संवाद झाला मुका
संवाद झाला मुका


संवाद झाला मुका
इंटरनेटच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसासोबत बोलता येत असेलही, मात्र शेजाऱ्याशी, घरातल्या सदस्यांशी, मित्राशी, नातेवाईकांशी असावा असा संवाद कुठे दिसत नाहीय.
पूर्वी सायंकाळी सर्व लहान मुलांना ओट्यावर, ओसरीत एकत्र करून आजी आजोबा शुभंकरोती म्हणायला लावत, परवचा म्हणायला लावत असंत. आजीच्या भोवती कोंडाळे करून बसलेल्या मुलांना आजी देवाच्या, वीरांच्या गोष्टी सांगायची. त्यातून संस्कार बीजं पेरली जायची. सायंकाळचे जेवण सर्वांचे सोबतच व्हायचे. जेवण झाल्यावर सर्वजण एकत्र बसून दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यायचे, मुले अभ्यासाचा आढावा घायची. कुणाला काम करतांना काही अडचणी आल्या तर त्यावरही चर्चा व्हायची. चुकल्याची खंत राहू नये अशा प्रकारचं मनोबल वाढवण्याचं काम त्या एकत्र बसून चर्चा केल्यानं व्हायचं.
गावातील वडीलधारी माणसं सायंकाळी शेतातून आल्यावर मंदिराच्या समोर एकत्र यायची. देवासमोर बसून सुख दुःख देवाला सांगायची, इतरांनाही सांगायची, एकमेकांच्या सुखदुःखात एकरूप व्हायची. जणू गावाचं एक कुटुंबच असायचं. कुणाच्या अडल्या नडल्याला मदतीला धावून यायची, कारण एकमेकांच्या संवादातून आत्मीयता निर्माण झालेली असायची. जीवनाचा घेतला जायचा.
आज सोशल मीडियाने खूप प्रगती केलीय, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो. पण माणूस माणसापासून दूर जातोय. नात्यात दुरावा निर्माण होतोय, स्वार्थी हेतू ठेऊनच नाती जपली जाताहेत. आपापसात मतभेद होताहेत. त्यातून अनेक समस्या जीवनात उभ्या राहताहेत. कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलीय. मात्र त्याचं कुणालाही सोयर सुतक वाटत नाहीय. किंवा वाटत असेलही, पण काही करण्याची इच्छा नाहीय. प्रत्येक जण स्वतःपुरतच जगायला लागलाय. त्यामुळं ज्याचं त्याचं सुख दुःख त्याचं त्यालाच भोगावं लागतंय.
या सर्वाला कारण एकच, संवादाचा अभाव, संवाद मुका झालाय. गुरू- शिष्यात संवाद नाही, मित्रा- मित्रात, पती-पत्नीत, बाप आणि मुलगा, आई आणि मुलगी, बहीण-भाऊ, कुणातही संवाद उरला नाही. मुलीला काही समस्या असेल तर ती आईला मनमोकळं सांगायची. ते आता राहिलं नाही. व्यक्तिगत जीवना बरोबरच सामाजिक जीवन खराब होऊ लागलंय. माणूस एकलकोंडा झालाय. व्हाट्सप, फेसबुक, यांच्यात पुरता गुरफटलाय. यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे आपापसात संवादाची. गरज आहे "मी पण" सोडून एकत्र येण्याची, बोलकं व्हायची, जगाच्या कोपऱ्यात नाही तर मनाच्या कोपऱ्यात डोकावण्याची, मुका झालेल्या संवादाला बोलकं करायची. माणूस माणसा जवळ गेला पाहिजे. प्रेमानं भेटला पाहिजे. मनमोकळे बोलला पाहिजे. जीवनातला आनंद लुटला पाहिजे. तरच जीवनात सुख लाभेल. जीवन जगण्यात मजा येईल. मुका झालेला संवाद बोलका झाला तरच म्हणता येईल, ........
"या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे."