Satish yanbhure

Tragedy

3.6  

Satish yanbhure

Tragedy

धूळधाण

धूळधाण

8 mins
690


रमाकांत धावतपळत माळावरुन, डोंगरावरून पळत सुटला होता. कपडे रक्ताने माखले होते. पायाखाली दगडगोटे येत होते. खाचखळगे येत होते पण रमाकांतला याचं भान राहिले नव्हते. त्याला आज समोर काहीच दिसत नव्हते. तो धावत होता. पायाला गाडीची चाकं लावल्याप्रमाणे तो गावाच्या दिशेने धावत होता. वाटेत कुठेतरी एखादा कोणी त्याला भेटत असे. काय झालं? म्हणून ते विचारेपर्यंत तो पुढे गेलेला असायचा. त्याच्या डोळ्यातून ओघळून आलेले पाणी गालावरच थिजले होते. माळावरुन तो गायरानाच्या पांदीच्या वाटेवर आला. त्या कच्च्या रस्त्यावरून जीव तोडून तो धावत होता. त्यामुळे त्याला दम लागला होता. पण त्याला त्याचं भान राहिलं नव्हतं. त्या पांदण रस्त्यावरून तो मुख्य डांबरी रस्त्यावर आला. गाव जवळ आलं होतं. चार दोन पत्र्याची घरं दिसू लागली होती. अंगातील कपडे घामाने भिजून गेली होती. तरीही तो मात्र थांबायला तयार नव्हता. डांबरी रस्त्यावरुन तो गावच्या बामन जाळीपर्यंत (स्मशानभूमी) बघताबघता आला होता. तिथून तो तसाच धावत पुढे निघाला. आंबेडकर पुतळ्याजवळून पुढे धावत गेला. तो जात असताना त्याला व्यंकटीने पाहिले.

व्यंकटी विचार करु लागला. हा असा का पळतोय? रमाकांतचा असा अवतार पाहून काहीतरी बरंवाईट घडलं असावं अशी शंकेची पाल व्यंकटीच्या मनात चुकचुकली. त्याच्या मनात धस्स झालं. ह्याला एवढी धाप लागली तरी हा थांबला नाही आणि त्याच्या कपड्यावर दिसणारे रक्ताचे डाग कशाचे असतील? अशा अनेक प्रश्नांनी व्यंकटीच्या मनात काहूर माजवलं होतं. तो विचार करु लागला. ही पोरं आत्ताच बारा-एकच्या सुमारास कामाला गेली होती. अन् आता हा एकटाच असा धावत का आला असावा? व्यंकटीचं मन संशयानं भरुन गेलं. तो तसाच रमाकांतच्या मागे पळू लागला. जवळपास चार किलोमीटर धावत रमाकांत गावात आला. तो तसाच महारवाड्यात घुसला. बरेचजण त्याला पाहात होते. विचारत होते. त्याला थांबवत होते. पण तो कुठे थांबलाच नाही. त्याच्या मागे चारदोन माणसं आणि लहान पोरं पळतच होती.

तो गणपतच्या घराजवळ आला अन् थांबला. धापा टाकतच कोणी काही बोलण्याच्या आतच तो बोलला, "आपला रामा गेला, ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेला..." हे सांगतच तो खाली कोसळला. रामाचा बाप गणपत. पाठीला पोट गेलेलं. रमाकांतचे शब्द ऐकताच थंडगार पडला होता. रामाची म्हातारी माय गळून पडली होती. रामाची बायको सविंद्रा कपाळ बडवून घेत होती. धाय मोकलून रडत होती. तिला कशाचे भान राहिले नव्हते. रामाची लेकरं घाबरून बिथरली होती. त्यांना काय झालंय कळत नव्हतं आणि कळालं तरी आता काय करावं उमजत नव्हतं. आपली आई, आजीआजोबा, शेजारीपाजारी रडताना पाहून यांचा हंबरडा फुटला होता. पोरं घाबरली होती. शेजारी राहणऱ्या वनिताने त्यांना आपल्या घराकडे नेलं. तिथेच त्यांना थांबायला सांगितलं. रामा गेल्याची खबर महारवाड्यात वाऱ्यासारखी पसरली होती. चारदोन तरणीताठी पोरं डोंगराच्या दिशेनं पळाली.

इकडे डोंगरावर ज्ञानू, ग्यानु, तात्या, सुदामा, कोंडिबा, राजू, आणि सूर्या आणखी चारदोन गडी ट्रॅक्टरखाली अडकलेल्या रामाचा देह काढत होते. ट्रॅक्टरच्या चाकाखाली रामाचं डोकं आलं होतं. डोक्याचा पार चेंदामेंदा झाला होता. हसरा बोलका असलेला चेहरा रक्ताने माखून चेंदामेंदा होऊन निस्तेज पडला होता. ते पाहून ही पोरं ढसाढसा रडली. ट्रक्टर गावातील जयसिंगराव या बलाढ्य पाटलाचे होते. त्यांचा मोठा मुलगा माधवराव पाटील स्वतःच ट्रॅक्टर चालवत होता. तो घाबरून गेला होता. त्याला काय करावे सुचत नव्हते.

गणपतच्या घरी रडण्याचा कल्लोळ माजला होता. थोड्या वेळानंतर रमाकांतने स्वतःला सावरलं होतं. त्याला लोकं विचारत होती काय झालं? कसं झालं? तर तो सांगू लागला. "आम्ही दगडांनी अर्ध्याच्या वर ट्रॅक्टर भरला होता. मग थोडे पुढे जाऊन पुढचे धोंडे भरावेत म्हणून आम्ही पुढे गेलो. रामा ट्रॅक्टरमध्येच होता. ट्रॅक्टर दगडाच्या जागेच्या जवळ आल्यानंतर माधवराव पाटलाने तो जोरात वळवला. तेवढ्यात रामाने उतरण्यासाठी वरुन उडी मारली. पण त्याचा पाय फाटक्या पायजाम्यामुळं ट्रॅक्टरच्या कडीत अडकला. तो तसाच ट्रक्टरच्या चाकाखाली आला अन् सगळं संपलं. पाटलाला ट्रॅक्टरवर काही ताबा ठेवता आला नाही. रामाचं मस्तकच फुटलं." रमाकांत एका दमात बोलून गेला. ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर भितीच्या, काळजीच्या, करुणेच्या छटा उमटून जात होत्या.

तासाभरात त्याच ट्रॅक्टरमध्ये टाकून रामाचं मृत शरीर गावात आणण्यात आलं. गावचा पाटील जयसिंगराव, त्याचा मुलगा माधवराव आणि रामाची बायको, रामाचे आईवडील आणि एकदोन नातलग यांच्यात काहीतरी बोलणं झालं. मग पोस्टमार्टेम न करताच पाटलाच्या सांगण्यावरून आणि दोघांच्या समझोत्यावरुन रामाच्या शरीराला अग्नीच्या स्वाधीन करण्यात आलं. जर पोस्टमार्टेम केलं असतं तर पोलीस केस, कारवाई, झाली असती. त्यामुळे पाटलानी खेळी करून आपल्यावरचं बालंट टाळलं होतं. रामाच्या घरच्यांनी पोलीस केस करून काय साध्य होणार? त्यापेक्षा पाटलांनी रामाच्या पोराची जिम्मेदारी घ्यावी, त्याला नोकरी व्यवसाय बघून द्यावा म्हणून पोलीस केसच्या भानगडीत न पडता रामाचा अंत्यविधी उरकला होता. रामाचं पोर आठ वर्षाचं असेल. अन् त्या पोराच्या नोकरीच्या, व्यवसायाच्या जबाबदारीचा शब्द पाटलाने दिला होता. तिकडे रामाचा अंत्यविधी होत होता अन् रामाची चिमुरडी शेजारच्या वनिताच्या घरी रडून रडून बसली होती.

सविंद्रा... ऐन तिशीच्या उंबरठ्यावर असताना नवरा असा अचानक सोडून गेला होता. कष्ट केलं तरच चूल पेटायची. पोटाला तीन लेकरं. सासूसासरे दोघं. सगळा भार सविंद्राच्या खांद्यावर येऊन पडला होता. ती अगोदरपासूनच पाटल्याच्या शेतात कामाला जात असे. आता नवरा गेला. काम केल्याशिवाय चूल पेटणार नाही याची जाणीव होती. मग ती त्याच पाटलाच्या शेतात कामाला जावू लागली. वर्षभर ती तिथंच राबायची. आलेल्या मजुरीतून आपल्या कुटूबाचा निर्वाह चालवायची. दोन मुली, एक मुलगा असा परिवार तिच्यावर अवलंबून होता. मुलं मोठी होऊ लागली होती. शाळेत जावू लागली होती. ही पाटलाच्या शेतातच राबायची. तिथं काम करताकरता पाटलासोबत नको ते करून बसली होती. जयसिंगराव पाटील त्यानंतर माधवराव पाटील त्यानंतर माधवराव पाटलाची पोरं... सगळेजण तिच्या अब्रूसोबत खेळत होते. तिच्यासोबत शेतामध्ये शय्या करत होते. तिलाही त्या गोष्टीचं काही वावगं वाटत नव्हतं. जरी वाईट वाटत असलं तरी कधी तसं भासत नव्हतं. एका मजबूर बाईची अवस्था कोंडवाड्यातल्या भेकडासारखी झाली होती. स्वतःच्या अब्रूपेक्षा पोटच्या पोरांच्या भुकेची अब्रू तिला मोलाची वाटत असावी. म्हणून तिला निती-अनिती यातला फरक समजत नव्हता. का अब्रू वाचवणे म्हणजे निती म्हणण्यापेक्षा पोरांचा सांभाळ म्हणजेच 'निती' अशी कदाचित तिने व्याख्या केली असावी. वर्षानुवर्षे मागे जात होती. तिचे तेच काम तीच अवस्था होती. पोरं आता मोठी झाली होती.

साधना... मोठ्या मुलीची बारावी झाली होती. मुलाची दहावी होऊन तो पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला होता. लहान मुलगी नववीच्या वर्गात होती. मोठ्या मुलीचं नाव साधना. साधनाचं लग्न लावून दिलं. मुलगा कंपनीत कामाला म्हणून मुलीचं लग्न लावून दिलं होतं. पण लग्नानंतर गावातच राहू लागला. पिऊ लागला. व्यसनी, बाईलख्याली झाला. तिलाही आता मुलंबाळं झाली होती. पण तिच्या संसारातली गरीबी कधी हटली नाही. शाळेत अभ्यासात हुशार होती. एका सुशिक्षित नोकरदाराची बायको व्हावी, घरदार चांगलं असावं अशी सर्वसामान्य मुलीसारखी तिची स्वप्न होती. पण त्या स्वप्नांचा धुराळा उडाला होता. ती कधी मन भरून आलं की बोलून दाखवायची, "माझे बाबा असते तर आज मी वेगळं जीवं जगले असते." तिचे शब्द ऐकले की ऐकणाऱ्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. तिच्या कडा तर कधीच ओल्या होऊन गेलेल्या असत.

मयूर... सविंद्राच्या मुलाचे नाव मयूर. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर तो शहरात आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तिथे मित्रांच्या सोबतीने त्याला वाईट सवयीने घेरले होते. दारू, गांजा, इतर ड्रग्जचे सेवन तो करू लागला होता. आई पाटलाच्या शेतावर मजुरी करून पैसा पुरवत होती. तो आयटीआय पास झाल्यानंतर गावात आला. तर तो दोन वर्षात पूर्णतः बदलला होता. स्वतः वेगळ्याच तंद्रीत राहायचा. गावात पण नशा करून फिरु लागला. एकुलता एक मूलगा म्हणून संविद्री पैसे पुरवायची. मुलाच्या चुकाकडे दुर्लक्ष करायची. तो पूर्णतः व्यसनाच्या आहारी गेला होता. आईला हे कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. डोक्यावरचे ताळतंत्र सुटल्यासारखे काहीतरी बडबडत असायचा. घंटेच्या घंटे एका ठिकाणावर बसून असायचा. तो स्वतः तिशी पार करून बसला होता. ना नोकरी होती, ना व्यवसाय होता. ना पाटलाने दिलेला शब्द पाळला होता. कुठेतरी लागलेलं तो छोटेमोठे कामे करायचा. आलेल्या पैशातून आपली व्यसनाची निकड भागवत असे.

भार्गवी.. सविंद्राच्या लहान मुलीचे नाव भार्गवी. रामाच्या मृत्यूच्या वेळी खूपच लहान होती. तिला आपला बाप गेला याची जाणीव पण त्यावेळेस नसणार. आई शेतावर मजुरी करायची. भाऊ व्यसनी निघाला. मोठ्या बहिणीच्या संसाराचा झालेला खेळखंडोबा ती उघड्या डोळ्याने पाहत होती. वयात आल्यानंतर तिची बऱ्याच मुलांशी प्रेमप्रकरणे गल्लीत गाजली होती. तारुण्य आणि सौंदर्य असेपर्यंत जगाच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या असतात. एकदा का ते ओसरले की आपल्याला कोणी ढुंकूनही पाहात नाही. अगदी तशीच अवस्था तिची झाली होती. दहावीनंतर शिक्षणात रस नसल्याने सोडून दिले होते. मग आईसोबतच पाटलाच्या शेतावर कामाला जावू लागली होती. ती पण माधवराव पाटलाच्या पोराच्या गळाला कधी लागली कळलंच नाही. अशातच तिच्या आईने तिचे लग्न लावून दिले. नवरा मुलगा नात्यातलाच. पंधरा दिवसच संसार चालला असेल. ती काही कारणास्तव माहेरी आली. कारण तर कोणते? नवरा शहरात कामाला आहे. मग मी पण त्याच्या सोबतच जाणार या एवढ्या कारणापायी माहेरी आली होती. पण त्यांच्यात दुरावा वाढतच गेला. नंतर त्याने तिला कधीच नेले नाही. उलट फारकत मागितली. त्याला कुठूनतरी हिचे प्रताप समजले होते. वर्षभरातच सोडचिठ्ठी झाली होती. सोडचिठ्ठीनंतर ती आईसोबत पाटलाच्या शेतावर कामाल जावू लागली होती.

जयसिंगराव पाटील... हा गावात बलाढ्य हस्ती म्हणून ओळख असलेला. गावातच नाही तर तालुक्यात वजन असलेली व्यक्ती होती. पंचक्रोशीतील गावावर दबदबा होता. गावातील तंटेबिखेडे पोलिसात जाण्याअगोदर पाटलाच्या उंबऱ्यावर जात असत. पाटील दिलजमाई करण्याचा प्रयत्न करी. गावातील शाळेवर तो अध्यक्ष म्हणून होता. तो शंभर एकराचा धनी होता. लोकांच्या अडीअडचणी ओळखून त्यांना गरजेला व्याजाने पैसे देत होता. समाजात तीन रूपये व्याजाचा दर असायचा. मात्र पाटलाचा पाच ते दहा रुपये असायचा. लोकांना पैसे जमीन गहाण ठेवून देत असायचा. अशाच कित्येक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारीच्या माध्यमातून त्यानं लाटल्या होत्या. वागण्यात एक रुबाब होता. समोरच्यावर जरब बसावं असं वावरणं पाटलाचं होतं. बोलताना वरच्या पट्टीत बोलत असे. बोलता बोलता तीन प्रकारचा आवाज काढायचा. शाळेत कार्यक्रमात बोलताना तीन आवाजात बोलायचा. हसताना तीन आवाज काढायचा. फोटो काढल्यानंतर जुन्या कॅमेऱ्याचा आवाज जसा येतो तसा हा हसताना आवाज काढायचा. पोरं गावात नक्कल करत फिरत असत. दोन बायका, सहा पोरं आणि तीन मुली असा परिवार वाढवला होता. शेतावर कामाला आलेल्या तरण्याताठ्या बायकांवर पाटलाची वाकडी नजर असायची. कामावर जाणाऱ्या बायकांना माहीत होतं. म्हणून गावातील ठरलेल्या बायकाच त्याच्या शेतावर कामाला जात असत.

पाटलाने रामाचं प्रकरण मोठ्या हुशारीनं दाबलं होतं. सविंद्राच्या घराला, तिच्या पोराबाळांकडं नंतर ढुंकूनही पाहिलं नाही. उलट तिला, तिच्या लहान मुलीला ओरबडण्याचे काम पाटलाने अन् त्याच्या मुलाने केले होते. रामासारखी दोनचार प्रकरणं पाटलाने शेतातच दाबली होती.

माधवराव पाटील... जयसिंगराव पाटलाचा मोठा मुलगा होता. त्यानेच अपघाताने का मुद्दामहून रामाचा बळी आपल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली घेतला होता. तो कधीपण सविंद्राच्या घरी शेतावर कामाला ये म्हणून सांगायला यायचा. 'सविंद्रे' म्हणून हाक मारायचा. बाकीच्या लोकांना यांचं अनैतिक नातं कळलं होतं. पण कोण बोलायचे आणि का बोलायचे म्हणून गप्प बसत होते. माधवरावांनीपण नंतर सविंद्राच्या पोराला नोकरी अथवा कोणता व्यवसाय लावून दिला नाही.


काही दिवसांनी पाटील कॅन्सरच्या रोगाने मेला. पोरं वेगळे झाले. व्यसनापायी कर्ज झालेल्या पोरांनी जमिनी विकाय काढल्या. पाटलाचा रुबाब, वचक नाहिसा झाला होता. पाटलाच्या नातवंडावर सामान्य माणसासारखी जगण्याची वेळ आली होती. नियतीचा खेळ होता की सविंद्रासारख्या पीडितांचा, रामाच्या आईवडिलांचा, सावकारी सहन केलेल्या अन् आपल्या जमिनी पाटलाच्या घशात घालवलेल्या शेतकऱ्यांचा तळतळाट होता काही समजत नव्हते. पण लोक तर तळतळाटच होता असे म्हणतात. पाटलाची अशी फरपट व्हावी असा कोणी स्वप्नात विचार केला नव्हता. पण पाटलाची धूळधाण झाली होती.

सविंद्राने केव्हाच पन्नाशी पार केली होती. हल्ली तिला लहान मुलीची, तिच्या मोडलेल्या लग्नाची अन् आता लग्न होणार की नाही याची चिंता ग्रासत होती. मुलगा मानसिकदृष्ट्या खंगला आहे. लोकं तर त्याला वेडा म्हणत आहेत. त्याची चिंता तिला खात होती. तिला आता एकटेपणाचा त्रास होत होता. नवऱ्याला आठवून कधीतरी आसवं गाळत असते. माझा नवरा आज जिवंत असता तर माझ्या संसाराची अशी धूळधाण झाली असती का? असा खाटेवर पहुडताना विचार करत असते. तसा विचार करताना कधी पदराने डोळे पुसत असे तिलाही कळत नाही. विचाराच्या तंद्रीतच तिला डोळा कधी लागतो हल्ली कळतही नाही. उद्या उठून पुन्हा पाटलाच्या शेतावर जायची तयारी तिला करावी लागायची म्हणून आलेला विचार ती झटकण्याचा प्रयत्न करायची. पण ते तिला झटकता येत नसतं. कारण तो विचार तिच्या मनाला आयुष्यभरासाठी चिकटला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy