STORYMIRROR

Savita Tupe

Inspirational

3  

Savita Tupe

Inspirational

संस्काराचे बीज !

संस्काराचे बीज !

11 mins
224

  " गौतम आज तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी बनवली आहे ,मावशी आल्या की नीट जेवण करून घे . अभ्यास कर , मावशींना सारखा टीव्ही लावा म्हणून त्रास देवू नको . मला थोडा उशीर होईल यायला. अरे ! ऐकतोस का ?? "..

" हो ग आई ! जा तू ऑफिसला निवांत , आणि मी नाही त्रास देणार मावशींना , तू येई पर्यंत सगळा अभ्यास करून ठेवेन. ओके !! "..

" माझं पिल्लू ग ! ".

" अरे काळजी वाटते ,कारण आजी आजोबा नाहीयेत ना घरी "...

 "अग मावशी आहेत , त्यापण खुप काळजी घेतात माझी "...

" बरं ! "...

तेवढ्यात साधनाचा फोन वाजला , " हॅलो ! "...

 " साधना ताई ! मी रमा मावशी बोलतेय ,जरा उशीर होईल यायला ,अचानक हॉस्पिटल मधे आले ,सकाळी फोन आला डॉक्टरांचा आणि पैश्याची पण सोय झाली म्हणून आले , तुम्ही ऑफिसला जा , मी अर्ध्या तासात येतेच लगेच ,शेजारी सांगा लता बाईंना लक्ष ठेवायला ." साधना म्हणाली ," बरं मावशी या तुम्ही सावकाश ,खुप दिवसांपासुन जायचं चाललं होतं तुमचं दवाखान्यात , मुहूर्त लागला एकदाचा . बरं ठेवते फोन आणि गौतम थांबेन घरात एकटा तोवर ! "

बरं म्हणून फोन ठेवला आणि गौतमला सूचना देवून ती बाहेर पडली .

गाडी चालू करून निघणारच होती ,तेवढ्यात वंदू काकूंनी तिला आवाज दिला ," साधना , थांब जरा ! तुझ्यासोबत बोलायचे आहे ! "

 साधना जरा नाराजीने थांबली ,आज आधीच उशीर होत होता आणि त्यात परत काकूंनी आवाज दिला , 

"अग , गौतमचं काय चाललय सध्या ? "

" काय काकू ? त्याचं काय असणारं विशेष ? आहे घरात ,अभ्यास आणि तो ."

" तसं नाही ग ! तू जातेस ऑफिसला , आजी आजोबा दुपारी झोपतात जरा वेळ , रमा असते पण ती काही त्याच्यावर बाहेर जावून नाही लक्ष ठेवत ! "

" काकू काय म्हणायचे आहे तुम्हाला ? जरा स्पष्ट बोलता का ? मला काही कळत नाहीये ! " 

 " अग ३-४ दिवसांपूर्वी त्याला मालती बाईंच्या स्वयंपाक घराच्या खिडकीतून आत जाताना पाहिले .कपडे सगळे खराब झालेले , हात पाय पण खराब झालेले .त्याच दिवशी संध्याकाळी शेजारच्या वस्तीवरचा तुका त्याला पैसे देत होता . आणि परवा आपल्या सोसायटी मधल्या बागेत सगळ्या मुलांकडून पैसे गोळा करून मोजत होता , तूझ्या काकांनी त्या मुलांना हटकले तसे पळाले सगळे "

 साधना शॉक होवून ऐकत होती , हे काय ऐकतेय आणि तेही तिच्या गौतम बद्दल ? गौतम चोरी करतो का भीक मागतो पैश्यासाठी ??

पुढे काकू म्हणाल्या , " आजीलाच सांगणार होते त्याच्या , म्हणलं उगाच तुला सांगून कशाला तुला त्रास करून द्यायचा ? पण ते दोघे गावाला गेल्याचं कळलं म्हणून तुला सांगावं लागलं , गौतमला मी पण अगदी त्याच्या लहानपणा पासून ओळखते ग ,तो किती सुसंस्कारित मुलगा आहे मला माहित आहे .पण त्याच हे वागणं मलाही न पटण्यासारखं आहे .म्हणून म्हणलं तुझ्याच कानावर घालावं " " बरं जा तू आता , पण लक्ष ठेव ग बाई त्याच्यावर , बाप ३_३ महिने फिरतीवर असतो ,उगाच त्याला कळलं तर तुझ्यावरच त्याचा राग निघायचा ,काळजी घे आणि जरा सांभाळून गौतमला विचार काय करतोय ते !" 

 साधनाचा रागाचा पारा खूपच चढला होता , आई मामांजी आणि रमा मावशी एवढे सगळे असताना गौतम काय करतोय याची कुणालाच खबर नसावी ? त्यांच्या जीवावर निर्धास्त होवून मी काम करते . आजी आजोबांच्या संस्कारात गौतमची योग्य घडवणुक होईल या आशेने तिने त्या दोघांना गावावरून इथे बोलावून घेतले ,आणि हे काय समोर आले आज ? "

तिला भोवळ आली , क्षणभर तशीच स्तब्ध होऊन ती जरा सावरली . ऑफिसवर फोन करून येत नसल्याचे कळवले आणि ह्या प्रकरणाचा छडा लावायचा ठरवले .गौतमचा विचार करताच तिला त्याचा निरागस चेहरा समोर आला तो असे काही करणार नाही याची तिला खात्री होती , मग कोणी त्याला फसवत तर नाही ना ? गाडी लावून ती तशीच घराकडे वळली.समोरचे दृश्य पाहून ती तिथेच थबकली ..

समोर दारामध्ये शेजारच्या वस्तीवरची मुले उभी होती ,त्यांच्या सोबत गौतम दाराला लॉक करून कुठेतरी बाहेरच निघाला होता .त्याला तसा पाहून तिचा राग अजून उसळला , जोरात ओरडून ती गौतमला , दरवाजा उघडून आत घेवून गेली , तिला आलेली बघताच ती मुले पण तिथून पसार झाली .आत आल्यावर साधना गौतमला हातात येईल त्या वस्तूने सटासट मारू लागली .गौतमला काही कळेना आई का मारते आहे ? तो , "आई थांब नको ग मारू ,मी काय केलंय ? आई ,आई ......" तो बिचारा कळवळत , मार चुकवायचा निष्फळ प्रयत्न करत होता . पण साधना रागाने जणू पेटली होती , त्यात ती गौतमला अख्खा बाजून काढत होती .

  मारून मारून हात दुखू लागला तेव्हा कुठे ती शांत झाली ...

त्याला तसाच सोडून ती पुन्हा बाहेर जाऊन बसली .. रडून रडून गौतम पण ग्लानी येवून झोपून गेला . झोपेत पण हमसून , दचकत होता ...

  ती डोळे मिटून पडली सोफ्यावर .तिलाही तिथेच डोळा लागला .अर्धा तास गेला असेल ..तिला जाग आली .पटकन उठून बेडमध्ये गेली ,गौतम तसाच झोपला होता ..   तोंडावर ,अंगावर माराचे वळ दिसत होते .तिला खुप भरून आलं .त्याच्या अंगावर हात फिरवत रडत राहिली . गौतम अजून ग्लानीतच होता ,

 " नको मारू आई , नको मारू आई ! " बडबडत होता ..

 साधना बाहेर आली .तिला आठवलं , २ - ३ दिवसापूर्वी गौतम घरी आला तेव्हा त्याचे कपडे सगळे खराब झालेले , तिने विचारले तर म्हणाला होता की खेळताना पडलो ,तिनेही दुर्लक्ष केलेले .कपाटात परवा तिची नजर चुकवून त्याला एक डबा ठेवताना पाहिले , असेल काहीतरी म्हणून तेव्हाही तिने लक्ष नाही दिले ..

आता तिचा तिलाच राग येवू लागला .खरंच का तीच मुलाकडे दुर्लक्ष होतंय ?? सासू सासरे आहेत म्हणून ती निर्धास्त झाली .सोबत रमा मावशी आहेत , " अरे ..रमा मावशी म्हणाल्या , 

" पैश्याची पण सोय झाली म्हणून आज दवाखान्यात गेल्या " .म्हणजे मावशी तर त्याला पैसे आणायला लावत नव्हत्या ना ? नाही नाही , मावशी असे कसे करू शकतात ?? मग गौतम ला काय गरज पडली पैश्यांची ? का आई बाबांना गावाला जायचे म्हणून त्यांनी पैसे 

मागायला लावले ? गावाकडे भावोजींना लागत असतील आणि मला मागायला त्यांना बरं वाटलं नसेल !! "

  एक ना अनेक प्रश्नांनी साधनाचे डोके गरगरायला लागले .

तिने ह्याचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला . पहिलं वस्तीतल्या त्या मुलांकडे जावून विचारू म्हणून ती निघाली ..

दार लावून निघाली तर मालती बाई भेटल्या , तिला आठवलं वंदू काकू म्हणाल्या की गौतम त्यांच्या स्वयंपाक घराच्या खिडकीतून घरात गेलेला .ती लगेच त्यांना थांबवून म्हणाली , " काकू गौतम तुमच्या घरी काय करत होता दोन दिवसापूर्वी ? " त्या म्हणाल्या , " अग मी आजच पहाटे आले गावावरून ,मला नाही माहित ग , काकांना विचार , आणि तू का एवढी ओढल्यासारखी दिसतेस ? काय झालं ? ठीक आहेस ना ? " ती हो म्हणाली आणि तिथून निघाली .सुदैवाने काका भेटले , म्हणाले ," अग साधना तुझ्याकडे काम होत , गौतम बद्दल बोलायचं होत जरा ! "

साधनाच्या पायाखालची जमीनच सरकली ,आता काका अजून काय सांगणार आहेत , ती थबकली जागीच , पुढे काका म्हणाले , " अग घाबरु नकोस ! त्याने काही केलं नाही .पण अग किती त्याचे गुण गावू ? एवढा चटपटीत आणि समजदार मुलगा आपल्या इथे शोधून सापडणार नाही ! "

" काका काय सांगताय तुम्ही ?? "

" अग हो ऐक तर पुढे .मधे एकदा आला माझ्याकडे आणि म्हणाला की आजोबा मला काही तरी काम सांगा आणि ते झालं की तुम्हाला द्यायचे तेवढे त्याचे मला पैसे द्या ".

 " कशासाठी रे पैसे ? आणि काम का करणार ? आई नाही का देणार तुला पैसे ??".

" आई देईल पण मला तसे पैसे नको आहेत .म्हणजे स्वकष्टाने हवे आहेत ना म्हणून"....गौतम .

 "बरं , मग आज माझ्याकडे नळाचे काम करायला माणूस आलाय त्याला मदत कर .मग देतो तुला पैसे !" काका .

आपल्या मागच्या वस्तीतला तुकाराम आला होता , स्वयंपाक घरातल्या बेसिनला पाणी येतच नाही नीट .पाईप बदलायचा होता , त्याला काही स्वयंपाक घराच्या खिडकीतून खाली उतरता येईना .मग गौतमने खाली उतरून ,तिथला पाईप ,तुकारामच्या सांगण्यावरून काढून दुसरा पाईप बसवला . अगदी सहज .काहीही गडबड नाही की धस- मुसळेपणा नाही .अगदी शिस्तीत सारं काम केलं बघ ." मग दिले त्याला पैसे , जाताना तुकाराम पण खुश झाला आणि त्याने पण पैसे दिले त्याला ."

" अग पण ह्या गडबडीत मी त्याला विचारायचे राहूनच गेले बघ ,की पैसे कशाला हवे आहेत म्हणून , तू आत्ता दिसलीस म्हणून म्हणलं विचारावं तुला ! "...काका .

साधनाला कळेना काय उत्तर देवू ! ती एवढंच म्हणली , " काही नाही काका ,शाळेमध्ये काहीतरी सांगितले आहे ".

" बरं असुदे असुदे .पण खुप गुणी पोर आहे हो , नशीबवान आहेस बघ तू असा नक्षत्रसारखा मुलगा आहे तुला ! "..

 एक बाजू स्पष्ट झाली होती की गौतमने चोरी नव्हती केली ,साधना जरा शांत झाली .पण प्रश्न अजून सुटला नव्हता , तो म्हणजे गौतमला पैसे कशासाठी लागत होते ? ..

तिला रमा मावशी येताना दिसल्या , तिने मागचा पुढचा विचार न करता पटकन विचारले ,  

 " मावशी पैसे कुठून मिळवले आज तुम्ही दवाखान्यासाठी ?"

मावशींना काही कळेना ताई अश्या का विचारत आहेत , " काय झालं ताई ? अहो विसरल्या का तुम्ही ,मी परवाच म्हणलं होत तुम्हाला मुलगी येणार आहे ,अहो ती देवून गेली आज पैसे जाताना "..

साधनाला उगीच लाजिरल्यासारखं झालं आणि जास्त काही बोलले नाही म्हणून त्याचं जरा बर वाटलं .

" काही नाही समोर दिसल्या म्हणून पटकन विचारलं " साधना ..

" पण तुम्ही ह्या वेळी अजून घरी कश्या आहे ? गेला नाही का ऑफिसला ? आणि ताई तुम्ही अश्या का दिसत आहे ? काय झालं ताई ? " रमा मावशी .

आता मात्र साधनाचा बांध फुटला , ती तिथेच मटकन खाली बसली आणि रडायला लागली .

रमा मावशी घाबरल्या , " ताई , ताई ,काय झालं ? काय होतंय ताई ? शांत व्हा ".

त्यांनी त्यांच्या पिशवीतून बाटली काढून साधनाला पाणी प्यायला दिले आणि त्या दोघी मग जरा बाजूला जावून बसल्या .मग साधना जरा शांत झाल्यावर तिने त्यांना सगळं सांगितलं .मावशी पण जरा गोंधळल्या ,कारण गौतम तर ठीक वागत होता नेहमी प्रमाणे , त्यांच्या नजरेत असे काही वावगे वागणे आले नाही त्याचे .तो तासभर खेळायला बाहेर जायचा पण आई यायच्या वेळेला ,तिच्याच सोबत परत यायचा .मग त्या म्हणाल्या , ताई चला आपण त्या वस्ती वरच्या मुलांकडे जावू , "

साधना हो म्हणाली आणि दोघी निघाल्या .तिथे गेल्यावर , मघाशी घराजवळ दिसलेली मुले तिला दिसली ,तिने त्यांना आवाज दिला तशी ती घाबरली आणि जायला लागली पण साधना म्हणाली , " घाबरु नका या इकडे "..

ती मुले बिचकत जवळ आली .मावशी म्हणाली , " काय रे पोरांनो कसले उद्योग करता ? गौतम ला कोणाला पैसे मागायला लावता आणि नसती कामे करायला सांगता?" 

मुले आधीच घाबरली होती .ती काही बोलली नाही .त्याच्यात एक मुलगा होता मग तो जरा ओरडुन विचारल्यावर सांगू लागला , " तो आणि गौतम एकाच वर्गात आहेत आणि वर्गातल्याच एका मुलाला पैश्याची मदत हवी आहे म्हणून सगळी मुले काही ना काही काम करून , पैसे जमवून , गौतम जवळ ठेवायला देतात . पुढच्या सोमवारी पण पैसे जमा झाले की त्या मुलाला द्यायचे आहेत . " असे त्याने सांगितले .

" कोणाला हवे आहेत पैसे ? आम्हाला त्यांच्याकडे घेवून चल , " म्हणाल्यावर तो लगेच तयार झाला . सगळे मग जरा अजून आत वस्तीवर एका पत्र्याच्या खोली जवळ आले ,

 " केशव आहे का काकू ? " एकाने आवाज दिला , तेवढ्यात गौतमच्या वयाचा एक मुलगा बाहेर आला . पण साधना आणि मावशींना बघून दारातच उभा राहिला . दुसरा मुलगा त्याला म्हणाला , " गौतमची आई आहे . "

त्याने मग आईला आणि वडिलांना आवाज दिला . तसे ते दोघे बाहेर आले .नमस्कार करून आत या म्हणाले पण त्या दोघी बाहेरच थांबल्या .

मग केशवची आई म्हणाली , " ताई तुमचा मुलगा खुप हुशार आहे , खुप छान वळण लावलय तुम्ही त्याला . आत्ता पासूनच एवढा विचारी आणि माणुसकी असलेला एवढासा पोर मी पाहिला नाही . तुम्ही खुप भाग्यवान आहे असा मुलगा तुम्हाला आहे . "

  साधनाला आता मात्र स्वतःची लाज वाटू लागली आणि गौतम वर हात उचलला त्याचे खुप वाईट वाटू लागले .

पुढे केशवची आई म्हणाली ," केशवचे वडील रिक्षा चालवतात , त्यांना हृदयाला होल आहे म्हणून त्यांचं हृदयाचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे डॉक्टरने , खर्च आम्हाला परवडण्याजोगा नाही , मी धुण्या भांड्याची काम करते . कर्ज काढले आहे थोडे .कामावरून पैसे उचल घेतलेत , तरी पण तेवढ्यात भागेल असे वाटत नाही .केशव मग तुमच्या सोसायटी मधे गाड्या धुवायला येतो .कोणाची बारीक सारीक कामे करून देतो .हे तुमच्या मुलाला कळलं आणि त्याने घरी येवून आमची एखाद्या शहाण्या माणसा सारखी समजूत काढली आणि म्हणाला माझ्या बाबांना सांगतो , राहिलेल्या पैश्याची मदत करायला , केशुचे वडील नको म्हणाले , 

" आम्ही कष्टकरी माणसं आहे , परत तुमचे पैसे कधी फेडणार आम्ही ? आम्हाला जेवढं जमेल तेवढं करतो आम्ही जमा , बाकी देवाचा आधार ",  त्यांचे बोलणे ऐकून त्याला खुप वाईट वाटले . मदत करायची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना .

   मग त्याने सगळ्या मुलांना जमवून सुट्टीच्या दिवशी आपल्याला झेपतील अशी कामे करून पैसे कमवायचे असे ठरवले .म्हणजे नंतर कोणाला पैसे परत द्यायचा प्रश्नच राहणार नाही आणि त्याप्रमाणे ही सगळी मुले छोटी छोटी कामे करून गौतम जवळ पैसे जमा करतात आणि आम्हाला कालच १०००/- रुपये त्यांनी आणून दिले . परत दोन दिवसांनी जमा झाले की आणून देतो म्हणालेत . " 

साधनाला काय बोलू तेच समजेना , ती तशीच तिथून निघाली ,मावशी तिच्या मागे मागे पळत आल्या .साधना तडक घरी आली , दार उघडून आत बेड मधे पळाली .गौतम उठला होता .खिडकीत बसून विचारात मग्न झाला होता , डोळ्यातून अजूनही पाणी येतं होते .आईला बघून तो अजूनच घाबरून अंग चोरुन बसला .साधनाला खुप गलबलून आले , तिने त्याला तसाच जवळ ओढून घेतला ,त्याचे भराभर पापे घ्यायला लागली , " मला माफ कर माझ्या लेकरा , आई खुप खूप वाईट आहे , माझ्या सोन्यासारख्या लेकरावर हात उचलला ".

 गौतम निरागसपणे तिला म्हणाला , " आई , तू मगाशी इतकं मारलं आणि आता काय झालं तुला रडायला ? "..

मग तिने त्याला काय काय झालं ते सांगितलं .

आणि आता खर काय ते कळल्यावर स्वतःची कशी लाज वाटतेय तेही सांगितलं .

गौतम मग आईला मिठी मारून म्हणाला , " आई मी चुकलो , मी आधी तुला सांगितले असते तर तुला पण एवढा त्रास नसता झाला , पण आई मी काही चुकीचे कधीच नाही वागणार , " मावशी दोघांचं प्रेम बघून रडत रडत म्हणाल्या , " बास झालं आता रडणं आधी जेवायला चला ,दोघपण उपाशी असताल , येताना मुलीने केलेले गुलाबजाम आणलेत मी , चला हात , पाय , तोंड धुवून घ्या तोवर मी दोघांची पाने वाढते .चला आवरा !"...

    खरंच किती निरागस असतात ना लहान मुले . त्या निरागस भावना जपताना त्यांना , आपण काय करतोय ? आणि ह्याचे काय परिणाम होवू शकतात ? याची काही कल्पनाच नसते .बस !! स्वच्छ , निर्मळ मनाने काहीतरी निरागस कृती करत राहतात . मोठ्यांच्या मनाने मात्र त्यांना समजून घ्यायला हवे असते आणि नेमके तिथेच मोठे चुकतात , वरवर आणि स्वतःच्या बुध्दीने , लहान मुलांच्या कृतीची चुकीची समजूत करून घेतात आणि लहानग्यांना स्वतः ची अक्कल शिकवत रहातात . लहान मुले त्याच्या बुध्दीने काही करू शकतात याची त्यांना खात्री वाटतच नाही .

  लहान मुलांना गृहीत धरताना स्वतः , त्यांच्यावर केलेल्या संस्कारांना का विसरून जातात बरं ही मोठी माणसं ??


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational