Jalindar Barbade

Drama Inspirational

3  

Jalindar Barbade

Drama Inspirational

सावित्री म्हणावे का

सावित्री म्हणावे का

5 mins
564


अखंड स्त्री वर्गाला जन्मल्यापासूनच अनेक संकटांना सामोरे जावे लागते, संघर्ष करावा लागतो. अन त्यांच्या संघर्षामुळेच आजची त्या कुटुंबाची परिस्थिती स्थिरस्थावर आहे. या संघर्षातूनच यश मिळतं. यामुळे त्या कुटुंबालाच नव्हे तर साऱ्या समाजाला एक प्रेरणा मिळते. जीवनातल्या प्रत्येक संकटांशी संघर्ष करत ती यशाची गवसणी करते आणि या संघर्षगाथेमुळे ती आपल्या कुटुंबालाच नव्हे तर समाजालाही एक दिशादर्शक ठरते. मी आपणास आज एका अशा स्रीची कथा सांगणार आहे जिने लहान असल्यापासून ते आजपर्यंत आयुष्याशी संघर्ष आणि फक्त संघर्ष केलेला आहे. लहानपणी वडिलांसाठी आणि विवाहित झाल्यावर आपल्या मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी तर चला बघूया या स्त्रीचे आयुष्याशी असलेले युद्ध.


तिचा जन्म हा नालेगाव नामक एका खेडेगावात झाला होता. ती तिच्या माता-पित्याची तिसरी अपत्य होती. तिला दोन मोठ्या बहिणी होत्या वडिलांनी तिचे नाव लाडाने संगीत असे ठेवले होते. घरची परिस्थिती तशी खूप बिकट होती. वडील लोकांच्या विहिरी फोडून परिवाराला अन्न-पाण्याची सोय करायचे. आई रोजमजुरी करायची आणि या तिघी बहिणीदेखील आईसोबत शेतात मजुरी करायच्या. संगीताला लहान असल्यापासून कामाची खूप आवड होती. ती वडिलांसोबत लहान असताना शेतात कामाला जायची. तिच्या दोन्ही बहिणीचे एका मागून एक लग्न झाले आणि मग कामाचा बराचसा बोजा हा संगीताच्या माथी आला. तिला एक लहान भाऊदेखील होता. एकुलता एक असल्याने ती त्याची खूप काळजी घेत असत.


घरची परिस्थिती जेमतेम असल्याने खाण्यापिण्याचे तसे बरेच हाल होत असत. पण संगीताचा स्वभाव गुण हा लहानपणापासून आपल्या माणसासाठी जगायचं असा होता. ती तिच्या भावासाठी शाळेत गेली नाही. वडील दोघांना शिकवू शकत नसल्याने ती कधी शाळेत गेलीच नाही. माझा भाऊ शिकतोय ना तर बस, मी यातच समाधानी आहे असे ती नेहमी म्हणायची. आपल्या भावाला शाळेतून आल्यावर जेवायला दूध राहावे म्हणून संगीता स्वतः मिरची भाकर खात असे आणि भावासाठी ते विकत आणलेलं दूध ठेवत असे. असेच संगीताचे थोडे दुःखात थोडे सुखात एका मागून एक दिवस जात होते. संगीतादेखील आता मोठी झाली होती. तिची आत्या नेहमी तिच्या वडिलांकडे तिच्या लग्नाच्या बाबतीत बोलायची तशीच एक दिवस तिला न विचारता तिच्या वडिलांनी तिचे लग्न हे तिच्या आत्याच्या मुलासोबत लावून दिले. येथूनच चालू होते संगीताचे आयुष्याशी ते युद्ध.


तसा तिचा नवरा एकदम देखणा आणि प्रेमळही होता पण थोडासा हट्टी आणि रागीट स्वभावाचा होता. तशी तिच्या सासरची परिस्थितीही खुपच चांगली होती पण तिला जे लग्नानंतर सोसावे लागले ते खूप असहनिय आहे. लग्न होऊन आली तेव्हा ती खूप नवीन स्वप्न घेऊन आली होती. पण काही दिवसातच तिच्या सगळ्या अपेक्षेचा भंग झाला होता. तिचा मोठा भाया तिला व तिच्या नवऱ्याला खूपच त्रास देत असे. तिच्या लग्नाला फक्त 6 महिने देखील पूर्ण झाले नव्हते. तेच तिला व तिच्या नवऱ्याला घरातून फक्त अंगातल्या कपड्यानिशी बाहेर काढले. पण तिचा नवरादेखील खूप धीट होता तो परिस्थिती बघून काम करत असे. त्याने भावाशी वाद घालून राहण्यासाठी भावहीश्यातील एक खोली (10 बाय 8 ची) राहायला घेतली. लग्नात मिळालेली चार दोन भांडी होती व तो स्वतः काम करून दोघांचा उदरनिर्वाह करत असे. पण हे संगीताला काही पटत नसे आणि त्यात तिला बालपणापासून कामाची सवय होती. म्हणून संगीतादेखील गावातील बायांसोबत शेतात रोजाने जायची आणि आपल्या सवयीप्रमाणे जोरात काम करायची. पण तिला हे जोरात काम करणेदेखील महागात पडत असे. तिची मोठी जावदेखील तिच्या सोबत असे आणि ती काम हळू करत असे म्हणून गावातील बायांनी संगीताला आपल्या समवेत कामाला न्यायच्या आणि तिच्या मोठ्या जाऊ बाईला नेत नसत. याचा राग मनात धरून तिचा भाया तिच्या नवऱ्याशी व तिच्याशी भांडायचा कारण फक्त एकच की तो म्हणायचा, तू तुझ्या बायकोला कामाला नको पाठवत जाऊ तिच्यामुळे माझ्या बायकोला घरीच बसावे लागते आहे. हे न ऐकल्याने त्याने घर गावात असल्याने आणि दोन्ही घरांची अंघोळीची मोरी एकच असल्याने त्याने ती यांना वापरायला बंद केली. आता एकतर घर गावात आणि त्यात पण यांना जी रूम होती ती गावातील रोडच्या साईटने होती. त्यांनी तब्बल 3 महिने अंघोळ चहू बाजूनी कापड लावून तिथे करत असे. तिचा भाया काही न काही कारणावरून त्यांच्याशी भांडतच असे.


या भांडणाला कंटाळून त्यांनी तिथूनच काही अंतरावर एक घर बांधले जेव्हा ते घर बांधायला सुरुवात झाली तेव्हा ती गर्भवती होती. पण भावबंदकी खूप वाईट हे खरंच आहे त्या घराच्या कामासाठी ती गर्भवती असतानादेखील तिला नवऱ्यासोबत एक किलोमीटर अंतरावरून विटा आणाव्या इतक्या बिकट परिस्थितीतदेखील बिचारीने कधी आपले दुःख कुणाला सांगितले नाही. या कामाचा तिच्या बाळावर खूप परिणाम झाला तिचे बाळ जन्माला तर आले पण खूप कमजोर होते. तिचे बाळंतपण हे माहेरीच झालं. त्या बाळाच्या पाठीवर तिला दोन जुळ्या मुली झाल्या पण त्या दोन्हीही जन्मजात मृत होत्या. ती खूप दुःखी झाली संगीताला मुलींची खूप हौस होती पण ते देवाला मान्य नव्हतं. तिला तिन्ही मुलंच झाले.


संसार आताच कुठे थोडासा चालू झाला तोच भावबंदकीमध्ये तिच्या नवऱ्याच्या मारामाऱ्या झाल्या. त्या बिचाऱ्याला काही चूक नसताना देखील जेलमध्ये जावं लागलं. पण इकडे तिच्यावर तर संकटच कोसळलं ना. तीन मुलं घेऊन एकटीने तिथे कसं राहावं. संकटकाळात आपलेसुद्धा हातातील हात सोडतात ते खरंच आहे. तिला कोणत्याही भाऊबंदाने साथ दिली नाही उलट तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध कोर्टात खोटी साक्ष दिली. ज्या दिवशी ही घटना झाली त्याच रात्री त्यांनाही पोलिसांनी सोबत नेलं. तिने एकटीने आपल्या 3 मुलांना घेऊन त्या काळाकुट्ट अंधाऱ्या खोलीत पोलीस स्टेशनमध्ये काढली. दुसऱ्या दिवशी तिचे वडील आले आणि मग तिला तिकडे मुलांसोबत माहेरी घेऊन गेले.


तिचा नवरा जेलमध्ये आणि ती इकडे तिचा जीव काय म्हणत असावा जी चूक नवऱ्याने केली नाही त्याची शिक्षा तो भोगतोय पण त्या सोबत ती देखील शिक्षा भोगते आहे जसा वनवास सीतेने रामसाठी भोगला होता तसाच ती भोगत होती. तिने तब्बल 22 महिने या निर्दयी समाजाशी आपल्या भाऊबंदाशी आणि विश्वासघात करणाऱ्या त्या नातेवाईकांशी एकटीने भगीरथ संघर्ष केला. तिने ज्या प्रमाणे सावित्रीने यमाच्या दारातून सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्याचप्रमाणे संगीतानेदेखील आपल्या नवऱ्याला या डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्या कोर्टातून आणि त्या सगळ्या भाऊबंदाच्या विळख्यातून बाहेर काढले होते तिचे हे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले. आणि आता तिने आपला संसार हा आता त्यांच्यापासून दूर वसवला होता. नवरा बायकोने आणि मुलांच्या मदतीने त्यांनी पुढील 10 वर्षात जी प्रगती केली ती कोणत्याही भाऊबंदाने किंवा विश्वासघाती नातेवाईकांमध्ये कोणी केलेली नाही. आता तर तिचे तिन्ही मुले हे मोठे झाले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या घराला हातभार लावत आई-बाबांच्या कष्टात थोडासा हातभार लावत आहेत. तिचे दोन्ही लहान मुले अजून उच्च शिक्षण घेत आहे आणि तिचा सगळ्यात मोठा मुलगा हा एका मोठ्या दुकानाचा मालक आहे.


तिच्या अथक प्रयत्नाचे फळ तिला भेटलेलं आहे. तिचा व तिच्या परिवाराचा छळ करणारे भाऊबंदामध्ये तिने तिचे घर सर्वोच्च यशाच्या शिखरावर नेलं आहे. विश्वासघात करणारेही आता तिच्या व तिच्या परिवाराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही तिचे आयुष्याशी लढणे हे चालूच आहे. आपल्या लहान दोन मुलांना मोठे साहेब बनवायचं आहे. असेच अजूनही ती आपल्या परिवारासाठी लढते आहे. खरंच मला वाटतं त्या सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा ही सावित्री खूप खूप मोठी आहे. तिने फक्त एका यमाकडून पतीचे प्राण वाचवले पण हिने तर या समाजात वावरणाऱ्या कित्येक यमाशी झगडून आपल्या मुलांचे आणि नवऱ्याचे प्राण वाचवून त्यांना एक उत्कृष्ट असा दर्जा प्राप्त करून दिला. या मातेला माझा कोटी कोटी प्रणाम मला तर वाटतं त्या सवित्रीपेक्षा संगीतासारख्या कित्येक सावित्री आपल्या परिवारासाठी अतोनात कष्ट करतात. त्यांना खरंतर कलियुगातील सावित्री म्हणावे.


तुम्हाला काय वाटतं, अशा स्रियांना कलियुगातील सावित्री म्हणावे का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama