Satish yanbhure

Drama Tragedy

4.0  

Satish yanbhure

Drama Tragedy

सावली

सावली

2 mins
197


बापाच्या खांद्यावर पोलकं घालून दहा अकरा वर्षाची धोंडू गावभर फिरत असायची. बाप वारकरी संप्रदायात पुंडलिक महाराज म्हणून प्रसिद्ध होता. भजन गायन करत तो फिरायचा. धोंडू पण सोबत जात असायची. तेरा-चौदा वर्षांची असताना पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातून तिच्या साठी एक स्थळ आलं होतं. लग्न ठरलं. लग्न झालं आणि विशी पार केलेल्या सोपानसोबत ती सासरी आली.


सासरी कुटुंब खूप मोठे होते आणि अठराविश्व दारिद्र्य होतं. धोंडू हळूहळू संसारात रमू लागली होती. घरात कितीही गरिबी असली तरीही नवरा मात्र दिलदार, मनमोकळा आणि समजून घेणारा भेटला होता. त्यामुळे हसत खेळत वर्षे जात होती. बघता बघता धोंडूला मुलंबाळं झाली. चार मुली आणि पाच मुलं. त्यातली दोन मुलं लहान असतानाच दगावली. ते दुःख पचवून सोपान धोंडाईचा संसार फुलू लागला होता. सासरा खूप तापट स्वभावाचा. त्याच्यामुळे त्यांना मोठ्या दोन मुलींना शिकवताच आले नाही. पण सोपान आणि धोंडाईला शिक्षणाचे महत्त्व कळले होते. म्हणून त्यांनी आपल्या सर्वच मुलांना शिकवण्याचा निश्चय घेतला होता.

सोपान तर पाच रुपये साल या प्रमाणे दुसऱ्याच्या शेतात राबायचा. बहात्तर सालचा दुष्काळ त्यांनी भाकरीचा एकएक घास वाटून खाऊन काढला होता. नंतर तो दुसऱ्याची शेती करु लागला. शेतात काम करतच मुलांना शिकवू लागला होता. कामासाठी कितीतरी वेळेस गाव सोडून दुसऱ्या गावात, तर कधी वीट कामगार म्हणून दुसऱ्या राज्यात सोपान धोंडूला जावे लागले होते. पण मुलांचं शिक्षण सुरू झाल्यापासून ते इतर ठिकाणी कामासाठी कधी गेले नाहीत. त्यांच्याच गावात एका ब्राह्मणाचे शेत तो करु लागला होता. जवळपास चाळीस वर्षे त्या शेतात वाटेकरी म्हणून काम केले. धोंडू सोपानच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. तसेच दुसरीकडे जे काम लागेल त्या कामाला ती जात असत. आलेला रुपया न रुपया ती मुलांच्या शिक्षणासाठी लावत असायची.

घरात खाणारी दहा तोंडे आणि काम करणारे चार हात होते. मग फरपट होत असे. पण कधी कोणत्या मुलाला अथवा मुलीला त्यांनी कामाला लावले नाही. धोंडू स्वतः शेत नाल्याची कामे पुरुषासारखी करायची. उन्हात काळी ढेकळं तिच्या पहारीच्या घावाने खिळखिळी होत होती. तिच्या घामातून तिचा संसार फुलाप्रमाणे फुलत होता.


सोपान आणि धोंडूमध्ये चारचौघांत ऐकू जाईल असा वाद कधी झाला नाही. एकमेकांवर अपार जीव होता आणि एकमेकांच्याविषयी अपार आस्था होती. दोघांच्याही मनात जसजसा काळ जाईल तसतसा तो विश्वास आणखीनच दृढ होत गेला. सोपान आणि धोंडूने दोन मुलींना त्यांच्या मर्जीनुसार शिकवले. बारावी नंतर डीएड करु दिले. नंतर लग्न लावून दिले. मोठ्या मुलाला एम ए बी एड, एम एड करेपर्यंत शिकवले. नंतर तो कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करु लागला. दुसरा मुलगा प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागला. तिसरा मुलगापण प्राध्यापक म्हणून नोकरीस लागला. निरक्षर असलेल्या सोपान धोंडूचे घर आज शिक्षणाचे माहेरघर झाले होते. सत्तर वर्षापर्यंत सोपान कष्ट करत होता. त्याची तिन्ही मुले नोकरीला आणि मुली चांगल्या घरी संसार करत होत्या. यातच सोपान आणि धोंडू आत्मिक समाधान मानून त्यांच्या आनंदाने ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा पुसत असत.

दोघांचा संसार सुखदुःख पाहत एखाद्या सुगंधी वेलीप्रमाणे बहरला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama