Kalidas Ajegaonkar

Others

3  

Kalidas Ajegaonkar

Others

रोजचीच लोकल

रोजचीच लोकल

3 mins
562


ती, रोजचीच सोबती! मी फक्त तिच्याकडे बघत असतो! तिच्या भुवयांमधील अंतर सांगतं, आज तिचा मूड कसा आहे! एका वैशिष्ट्यपूर्ण साच्यात बनवून घेतलेल्या वाटतात तिच्या भुवया, कोरीव! जेव्हा रागात असते तेव्हा, आपसूक कपाळावर एक आठी उमटते, दोन्ही भुवयातलं अंतर वाढतं, हातवारे वाढतात, मनातली चलबिचल ज्या एक high किंवा low अश्या पॉइंटवर असते तेव्हा पायातील बुटाने जमिनीशी धरलेला ठेका कमी जास्ती होतो!


मराठी साहित्य म्हणजे जीव की प्राण! हातात मला आतापर्यंत तरी सतत रत्नाकर मतकरी, पुलं, वपु, खांडेकर दिसले! अजून बऱ्याच लोकांशी मैत्रीपूर्ण भेट असते तिची, रोजच! पण आजकाल 'Think Global act local' हा पायंडा तिने पण घेतलाय, कधीकधी तिच्या हातात आता, Dan Brown, john green, आणि इंग्रजी साहित्यसम्राट शेक्सपियर आजोबा पण असतात! तसं भाषेचं वावडं कोणत्याच नाही, पण मायबोली मायमराठीवर विशेष प्रेम! भाषेचं वावडं नाही हे तेव्हा कळलं जेव्हा तिचा फोन वाजला आणि एक तामिळ गाणं रिंगटोनला होतं! ते गाणं तामिळच हे कश्यावरून तर AR रहमान यांचं तेच हिंदी गाणंसुद्धा आहे! मग काय शोधलं गुगलवर आणि उलगडा झाला, ते बोल तमिळच आहेत! बाकी निव्वळ ऐकून फरक मला तरी नाही ओळखायला येत! थोडा पेशन्स लेवल कमी आहे! क्षणार्धात पॅनिक मुद्रेमध्ये जाते! जेव्हा पॅनिक होते ना तेव्हा कानात बोळे घालून दोन तीन गाणे ऐकते! तिला नेमकं कळतं की किती वेळ गाणे ऐकले की पॅनिक मोड संपून जातो! मग लगेच फोन ठेवून पुस्तकाची पानं चाळत बसते!


परवाला मजाच झाली, कोणीतरी स्टेशनवर भेटायला यायचा होता! गाडीने निघायची संमती दिली तरी, ही बया बाहेरच! मग 'काय गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले' असं होईल असं वाटलं मला, पण कशाचं काय, जागेवर बसल्यापासून जो पारा चढलेला, तो काही केल्या उतरला नाही! रागाने डोळे थोडे फिकट लाल झाले, फोन कॉल झाला, तो अर्धवट बोलताना बंद केला! नंतर 2-3 फोन कट करून झाले, त्यादिवशी मात्र बोळे काही कानाबाहेर आलेच नाहीत! उतरेपर्यंत कानातच! मलूल होऊन बाहेर धावणाऱ्या जागाकडे बघत बघत, ती आतल्या सुसाट धावणाऱ्या जगाला शांत करत असावी! फार बोचरा असतो हा प्रवास, अश्यावेळेसच गाडी उशीर करते आणि विनाकारण प्रवास लांबतो! रेल्वेच्या नावे पण एखादी रसीद त्यादिवशी फाटत असावी!


जेव्हा मन दोलायमान असतं तेव्हा, डोळे बंद, डावा अंगठा डाव्या मुठीमध्ये बंद, मूठ घट्ट बांधलेली आणि उजव्या अंगठ्याने बाकी चार बोटांच्या नखांवरून अलवार अंगठा फिरवणे! अश्यावेळी भुवयातलं अंतर सारखं कमी-जास्ती कमी-जास्ती होतं! डावा पाय उजव्या पायावर, मग काहीवेळाने उजवा पाय डाव्या पायावर अशी अदलाबदल, जसं की मनात High tide आणि low tide यांचा खेळ चालू असावा, आणि मनातल्या मनात, मनाच्या किनाऱ्यावर जे काही लिहीलेली अक्षरं उमटत असतील आणि तीच मिटत जात असावीत!


डोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सच्या शेडवरून कळतं, आज झोपेचा कोटा पूर्ण झालाय की नाही! आजच्या प्रवासातला कितीसा वेळ झोपण्यात जाणार, आणि किती वेळ मोबाइलच्या स्क्रीनकडे बघण्यात जाणार! तिचे डोळे पण निव्वळ घारे या प्रकारातले नव्हते, पण तो ब्राउन रंग पण मनातल्या उलथापालथेच्या intesity वर गडद किंवा फिकट व्हायचा!


उतरताना मात्र मोबाईलमधला वेळ नाहीतर गाडीची स्पीड आणि चिंचेचं भलं मोठं झाड पार केलं की आवराआवर चालू व्हायची! स्कार्फची गाठ घट्ट, मोबाईल, पुस्तक, बोळे गुंडाळून बॅगेत, एक छोटासा आळस देऊन, डोळे मिटून प्लॅटफॉर्म लागला की दाराच्या दिशेने मार्गक्रमण करत गाडी थांबली की उतरायची आणि गर्दीचा हिस्सा होऊन, त्या रंगीबेरंगी माणसांच्या वाळवंटात मिसळून जायची! रोजची ती, आणि मी फक्त बघायचो!


Rate this content
Log in