Subhadra Warade

Others

4  

Subhadra Warade

Others

संसार

संसार

5 mins
2.1K


संसार

"सुनंदा, ऐ सुनंदा, अगं इकडे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय ते?" असं म्हणत पंकजनं आपल्या बॅगमधून दोन ग्लास व दोन वाट्या बाहेर काढल्या आणि सुनंदाच्या समोर ठेवल्या. तसा सुनंदाच्या डोळ्यासमोर दोन महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. डोळ्यात आसवं जमा झाली. त्या आसवांच्या धुक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलं होतं.

साधारण चार वर्षे झाली असतील लग्नाला. घरची परिस्थिती बेताचीच. बेताची म्हणण्यापेक्षा हलाखीचीच होती. श्रीमंत बापाची लाडकी कन्या, गरिबी, काटकसर, टंचाई, इ. शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काही कारणच नव्हते. याच्या अगदी उलट पंकजच्या घरची परिस्थिती. अठराविश्वे दारिद्र्य जणू पाचवीलाच पुजलेले. हौस, चैन, या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या. 'भरपेट खाणे' हा शब्द केवळ पुस्तकात वाचूनच माहीत होता. तोंडाची अन् भाकरीची भेट अगदीच दुरापास्त होत होती. दहा बारा वर्षाचा असतांनाच पडलेल्या दुष्काळानं पंकजच्या घरासहित सर्व गाव होरपळलेलं होतं. लागोपाठ दोन तीन वर्षे सलग दुष्काळानं पुढच्या दहा पंधरा वर्षांची परिस्थिती हलाखीची करून ठेवली होती. मात्र एक चांगली गोष्ट होत होती, कशाही परिस्थितीत जीव जगवण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती. त्यांच्यातीलच एक म्हणजे पंकज.

वयाच्या दहा वर्षापासूनच पंकज स्वकष्टाने जगायला शिकला होता. मिळेल ते काम करून, मिळेल तेवढया पैशात शाळेचा खर्च भागवून स्वतःचे पोटही भरत होता. दुसऱ्यांच्या घरी पाणी भरणे, बंधाऱ्यावर खोदकाम करणे, जंगलात लाकडे तोडणे, सरपण जमा करणे, तलावाच्या कामावर जाणे, एवढेच काय? निंदणी, खुरपणी, लावणी, कापणी इ. शेतीची कामे करतच पंकज लहानचा मोठा झाला होता. परिस्थितीच्या चटक्यांनी तावून सुलाखून पक्का झालेला होता.

शिक्षण सुरू असतांनाच घरात पंकजच्या लग्नाचा विषय चर्चिला जाऊ लागला. घरात , शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचं एखादं माणूस घरात यावं हा त्या मागचा उद्देश. वधू संशोधन सुरू झाले, परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल? पंकज इकडे शिक्षण घेत होता, तिकडे वधू संशोधन सुरूच होते. खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायचा धाडसी निर्णय घेतला होता. 'मुलगा सुशील आहे, चरित्रवान आहे, होतकरू आहे, कष्टाळू आहे, शिक्षण घेत आहे, पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही. त्यापेक्षा आताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल. असा विचार करून सुनंदाच्या वडिलांनी पंकज आणि सुनंदाचे लग्न लावून दिले होते.

सुनंदा लग्न करून नव्या घरात आली. नव्याचे नऊ दिवस कौतुक करण्यात निघून गेले. आता काम करावे लागणार होते, सुनंदाला काम फारसे जमत नव्हते. सगळे तिला हसायचे, तिला अपमान वाटायचा, पण नाईलाज होता. तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व काम शिकून घेतले होते. पण तरीही घरात फारसं कुणी तिला नीट बघत नव्हते. कधी कधी मुद्दामहून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली. नको नको ते आरोपही केले जाऊ लागले. कधी कंटाळून माहेरी गेलेली सुनंदा तिच्या बरोबरच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायची. तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुला-मुलींच्या प्रेम कहाण्या रंगवून सांगायच्या. कुणी एखादी उगीचच तिला 'सांभाळून रहा' असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायची. जग हे असंच असतं ना. सरळ चालणाराला कधीच सरळ चालू देत नाही. उगीचच त्याला संभ्रमित करतील, नको असलेले रस्ते दाखवतील. हेच सुनंदाच्या बाबतीत घडू लागले होते. पंकज शहरात राहतो, तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही याची काय खात्री? असेही कुणी तिला पटवून द्यायचा प्रयत्न करायचे. ती आणखीच उदास राहू लागली. सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलत नव्हते. अशा उदासीतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चूका घडायच्या. तिचा घरात फारसा उपयोग होत नाही हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायला इच्छा होईल, अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती.

पंकजला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन पंकज शहरात रहायला आला होता. सुनंदाशी लग्न करून शिक्षण, नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारीत तो जगत होता. आणि या संसारात त्याला सुनंदाची समंजस अशी साथ मिळत होती. एकच ताट, एकच ग्लास, एकच बिछाना, एवढेच काय अंगावरचे कपडेही एकेकच. पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते.

शेजारी रहायला आलेल्या नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून सुनंदाच्या मनात कधी कधी निराशेचा भाव निर्माण व्हायचा, पण पंकज समजूत घालायचा अन् सुनंदा समजून घ्यायची. एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले, बसले गप्पा केल्या. मात्र जातांना पाणी पिण्यासाठीच्या भांड्यांचा विषय छेडून गेले.

"काय राव, तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये?"

सुनंदाला पटले, पण पंकजचा स्वाभिमान दुखावला गेला. तो ताडकन् उत्तरला.......

"हे बघ मित्रा, माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं अतिथींचा सन्मान माझ्या यथायोग्य पद्धतीने करतोच करतो. आहे त्या साधनांचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही. माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते. तुला चालत नसेल तर माझ्याकडे येतांना याचा जरूर विचार कर. नाही आलास तरी मला काहीच वाईट वाटणार नाही."

मित्र निघून गेला. पण सुनंदाला खूप वाईट वाटले. 'हा असला कसला संसार? आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखादे भांडे असू नये? याला काय संसार म्हणायचे? याला काय गृहिणी धर्म म्हणायचे?' तिने पंकजला हटकलेच...

"तुमचा तो मित्र काय चुकीचं बोलला? बरोबर होते त्याचे. तुम्ही त्याला असे बोलायला नको होते. ते काही नाही, या महिन्यात चार पाच ताटं, वाट्या, ग्लास आणायलाच पाहिजे. खूप झाले आता. नाही सहन होत मला हे सारं." पंकज काहीही बोलला नाही , गुपचूप ऐकून घेतलं. जेवणाचा डबा उचलून कामावर निघून गेला.

पंकजचा पगाराचा दिवस आला. पगार झाला तसा पंकज पगाराचे पाकीट घेऊन किराणा दुकानावर गेला. त्याच्याकडून महिन्याच्या किराणाचे बील घेऊन घरी आला. पगाराचे पाकीट आणि तो बीलाचा कागद, तसेच दूध, घरभाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व सुनंदाच्या हातात दिले. आणि सांगितले,....

"हे बघ, मला फक्त दोन वेळेस जेवायला पाहिजे, जे देशील तेच. बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर. माझी काहीही हरकत असणार नाही."

सुनंदाच्या लक्षात आले, पंकज दुखावला गेलाय. एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. तिने माफी मागितली. पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले. पंकज थोडंसंच गालात हसला त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती. त्यानेही मनात ठरवले, 'बिचारी सांगेल तसे ऐकते, तिला नाराज नाही करायचे. जमेल तसे जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या. तिने नाही म्हटले तरीही आणायच्या. संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणील?' असा विचार त्याने मनाशी पक्का केला. दोघांनी जेवण केले. सुनंदाचे काम आटोपून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले.

अशा छोट्या छोट्या गोष्टीच हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उध्वस्त करत असतं, नाही का? ते वादळ आता सध्या तरी टळलं होतं.

तेव्हापासून पंकजने प्रत्येक पगाराच्या दिवशी कुठे वाटी, कुठे ग्लास तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती. त्यातलाच आजचा गोड प्रसंग होता.

पंडित वराडे,

9881749224

औरंगाबाद.

२९.११.२०१८


Rate this content
Log in