सकारात्मकता
सकारात्मकता
आमचा इयत्ता चौथीचा वर्ग. वर्गातील सर्व मुलं मुसमुसतायत. त्याला कारणही तसच होतं. उद्यापासून आम्हाला आमच्या लाडक्या बाई पुन्हा कधीही दिसणार नव्हत्या. आम्हां आठ-नऊ वर्षांच्या मुलांना आमच्या बाईंच शाळा सोडून जाणं पटतच नव्हतं. बाईंच शाळा सोडून जाण्यामागच्या कारणाच गांभीर्य समजण्याइतपत वय तरी कुठे होतं आम्हां पिल्लांचं. पण काहीतरी भयंकर घडलंय हे आमच्या बालसुलभ मनाला समजायला वेळ लागला नाही. त्यातलीच मी ही एक. आमच्या वर्गशिक्षिका आमच्या वर्गाच्याच नाही तर संपूर्ण शाळेच्या जान होत्या. त्यांचं बोलणं अत्यंत लाघवी. मनमिळाऊ स्वभावामुळे त्या शाळेत सर्वांच्याच लाडक्या होत्या. या वर्षी त्या चौथीच्या वर्गाच्या म्हणजे माझ्या वर्गशिक्षिका झाल्या आणि आम्ही मुलांनी एकच कल्ला केला. पण दोनच महिने झाले आणि ही बातमी आम्हाला मिळाली. वर्गातील सारी मुलं हिरमुसली. बाई वर्गात आल्या की आम्ही मुलं त्यांच्याभोवती घुटमळतच रहायचो. बाईंनी प्रेमाने डोक्यावर हात फिरवला की किती! किती! आनंद व्हायचा. बाईंच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करायचो आम्ही. त्यांचं चालणं, बोलणं सगळंच भारी वाटायचं आम्हाला.
एकदा मी आईकडून हट्टाने दारातल्या अबोलीचा गजरा बनवून घेतला. शाळेत गेल्या गेल्या बाईंच्या पुढ्यात धरला. बाईंनी फक्त स्मितहास्य केलं आणि काहीही आढेवेढे न घेता गजरा आपल्या केसात माळला. किती भारी दिसत होत्या बाई. त्यांच्या लांबसडक केसात माळलेला गजरा अजूनच खुलला. बाईंना पाहून आपणही असच शिक्षक व्हायचं असं माझ्या बालमनाने बहुतेक ठरवलेलं असावं पण आज माझ्या लाडक्या, प्रिय बाई मलाच काय पण संपूर्ण शाळेलाच सोडून जाणार होत्या. त्याला कारणही तसंच होतं. आमच्या शाळेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. काही खोल्यांचं काम पूर्ण झालेलं तर काही सुरु होतं. तयार झालेल्या खोल्यांमधे आमचे वर्ग भरायचे. एकदा सातवीचे काही विद्यार्थी लपंडाव खेळताना बांधकाम सुरु असलेल्या भागात लपण्यासाठी गेले. त्यांच्यात माझी मोठी बहीणदेखील होती. तेथील एका खोलीत त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून धापा टाकतच सर्व मुख्याध्यापकांच्या खोलीकडे धावले. मुलांनी जे सांगितलं त्याने मुख्याध्यापकांनाही धक्का बसला. धावतच मुख्याध्यापिका, शाळेचे काही शिक्षक आणि आमच्या बाई स्वत: त्या खोलीकडे गेले. तिथला प्रकार पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. प्लास्टर केलेल्या भिंतीवर रात्री कोणीतरी दगडाने कोरून एका स्त्रीचं विवस्त्र चित्र रेखाटलं होतं. त्याच्यापुढे आमच्या बाईंच नाव लिहिलं होतं. कोणीतरी स्वत:च्या विकृत मन:स्थितीचं प्रदर्शनच केलं होतं. बाईंना हे सर्व अनपेक्षित होतं. त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी त्याच दिवशी राजीनामा दिला. सगळ्यांनीच अत्यंत जड अंत:करणाने बाईंना निरोप दिला.
बाईंच्या असं शाळा सोडून जाण्याने मी फार दुखावले. मनोमन बाईंवर खूप रागावले. त्या दिवसानंतर बाई माझ्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्या. राहिल्या त्या फक्त त्यांच्या पुसटशा आठवणी. पुढे जाऊन मी माझं शिक्षण पूर्ण केलं. बी.एड
. करून बाईंच्या पावलावर पाऊल ठेवून मी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. एका खाजगी शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले. आदर्श शिक्षिकेचे आपल्यात सर्व गुण आहेत याची खात्रीच होती मला. मुलांना शिक्षणाची गोडी लावायची. राग न देता प्रेमाने त्यांना जिंकायचं. त्याचबरोबर त्यांच्यात शिस्तही यायला हवी या मताची मी. अल्पावधीतच मी मुलांची मने जिंकली. मुलांमधे माझ्याबद्दल असलेल प्रेम, आपुलकी, दरारा पाहिला की मला जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. मला वाटले मी योग्य वाटेवर आहे पण नाही आपल्याला जसं वाटतं तसं प्रत्यक्षात मात्र नसतं. याची प्रचिती मला दोन दिवसांपूर्वी आली. मुलांच्या बाथरूममधल्या भिंतीवर माझ्या नावासह काही अश्लील, अर्वाच्य शब्दांचा उल्लेख केलेला. मी स्वतः जर माझ्या डोळ्यांनी ते पाहिलं नसतं तर माझा कधीच विश्वास बसला नसता. एवढा मोठा आघात माझ्यावर याआधी कधीच झाला नव्हता. मी तर आतून बाहेरुन पार हादरून गेले. कोणी केलं असेल, का केलं असेल, काही समजेना. याचा अर्थ आतापर्यंत आपण चुकीच्या भ्रमात होतो. नाही माझी मुलं असं काही करणार नाहीत. मन मानायला तयारच होईना. टीचर टीचर म्हणून माझ्याभोवती घुटमळणारी, मी रागावले तरी दुसऱ्याच क्षणी माझ्याशी बोलायला येणारी माझी... हो माझीच मुलं अस काही करतील यावर माझा विश्वासच बसेना.
तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर, किळसवाणा दिवस होता. आज मला बाईंच्या शाळा सोडून जाण्याचं कारण समजलं आणि पटलंही. घरी पोहोचले पण अस्वस्थता वाढतच होती. घरात कोणाला सांगावं की नाही काहीच समजेना. क्षणभर वाटलं शाळा सोडून द्यावी आपणही. रात्रभर माझ्याच विचारांचं माझ्याशी द्वंद्व सुरु होतं. ज्या मुलांना आईच्या मायेने पाहिलं. त्यांनी आपल्या मनात माझ्याबद्दल इतकं विकृत आणावं. खरंच वाटत नव्हतं मला. त्या मुलांना सामोरं जाण्याची हिम्मतच होईना. रात्रभर हाच विचार करत राहिले. बाईंसारखी मी ही शाळा सोडून गेले तर... शाळेत असणाऱ्या त्या विकृत प्रवृत्तीच्या मुलांचं काही बिघडणार आहे का? आज मी तर उद्या कदाचित दुसऱ्या कोणाचं नाव लिहितील. माझी काहीही चूक नसताना मी तोंड लपवायचं आणि त्या विकृत प्रवृत्तीच्या मुलांनी मात्र राजरोसपणे शाळेत वावरायचं. नाही मुळीच नाही मी माझ्या शाळेत न जाण्याच्या विचाराला डोकं वर काढूच दिलं नाही.
माझ्या मिस्टरांकडे मी जेव्हा मन मोकळे केले तर त्यांनी आधारच दिला. "अशा वाईट प्रवृती आपल्या आसपास असतातच त्यांना डावलून पुढे जा. तुला शाळा सोडण्याची काही एक गरज नाही." त्यांची सकारात्मक ऊर्जा मला खूप काही सांगून गेली. मीही ठरवलं कणभर वाईट प्रवृत्तीच्या विचारांना मला बदललंच पाहिजे. पुढे जाऊन या प्रवृत्तीकडून कोणतेही अघटित कृत्य घडणार नाही याची काळजी आपण आत्ताच घेतली पाहिजे. माझ्या सकारात्मक विचारांनी मला त्या विकृत विचारांना चांगली दृष्टी देता आली तर यासारखं मोठं यश माझ्यासाठी कुठलंच नसेल. दुसऱ्या दिवशी कसलंही दडपण न येऊ देता मी शाळेत प्रवेश केला. माझ्यातल्या सकारात्मक ऊर्जेने काही सकारात्मक बदल घडवायला...