तीने मित्र मी मैत्रीण गमावली
तीने मित्र मी मैत्रीण गमावली


सगळ्यात अनमोल नाते असते मैत्री. ना देवाने ना धर्माने ना कुणी तिसऱ्याने यातील कुणीही आपल्याला दिलेलं नसतं ते. आपण आपल्या इच्छेने ते जोडत असतो. मग त्यात ना जात बघितली जाते ना धर्म ना लिंग. या नात्याला जोडतो तो म्हणजे विश्वास. असं म्हणतात की मैत्रीचं नातं हे तुटलं तर श्वासानेही तुटते नाहीतर घणाघाती वारानेही तुटत नाही. इतके मजबूत असते हे नाते परंतु या नात्यात जेव्हा कुणी तिसरा मध्ये येतो ना तेव्हा या नात्याला तडा जातो आणि तेथून त्यांच्यात अविश्वासाचा जन्म होतो आणि एकदा का त्याचा जन्म झाला की तो मोठयातल्या मोठ्या नात्याला एका क्षणात सपाट करून टाकतो. माझ्यासोबतदेखील असेच काही घडले होते.
मी जीवनात दोन नाती स्वतः निर्माण करतो एक म्हणजे मैत्रीचं आणि दुसरं आहे बहिणीचं. मला रक्ताची बहीण मिळाली नाही हे माझं दुर्भाग्य, पण मी ज्या मुलीला एकदा ताई म्हणालो की बस तेव्हापासून ती आयुष्यभरासाठी बहीण होते. मैत्रीचं नात पण मी असंच फुलवतो.
ती आणि मी तसे लहानपणीचे मित्र नव्हतो. आमची मैत्री ही शाळेत झाली होती, शाळा असे एकमेव ठिकाण आहे जिथे आपल्याला दोन अनमोल नाती भेटतात एक मैत्री, दुसरं आहे गुरू-शिष्याचं. ती माझी वर्गमैत्रीण असल्याने आमची मैत्रीही जास्तच घट्ट होती. आम्ही एकमेकांशी नेहमी मनमोकळ्या गप्पा मारायचो, सोबत बसणे, एकमेकांसोबत डबा खाणे हे तर आमचे नेहमीचेच असायचे. आम्हाला दोघांनाही पुस्तके वाचण्याची गोडी होती त्यामुळे कधी तिने एखादं नवीन पुस्तक आणलं तर तिने वाचल्यावर मी तिच्याकडून घ्यायचो वाचण्यासाठी आणि मी जर एखादं नवीन पुस्तक आणलं तर तिला देत असे. असे आम्ही पुस्तके अदलाबदल करत असू.
असेच आमच्या मैत्रीचं नातं फुलत होतं पण न जाणे कुठून आणि कोणाची आमच्या मैत्रीच्या नात्याला नजर लागली, म्हणतात ना की दोघात तिसरा आला की नाते हे तुटते तसेच काही आमच्यासोबत झाले. आमच्या मैत्रीच्या नात्यात अजून एका मित्राने प्रवेश केला आणि जन्म झाला आमच्या दोघात तो अविश्वास. त्याने येऊन आमच्या नात्यात विष कालवण्यास सुरवात केली. ती अशी की त्याने आधी तिच्या मनात माझ्याबद्दल असलेला विश्वास कमी करण्यासाठी तिला सांगितले की तू त्याला आवडतेस. तिने आधी तर हे मान्य केलं नाही पण नंतर त्याने जो डाव टाकला त्यात मी अडकलो त्याने आमच्या मैत्रीत थोडासा दुरावा आला. नंतर तर बाकी मित्रांमध्येदेखील आमच्या नात्याला बदनाम केल्या गेलं. आम्ही दोघे नंतर बोलणेही बंद केलं पण एका मित्राच्या मदतीने आम्ही त्या मित्राला ज्याने विष कालवलं त्याला तिच्यासमोर खरंखोटं केलं तेव्हा कळालं की त्यालाच ती आवडत होती. पण खरं समोर येऊनही लोकांच्या मनात आमच्या नात्याबद्दल आता वाईटच विचार वावरत होते. त्यामुळे तिने माझ्याशी आधी संवाद कमी केला नंतरनंतर तर लगेच बंद केला आणि तेव्हाच तिने एक मित्र आणि मी एक मैत्रीण गमावली.
लोक म्हणतात ते खरंच आहे मैत्री हे नातं तुटलं तर श्वासानेही तुटतं नाहीतर घणाघातानेही तुटत नाही. पण एक मात्र नक्की खरं आहे की तुम्हाला जर कुणाला हरवायचं असेल तर आधी त्याच्या जवळच्या मित्रात आणि त्याच्यात अविश्वास निर्माण करा. तुम्ही अर्ध युद्धं तेथेच जिंकता. इथेही असंच झालं होतं मैत्रीत अविश्वास निर्माण झाला आणि तिने एक मित्र आणि मी एक मैत्रीण गमावली.