वळण

वळण

5 mins
815मी आणि रेवती रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म पाचवर वाट बघत उभे होतो, अर्थातच तिची!

रेवती मला धीर देत होती,


'माझं फक्त एकदाच ऐक, कदाचित हि शेवटची भेट असेल तुमची. फक्त या क्षणी अश्रू येऊ देऊ नकोस. नियतीने, नशिबाने तुम्हाला वेगळं करायचंय, असं ठरवलंच आहे तर हसत हसत निरोप दे. तू रडलास तर तिच्या विरहाचं शल्य आणखी तीव्र होईल.'


इतक्यात गाडी प्लॅटफॉर्म ला येऊन धडकली. माझे काळजाचे वाढत होते, निरोपाचीच नाही तर आमच्या नात्याच्या समारोपाची वेळ जवळ येत होती.


'हो रेवती! पण ती आहे कुठे? ७:५० ची निघायची वेळ आहे, ७:४५ ...' मी वाक्य पूर्ण करणार इतक्यात पाठीवर कोणीतरी थाप दिली. मी वळून बघितलं तर कोण? तीच जी यांनतर फक्त चुकून भेटणार होती, मुद्दाम भेटता यावं यासाठी बहाणे करताच येणार नव्हते.

मी तिला कडाडून मिठी मारली. मी माझं जग माझ्या कवेत घेतलं, शेवटचं! तितक्यात माझं लक्ष रेवती कडे गेलं, तिचे डोळे डबडबले होते,


'I am Sorry! खरंच! ट्राफिक मुळे खूप उशीर झाला यायला मला .'


'ते ठीक आहे. माझं चॉकलेट कुठंय ? ' कटू शेवट गोड करण्याचा प्रयत्न. भेटायला आलं कि चॉकलेट आणणं, जुनी सवय होती. ते आम्ही तिघांनी मिळून संपवलं. गाडीचा वेळ झाला. हाथ हळूहळू सुटत होता. मी दारातच उभा होतो. ती हळूहळू पुसटशी होत होती, आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला सज्ज होतं होतो. सज्जच म्हणावं लागेल. कारण आता, चुकलो तर समजून सांगणारं, सांभाळून घेणारं माझं हक्काचं माणूस सोबत असणार नव्हतं.

मी गाडीत स्थिरस्थावर झालो. पण मन अजूनही तिच्या शेवटच्या मिठीतच होतं. मी विचारात असतानाच माझा फोन वाजला,


‘अरे! रेवतीला तिच्या बस स्टॉपवर सोडलं, म्हणून उशीर झाला तुला फोन करायला.’


'काय म्हणाली ती?'


'म्हणत होती तू गाडी फार मॅनेज करतेस. आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्यातरी मुलीच्या मागे बसून सेफ वाटलं म्हणे तिला. आणि एक पत्र दिलय तिने मला. फोन झाला की उघडते?'


'चालेल! तेच तर ना! सगळंच छान मॅनेज करतेस तू. स्वार्थ काही केल्या सुटत नाही गं, मग तो माणसं निवडण्याच्या असला तरीही.'


'स्वार्थ? खरंच?'


'हो मग! स्वार्थच तो, ज्याच्या सोबत आयुष्य काढायचंय त्याचा जमेचा प्रांत कोणता? हे बघणं म्हणजे स्वार्थच कि!'


'एक विचारू?' आता प्रश्नोत्तरांची मालिका सुरु होणार होती. कारणं शोधण्याची धडपड, आणि मनाच्या समधानासाठी, त्याला घट्ट करण्यासाठी शेवटचा डाव होता तो.


'एक महिन्यात इतका परका झालो मी तुला? तू चक्क परवानगी मागते आहेस? ठोके कधी काळजाची परवानगी मागतात का?'


'रडलास ट्रेन मध्ये बसल्यावर?'


'नाही गं!' खोटं कसं बोलायचं याचं कसब आता शिकावं लागणार होतं, त्याचीच सुरुवात करत होतो मी.


'खरंच?'


'अगं हो! बरं ते जाऊ दे. आणखी काय म्हणतेस?' प्रश्नांना टाळणं ही तुटतानाची दुसरी पायरी.


तिचा प्रश्न तयारच होता,

'कसं वाटलं मला भेटून?'


'खरं सांगू?'


'अर्थातच!' रखरखीत सत्याशिवाय उरलंच काय होतं आयुष्यात?


'मी अजून नाही विचार केला इतका. फक्त आठवणींच्या कुपीत बंद केलीये भेट. एकांतात कुपी उघडून करत बसेन विचार यावर.'


'मग आता काय करतोय?'


'मी आणि पुस्तक अजून दुसरं काय?'


'आणि लाईट बंद झाला तर?'


'मी आणि आपल्या आठवणी आहेतच कि मग.'


'नको ना रे असं वागू प्लिज! कशी झालीये तुझी तब्येत? थोडीशी काळजी घे रे. मी म्हणते आहे म्हणून तर घे.'


'होईल गं मी ठीक. तुला कसं वाटलं मला भेटून?' भूकंप आल्यावर पण जमिनीला भेग्या कश्या पडणार नाहीत? उध्वस्त झाल्यावर पण सगळं नीटच राहावं अशी शाश्वती कशी काय मागू शकतात लोक?


'खूप मस्त वाटलं तुला भेटून? आधीचे दिवस आठवले.'


'म्हणजे स्पर्श विसरला गेला नाहीये तर.'

'कसा विसरेन?आयुष्याचं माहीत नाही, पण इतक्यात तर शक्यच नाहीये! '


'मला वाटलं, नवीन आठवणी गोळा करण्यात जुन्या पुसल्या गेल्यात कि काय?'


'किती टोचून बोलशील रे? ठेवू का फोन मी?'


'अगं चिडतेस काय?'


'मग बघ ना तू कसा बोलतोय?'


'मनाला बोचलंय खूप, म्हणून असं बोलणं उमटत असेल.'


'अरे! पण किती दिवस चालणार असं ?' वादळात उन्मळून पडलेला वृक्ष हटवावाच लागतो, तो परत कधीच उभा राहत नसतो.

'तुझ्याही डोळ्यात पाणी दिसलं मला?' एकमेकांच्या साक्षी, पुरावे, चौकश्या इतकच काय ते या नात्याचं अस्तित्व उरलं होतं.


‘नाही रे! डोळे लाल झाले होते. तुला कल्पना पण करता येणार नाही इतक्या स्पीडने मी गाड़ी चालवत पोहचले स्टेशनवर!’


'मग लवकर निघायचं, तुला वेळा माहित होत्या तरीही तू उशीर केलास.'


'खूप उशीर आधीच झालाय. आणि वेळा चुकल्यातच रे आपल्या एकमेकांच्या आयुष्यात येण्याच्या. मग शेवटच्या क्षणी तरी वेळेत येऊन का त्रास करून घ्यायचा'


'मान्य!'


'सफेद झूठ की भेटीची आस?'


'भेटीची आसच असेल. आणि, तू मला बघता क्षणीच मिठी का मारलीस? सगळे लोक आपल्याकडेच बघत होते.'


'तुझे डोळेच बोलले.'


'काय?'


'त्यांना मी ठीक आहे याची शाश्वती हवी होती.'


'ही शाश्वती आयुष्यभरासाठी मिळेल?'


'आयुष्यभर माझी काळजी राहील?'


'प्रश्नच नाही!'


'हाहा! आपण अजून एकमेकांना वचनच देतोय.' आयुष्यभर सोबतीच वाचन पूर्ण करू शकलो नाही, तिथे बाकी वाचनाची किंमत काय असेल?


'हे तरी वचन पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे?'


'हो! मी काळजी घेईन कि तुला माझी काळजी करावी लागणार नाही.'


'शब्दांची फुलं फक्त.'


'नाही! आश्वासनाचं नविन रोपटं.'


'आणि त्या रोपट्याला आसवांचं पाणी नकोय. '


'प्रयत्न...'


'हॅलो तुझा आवाज येत नाहीये? हॅलो??'


'ओके! बाय!'


'बाय!'

फोन बंद झाला.

तिचा फोन आला म्हणजेच मी समजलो, पत्र अजून उघडलं गेलं नाहीये.


'प्रिय...... '

'हो! आयुष्यभर प्रियच असशील माझ्यासाठी.'

खूप दिवस झाले तुझ्याशी मोकळं बोलून. आपण जेव्हा पासून वेगळं होण्याचं ठरवलंय त्या दिवसापासून फक्त भांडतोय. दोघेही किती बिथरलोय आपण?

म्हणून म्हणलं तुझ्यासाठी पत्रच लिहावं. शेवटचं! सगळंच शेवटचं होतंय पण, आपल्या आठवणी रोज नवीन प्रकारे मला आठवतात. जितक्या त्वेषाने मी त्यांना हरवण्याचा प्रयत्न करतोय, तितक्याच जिद्दीने त्या मला हरवून माझ्यासमोर उभ्या ठाकतात, अन मी त्यांच्याकडे हताशपणे बघत उभा असतो.

तुला मार्ग वेगळा करावा वाटला, मीच वाट मोकळी करू दिली. तुला माझ्यासोबत राहण्यासाठी कारणं हवी होती, तिथेच तर आपली हार झाली. तुला जबरदस्तीने माझ्यासोबत राहावं लागलं असतं अन ते ओझं मी आयुष्यभर नसतो पेलू शकलो असतो गं. माझ्यासाठी तू आजही स्वच्छंदी पाखरू आहेस, आकाशाला गवसणी घालणारं, ते पिंजऱ्यात कसं शोभेल?

कोणताही रस्ता आपल्याला दिशा दाखवू शकतो, बाकी शर्यत आपलीच असते. मी राहतोय उभा हळूहळू, सगळ्याच वाटा नवीन आहेत गं माझ्यासाठी. आणि आता ठेच लागली तरी स्वतःलाच सावरावं लागणार आहे, सोबतीला कोणी हात पकडायला कोणी नसणारे ना! पण तू काळजी नको करू. मी पण जाईल एक दिवस किनाऱ्यावर, फक्त काही दिवस वेळ लागेल मला.

आपण विचारलेल्या प्रश्नांवर आपणच उत्तरं गृहीत धरत असतो. पण काही वेळा नियतीच प्रश्न विचारते, तिचेच उत्तरं असतात. मिळेल ते उत्तर स्वीकारावं लागतं. त्रास, आटापिटा,घालमेल कमी होते.

खूप बोलतोय मी! थांबतो!!!

तुझ्या आयुष्यात कायमच्या येणाऱ्या नात्याला हार्दिक शुभेच्छा!

तुझा, आता कोणीच नाही!


ता.क. :- आता पर्यंत तरी आठवणींशी जिंकू नाही शकलोय! आणि मी मुद्दाम त्यांच्या कडून हारतचं राहणार आहे. तू परत वळून फोन नाही केलास तरच मला उठून उभा राहण्याचं बळ मिळेल.


आजही तीन वर्षांनंतर परत तिचा फोन नाही आला म्हणून वाटत राहतं, तिने पत्र नंतर वाचलं म्हणून शेवटचा संवाद तरी झाला.Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy