Satish yanbhure

Drama Others

3.8  

Satish yanbhure

Drama Others

कर्जात बुडाला संसार

कर्जात बुडाला संसार

3 mins
290


सुरेश महाराज घराच्या बंद दरवाजाकडे पाहत उभा होता.भल्यामोठ्या वाड्याला आज कोंडी लागली होती.सुरेश महाराजांच्या कित्येक पिढ्या या जागेवर, या वाड्यात मोठ्या झाल्या होत्या. खेळल्या होत्या. सुखदुःख याच जागेवर पाहिले होते. सणवार इथेच साजरे केले होते. आणि आज कर्जापायी हा वडिलोपार्जित वाडा,घर,जागा विकून गाव सोडून जावं लागत होतं. जिवंत भासणारा वाडा आज भग्न आणि नग्न होऊन निर्जीवपणे आपल्या मालकाकडे पाहत तसाच उभा होता. जर त्यालाही भावना असत्या, त्यालाही डोळे असते तर आज आंंबोली गावात या वाड्याने रडून महापूर आणला असता.


सुरेश महाराजांच्या डोळ्यासमोर भुतकाळात रेंगाळू लागला होता. डोळ्यात पाणी दाटलं होतं. तेव्हा सामानाने भरलेल्या टेम्पोच्या आवाजानं त्यांना भानावर आणलं. महाराजाने शेवटचा कटाक्ष घराकडे टाकला आणि झटकन वळून झपाझप वावभर अंतरावर असलेल्या टेम्पोकडे चालत गेला. ड्रायव्हर च्या शेजारी येऊन बसला आणि ड्रायव्हरला 'चल' म्हणून मानेनेच इशारा केला. पाठीमागे घरातलं सामान दोन लहान पोरं आणि बायको त्या सामानासोबत टेम्पोच्या तालावर हालत बसली होती. कपाळावर हात ठेवून विचाराच्या तंद्रीत बुडाली होती.


सुरेश महाराज पुन्हा आपल्या विचारात गढून गेला. वडिलोपार्जित वाडा, वीस एकर जमीन, नोकरी, वेळ मिळाली की धार्मिक कार्यक्रम करायला जाणे.सर्व कसे छान चालले होते. लग्न झाले. बायको समजून घेणारी मिळाली होती. काही वर्षातच दोन मुले झाली होती. घरात कधी पैस्याची चणचण भासली नाही. समाजात मान सन्मान मिळत होता. संसार अगदी परिकथेतल्या राजकुमारासारखा चालला होता.


पण न जाणो संसाराला कोणाची नजर लागली अन् हळूहळू संसाराला उतरती कळा लागली. नजर दुसऱ्या कोणाचीही लागली नव्हती. स्वतः सुरेश महाराजांचीच लागली होती. वाडवडील सांगतात की 'रम, रमी आणि रमणी' च्या नादाला कधी लागू नये. ते काही खोटे नव्हते.नोकरीमुळे चार पैसे हातात खेळू लागले होते. ते म्हणतात ना 'असतील शिते तर जमतील भुते'..अगदी त्याप्रमाणे मित्रांचा गोतावळा जमला होता.एकत्र हसणं,खेळणं,बसणं,उठणं चालूच होतं.


कधीतरी एका मित्राने फुकटची दारू आग्रहास्तव पाजवली होती. नंतर चार दोन वेळा असंच नको.. हो.. म्हणत दारू पोटात गेली होती. नंतर तर यानेच मित्रांना पियायला, बसायला चला म्हणून गळ घालायला सुरुवात केली होती.कोणीतरी जुगार दाखवायला नेले होते. पण बघता बघता सुरेश कधी डावावर बसायला लागला कोणाच्याही लक्षात आलं नाही. असेच एखदा डांस बारवर मजेमजेने गेले होते. तिथल्या बायांच्या अदांनी तो घायाळ झाला होता. त्याची पावले आठ पंधरा दिवसाला आपसूकच तिकडे खेचायची.


सुरेशला आता 'रम, रमी, आणि रमणी' या तिघांनेही घेरले होते. जुगारात नोकरी कर्जात बुडाली होती. मग बाईच्या नादाने ,अन जुगाराच्या व्यसनाने एक एकर शेती गेली होती. हळूहळू करत चार पाच वर्षात विस एकर शेती गेली होती. बायको बिचारी काही सांगायच्या भानगडीत पडली तर तुला काय कळतं? म्हणून थोबाडीत लावायचा. संसार पार मोडकळीस आला होता. आज हे नाही तर उद्या ते नाही, अशी गत झाली होती.


सगळं गेलं म्हणून चिंता लागली होती. चिंतेने दारू घशाच्या खाली रोज जात होती. अंगावर कर्ज वाढतच होतं. शेवटी कर्जदारांच्या रेट्यापायी वाडा विकावा लागला होता. आणि शेवटी आज वाडा सोडून, गाव सोडून जावं लागत होतं. आज दारू पियाला अन् दुसऱ्या कोणत्या गोष्टी करायला खिशात रुपया राहिला नव्हता.


सगळ्या आठवणींनी त्याच्या डोळ्याच्या कडा पार ओल्या झाल्या होत्या. चाळीशी पार असलेला तो विचाराने पार खंगला होता. सोबतीला विचाराने खंगलेली बायको आणि आठ-दहा वर्षांची दोन मुले होती. समोर सगळा काळोख होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama