Padmakar Bhave

Comedy Fantasy

3  

Padmakar Bhave

Comedy Fantasy

सायकल

सायकल

2 mins
174


3 जून जागतिक सायकल दिवस...माझ्या आठवणीतली सायकल...


सायकल चा धसका घेतला


लहानपणी मला सायकलची प्रचंड भीती वाटे.घरात सायकल असूनही मी ती कधीच चालवली नाही.वडील,आत्या,भाऊ सारखे ओरडायचे "सायकल धूळ खात पडली आहे, चालव नाहीतर बुट्याचा बुट्याच राहशील"वगैरे. मित्र माझी सायकल बिनधास्त घेऊन जात,कारण मी ती चालवत नव्हतो.आपली सायकल लोकांची पोरंच चालवतात हा नुसता बघत राहतो"नाना (वडील) ओरडायचे.बऱ्याच वेळा दोनचार मित्राबरोबर जबरदस्तीने ते मला पाठवत सायकल शिकवायला, मी जायचो पण माझी सायकल पोरंच हानायची, मला त्यांनी जबरदस्तीने शीकवायचा प्रयत्न केला की, मी त्यांना तेव्हा लाथा बुक्क्यांनी मारायचो, मग कुणी लफडयात नाही पडलं.सायकलवर पुढच्या दांडीवर किंवा पांजरी वर बसून जाणं ही मला भयंकर भीतीदायक वाटे,मी एकदा मित्राच्या सायकलवर मागे पांजरी वर बसून जाताना पडलो होतो मला खरचटलं होतं, खरंतर माझ्यापेक्षा त्याला जास्त लागलं होतं पण अशाही परीस्थितीत त्याने मला पाडलं म्हणून मी त्याला भर रस्त्यात तुडवलं होतं. मग तो माझ्या नानांना म्हणाला,"तुमच्या पोराला सायकल वरून शाळेत घेऊन जा, त्याचा मार पण खा..अरे वा रे वा..मला नाही जमणार"

मग जेवढं मी त्याला मारलं त्यापेक्षा जास्त परतफेड मला नानांकडून मिळाली.मला एवढा राग आला की घरात मागच्या खोलीत स्टँडवर उभ्या असलेल्या सायकलच्या पेकटात अशी लाथ घातली की ती दोन्ही चाकं वरती करून उताणी पडली,काय मला आनंद झाला म्हणून सांगू...!

सायकल शिकतांना पडतोच पडतो, पडल्याशिवाय लागल्याशिवाय सायकल येत नाही असं मी ऐकून असल्याने मी तिच्यापासून दूरच राहीलो.. पण एकदा कसं कुणास ठाऊक मी सायकल शिकायला तयार झालो,माझा मोठा भाऊ मुंबईहून दिवाळीला इकडे गावी यायचा,तसा तो आला होता,नानांनी त्याला गुपचूप सांगितलं असावं"मुंबईला जाण्यापूर्वी ह्याला सायकल शिकवूनच जा" त्याने चंगच बांधला आणि मला तयार केले. त्याने मला खूप समजावलं"मी मागे धरून ठेवतो रे,काही पडत नाही तू,आधी अर्ध पायडल मार" नाही नाही म्हणता म्हणता मी तयार झालो,"मी सायकलच्या दांडीमधून पाय घालून खटक खटक पायडल मारत सायकल चालवायला सुरुवात केली,माझा भाऊ सारखं सारखं.. पुढे बघ पुढे बघ असं सांगे, पण माझा लक्ष मागे त्याच्याकडे! तो सायकल सोडत तर नाही ना याकडे, आणि एक मोठ्ठा उतार आला त्यावरून सायकल भर्रकन खाली गेली,भाऊ मागे असल्याने पुढील उतारावर त्याचं लक्षच नाही,आणि माझं लक्ष मागे त्याच्या कडे असल्याने माझंही लक्ष नाही,उतारावरून सायकल अशी वेगात गेली की भावाचा हात सुटला आणि मी सायकल मला तिच्या ज्या पेकटात मी लाथ घातली होती तिथे बरोबर अडकवून सरळ समोरच्या नाल्यात घेऊन गेली एका मोठ्या दगडावर मी आपटून सरळ नाल्यात उताणा ! मी ही तिला लाथ घालून उताणी पडली होती ना,त्याचा बदला तिने घेतला.माझा उजवा पाय,डावा खांदा ,पायाचा अंगठा सोलवटून निघाला.

रड रड रडलो ,बोंबाबोंब केली,नाना हसत होते,भाऊ हसत होता आणि सायकल ही!



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy