लक्ष्या
लक्ष्या
गेल्या वर्षी दिवाळी ला गावी गेलो होतो, माझी दोन मुलं - मुलगी, मुलगा आणि बायको...
मी पुण्यावरून गावी आलो आहे असे वस्ती वर समजले, दुसऱ्या दिवशी माझा जीवाभावाचा मित्र लक्ष्मण, पण आम्ही सगळे त्याला लक्ष्या च म्हणायचो..मला भेटायला आला आर्धी पिशवी भरून संत्र्याच्या बागेतनं ताजी ताजी मोठ मोठी निवडून संत्री आणली होती त्यानं... म्हणाला तू आलेला कळालं सकाळ सकाळ बागात गेलो आणि चांगल्या चांगल्या निवडून संत्र्या तोडून आणल्या.
चहा पिला आणि निघाला, जाताना पोरांची चौकशी केली आणि म्हणाला तुझी बायको कुठे आहे बोलंव तिला मुलीला आवाज दिला,आई ला पाठव बाहेर.
बायको आली तसा माझ्या जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, वहिनी माझ्या दोस्ताला सांभाळा लय चांगला हाय त्यो,लय चांगल्या मनाचा हाय त्यो, माझा खांदा गद गदा हालवला आणि म्हणाला जातोरं जप सगळ्यांना,
आणि लक्ष्या गेला. जाता जाता बायको आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेला.
आम्ही तीघं जन मी लक्ष्या आणि कैलास पहीली पासूनचे मित्र, तसे आमच्या तिघांच्या वडिलांची चांगली मैत्री, सकाळी शिळेत निघाल्या पासून संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर उशिरा घरी पोहचे पर्यंत आम्ही एकत्रच असायचो, आम्ही तिघांची घरं एकाच वस्तीवर तशी लांब लांब होती, पण आम्ही मात्र एकदम जवळचे मित्र. शाळेत दुपारी जेवणाच्या सुट्टीत एकत्रच जेवायचो. जेवायचं कसलं गिळायचोच म्हणा.. एक तासाची सुट्टी असायची, जेवायला दहा मिनिटे खूप झाली, नंतर परत शाळाभरे पर्यंत खेळणं, कधी शेजारच्या शेतात जाऊन बोरं,चिंचा, संत्रा खाने,कधी एरंडाचे छोटी छोटी फळं तोडून घेऊन येऊन उंच आकाशात फेकायची आणि ती परत झेलायची, एरंडाचा चीक काढायचा आणि लिंबोळीच्या काडीने फुगे उडवयचे असा खेळ चालायचा. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना एक छोटं तळं लागायचं, त्याच्या पट्टीवर म्हणजे बंधाऱ्यावर तरवडाचा पाला तोडून त्यावर बसून खाली घसरत यायचं हा एक आमचा खेळ असायचा. मागून चड्ड्या फाटू नये म्हणून तरवडाचा पाला हा एक उपाय होता.
वस्तीत कोणाचं लग्न असलं की आमची तिघांची जोडी नवरदेव असो की नवरी असो नेहमी पुढे, त्या वेळी गड्यांगनेर म्हणून प्रकार असायचा, मांडवा मध्ये सगळे फळं, खाऊचे पुडे असायचे, त्या गर्दीत घुसून ते खाऊचे पुडे उचलायला आमचा लक्ष्या लय तरबेज, मग एका एकाची पाळी ते पुडे उचलायची नंतर लांब जाऊन ते उघडून पहायचे कधी गुंडदानी, कधी शेव तर कधी लाडू मिळायचे. आम्हाला वाटायचं की आम्हाला कोणी बघितलेच नाही. पण लक्ष्याची एक गंमत होती.पुडा हातात घेतला की त्याला हसूच आवरत नव्हते, तो हासंतच गर्दीतून बाहेर पडायचा आणि कोणत्या तरी बाईच्या शिव्या खातच बाहेर यायचा.पण काहीतरी मोठी बाजी मारल्याचा आनंद असायचा त्यांच्या चेहऱ्यावर.असे आमचे आनंदात दिवस चालले होते.
सातवीत असताना लक्ष्या दोन तीन दिवस शाळेत आलाच नाही कैलासला आणि मला कळेना की हा शाळेत का नाही आला म्हणून गुरूजींनी पण आम्हाला सांगितले की त्याच्या घरी जाऊन तरी या. आमची तिघांची दोस्ती सगळ्या गावाला माहिती होती. म्हणून गुरूजींनी ही जबाबदारी आम्हा दोघांवर सोपवली. संध्याकाळी लवकर घाईघाईने लक्ष्याच्या घरी गेलो तर समजले की रविवारी तो शेतात गेला होता, वडिलांबरोबर. शेतावर एक कोरडी विहीर होती. त्यात कधी पाणी नसायचं विहीरीच्या काठावर एक बोराचे मोठे झाड होतं आणि ते विहिरीवर झुकलेले होते. म्हणून त्या झाडाला खूप बोरं लागली होती कारण बोरं काढणं अवघड असल्यामुळे तिथे कोणी जात नव्हते. पण हा पठ्ठ्या झाडावर चढला आणि जोर जोराने बोर हालवली बोरांचा सडा पडला खाली तशी एक फांदी कडकन मोडली आणि लक्ष्या झाडावरून खाली पडला, झाडावरून जेवढा खाली पडला तेव्हढाच अजून खाली जाऊन विहीरीत पडला होता आमचा लक्ष्या. मोठा आवाज झाला म्हणून जवळच असलेले त्याचे वडील पळत विहिरीवर गेले तर हा बेशुद्ध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला मग दवाखान्यात घेऊन गेले. डोक्याला मार लागला होता, तो बरेच दिवस ओळखत नव्हता कोणाला नंतर तो ओळखू लागला पण काय बोलायचा ते बरेच दिवस कळंत नव्हतं. मग त्याची शाळा बंद झाली..
पुढे कैलास आणि मी दहावीत एकत्र होतो, नंतर तो शेती करु लागला आणि मी १२ वी नंतर पुण्यात आलो, कॉलेज केलं आणि पुण्यातच स्थायिक झालो.
लक्ष्मण म्हणजे खरा दोस्त, बैलगाड्यांची शर्यतीची आवड असलेला, राजकारणावर भाष्य करणारा, सगळ्या गावातील वयस्कर माणसे आणि आत्ताच्या पिढीतील लहान मुलांना आवडणारा, कायम घाईत असलेला हा अवलिया याला मानाचा मुजरा.
