा. बॉसच्या म्हणण्यानुसार नवीन गोष्टी एड केल्या तर खूप काही बदल करून काम करावे लागेल आणि त्यामुळे सगळ्यानाच जास्त वेळ काम करावे लागेल. पण अनुजाने ते आपल्या पध्दतीने मांडत काही उपाय सुचवले होते ज्यामुळे काम मॅनेज करणं शक्य होते. सकाळी मीटिंगमध्ये ती हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं ऐकून न घेताच बॉसने सुनावलं आणि वाद झाला. आता मात्र हे क्लियर झाल्याने क्लायंट आणि सिनियर यांच्यासमोर अनुजाचं पारडं जड झालं होतं.
तिचा बॉस मात्र आज ह्या पदावर इतरांचं क्रेडिट स्वतःच्या नावावर करतच आलेला होता त्याला बसलेली ही मोठी चपराक होती. कारण मीटींग संपता संपता तो प्रोजेक्ट कंपनीला मिळाला आणि त्याच मीटींगमध्ये उत्तम कामगिरी केली म्हणून लवकरच अनुजाला त्याचं फळ मिळणार असं सुचवत कंपनीचे सिनीयर मेम्बर बाहेर पडले.