शाळा आणि गंमती जमती
शाळा आणि गंमती जमती
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणून गावाला जाऊन येऊ असं म्हटलं आणि रविवारी मुलं आणि बायकोला घेऊन गावी गेलो. आमचे घर गावाबाहेर वस्तीवर असल्याने गावातूनच वस्तीवर जाण्याचा मार्ग आहे आणि त्याचबरोबर त्याच वाटेवर गावातील शाळा ही लागते शाळेकडे पाहिले आणि नमस्कार केला. पुढे आमच्या वस्ती वरील घराकडे गेलो. तसा मी नेहमीच गावाला जात असतो आणि घरी जाताना मध्ये रस्त्यावर लागणाऱ्या आमच्या शाळेला मी नेहमीच नमस्कार करत असतो.
याच शाळेत मी सातवी पर्यंत शिकलो. पुढील शिक्षण शेजारील गावातील शाळेत केले. कारण आमच्या जिल्हा परिषदेचे शाळेत फक्त सातवी पर्यंतच वर्ग होते. आमच्या वेळी बालवाडी, अंगणवाडी वगैरे काही नव्हते. पोरगं घरी त्रास द्यायला लागलं की आई बाप मुलांना शाळेत पाठवायचे. अशी आमची शाळा पहिलीपासून चालू झाली. माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असलेली माझी बहीण आणि मी पहिलीला एकत्र शाळेत जाऊ लागलो. आमच्या जन्मतारखा ही आमच्या गुरुजींनीच टाकल्या. कारण आमचा जन्म कोणत्या तारखेला झाला हे आमच्या घरातील कोणाच्याच लक्षात नव्हते आणि ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. कारण आमच्या वर्गातील सगळ्याच मुलांचे जन्म आमच्या गुरुजींनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला असे जग जाहीर केले होते. कारण आता आम्हाला पंचेचाळीस वर्षानंतर समजते आहे की आमचे वर्गमित्रांचे जन्मदिवस एकाच दिवशी आहेत. हे फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुप मुळे आम्हांस ज्ञात झाले आहे. माझी एक वर्षांनी लहान असलेली बहीण आम्ही एकाच दिवशी जन्मला आलो असे दिसते. आणि विशेष म्हणजे आमच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर एकच दिवशी आणि एकाच साली जन्मला आलो असे दिसते म्हणजे एक वर्षांनी लहान असलेली माझी बहीण कागदोपत्री आम्ही जुळे भाऊ बहीण आहोत असे दिसते.
पण अशा गंमती जमती फक्त आमच्या शाळेत झाल्या असाव्यात या शाळेने आम्हाला खूप काही दिले शाळा सकाळी साडेदहाला भरायची पंधरा मिनिटे आधी सफाईची बेल व्हायची म्हणजे शाळेतील वर्गातील साफसफाई करायची, वर्ग झाडून घ्यायचा, वर्गा समोरील पडवी झाडायची हे सगळे आपापले वर्गातील मुली करायच्या आणि मुले ही शाळेच्या समोर असलेल्या पटांगणातील कचरा, पालापाचोळा, पडलेले कागदाचे बोळे,इ. उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकायचे आणि शेजारी विहिरीतून पाणी घेऊन मोठे पिंप होते ते भरून ठेवायचे. सर्व मुलांना पाणी पिण्यासाठी. त्यानंतर राष्ट्रगीत आणि प्रार्थना व्हायची प्रत्येक वाराला वेगळी प्रार्थना असायची आमचे गुरुजी एक पेटी वाजवायचे आणि दुसरे तबला आणि दोन-तीन मुलं किंवा मुली प्रार्थना म्हणायचे आणि सगळे मुले त्यांच्या पाठीमागे प्रार्थना म्हणायचे. पहिली ते सातवी मधील सगळ्या वर्गातील मुलांची एकत्रच प्रार्थना असायची. शाळे पुढील पटांगणात पिंपळाच्या झाडाखाली किंवा पावसाळ्यात शाळेच्या पडवीत ही प्रार्थना व्हायची. त्यावेळी आम्हाला एकच गुरुजी असायचे सगळ्या विषयाला. तेच सगळे विषय आम्हां मुलांना शिकवायचे, फक्त इंग्रजी विषयाला वेगळी शिक्षक असायचे, तेही इयत्ता पाचवी पासून पुढे.
आमच्या शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरही खूप काही शिकायला मिळालं संध्याकाळी चार नंतर ठराविक दिवशी खेळायचा तास असायचा शिवणा-पाणी, खो-खो, कबड्डी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर आमच्या सर्वांचे आवडीचे मामाचे पत्र हरवलं, अगीनगाडी असे खूप खेळ खेळायचो. त्यावेळी आम्हाला बेंच वगैरे काही नव्हतं आम्ही खालीच जमिनीवरती बसायचो आणि मुलं-मुली खूप गोंधळ घालायचे म्हणून एक मुलगा आणि त्याच्यामागे एक मुलगी अशाप्रकारे आम्हाला आमच्या गुरुजींनी बैठक व्यवस्था करून ठेवली होती. लांबून पाहिले की असे दिसायचे की चार मुलींच्या मध्ये एक मुलगा बसला आहे आणि चार मुलांच्या मध्ये एक मुलगी. अशी व्यवस्था करून आम्हास बसवले होते. त्यावेळी दोन-चार महिने वर्गात गोंधळ झाला नाही आणि खूप शांतता वाटली पण सर्व मुले आणि मुलींचे चांगल्या ओळखी झाल्या आणि परत गोंधळ सुरू झाला.
अशा या बैठक व्यवस्थेमुळे आम्हा मुला मुलींना एकमेकांबरोबर कसं बोलायला पाहिजे, एकमेकांचा कसा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे हे आमचं आम्हालाच उमगत गेलं. त्या नकळत झालेल्या शिक्षणाचा आम्हा मुला मुलींना आजही खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.
आम्हाला दुपारच्या जेवणासाठी एक तास सुट्टी असायची आम्ही कधी शाळेत जायचं तर कधी शेजारी असलेल्या मारुतीच्या मंदिरात तर कधी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीच्या शेजारी जेवायला बसायचो जेवण झाले की परत तास चालू होईपर्यंत खेळायचो, जवळजवळ अर्धा पाऊण तास खेळायला मिळायचा.
जेवण झाले की पहिला तास नेहमी गणिताचा असायचा आणि आमचे गुरुजी गणित एवढे भारी शिकवायचे की आम्हा सर्व मुलांना गणित हा विषय आवडीचा झाला होता. एक ते 30 पर्यंत सर्व मुलांचे पाढे तोंडपाठ असायचे. म्हणजे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कारण जर कधी हेडमास्तरला एखादा मुलगा काही चुकीचं करतोय म्हणजे शाळा भरल्या नंतर ही उशिरा आला किंवा डोक्यात टोपी नसेल. (कारण आमचा गणवेश पांढरा शर्ट, खाकी हाफ पॅन्ट आणि डोक्यावर टोपी असा असायचा ) तर आमचे हेडमास्तर कोणताही पाढा म्हणायला लावायचे आणि तो जर व्यवस्थित आला तर ठीक. नाहीतर काय खरं नाही. हात लाल होईपर्यंत छडी द्यायचे यामुळे प्रत्येकाचे पाढे तोंडपाठ असायचे.
तालुक्याच्या ठिकाणी आलेली सर्कस सुद्धा आम्हां मुलांना शाळेने तिथे नेऊन दाखवली होती. कधी वनभोजन म्हणून गावाच्या बाहेर असलेल्या तळ्याच्या शेजारी आंब्याची चार पाच झाडांची रांग होती त्या झाडाखाली घेऊन जाऊन आमचेच डबे पण वेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजन म्हणून खायची मजाच वेगळी होती.
दर गुरुवारी शाळेने एक संगीत शिक्षक बोलवले होते. त्यांनी आम्हाला भजन म्हणायला, पेटी वाजवायला शिकवले होते. त्यामुळे शाळेतील मुले भजन म्हणायला लागली, तालुक्यात मग जिल्ह्यात भजन स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिकही पटकवले होते. मग गावातील खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठीचे काळात सप्ताह असायचा त्यातील एक दिवस मंदिरात जाऊन आम्ही भजन म्हणायचो. अशा प्रकारे आम्ही शिक्षणाबरोबर बरच काही जीवनात उपयोगी येईल असे शिक्षण घेतले.
या सर्व शिक्षणाचे श्रेय जातं आमच्या खैरे गुरुजींना. त्यांच्यामुळेच आम्ही आता सर्व मुलं- मुली वयाच्या पन्नाशीच्या जवळपास आलो आहे. आमचा एक 'इयत्ता सातवी' या नावाचा व्हाट्सअप ग्रुप आहे आणि त्यात आमचे गुरुवर्य माननीय काशिनाथ खैरे गुरुजी सहभागी आहेत. आम्ही सर्व विद्यार्थी वर्षाला एक तरी स्नेहसंमेलन करून सर्व एकत्र येत असतो. आणि सर्वांचे सुखदुःख एकमेकांबरोबर शेअर करत असतो. एकमेकांना मदतही करण्याचा पूर्ण प्रयत्न आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील अशी आम्हां सर्व विद्यार्थ्यांना खात्री आहे.
अशी आमची मराठी शाळा कधीच विसरू शकत नाही, प्रणाम त्या शाळेला जिने आम्हाला घडवलं, प्रतीकुल परिस्थितीत कसं जगायचं ते शिकवलं..
