धोंडाईचा... शिक्षणाचा ध्यास
धोंडाईचा... शिक्षणाचा ध्यास
"एवढं पत्र वाचून दाखव बरं... रावणदा.", बौद्धवाड्यातील धोंडाई आपल्या हातातलं पत्र रावणदाकडे देत आशाळभूत नजरेने पाहात होती. तिचा भाऊ हैदराबादला राहत होता. त्याचं पत्र आलं होतं. तिच्या घरी कोणाला लिहितावाचता येत नव्हतं. नवरा चौथीपर्यंत शिकला होता,पण तो घरी नव्हता आणि वाचन तेवढे सराईतपणे त्याला जमायचे नाही. दोन मुली निरक्षरच राहिल्या होत्या. त्या फक्त सासऱ्याच्या अट्टाहासामुळे. तो नेहमीच सोपानला आणि त्याची बायको धोंडाईला म्हणायचा,
"पोरी शिकून काय करणार? लोकांचच घर भरणार." त्यावेळी इच्छा असून हे दोघेही महादबा पुढे गप्प राहायची.
त्यावेळेस त्यांच्या पूर्ण समाजात शिकलेले बोटावर मोजण्या इतपत चार दोन लोक असतील. त्यात रावण हा एक होता. त्याचं शिक्षण बऱ्यापैकी झालं होतं. त्याला चांगलं लिहितावाचता येत होतं. हिशोबातपण तरबेज होता. त्यावेळी कोणाचा पत्रव्यवहार असेल, कोणता हिशोब असेल तर रावणदाकडे लोकं जायची. त्याला वेळ असेल तर तो वाचून दाखवायचा. लिहूनगी देत असे पण काही वेळेस, "उद्या या, मी कामात आहे असं सांगून परत पाठवायचा."
त्याही दिवशी तो बहुधा कामात असावा अथवा त्याला धोंडाईच्या पत्र वाचनाच्या कामाचा कंटाळा आला असावा. म्हणून तो पत्र घेत म्हणाला, "बघू आण, काय बाबा तुमचा तरास झालाय, उठलं की सुटलं की येता आणि हे वाचून दाखव अन् ते वाचून दाखव म्हणता." धोंडाईच्या काळजात चर्रर्र झालं .ती भरल्या डोळ्यानं पत्र ऐकत होती. पण तिचं मन काही लागत नव्हतं. तिचं मन रावणदाच्या शब्दाभोवतीच घुटमळत होतं. पत्राचा सार काही तिच्या डोक्यात आला नाही. रावणदाने पत्र वाचून धोंडाईच्या हातात ठेवलं. ती घेऊन घराकडे आली. येऊन थोडं पाणी पिलं. पण तिचा आत्मा शांत होत नव्हता. तिच्या डोळ्यांत जमलेले अश्रू गालावरून खाली घरंगळत होते.
बामणाच्या घरी गेलेला नवरा घरी आला. आल्यावर तिने सगळा प्रसंग सांगितला. नवरा तिची समजूत काढत होता. पण ती निश्चयाने बोलत होती, आता कोणी काहीही म्हणो आपण आपल्या मुलाबाळांना शिकवायचं म्हणजे शिकवायचं. दोघांनीही निश्चय केला आपण आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिकवायचेच.
दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला होता. नंतर दोन मुली आणि पुन्हा दोन मुले अशी वेल सोपान आणि धोंडाईची वाढली होती. पहिल्या दोन मुली सासऱ्यामुळे निरक्षरच राहिल्या होत्या. मोठा मुलगा त्याला गावच्या शाळेत घातलं. तो खूप लाडाचा होता. एक दोन मुलं वारली होती. चार मुलींमध्ये हा एकटाच होता. म्हणून धोंडाई त्याचा खूप लाड करायची. पण याचाच फायदा घेऊन 'तो शाळेचे निमित्त करून घरून निघायचा मात्र शाळेत पोहचायचा नाही.' ती गोष्ट धोंडाईला समजली. तेव्हा त्याचे कान पकडून पाठीवर धपाटे देत गुरुजीपुढे त्याला उभं केलं होतं. गुरुजींना म्हणत होती, "हा जर इथून पुढे शाळेत नाही आला अन् अभ्यास नाही केला तर तुम्हाला हवं ते करा. याला चांगला वळणावर आणा. हा शिकला पाहिजे. आजपासून हा तुमच्या स्वाधीन." मोठ्या करारीपणाने ती बोलून निघून गेली होती. गुरुजींनापण तिचं कौतुक वाटत होतं. नंतर सासऱ्याचा विरोध डावलून दुसऱ्या दोन मुलींना शाळेत घातलं. घरची परिस्थिती बेताची पण निश्चय मात्र पराकोटीचा. आहे त्या परिस्थितीत जगायचे पण पोरांना शिकवायचेच असा निश्चय.
नंतर दोन मुले झाली. त्या मुलांना आणि आपल्या हैदराबादच्या भावाच्या दोन मुलांना स्वतःच्या घरी शिकायला ठेवलं. सगळे शाळेत जाऊ लागली. धोंडाई आणि सोपान गावातल्या एका उच्चशिक्षित नोकरदार ब्राह्मण आणि भल्या माणसाचं शेत करत होती. त्या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत होता. मुलांचे शिक्षण पूर्ण होत होतं. दहावीपर्यंत परीक्षा फीस, वह्या, पेन, पुस्तकांच्या खर्चाशिवाय इतर म्हणावा असा खर्च आला नाही. पण तोही खर्च गरीब मजुरांना कमी असतो का? पण त्यांनी कधी तक्रार केली नाही आणि आपल्या पाच मुलांचं आणि भावाचे दोन अशा सात मुलांचं शिक्षण मोठ्या हिंमत पूर्ण केलं. मुलांच्या शिक्षणासाठीच त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आपल्या आयुष्याची जमापुंजी काय आहे? असं जर कोणी विचारल तर निःसंकोचपणे 'आपल्या मुलाचं शिक्षण,' असं सांगतात.
आज धोंडाई आणि सोपानचा मोठा मुलगा प्राध्यापक आहे. दोन नंबरचा मुलगा प्राथमिक शिक्षक आहे आणि तीन नंबरचा प्राध्यापक आहे. एका मुलीने डीएडचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुसऱ्या मुलीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. भावाच्या मुलाचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. आज धोंडाई आणि सोपान दोघेही समाधानी आहेत. आज त्यांनी हाती घेतलेल्या शिक्षणाचा ध्यासाचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांचा प्रचंड आशावाद फलद्रूप झाला होता. निरक्षर धोंडाईचा घर आता शिक्षणाचा वाडा झाला होता. धोंडाईने आयुष्यभर घेतलेल्या कष्टाचे आज फळ चाखायची वेळ आली होती. आता तिने सर्व कामकाज बाजूला ठेऊन विसावा घ्यायला हवं, असं तिचं थकलेलं मन सांगत होतं.
