श्रावणातील पद्मालयच्या वाटा
श्रावणातील पद्मालयच्या वाटा
श्रावणाच्या पहिल्या पावसात ओल्या झालेल्या वाऱ्यासारखी, आमच्या गावातही एक ताजेपणाची लाट यायची. हा महिना सुरू झाला की श्रावणी सोमवारची अर्ध्या दिवसाची सुट्टी आमच्या पायांना सायकलच्या पेडल्सवर ठेवायला भाग पाडायची. सकाळी शिक्षकांचा शेवटचा शब्द संपताच, आम्हा चार-पाच मित्रांचा गट आपापल्या सायकली उचलून पद्मालयच्या रस्त्याने मस्तीत निघालेला असे. एरंडोलपासून जवळपास दहा किलोमीटरवर वसलेल्या या प्राचीन मंदिरापर्यंतचा प्रवास केवळ अंतर नव्हते, तर आमच्यासाठी त्या काळातला एक रोचक अनुभव होता.
पहिल्या काही किलोमीटरमध्येच निसर्ग आमचं स्वागत करायचा. डोंगरकुशीत वेढलेली हिरवी शेतं, ओल्या मातीचा सुगंध, आणि ओढ्यांच्या खळखळत्या आवाजांनी वाट चुकवायला कधीही वाव मिळत नसे. तीन-चार ओढे ओलांडल्यावर, शेवटचा डोंगर सुरू व्हायचा. पायपीट करत चढाई करताना श्वासांचा आवाज आमच्या कानात गडद होत जायचा, पण वरच्या टोकाला पोहोचल्यावर समोर पसरलेलं दृश्य पाहून थकवा विसरायला वेळ लागत नसे. तलावाच्या मध्यात उभं असलेलं पद्मालयचं मंदिर, त्याच्या भोवताली कमळाच्या फुलांचा हिरवागार पट्टा, आणि तलावाच्या काठी पालांच्या दुकाना खाली वसलेली यात्रा… ते असं काही होतं की ते डोळे बंद केले तरी दिसत राहायचं..
पद्मालयच्या गणपती मंदिरातील दोन मूर्ती अमोद आणि प्रमोद यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आमच्या थकव्याचे सारे श्रम हरवून टाकायची. श्रावणी सोमवारी मंदिरात चाललेली भक्तिगीते, पुजाऱ्यांच्या घंटांचा आवाज, आणि अगरबत्तीचा सुगंध... या सगळ्यात एक विलक्षण शांती वाटायची. मंदिराच्या तलावाकाठी बसून आम्ही पुढच्या योजना आखत असू "आज भीमकुंडात पोहायचं नक्की!"
मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कुठल्याही झाडाच्या सावलीत आम्ही सायकली पार्क करत, आणि मग सुरू व्हायची खरीखुरी साहसिक सफर..
भीमकुंडाकडे जाणारी वाट अतिशय अरुंद होती. वाकड्या-तिकड्या मार्गाने दरीत उतरताना दोन्ही बाजूंची झाडं आमच्या हाताला चोरुन टिपायची. कधी झाडांवरच्या पोपटांच्या किलबिलाटाने आमच्या गप्पांना साथ मिळायची तर कधी कुठून एखादा साप येतोय का समोर अशी भितीही वाटायची आणि आम्ही खाली उतरून भीमकुंडावर पोहचायचो.... शेवटी, भीमकुंडाच्या निर्मळ पाण्यात पाय टाकून बसलो की सगळेजण ‘होप्प्प!’ करत पाण्यात उड्या मारायचो. थंड पाण्यात लोळणं, मित्रांवर पाणी ओतणं, आणि कुणाचा चप्पल वाहून गेली तर त्याची मजा घेणं. या सगळ्यात वेळ कसा निसटायचा ते कळायचंच नाही.
सायकल चालवत घरी परत जाताना आकाशात संध्याकाळच्या लालसर ढगांचं आगळं मनोहरी दृश्य दिसायचं. रस्त्यावरच्या चिखलात सायकलच्या टायर्सनी काढलेल्या रेषा मागे टाकत आम्ही एकमेकांना त्या दिवसाच्या छान छान प्रसंगांची आठवण करून द्यायचो. घरी पोहोचलो की आईचा “किती वेळ लावलास?” असा प्रश्न पडायचा, पण भीमकुंडातल्या पाण्यासारखीच ती आवाजातली चिंता थंडगार वाटायची.
तो श्रावणसोमवार आणि पद्मालयच्या वाटेवरच्या सहलीच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. पाऊस सुरू झाला की सायकलच्या घंट्यांचा आवाज, मित्रांचे हसणे, आणि कमलपुष्पांचा देखावा… सगळं जणू पुन्हा जिवंत होतं. श्रावण हा केवळ महिना नव्हे, तर आमच्या बालपणीचा एक स्वर्णीम काळ होता. श्रावणाच्या धारात जन्मलेल्या त्या आठवणी, आजही माझ्या हृदयातल्या कोरड्या पानांना ओलावा देताहेत. निसर्गाच्या हस्ताक्षरात लिहिलेला तो प्रवास, माझ्या स्मृतीतून कधीच लुप्त होणार नाही…
आज कदाचित तो आनंद घेता येणार नाही, पण ते क्षण अमर झाले आहेत अगदी त्या भीमकुंडासारखे...…
आजही पाऊस आला की, मनातल्या भीमकुंडातलं पाणी पुन्हा एकदा तरारत… आणि मी माझ्या
खिडकीतून बाहेर पाहातो, की कदाचित एखाद्या सायकलवरचा तरुण माझ्यापाशी थांबेल आणि विचारेल, 'चल ना, पद्मालयला…..
लेखक : अविनाश कोल्हे
