समर्पण !
समर्पण !
आज दोन दिवसांनी राम शु्द्धीवर आला .थोडीशी हालचाल होताच , मस्तकात तीव्र वेदना झाली . तो क्षीण आवाजात कन्हला .त्याने हळूहळू डोळे उघडले .तोपर्यंत नर्सने डॉक्टरांना बोलावले .डॉक्टर त्याला चेक करून म्हणाले ,
" आता काही काळजी करण्याचं कारण नाही , सगळं काही ठीक आहे . अजून दोन दिवस बघू मग तुला डिस्चार्ज . "
डॉक्टर गेल्यावर इन्स्पेक्टर काळे आत आले . ते जवळ येवून बसले , " राम , कसं वाटतंय आता ? "
त्याने डोळे उघडले आणि विस्मयाने त्यांच्या कडे बघत राहिला . आता तो चांगलाच शुध्दीवर आला होता . त्याला आठवलं काय झालं होतं ते !
तो चौकीत येवून इन्स्पेक्टर काळेंना , मी खून करून आलोय माझ्या दादांचा , मला अटक करा . एवढं बोलला आणि चक्कर येवून पडला , पण पडताना त्याचं डोकं कशावर तरी आदळलं आणि त्याची शुद्ध हरपली . त्यानंतर शुध्दीवर आला तो हॉस्पिटल मध्येच .समोर इन्स्पेक्टर काळेंना बघताच तो फक्त , " ठीक आहे . " म्हणाला . इ काळे म्हणाले ," तुला जर ठीक वाटत असेल तर मला सांगतोस का , त्या दिवशी नक्की काय झालं ते ."
" मी माझ्या वडिलांना बांबूने डोक्यात मारले आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून मी तुम्हाला सांगायला आलो . गेले असतील जागेवर , मला त्याचं काही दुःख नाही .अश्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही ."
" बरं , पण का मारलंस ? " इ. काळे .
" ते सांगणं आवश्यक आहे का ? मी त्यांचा खून केला आणि त्यासाठी तुम्ही देताल ती शिक्षा मान्य आहे मला . अगदी फाशी दिली तरी चालेल ." राम .
" तू गुन्हा केला , हे तू जरी मान्य केलस तरी सगळा तपास केल्याशिवाय आम्ही तुला गुन्हेगार ठरवून शिक्षा नाही देवू शकत . म्हणून तुला विचारतोय नक्की काय झालं होतं ? "
"तू अट्टल गुन्हेगार नाहीस , तुझं वय कमी आहे .
तू म्हणतोस म्हणून तू खून केला हे मी कसं मान्य करू ? दुसरं कोणी साक्षीदार पण नाही , हे खरं आहे ते सांगायला ? "
रामला आई आणि ताईची आठवण झाली , तसा तो जागेवर पटकन उठून बसत इ. काळेंना
म्हणाला , " सर तिथे तुम्ही स्वतः गेला होता ? तिथे तुम्हाला अजून दोन डेड बॉडी मिळाल्या असतील ना ? "
इ. काळे त्याला निरखून बघत होते , त्याचे बदलणारे हावभाव बघून त्यांना जाणवलं की काहीतरी घोळ नक्की आहे .त्याला अनुसरून ते म्हणाले , " हो !"
हे ऐकताच त्याचा चेहरा पुन्हा बदलला , " पुन्हा ती काळजीची छटा जावून चेहरा रागीट झाला रामचा .
इ.काळे जरा दरडावूनच म्हणाले ," राम , मला नीट सांग काय झालं ते ? "
राम रडायला लागला . इ.काळेनी त्याला मनसोक्त रडू दिलं , मग तो बोलू लागला .
" मी शिक्षणासाठी मावशीकडे राहतो ,आत्ताच बारावीची परीक्षा दिली .सुट्ट्या आहेत म्हणून घरी आलो . वडील कारखान्यात कामाला होते , आई आणि एक मोठी बहिण .आई आणि बहिण घरी जेवणाचे डबे बनवतात आणि शिवणकाम पण करतात .वडिलांना प्रचंड प्रमाणात दारूचे व्यसन . कामावरून ते घरी येतानाच पिऊन येण आणि घरी आल की आईला मारहाण करण हे रोजचंच .
त्या दिवशी त्यांना यायला उशीर झाला म्हणून मी त्यांना त्यांच्या अड्ड्यावर बोलवायला गेलो .तिथे त्यांचं ४-५ मित्रांसोबत चाललेलं बोलणं मी ऐकलं . त्यांनी बहिणीसाठी त्यातल्याच एकाच स्थळ ठरवलं होतं , तो जवळपास ३० वर्षाचा तरी वाटत होता .त्याने पाचशेच्या नोटांचे ५-६ बंडल दादांच्या हातात दिले आणि दोन दिवसात लग्नाची तयारी करायला सांगितले . दादा एवढे पैसे बघून हरखून गेले होते . त्यांना गुंगलेल बघून शेजारीच बसलेले दुसरे दोघेजण , एकमेकांना काहीतरी खुणावत होते .अजून एक दोन पेग रीचवल्यावर दादांना स्वतःचा कंट्रोल राहिला नव्हता .त्यांची अशी अवस्था बघून दुसरा एकजण अजून २ बंडल दादांच्या हातात देवून म्हणाला ," आज तुझी बायको पाठव माझ्याकडे डबा घेवून ". दादांना पैश्यापुढे काही दिसत नव्हतं आणि ते तेवढे शुध्दीवर पण नव्हते , ते पैसे हातात घेवून त्याला घरीच ये म्हणत होते ."
मी हे सगळं ऐकून घाबरून तिथून घरी पळत सुटलो , आई आणि ताई दोघींना काय पाहिलं ते सांगितलं , त्याही घाबरल्या , आम्हाला काही कळेना , दादा यायच्या आत आपण आपले जीवनच संपवून टाकू असा आमचा भेकड निर्णय झाला . घरात उंदीर मारायचं औषध होते ,तेच तिघांनी घ्यायचं ठरवलं. भीत भीत आई आणि ताईने औषध घेतलं आणि बाटली माझ्या हातात दिली , मी घेतच होतो तेवढ्यात दरवाजावर टकटक ऐकायला आली , दादाच असणार याची मला खात्रीच होती .थरथरत मी उठलो , बाटली पण हातातून खाली पडली ,मी तसाच दारामागचा वासा हातात घेतला , दार उघडले , दादांना समोर बघून त्यांच्या डोक्यात बांबूने मारले , ते खाली पडले ,मला काही सुचले नाही ,मी तसाच चौकीत पळत सुटलो , तुम्हाला सांगून चक्कर येवून खाली पडलो ते इथ शुध्दीवर आलो . "
" असं झालं तर , म्हणजे तुला तिघांच्या खुनासाठी शिक्षा झाली पाहिजे ". इ.काळे.
"मला आता पर्वा नाही , मरणार तर होतोच ना , तेव्हा नाही मेलो , मग आता एक काय नाहीतर तीन खून काय ? काय फरक पडतो सर .माझी आई आणि ताई ह्या नरकातून सुटल्या आता मला पण जायचं त्यांच्या कडे !" राम .
" आता मला नक्की फाशीची शिक्षाच
होणार ना ? नाही जगायचं मला ,कोणासाठी
जगू मी आता ? " राम स्वतः शीच बडबड करत कुस वळवून झोपला .
खुप मोठा आघात झाला होता त्याच्या बालमनावर . इ.काळे तिथून उठले आणि बाहेर गेले .दोन दिवसांनी रामला डिस्चार्ज मिळाला . इ.काळे स्वतः त्याला न्यायला आले होते . राम शांत होता . " मला नक्की फाशीची शिक्षा होणार ना सर ? " रामने खोल आवाजात विचारले .
इ. काळे त्याला फक्त , " चल माझ्यासोबत ," एवढेच म्हणाले .
ते त्याला घेवून तिथल्याच दुसऱ्या वार्ड मधे गेले .तिथे गेल्यावर त्यांनी रामला विचारले ,
"आत जा आणि मग मला सांग तुला नक्की फाशीची शिक्षा हवी आहे ? तुला नक्की जगायचं नाही ? "
राम थरथरत उभा होता , आधीच त्याच्यात काही त्राण नव्हते , आता अजून काय बघायला मिळते या विचाराने तो गडबडला , " जा आत जा , "
तो दार उघडून आत गेला .समोर आई आणि ताईला बघून त्याने जोरात हंबरडा फोडला , तिघे एकमेकांना मिठी मारून कितीतरी वेळ रडत राहिले . बाहेर इ. काळेंना पण अश्रू अनावर झाले .त्यांच्यातला पोलिसीखाक्या जावून एक संवेदनशिल हळवा माणूस जागा झाला .
ते आत आले , रामला , " पुढे काय ? " म्हणून विचारले , तो त्यांच्या पायावर कोसळला , " मला नाही समजत , आता मी काय करू ? जे काय असेल ते तुम्हीच बघा सर . "
तिघेपण घरी आले .दुसऱ्या दिवशी इ. काळे आले , त्यांनी त्या तिघांची एका फॉर्म वर सही करून घेतली , रामला म्हणाले , " तुझ्यावर कोणताही आरोप नाही . तू निर्दोष आहेस .
तुझ्या आईने सांगितले होते तुझे स्वप्न काय आहे ते .तुला त्यासाठी कोणतीही मदत लागली तर नि:संकोच पणे मला सांग . आणि आता आई ,ताई दोघींना नीट सांभाळ , हे नवीन आयुष्य मिळालंय तुला , मागचं सगळं विसरून जायचं .पुढील उज्वल भविष्यासाठी तुला शुभेच्छा ! "
चहा घेवून इ.काळे तिथून गेले . त्याला हे नक्की काय झाले ते कळेना , आई आणि ताईला त्याने विचारले पण त्यांना सुध्दा काहीच माहीत नव्हते . औषध घेवून त्या पण दरवाजाचा आवाज ऐकल्यावर बेशुद्ध झाल्या ते हॉस्पिटल मध्येच शुध्दीवर आल्या होत्या .
राम दुसऱ्या दिवशी चौकीत गेला , तिथे
इ. काळेंना भेटला , त्यांनी मग त्याला सर्व सांगितले .
राम चौकीत येवून पडला , तो जे बोलला त्याने पुढे सगळा स्टाफ पटपट कामाला लागला .त्याच्या खिशात त्या दिवशी भरलेले लाईटबिल सापडले ,त्यावर घराचा पत्ता होता ,दोघांना रामला हॉस्पिटल मधे न्यायला सांगून ,ते स्वतः दोन कॉन्स्टेबल सोबत घेवून रामच्या घरी आले .दारातच सखाराम पालथा पडला होता , त्याच्या पाठीत चाकू खुपसलेला आणि डोक्यावर मार लागलेला , त्याचे निरीक्षण करून ते आतल्या खोलीत गेले ,तिथे दोघी जणी बेशुध्द पडल्या होत्या , रुग्णवाहिकेची गाडी बोलावून त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये नेले .शेजारी पाजारी चौकशी केल्यावर नक्की काय प्रकरण असावे ते लक्षात आले .पण त्या दिवशी नेमक काय झालं ? कश्यामुळे ह्या दोघी औषध पिल्या ते त्यांना काही कळत नव्हते .
सखारामला , मित्रांसोबत पैशातून वाद झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी मिळून मारले होते . हे इ. काळेना ,दारूच्या अड्ड्यावर गेले तेव्हा कळले , त्यांनी त्यांचा शोध घेवून दोघांना अटक केली होती . ते तेच होते ज्यांनी सखारामला पैसे दिले होते .त्यांना नंतर रामने ओळखले .बाकीचे काय घडले होते ते मग त्यांना राम , त्याची बहीण आणि आई शुध्दीवर आल्यावर कळले होते .
हे सगळं ऐकून राम थोडा रिलॅक्स झाला , अनुभवी इ . काळेंच्या नजरेने बरोबर हेरले .
त्याच्या मनावरचे ओझे हलके झाले होते , इ. काळेंना धन्यवाद देवून , तो नव्या उभारीने तिथून बाहेर पडला . इ. काळे बाहेर पडणाऱ्या रामच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अभिमानाने पाहत राहिले . आज एका अश्राप मुलाला गुन्हेगार होण्यापासून त्यांनी वाचवलं होतं .
त्यातून उद्याचा एक नवीन प्रामाणिक , धाडसी पोलीस ऑफिसर घडणार होता .
बाजूला बसलेला हवालदार शिदे सरांना कडक सॅल्युट ठोकून म्हणाला , " तुमच्यासारखे साहेब सगळीकडे असतील तर या देशाची नवी पिढी खुप आदर्शवत असेल ."
" माणसाच्या हातून नकळत घडणारे गुन्हे माणसाला नंतर अट्टल गुन्हेगार बनवतात ! "
" साहेब तुम्ही मात्र त्याचा गुन्हा लपवून त्याला नवीन आयुष्य दिलंत , नाहीतर आपण बापाला मारले हे शल्य त्याला आयुष्यात पदोपदी सलत राहिले असते .तो कधीच पुढे सुधारू शकला नसता आणि पुढेमागे परत एखादा गुन्हा करायला पण घाबरला नसता , पण तुम्ही खुप योग्य मार्ग दाखवला त्याला भावी पिढीला योग्य पद्धतीने घडवायला असाच योग्य मार्गदर्शक मिळाला की ही पिढी कधीच रस्ता चुकणार नाही !! तुम्ही खूप छान काम केलंय सर , त्यासाठी माझा तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा !!
नवी उमेद ,
नवी आशा ,
जगण्याची ही ,
नवी दिशा !
स्वप्न उडण्याचे ,
बाळगावे उराशी ,
घ्यावी भरारी ,
उंच आकाशी !!
