लग जा गले
लग जा गले


प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गाणं असं असतंच, ज्यासोबत आपल्या आठवणी जुळलेल्या असतात. ते गाणं फक्त स्पेशल मूड असतानाच ऐकलं जातं, आणि चुकुन लागलं कि, आपण आपलेच न राहता त्या गाण्याचे कधी होऊन जातो ते कळतच नाही. मग आठवणी पिंजल्या जातात, वर्तमान आणि भूतकाळ यात एक रेशीमबंध तयार होतो.
तिचा फोन उचलताच, मधुर आवाज ऐकू आला,
‘लग जा गले, की फिर ये हसीन रात...’
मी गाणं पूर्ण मन एकवटून ऐकलं. तो आवाज ऐकावा वाटला की गाण्याचे बोल हे ठरवता आलंच नाही.
‘तू तिकडे ५००-७०० किलोमीटर वरून म्हण ‘लग जा गले’. व्वा!! उगाच शांत समुद्रात त्सुनामी आणायचा आणि आपण मात्र किनाऱ्यावरून मजा बघायची.’
‘आपली भेट म्हणजे सुद्धा त्याच किनाऱ्यावर काढलेल्या चित्रासारखी असते, क्षणात पुसून जाते. मागे उरतात फक्त जड आठवणी.’
‘अंतर वाढला की ओढ वाढते, विरह वाढला की मिलानाची गोडी वाढते.’ मला मधेच थांबवत ती म्हणाली,
‘इति वपू उवाच.’
‘अरे वा!’ तिचं वपुंवर प्रेम आहे हा माझा आनंद फार काळ टिकला नाही. ती लगेच म्हणाली,
‘तेच वपू, असं पण म्हणतात, शब्द कमी पडतात म्हणून प्रेम व्यक्त करण्यासाठी, निसर्गाने स्पर्श निर्माण केलाय. त्या स्पर्शाची मजा काही औरच असते. तू नुसते शब्दांचे इमले बांधतोस, पण मी जेव्हा तुझ्या मिठीत झेपावते ना. स्वर्गच रे तो दुसरा माझ्यासाठी! तो हर्ष व्यक्त करताच येत नाही. आणि मी एकांतात त्याचा अर्थ शोधात बसते.’ इतकचं बोलून ती थांबली, तिच्या डोळ्यातून वाहून गेलेला अश्रू मला इतक्या लांबवरून दिसला. मी पण गंभीर झालो,
‘मना, समजतंय गं मला. म्हणून तर मी म्हणतो ना नेहमी. आपली प्रत्येक भेट आपल्यातलं अंतर संपवते. त्या एका मिठीत त्या एका मिठीत भेटीचा बॅकलॉग संपतो.’ मी माझ्या गळ्यातला आवंढा गिळला. कदाचित माझ्या डोळ्यातून पण अश्रू वाहून वाया जाऊ नये, असं तिला वाटलं असावं. तशी ती व्यावहारीक आणि करारी होती. ती क्षणात चमकली,
‘मी पण हे काय बोलत बसलीये, गाणं कसं वाटलं?’
मी शांतच.
‘राजा, मी काहीतरी विचारतेय!’
‘हा! काय म्हणालीस?’
‘गाणं कसं वाटलं?’
‘त्याचाच विचार करतोय. तुझ्या मनातल्या आर्त स्वराचा अर्थ लावू का गाण्याच्या बोलांचा?’
‘तू फक्त आस्वाद घे. अर्थ शब्दांना असतो. शब्दांना सीमा आहेत. भावनांना आसमंत पण कमी पडेल इतक्या त्या विशाल आहेत. फक्त शब्दांनी व्यक्त होणाऱ्या प्रेमात कधी कधी उपदेश असतो. आपण दोघे इतक्या लांब राहतो, म्हणून तो उपदेश झेलण्या इतपत मनात ताकद नसते रे! या उलट स्पर्शाने वाहणारं मुकं प्रेम, एक शब्द हि न उच्चरता संवाद साधून जातं!' हे बोलताना मला तिचा समजूतदार असलेला स्वर नाराजीचाच वाटला.’
‘तू असं बोलायला लागलीस न की माझ्या किंबहुना दोघांच्याही जगण्याची कीव करावीशी वाटते. इतका निस्सीम प्रेम करणारा जोडीदार असताना, मोबाईलवरून प्रेम व्यक्त करायच? व्हिडीओ कॉल वर समाधान मानायचं. कधी कधी तर वेड लागायची पाळी येते विचार करता करता. पण लगेच मंथली टेस्ट, प्रॅक्टिकल शीट्स डोळ्यांसमोर दिसायला लागतात. तिथे मन मारावंचं लागतं.’
परत तिचा बूमरॅंग.
‘तू सांगितलं नाहीस, गाणं कसं वाटलं.’
‘अंगावर रोमांच उभे राहिले. पहिल्यांदाच गाणं जगल्यासारखं वाटलं. वाटतंय क्षणात सगळं सोडावं, रात्रीची रेल्वे पकडावी, सकाळचा चहा सोबत घ्यावा. दूर एकांतात जावं, ओठांवर ओठ टेकवावेत. मनसोक्त तुला स्वतःत उतरवून घ्यावी आणि लगेच रात्री परतीचा प्रवास.’
‘तू रंगवलेली कथा तशी रंजक आहे. पण सत्यात किती वेळेस येते?’ तिने मला टोकलं.
‘आय ऍम सॉरी.’
‘तुला टोचणे उद्देश नाहीये. मला हि असह्य होतं रे राज्या!’
मी उत्तरादाखल फक्त हुंकार दिला. तिनेच बोलणं चालू ठेवलं.
‘एक विचारू?’
‘अनाटॉमी सोडून काही पण विचार.’
ती खळाळून हसली. तिचं साक्षात रुप माझ्यासमोर उभं राहिलं. तिचा मूड थोडा हलका झाला.
‘तुझं माझ्यावर प्रेम आहे की वपुंवर?’
‘वपुंवर.’
‘अं..... खरं सांग ना रे.’ हाच तिचा तो लडिवाळ सूर आणि माझ्या काळजाचे लाख तुकडे.
‘खरंच सांगतोय. त्यांनीच मला माणूस बनून जगायला शिकवलं. डोळे उघडे ठेवून बघायला शिकवलं. नितळ, निस्सीम, अपार अशा प्रेमाच्या जितक्या छटा असतील, तसं प्रेम करायला शिकवलंय.’
‘करत बस त्यांचीच तारीफ. मला नाही बोलायचय तुझ्याशी. जा!!’
वाक्य पूर्ण न करताच तिने फोन कट केला. आता तिने रुठना, मनाना खेळ चालू केला.
मी गॅलरी मध्ये उभा होतो. सायंकाळी अस्मानात रंगीबेरंगी नक्षीकाम चालू होतं. हातात वाफाळलेल्या चहाचा कप होता. बॅकग्राउंड मध्ये रेडिओवर 'लग जा गलें' लागलं आणि याच गॅलरी मधून झालेला आमचा हा संवाद मला आठवला. चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली.
आजही मला ठरवता आलं नाही, मी गाणं ऐकलं कि गाण्याचे बोल? फक्त इतकंच उमजलं कि, माणसाची प्रत्येक आठवण हि कुपीबंद अत्तरासारखी असते. थोडंसं झाकण ढिलं पडलं कि, तो अत्तराचा घमघमाट भूतकाळात डोकवायलाच लावतो.
मी लगेच बॉसला आठ दिवसांच्या सुट्टीसाठी मेल केला. तिच्या शहरात जाणाऱ्या विमानाचं त्याच रात्रीचं बुकिंग केलं, आणि बॅग भरायला बेडरूममध्ये गेलो.
त्या प्रिय व्यक्तीचं स्मरण झालं कि आपण स्वतःलाही विसरून जातो. बीजाला अंकुर फुटतो, त्याच लहानशा अंकुराचा सुंदर वेल तयार होत जातो. त्या वेलीला आलेलं प्रत्येक फुल हि पर्वणीच असते. तुम्ही सोबत घालवलेल्या वेळेमुळे त्या वेलीला जीव मिळतो. तो आठवणींचा वेल कधीही संपणारा नसतो. तसंच माझं झालं, अंकुर, आठवणींचा वेल आज परत फुटला.
मी विमानात बसलो आणि तिच्याकडे निघालो.
छोट्या शहरांची बातच काही और असते. एकतर लोकसंख्या कमी म्हणून चेहरे लक्षात राहतात. हव्या त्या चेहऱ्यांमागे झुरता येतं, त्यांच्या हालचालींवर बारीक वॉच ठेवता येतो. अर्थातच! तो वॉच फक्त त्रास देण्याच्या हेतूनेच असतो असं नाहीये. काही वेळा त्या नजरेत, त्या पाठलागामागे काळजी पण असते. कारण तो अनोळखी चेहरा, ओळखीचा करून घ्यायचा असतो. काळजात कोरायचा असतो. त्या ओठानी उच्चारलेला शब्द न् शब्द झेलायचा असतो. त्या शब्दांच्या पूर्तीसाठी सर्वस्व पणाला लावावं वाटतं. त्या डोळ्यांमध्ये स्वप्न बनून, रात्री एकांतात तरी भेट व्हावी असं वाटतं.
बारावीचा ऑफिशिअली शेवटचा दिवस होता. उद्या कळणार होतं कोणाचा नंबर कुठे लागलाय. कॉलेजेस कोणती, ब्रॅंचेस कोणत्या आणि आता पर्यंत सगळ्यांचं एक असणारं शहर बदलणार होतं. नवे लोक, नव्या जागा, नवीन प्रवास चालू होणार आहे याचा आनंदही होता. त्याच बरोबर सगळं जुनं सुटत जाणार यामुळे मन खिन्न झालं होतं. क्लासने छोटंसं 'गेट टुगेदर' ठेवलं. जे लोक नंतर क्वचितच 'टुगेदर' असणार होते आणि त्याच बॅचच्या कोणालाली 'गेट' करण्याचा शेवटचा चान्स होता.
मी एकटाच उभा होतो. चार-पाच पोरींचा घोळका कोपऱ्यात उभारून माझ्याचकडे बघून कुजबुज करत होता. त्या गोटात ती पण शामिल होती म्हणून तिकडे विशेष लक्ष होतं. त्या सगळ्या मिळून तिला हलकेच ढकलत होत्या, असं कि तिला युद्धाला लढायला तयार करत होत्या. एकप्रकारे ते युद्धच असतं.
ती सरळ माझ्याकडे चाल करून आली. मी भेदरलो खरा, पण तितकाच सुखावलो. ज्या मूर्तीची तिला न समजू देता भक्ती केली होती, तीच आकृती माझ्याकडे येत होती. मी हळूच मोबाईल स्क्रीनवर चेहरा बघून घेतला, केसांतून हलकेच हात फिरवला. तोपर्यंत जवळ येऊन ठेपलीच आणि माझ्याकडे बोट रोखून म्हणाली,
'वेदांत? बरोबर?'
'हो! तू?' नाव माहीत असताना मुद्दाम नाव विचारण्यात वेगळाच चार्म असतो. तिचं नाव कसं माहित नसणार?
'जान्हवी.' तिनेच हात पुढे केला. हातात हात मिळाला, पहिला रेशीम स्पर्श. तो हात कधी सोडू नकोस, असा मनाने कौल सुद्धा देऊन टाकला. २ मिनिटे हातात हात, नजरेला नजर. हात खंबीर आधार देणारे आणि नजर गुंतण्यासारखीच होती. तिने हात सोडत विनंती केली.
'बाहेरच्या गॅलरीमध्ये येशील? तुझ्याशी बोलायचंय.' तिनेच पुढाकार घेतला. मी तिच्या मागून चालायला लागलो. मनात सुखाच्या चिमण्यांनी चिवचिवाट चालू केला. काळजाचे ठोके वाढले होते, हे वेगळं सांगायला नको. आम्ही गॅलरी मध्ये पोहचलो.
'इंजिनिअरिंग घेणार का?'
'हो! आणि तू डॉक्टर?'
'तुला तर सगळंच माहित आहे रे!' ती हे बोलताना नाजूक लाजली.
'आता फक्त बायोलॉजी घेणारी, चष्मा घालणारी, क्युटशी मुलगी दुसरं काय करणार?' ज्यांच्या क्लासच्या वेळा फिजिक्सच्या इक्वेशन सारख्या पाठ केल्या होत्या, त्यांचे करियर चॉईस कसे माहित नसणार?
'इंजिनिअरिंग कुठे करणार आहेस?'
'पुण्यात जायचा विचार आहे. चार वर्षे झाली कि नौकरी मिळायला तिथे जास्ती संधी आहेत. आणि तू?'
'बघूया नंबर कुठे लागेल. तसं पुणे सुद्धा टाकलंय पण मार्कांवरून नागपूर मिळेल असं वाटतंय.'
'एमबीबीएस?'
'अर्थातच! तुझं मेकॅनिकल पक्कंय का?'
'हो! मला गाड्यांशी बोलायला आवडतं.'
'गाडयांना बोलशील, आधी माणसांना बोलायला तर शिका.' ती डोळे मिचकावत म्हणाली. तिरप्या नजरेने कितीतरी वेळा बोललो होतो. वेडीला शब्दांची आरास हवी होती.
'म्हणजे?' मी काहीच न कळल्याचा आव आणला होता.
'ते पण मीच सांगू का?' ती आश्चर्याने म्हणाली.
'हो!' सापडली पेचात. मी उत्तराचं समर्थन पण तिच्याच कडून घेतलं.
'दोन वर्षे सतत पाठलाग करत होतास. एकही शब्द बोलला नाहीस. आजही पहिल्यांदा मीच आले बोलायला.' अरे व्वा! तिने सगळंच नोंदवलं होतं. मी सुखावलो.
'तो पाठलाग नव्हता. काळजी होती.' आणि शेवटी मी मनातली गोष्ट तिच्यासमोर उघड केली.
'माझी काळजी करत होतास ना, आता मला ते समजावून सांग.' ती माझ्या शब्दांसाठी आतुरली होती.
'आपला फिजिक्सचा क्लास सकाळी ६ लाच असायचा. आपण राहायचो शहाराच्या दुसऱ्या टोकाला. जागा मिळवण्यासाठी ५:२० लाच घरातून निघावं लागायचं. इतक्या सकाळी कोणी सोबत नको का? पहिल्या दिवशी तुला बघितलं आणि लगेच ठरवलं, तुझ्या गाडीच्या मागेच गाडी ठेवायची. बॉडीगार्ड सारखं जपायचं आणि क्लास पर्यंत सोबत करायची.' तिला ते उत्तर पटणारंच होतं. दोन वर्षे सतत याच प्रश्नांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं. तिला हवं ते उत्तर मिळलं. ती गोड हसली. तिच्या जिवणीवर छोटासा तीळ अगदी योग्य ठिकाणी होता. तिच्या गालावर पडणारी खळी आज निरखून बघितली. एरव्ही तिरक्या नजरेत चेहराच मुश्किलीने दिसतो, त्यावरचं नक्षीकाम कसं दिसेल?
'वेळा बरोबर पाठ पण केल्यास, पाळल्यास सुद्धा.'
'तुझा बॉडीगार्ड बनायचं होतं म्हणल्यावर तितकं तर करावंच लागणार होतं.'
'तुझा मॅथस् चा क्लास तर अर्धा तास आधीच सुटायचा? हो ना?'
'परत तेच. आगा बॉडीगार्डचं कामच ते असतं. ज्या जिवलग जीवाला जीवापाड जपायचं, घरापर्यंत सुखरूप पोहचवावं लागतं. वेळेची पर्वा न करता.'
'माझ्या एक्सट्रा क्लासच्या वेळा तुला कश्या कळायच्या?'
'नोटीस बोर्ड कशाला असतो? आणि तू एकटी थोडी होतीस जिचा मी पाठलाग करायचो.' ती रागाने हलकेच लाल झाली. मी त्या विनोदासाठी कान पकडले. हसून मला माफी पण मिळाली.
'आय एम इम्प्रेसड!'
'ते तर तू केव्हाच झाली होतीस. आता फक्त बोलून दाखवत आहेस.'
'तुला कसं कळलं?'
'जेव्हा त्या विपुलला तू क्लास बाहेर चांगलंच खडसावलं होतंस. काय केलं होतं त्याने?'
' तू मला आवडतेस म्हणाला होता. नालायक!' नालायक शब्द खास नाक मुरडत आला होता. 'तू कुठे होतास तेव्हा?'
'सावलीसारखा होतो गं तुझ्यामागे. तुला जाणवू न देता.'
'मग दोन वर्षे एकही शब्द का नाही बोललास?' तिने तिची तक्रार बोलून दाखवली.
'जाऊ दे ना! आपल्याला पूर्ण आयुष्य सोबतीने घालवायचंय.' तिचा हात आपसूकच हातात घेत मी म्हणालो.
'तक्रार दोन वर्षाची यासाठी. तुला जवळूनं अनुभवायचं होतं. माझ्या नावाचे तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचे होते. क्लासला दांडी मारून लॉन्ग ड्राईव्हला गेलो तर तुला मागून गुदगुल्या करायच्या होत्या. 'साजण' ची एका प्लेट मध्ये दोघांनी मिळून पाणीपुरी खायची होती. सगळं चुकलं ना आणि आता पण आपल्याला दूर राहावं लागणार. जाऊ देत तुला नाही कळायचं.'
ती हिरमुसली, मान खाली घातली.
'अगं वेडाबाई! आपलं आयुष्य सोबत जाणारे. आपण एक एक क्षण सोबत जगणार आहोत. एकमेकांचा वेळ एक असणारे. आपण आज घट्ट मिठी मारून त्या दोन वर्षाचा बॅकलॉग भरून काढूया.'
मी तिची मान जिवणीला पकडून हलकेच वर केली. तिने डोळे मिटले. वातावरणात कमालीची शांतता पसरली होती. हवेत प्रेमाचा थर चढला. तिच्या कपाळाचं चुंबन घेत मी तिला मिठीत घेतलं. माझ्या काळजाचे तिच्या नावाचे ठोके तिला ऐकवले. ती हलक्या आवाजात म्हणाली,
'तुझ्या मोबाईलमध्ये माझा नंबर बरोबर आहे ना!' मिठी घट्ट करत मी होकार दिला.
दुसऱ्या दिवशी १२ सुमारास आम्ही दोघांनी एकमेकांच्या मोबाईलवर मेसेज केला.
'नागपूर.'
'पुणे.'
तिला विमानतळावर बघताच घट्ट मिठी मारली आणि भेटीचा बॅकलॉग संपवला.