STORYMIRROR

Kalidas Ajegaonkar

Romance

3  

Kalidas Ajegaonkar

Romance

शेवटचा इंटरव्ह्यू

शेवटचा इंटरव्ह्यू

6 mins
743


जुईने मनाशी पक्कं ठरवलं, आता परत फोन चेक करायचा नाही. त्याचा मेसेज आला तरी आपण उत्तर द्यायचं नाही. तिला स्वतःचा राग यायला लागला. मनाचा आणि बुद्धीचा कोलाहल चालू झाला. 'का मी सतत फोन चेक करते आहे? का? त्याला तर तीन दिवसात, एक पण मिनिट वेळ मिळाला नाही माझ्याशी बोलायला. संकटामध्ये असेल का? संकटामध्ये असता तर त्याने नक्कीच सांगितलं असतं.' जखमेवर मीठ म्हणजे, 'लास्ट सीन', पाच मिनिट पुर्वीचाच आहे. तिच्या रागात आणखी भर पडली.


तिने खुर्ची मागे सरकवली, पाठीचा कान ताणात आळस देत असताना फोनचा बीप वाजला. तिने डोळे घट्ट मिटले, आणि विचार करायला लागली.


'त्याचाच असेल का? आणि नसेल तर? मी उगाच मनाची परवड का करते आहे?' 'लास्ट सीन'ने तर नक्कीच आशा पल्लवित केल्या होत्या. आणि मनातून ती त्याच्याच मेसेजची वाट बघत होती.

तिने डावा डोळा थोडासा किलकिला केला. फोनच्या स्क्रीनकडे तिरकस नजर टाकत, बटन दाबलं आणि नाव झळकलं. 'आदि'. उजवा डोळा आपोआप ताडकन उघडला गेला. आणि मेसेज होता,

'जुई, मी तुला ऑफिसखाली घ्यायला येतो आहे. ५.३० ला नक्की. सरप्राइजसाठी तयार???'


उत्तर नाही द्यायचं असं ठरवलेलं असताना नाही. टाइप झालं,

'हो'.


स्वतः उत्तर दिलं याचा किंचत राग, तीन दिवस काहीच बोलणं नाही झाल्याने आलेली उदासीनता आणि 'सरप्राइज साठी तयार???' या वाक्याने मनात गुदगुल्या झाल्या, भावनांची खळबळ उडाली. घडाळ्याने वेळ दाखवली ५.१५.

भराभरा तिने टेबल आवरला. पर्समधून आरसा काढला. केसाचा बो काढून, केस नीट केले. चेहरा धुवायला वेळ नव्हता. तसाच रुमालाने पुसला. आरश्यात बघून लाल रंगाचा लिपस्टिकचा हलकासा थर ओठांवर चढवला. बरोबर ५.२५ ला ऑफिसच्या खाली येऊन उभी राहिली.


५.३० ला आदित्यने गाडी जुईच्या ऑफिसकडे जाणाऱ्या वळणावर तिला दिसणार नाही अश्या रीतीने उभी केली, आणि तिच्याकडे बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर भेटीची ओढ स्पष्टच दिसत होती. ती घडाळ्याच्या काट्यांनी पडणारे सेकंड मोजत रस्त्याकडे आस लावून बघत होती. तिची उडत असलेली तारांबळ बघून त्याला हसू येत होतं. नेहमीप्रमाणे मुद्दाम १० मिनिटे उशीर करायचा, तसाच आजपण. ५.४० ला गाडी तिच्यासमोर उभी केली, आदित्य विजेसारखा उतरला. तिला कडाडून मिठी मारली आणि ठेवणीतली ओळ उच्चरली,


'जुई, किती ट्राफिक होतं, काय सांगू तुला? बस! बस! गाडीत बस.' तिच्यासाठी दरवाजा उघडून दिला. गाडी ओलांडताना एक नजरेचा कटाक्ष तिच्याकडे टाकला. तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आदित्यने टिपलं. तो सुखावला आणि सरप्राइजच्या दिशेने दोघांचा प्रवास सुरु झाला. 


तिच्या दृष्टीने तिला, आज आदित्यच्या मनाचा ठाव घेता येत नव्हता. सरप्राइज काय? मिठी काय? सगळंच नवीन होतं. तीन चार वर्षांच्या ओळखीत पहिल्यांदाच आदित्यने तिला स्पर्श होऊ दिला होता. यामुळे तिच्या मनात आदर तर होताच, पण आता त्या स्पर्शात प्रेम वाटू लागलं. तिच्या सोबत घडणारं हे सगळं तिला स्वप्नवत वाटायला लागलं. तीन दिवसाचा विरह, तीन सेकंदाच्या मिठीने पुसल्या गेला, तिने मनातल्या मनात हसण्याचं कारण सांगून टाकलं,

'आदित्य, मी तुझी ४ वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहे, ओळखते रे मी तुला! तुझं उशिरा येणं मुद्दाम असतं. दोन सिग्नल पार केले कि तुझं ऑफिस आहे. कारण मनाला पटेल असं तरी देत जा.'


आदित्य मनातल्या मनात हसला.


जुईच्या प्रश्न तयारच,


'सरप्राइज काय आहे?'


'किंचितसा धीर? अगदी थोडासा हं.'


'अरे पण, सांग...' तिला मधेच थांबवत आदित्य म्हणाला,


'आता रेडिओवर लागलेले रोमँटिक गाणे ऐक. बाकी प्रश्नोत्तरे नंतर.' त्याने रेडिओचा आवाज थोडासा वाढवला.


जुई शांत झाली. सरप्राइजचा विचार रंगवत, ती तिच्याच भावविश्वात रंगून गेली. रेडिओवर रोमँटिक गाणी, हवेत हलकासा गारवा. आज वातावरण पण आदित्यच्या मदतीला आहे असंच वाटायला लागलं.


नेहमीच्या बागेच्या पार्किंगमध्ये गाडी लावली आणि ते दोघे शांतपणे एका बेंचवर जाऊन विसावले. तिचा परत तोच प्रश्न,


'सरप्राइज काय आहे सांग ना.'


'त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरं देशील?'


'मुलखात घेणारेस का माझी आता? का कौन बनेगा करोडपती खेळणारेत आपण? बरोबर उत्तरं दिलीत तरच सरप्राइज मिळेल?' ती हळूहळू चिडायला लागली. आदित्य मान खाली घालून स्वतःशीच पुटपुटला,

'आज माझं ऐक, यांनतर मला तुझंच ऐकावं लागणार आहे.' कदाचित तिला ऐकू गेलं नसावं,


'काही म्हणालास का?'


'नाही गं. कुठे काय?' आदित्यने जुईचा हात हातात घेतला. 'जुई! मी

काय म्हणतोय ते फार महत्वाचं आहे ऐकशील का जरा?'


ती जरा गोंधळली. आदित्य आणि बचावात्मक बोलतोय? त्याचा मार्दवलेला सूर पण अनपेक्षित होता तिच्यासाठी. तिने पण त्याच्या मनातून आलेल्या आवाजाला तितक्याच प्रेमाने साद दिली,

'हो आदी. बोल तू ऐकतेय मी.' तिच्या खांद्यावर मन टेकवत


आदित्यने प्रश्न केला,

'जुई नातं म्हणजे काय गं? मला समजावून सांगशील?' त्याला इतकं गंभीर बघून, तिच अचंबित झाली. सदैव जॉली असणारा, हसरा आदित्य, आज एकदम उलट का वागतोय?


'ब्रेकअप वगैरे झालंय का तुझं?'


'तू उत्तरं देना! नसते प्रश्न कशाला विचारतेस?' जुईने बॅग मधला मोबाईल काढला आणि त्यात काहीतरी टाइप करत होती. आदित्यला ते दिसलं,


'आता गुगल ला विचारणारेस का नातं म्हणजे काय?'


'दोन मिनिट दे मला.'


'ठीके.'


माझ्या प्रश्नांपेक्षा तिला तिचा मोबाइल महत्वाचा वाटतोय. या विचाराने आदित्य खिन्न झाला.


जुईने तिचा फोन आदित्यच्या हातात दिला.


'मोठ्याने वाच.'


‘R- Responsibility

>

E- Earnestness

L- Love

A- Assurance

T- Translation

I- Imperfect

O- Oblige

N- Naughty’


आदित्य थांबला, जुई लगेच म्हणाली,


'हे सगळं म्हणजे नातं. किती सोप्पं आहे ना?'


'अगं तू खरंच मुलाखतीमध्ये उत्तर दिल्यासारखं देत आहेस. सध्या प्रश्नाचं इतकं अवघड उत्तर?'


'थांब मी तुला समजावून सांगते.' आणि जुईने त्या एक एक अक्षराचा अर्थ सांगायला सुरुवात केली.


‘R- Responsibility आणि रिस्पेक्ट सुद्धा, नात्यामध्ये जबाबदारी निभवायची असते. दोघांनी पण जबाबदारीने एकमेकांसाठीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात. नात्यात जबाबदारी आपणहून उचलून पूर्ण करायची असते, ओझं न वाटू देता. मुद्दाम हाती घेतलेल्या गोष्टी जश्या जपतो आपण? तसंच नातं पण जपायचं असतं.'


'आणि रिस्पेक्ट का?'


'आदर गरजेचाच आहे. एकमेकांच्याबद्दल आदर नसेल तर सगळं थोतांड होऊन जातं. नातं यंत्रवत होतं जातं. नात्याची मजा अलवार फुलण्यात आहे.' आदित्य तिचं बोलणं मन लावून ऐकत होता,

'पुढे?'


'E- Earnestness म्हणजे तत्परता.' तिला मधेच थांबवून आदित्यने समर्पक उदाहरण दिलं,


'तत्परता म्हणजे फायर ब्रिगेड चं काम करायचं का?'


'एकदम बरोबर! संकटकाळी आधार बनण्यात तत्परता असावी. आधार बनत असताना कधीही मधे 'मी' पणा येऊ नये. तो आला कि संपलं सगळं. नात्यातला गोडवा संपतो आणि स्पर्धा चालू होते. स्पर्धेत संघर्ष असतो. संघर्ष जिंकण्यासाठी असतो. नातं काही स्पर्धा नाहीये. नात्यात येणारे अडथळे सोबतीने पार करायचे असतात.'


'L- Love, प्रेमाला कसं विशद करशील?'

'प्रेम समजवून सांगताच येत नसतं. प्रेम फक्त अनुभवता येतं.' हे सगळं बोलताना जुईच्या डोळ्यांत कमालीचा सच्चेपणा दिसत होता. आदित्य तिच्याचकडे बघत राहिला.


'आदित्य! मी तुझ्याशी बोलते आहे. लक्ष कुठेय तुझं? कसला विचार करतोय?' आदित्य भानावर आला,


'कसलाच नाही. तू बोल ना!'


'A- Assurance. एकमेकांबद्दलची खात्री हा तर नात्याचा पाया आहे. विश्वासाची मुळं जोवर घट्ट होत नाहीत, तोपर्यंत नात्याचं वटवृक्ष होतच नाही.'


'विश्वास दाखवणं म्हणजे एकप्रकारे आधार देणंच?'


'हो! प्रेम कितीही आंधळं असलं तरीही आधार मात्र डोळसपणाने आणि योग्य गोष्टींसाठीच हवा. चुकीच्या गोष्टींना समर्थन मिळत गेलं कि खटके उडणारच.'


'पण चूक किंवा बरोबर हो कोण ठरवणार?'


'ते स्वतःचं स्वतःला माहित असतं. फक्त ते मान्य करायचं धाडस असावं लागतं. चूक मान्य करणं म्हणजे नांगी टाकणं नसतं, येणाऱ्या वादळाला शमवणं असतं ते.'


'बरोबर! अश्यावेळी संयमाने गेलो तरच समस्या सुटत जातात.’


'T- Translation म्हणजे एकमेकांच्या भावनांचं अनुवादन करणं. काही वेळा समोरच्याचा पवित्र ओळखून भूमिका ठरवायची असते. प्रत्येकवेळा बोललंच पाहिजे, असं गरजेचं नसतंच. जे बोललं नाही गेलंय ते समजून घ्यायचं असतं. काही कृतींमागे विशेष उद्दिष्ट असतं, ते पूर्ण झालं कि बोलण्याचीही गरज उरत नाही. आपोआप निरोप मनापर्यंत पोहचतो.'


'जुई, तू नात्याचे इतके सारे कांगोरे सांगत आहेस आणि त्यालाच अपूर्ण (I- Imperfect) पण म्हणते आहेस?'


'आदित्य! अपूर्ण यासाठी कि, परिपूर्ण असा कोणीच नसतो. दोघांचं एकत्र येणं म्हणजेच पूर्णत्वाकडे जाणारी वाट असते. जे परिपूर्ण असतं त्याच्याकडून चुक अपेक्षित नसतेच, कधीही. नातं हे घर बांधण्यासारखं आहे, एक एक विट रचावी लागते. हळूहळू आकार येत जातो. उणीव जाणून घेऊन त्याच्यासकट एकमेकांना स्वीकारायचं असतं. सोनं पण सुगंधाशिवाय अपूर्णच आहे.'

'कारण, जगात प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट नियमाने बनत असते.'


'म्हणूनच तर O- Oblige म्हणजे स्वतःला नियमात बांधून

वागायचं असतं.'


'आणि नियमांचं ओझं झालं तर? ते लादले पण जाऊ शकतात?'


'हो! नियम लादण्यासाठी नसतात, ते शिस्तीसाठी असतात. घराला चौकट असते, तशीच मनाला सुद्धा असते. मनाला भिंती नसतात, म्हणून ती चौकट कायम लक्षात राहिली पाहिजे.'


जुईचं वाक्य संपताच क्षणी, आदित्यने तिचे दोन्ही गाल प्रेमाने ओढले. ती वेदनेने विव्हळली आणि तितकीच सुखावली सुद्धा. तो दिसायला राकट जरी असला तरीपण त्याच्या स्पर्शातली कोमलता जुईला जाणवली.


'आदित्य सोड रे! दुखतंय.' त्याने गाल सोडले, दोन्ही गाल लाल झाले. जुई गाल चोळायला लागली.


'याला म्हणतात खोडसाळपणा (N- Naughty).' आणि आदित्य हसायला लागला.


जुईने पण परतफेड केली आदित्यच्या हातावर जोरदार चापट ठेवून दिली. तरीही आदित्य हसतच राहिला. हसत हसत त्याने तिला उभं केलं.


'एक मिनिटसाठी डोळे मिटून घे!'


'का पण?'


'अरे! सरप्राइज नको का? आणि मी म्हणेपर्यंत उघडलेस तर याद राख!' आदित्यने सज्जड दमच तिला दिला.


'ओके! ओके!' जुईने डोळे मिटले.


'बिलकुल उघडायचे नाहीत!'


आदित्य गुडघ्यांवर बसला, शर्टच्या खिशातून अंगठी काढली, तिचा हात हातात घेऊन म्हणाला,


'मला माझ्या उणीवांसकट स्वीकारशील? आपण जे काही बोललोय आता, असं नातं विणायला मला मदत करशील? लग्न करशील माझ्याशी?'


जुईने डोळे उघडले, तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरारले. तिने मानेनेच होकार दिला. आदित्यने तिच्या हातात अंगठी घातली. गालांवरून ओघळणारे अश्रू पुसले. केस कानामागे केले. गाल हातात घेतले. जुईने परत डोळे मिटले. त्यांचे ओठ इतक्या जवळ आले कि, दोघांच्या श्वासाचा सूर एक होत गेला.


ओठांचं मिलन होणार, इतक्यात आदित्यच्या फोनने दोघांतली शांतता भंग केली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance