Padmakar Bhave

Inspirational Others

3  

Padmakar Bhave

Inspirational Others

जिजी

जिजी

4 mins
212


"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" खूप भरून येतं आजही हे गाणं ऐकतांना.पण जिजीने कधीच आम्हाला ओझं समजलंच नाही. माझी सख्खी आत्या! मुद्दामूनच सख्खी असं म्हणावं वाटतं, सख्यत्वाचं इतकं जवळून दर्शन आम्हाला जिजीने घडवलं.लोकं म्हणायचे तुम्ही आत्याला सांभाळता, पण खरं तर जिजीनेच आम्हा सहा भावंडांना सांभाळलं अगदी माझ्या आई वडिलांसह! जिजीचं बालवयतंच लग्न झालं.लग्न झालं आणि अवघ्या काही महिन्यांतच जिजीचे यजमान गेले. त्या काळातलं विधवेचं जगणं!


पण जिजी खचली नाही,तिने सासरी न राहता माझ्या वडिलांकडे राहायचा निर्णय घेतला.वडिलांची परिस्थिती अगदी जेमतेम ! जिजीने आमच्या गावी-जळगाव जिल्ह्यातील कासोदा-शिक्षिकेची नोकरी केली.आणि आम्हा सर्व भावंडांची जवाबदारी घेतली.परिस्थितीमुळे असेल कदाचित पण जिजी खूप कडक शिस्तीची! घर जरा अस्ताव्यस्त असलेलं जिजीला नाही चालायचं! पलंगावरच्या चादरीलाही वळी पडलेली जिजीला नाही चालायची. शाळेत सारेच तिला घाबरून असत. विदयार्थी तर सोडाच पण सहशिक्षकही जरा दक्ष च असत.स्वतःचा रुमाल,स्वतःची पावडर डबी,स्वतःचा कंगवा अगदी तेल देखील जिजीचं वेगळं असायचं.टापटीपणा तिला खूप प्रिय होता.स्वतःच्या हाताने धुतलेली तिची स्वच्छ नऊवारी साडी, पांढरंशुभ्र ब्लाउज! आम्ही सारीच भावंड जिजीची खूप लाडकी होतो,पण फटके ही खूप खाल्ले तिच्या हातचे.तिच्या तुटपुंज्या पगारात तिने सहा भावंड,माझे आई वडील साऱ्यांचं व्यवस्थित निभावून नेलं.मला आठवतं वडील जेव्हा निवृत्त झाले-ते एका छोट्या नागरिक बँकेत शिपाई होते-तेव्हा त्यांना हजार रुपये मिळाले होते त्यावेळचे हजार! केवढी मोठी रक्कम ! त्यांनी ती जिजीपुढे ठेवली.मी तेव्हा तिथेच होतो, असेन ८-९वर्षांचा! मी तेव्हा वडिलांना (आम्ही त्यांना नाना म्हणायचो) म्हटले "नाना आपले पैसे आहेत ना हे मग जिजीला कशाला देता?" त्याची वेदना आता मला जाणवते. जिजीचे डोळे भरून मला आजही आठवतात.मुळातच ती उग्र स्वभावाची तिने ते पैसे वडिलांना परत केले,वडिलांनी खूप समजूत घातली "जाऊदे नं लहान आहे तो त्याला काय कळतं" मग जिजीने ते घेतले, घेतले म्हणजे काय नानांच्याच संसारासाठी वापरले.पण हे कळण्याचं ते वय नव्हतं माझं.वडील राबराब राबले,आईनेही गावातल्या मारवड्यांकडे स्वयंपाकाची कामं केली.शाळेची फी भरायची असली की जिजी,नवीन शर्ट,नवीन खाकी पॅन्ट घ्यायची की जिजी,सहलीला जायचं की जिजी.जिजी शिवाय काही होत नव्हतं.जिजीने एक एक पैका साठवला आम्हा भावंडासाठी! आम्हा सगळ्या भावाबहिणींचे शिक्षण जिजीने केले.आईची बाळंतपणं, आजारपणं सगळं सगळं जिजीच करायची.मी चौथीत असेन पायात चप्पल नव्हती म्हणून नानांकडे हट्ट धरला,चिडलो वैतागलो,"घेऊन देतो थांब ना जरा"नाना म्हणाले मी चिडून घराबाहेर पडलो आणि धावतांना एक काच खसकन पायात घुसली,पाय रक्ताळला मी धाय मोकलून रडलो"बघा तुमच्यामुळे काच लागली"रडत रडतच नानांकडे तक्रार केली.नानांच्या डोळ्यातले ते थेंब मला अजूनही जसेच्या तसे आठवतात.जिजीने लगेच मला संध्याकाळी 20 रुपयाची स्लीपर घेऊन दिली.हे आठवात राहिलंय म्हणून लिहितोय!असं जिजीने सारं आयुष्यभर दिलं. आम्हा सगळ्या भावा-बहिणींचे लग्न जिजीनेच केले.नुसतेच लग्न नाही संसारही थाटून दिले अगदी वाटी चमच्यासह!


आजही माझ्या व माझ्या भावाच्या घरात जी भांडीकुंडी आहेत त्यातली बरीचशी जिजीचीच आहेत.मी तिचा खूप लाडका. माझं " पद्माकर"हे नाव सुद्धा तीचंच! भावा बहिणीची नावं ही तिनेच ठेवली.जिजी असयुष्यभर देत राहिली.जिजी नि निवृत्त झाली.मिळालेले सारे पैसे तिने आमच्यासाठीच वापरले.मला शाळेत कोणी काही विचारले की "आत्याला विचारून सांगतो"असंच सांगायचो.वर्गातले माझे शिक्षकही "बाईंना विचार"असंच म्हणायचे.जगण्यातला कोपरा नि कोपरा जिजीने व्यापला होता.सगळा हट्ट जिजीकडेच! नव्हे तो हक्कच वाटायचा मला.फक्त नानांनी निवृत्तीचे पैसे जीजीला देतांनाचं मला जिजीचा परकेपणा कसा जाणवला कुणास ठाऊक! कसे म्हणून गेलो मी आपले आहेत ना ते पैसे म्हणून! अर्थात ते नाकळतीचं ते वय! पण आत्ता ते खूप जाणवतं.


मला आठवतं दिवाळीत शंभर रुपयाचे फटाके हवेत मी जिजीकडे हट्ट धरला,ते अर्थात तिला शक्य नव्हतं मग खूप चिडलो आणि "जिजी,नाना सारेच कंजूष कुकडे आहेत असं मी गल्लीत ओरडत होतो अक्षरशः ओरडत होतो,त्यावेळी मी खडूने घराच्या भिंतीवर मोठया अक्षरात लिहून ठेवलं होतं "जिजी नाना कंजूष कुकडे, म्हातारे वाकडे,आणत नाही फटकडे"ती माझी पहिली उस्फुर्त कविता! आता हसू येतं,रडूही येतं.आम्ही दोघे भाऊ अंबरनाथला स्थायिक झालो तेव्हाही जिजीनेच घरासाठी पैसे दिले भावाला. आणि ते तिनेच द्यायचे असतात असा आमचा ठाम समज! खरंतर दैवाने जिजीचं तिचं 'स्वतःच'असं काहीच ठेवलं नाही.आयुष्याचं शीवधनुष्य जिजीने लीलया पेललं.वैधाव्यानंतर जिजी खचली नाही,रडत बसली नाही.


"पेलूनी धनुष्य आयुष्याचे समर्पिता झाली


रडली नाही,नाही खचली लढा देत राहिली"


जिजीला आम्ही मग अंबरनाथला आणलं.जिजी निवृत्त झाली तरीही पेन्शन झालं की ते आम्हाला वाटून टाकायची.खरंतर आम्ही भावंड आता स्थिर स्थावर झालो पण तरीही कधी एकदा पेन्शन होतं आणि कधी एकदा ते आम्हाला देते असं तिला व्हायचं. मी जेव्हा अनाठायी खर्च करायचो तेव्हा ती म्हणायची "तू बापू सारखं करायला जाऊ नको (बापू माझा मोठा भाऊ)


ते दोघं कमावतात,पोटी पोर आहे उधळपट्टी नको करू"जिजीने आयुष्यभर पैका पैका जोडला,आम्हाला उभं केलं ,तेव्हा तिचं असं म्हणणं साहजिकच होतं.जिजीला ८४वर्षांचं आयुष्य लाभलं. जिजीला जाऊन आता चार वर्षे होतील.शेवटचं पेन्शन मात्र काढायला बँकेत जात येत नाही हे शल्य मात्र तिला फार बोचत असावं,तिचे शेवटचे काही दिवस खूप त्रासात गेले.जिजीला शेवटची घरघर लागली प्राण जाता जात नव्हते ती अडकली होती आमच्यात आणि आता आमच्या मुलांबाळात आम्ही सारे जण तिच्या भोवती जमा झालो होतो.भावाने तिच्या कानाजवळ जाऊन म्हटले "काही चिंता नको करू आम्ही सारे कादंबरीला (माझी मुलगी) नीट सांभाळू" 'पोर आहे पोटी' जिजीचे शब्द आठवले


जिजीने खोल खोल आवाजात "हू"म्हटले आणि अवघ्या दोन मिनिटात जिजी नावाचं वादळ शांत झालं. असं वादळ ज्याने मोडलं नाही.. घडवलं.


'जन्मात साधणे नाही,याही अन पुढल्याही, लक्ष तुझ्या ऋणातून होऊ कसा उतराई?"अनंत वादळातही ,ऊन पावसातही जिजी नावाचं झाड उभंच राहिलं.. देत राहिलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational