Padmakar Bhave

Fantasy

3  

Padmakar Bhave

Fantasy

दिन दिन दिवाळी

दिन दिन दिवाळी

3 mins
220


दिवाळीची आठवण जरी निघाली,तरी आठवते माझे कासोदा गाव.जळगाव जिल्ह्यातील.मुंबईत आलो काय किंवा अमेरिकेत,कसोद्याची दिवाळी,तीच खरी दिवाळी,महिना महिना आधी दिवाळीची तयारी सुरू व्हायची. गावाकडचे मोठे घर,त्याची साफसफाई,आवराआवर सुरू व्हायची,चुन्यात रंग टाकून मातीच्या भिंतींना रंगही घरीच द्यायचो आम्ही,आम्ही म्हणजे वडील- आम्ही त्यांना नाना म्हणायचो.मग चिवड्यासाठी पोहे वाळत घालायचे,म्हणजे उन दाखवायचं त्यांना वगैरे.दिवाळीचा कसा माहौल तयार व्हायचा,माहौल. मग 15 पैशाच्या पोस्टकार्डची वाट पहायचो आम्ही,ताई येण्याची वार्ता मिळणार असते ना! मुंबईहुन भाऊ येणार,मोठा सोहळाच तो.गल्लीभर ओरडून सांगायचो -ताई येणारए,भो,भाऊ पण....! आणि मग त्यांच्या आगमनाचा दिवस."आनंदी आनंद गडे" मग ठरल्याप्रमाणे फटाके....!हा मोठा विषय असायचा माझ्या घरात. माझे गल्लीतले मित्र-गण्या ,राज्या,दिप्या सांगायचे "100 रुपयाचे फटाके आणणारए माझे वडील" हे 100 रुपये म्हणजे 1985-1986 चे बरं का! त्यावेळी


30..40 रुपयात बरेच नाहीतरी,पुरेसे फटाकडे यायचे,पण आम्ही कसे ऐकतो...मग आमची गालफ़ुग्गी व्हायची-"आम्हला नको वीस रुपड्याचे फटाके-त्या गण्याकडे बघा,त्याच्या घरी 100 रु चे फटाके आणणार आहेत, आम्हालाही पाहिजे"मग वडिलांची म्हणजे नानांची समजवणी-जिजी म्हणजे आत्या समजवायची,पण- ऐकेल तो राजू कसला?मग नुसती आदळआपट..तंगड्या आपट-भिंतींवर गुद्दे मार,मोठमोठ्याने बोंबा मारणे असं सगळं सुरू व्हायचं-बोंबा म्हणजे शब्दशः बोंबा मारायचो मी,अगदी गल्लीभर ऐकू जाईल एवढ्या आवाजात,घशाच्या नसा ताणून ओरडायचो-"ह्या घरातील माणसे कंजूष आहेत होssssss" मगअसं दुसऱ्या गल्लीतही जाऊन ओरडायचो- गल्लीतली माणसं फिदी फिदी हसायची.नाना वैतागून म्हणायचे" ओरड आणखी जोरात ओरड" एवढंच नाही तर घरातल्या नव्या कोऱ्या रंग दिलेल्या भिंतींवर मी खडून लिहून ठेवायचो-" जिजी-नाना कंजूष कुकडे,म्हातारे वाकडे,आणत नाही फटाकडे-" हीच माझी उद्वेगातून निघालेली -पहिली विद्रोही कविता! 


मग यावर दरवर्षी एक उपाय शोधायची माझी आत्या-फटाक्यांच्या दुकानदाराला देण्यासाठी ती चिठ्ठी लिहून द्यायची.१००रु चे फटाके देणे-(चिठ्ठीच्या मागे बारीक अक्षरात लिहिलेलं असायचं-२० चे देणे)


अर्थात फटाक्यांच दुकान तरी कोणाचं?


माझ्याच चुलत भावाचं-सुरेश भावे चं.


त्याला माझी सगळी नाटकं माहीत असायची.तो ही मग १०..२० रुपयाचे फटाके देऊन सांगायचा-" ह घे राज्या १०० चे फटाके" विशेष म्हणजे जिजी जेव्हा मला चिठ्ठी घेऊन पाठवायची तेव्हा त्यावर "१०० रु चे फटाके देणे" हे वाचून परमानंद व्हायचा-विजय प्राप्त केल्यासारखा धावत सुटायचो- पण चिठ्ठीच्या मागे "२० चे देणे" हे वाचूनही त्यातला छुपा मसुदा मला कधीही कळला नाही.


मग मित्रांना ती फटाक्यांची पिशवी दाखवत सुटायचो..."है...१०० रु चे फटाके" मग त्यातल्या एखादा कळलाव्या म्हणायचा-"१०० चे ?एव्हढेच? माझे बघ किती आहेत १०० मध्ये" पुन्हा राजुची स्वारी घरी फटाक्यांची पिशवी जमिनीवर फेकून देत," हे फटाके एवढे कमी काब्र?"


गण्याकडे पिशवीभरून आहेत बघा"


तेव्हा वडील मुद्दामून इकडे तिकडे, कोणी बघत नाही ना,कोणी-ऐकत नाही ना असा आविर्भाव आणत म्हणायचे-अगदी हळु आवाजात "अरे आपले फटाके भारी आहेत-म्हणून १०० रुपये देऊनही एवढेच...त्यांचे फुसके आहेत" हे मात्र मला पटायचं..


मग फटाके फोडण्याचा दिवस-भल्या पहाटे ओंघोळी चालू असतांना ,अंधार असतांना फटाके फोडण्याचा महोत्सव सूरु व्हायचा-एका हातात लक्ष्मी बॉम्ब आणि दुसऱ्या हातात उदबत्ती घेऊन मी फटाके उडवायचो-एकदा उदबत्तीवर लक्ष्मी बॉम्ब पेटवला,तो सुरसुर करायला लागला आणि मी लक्ष्मी बॉम्ब फेकण्याऐवजी उदबत्तीच फेकली,लक्ष्मीबॉम्ब हातातच फुटला-"ढुम्म" पण काही रडलो बिडलो नाही,हात भाजून निघाला होता पण नानांनी खोबरेल तेल लावल्यावर बरा झाला-


आजही दिवाळी आली की -आठवतं ते कासोदा गाव-गण्या ,राज्या,दिप्या आणि


माझी पहिली विद्रोही कविता-

*" जिजी ,नाना कंजूष कुकडे..म्हातारे वाकडे,आणत नाही फटाकडे"*.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy