एक अविस्मरणीय घात
एक अविस्मरणीय घात


असे म्हणतात प्रेमात पडलेल्यांना दुनिया दिसत नाही. त्यांची दुनिया ही दोघांपुरतीच मर्यादित असते. अशीच एक कथा आहे जी माझ्या मित्रासमवेत घडलेली आहे. एका लग्न समारंभात तो आणि ती भेटतात. त्याने व्यक्त केलेले प्रेम त्याच्याच शब्दात...
तुझ्याबरोबर घालवलेले ते 3 दिवस मला कायमचे लक्षात राहतील. मी जेव्हा तुला बघितलं तेव्हाच तू मला आवडलीस. तुझा मनमोकळा स्वभाव मला खूप आवडला. तू माझ्या हातावर मेहंदी काढत असताना तुझं बोलणं आणि ते प्रत्येक वेळी माझा हात असा प्रेमानं धरणं मला खूप आवडलं.
दुसऱ्या दिवशी आपण दिवसभर एका बाकावर बसून फिल्म बघत बसलो. मला वाटत होतं तुलादेखील माझा सहवास आवडत असावा म्हणून तर तू इतक्या उन्हातदेखील जेवायला घराच्या छतावर आलीस कारण तेथे मी होतो. खरं सांगू का गं, तुझा तो हिरव्या रंगाचा शर्ट होता ना तो खरंच खूप मस्त दिसत होता. तू हळदीला घातलेला ड्रेसही छान होता. बरं आपण फ़ोटो तर बरेच काढ़ले पण दोघांचा एकत्र एकही नाही. लग्नाच्या दिवशी तर मला तुझ्यासोबत फ़ोटो काढ़ायचे होते पण नाही शक्य झालं म्हणून मी तुझ्या हाताने माझाच फ़ोटो काढला. हळदीच्या रात्री तर तू खूप मनमोकळी नाचत होतीस अन् मला बघत होतीस म्हणूनच तर मी तुला फक्त तुलाच बघत होतो.
रात्री आपण सगळ्यात शेवटी 2 वाजता झोपलो होतो आणि तू माझ्या प्रेयसीसारखी मला सकाळी सकाळी 6 वाजताच उठवायला आलीस. मला तुझं असं करणं खूप आवडलं. लग्न समारंभात तर तू माझ्यासमोर बसलीस आणि मला बघत होतीस. मी पण मग तुला तसं बघतंच होतो. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा तू मला म्हणालीस, मी चालले आता तेव्हा माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं. पण जेव्हा तू फिरून फिरून मला बघत होतीस तेव्हा पूर्णपणे विश्वास बसला की मीदेखील तुला आवडत असावा म्हणून की काय तू जाताना मला 'बाय बाय' असं दुरुनच म्हणालीस आणि घराकडे निघालीस. आपसूकच माझीही पावले तुझ्यामागे निघाली आणि तुला शेवटचा निरोप द्यायला मी घरापर्यंत आलो. तुझ्या तोंडातून निघालेले ते शेवटचे शब्द की, तुम्ही मला कायमचे लक्षात रहाल. तूदेखील माझ्या कायमस्वरूपी मनात राहशील. आपलं हे ३ दिवसीय भेटणं खूपखूप आनंदित करून गेलं. मी हे तुला लिहितोय खरं पण आता हे तुझ्याजवळ पोहोचेल कधी माहीत नाही. पण एक दिवस नक्की पोहोचेल आणि तू मला मेसेज करशील आणि तुझ्या मनातील माझ्याबद्दल असलेले विचार मला सांगशील. सांगशील ना गं, हे बघ ना आता इतके लिहून झाले तरीदेखील मी साधा तुझ्या नावाचा उल्लेखही कुठे केला नाही. पण काय करू, या दुनियेला तर फक्त स्वतःने केलं तर प्रेम चांगलं आणि आपल्या सारख्यांनी केलं की प्रेम करणं त्यांच्या नजरेत वाईट ठरतं. पण तू काळजी नको करू गं एक दिवस मी छाती ठोकून सांगेल या जगाला की हो करतो मी k..... वर प्रेम. पण तू पण देशील ना गं साथ मला की इतर मुलींप्रमाणे तूही ऐनवेळी काढता पाय घेशील. नाही मला नाही वाटत तू मला एकट्याला सोडून जाशील म्हणून...
तुझी अन् माझी पहिली भेट ही खूपच अविस्मरणीय म्हणावी लागेल हो की नाही गं. एका संध्याकाळी आपण दोघे लग्न समारंभात भेटलो, भेटताच क्षणी आपण एकमेकांशी असे गप्पा मारू लागलो जसे आपण एकमेकास पूर्वीच्या जन्मापासून ओळखत होतो. तसं म्हणावं तर मला बघताच क्षणी आवडणारी माझ्या आयुष्यातील तू पहिली मुलगी आहेस. तसं तर मी थोडासा उशीरच केला गं, माझ्या मनातील बोलायला पण खरं सांगू का... तू जोपर्यंत माझ्यासोबत होतीस ना तोपर्यंत मी स्वतःस असे विसरलोच होतो बघ.
तू आणि मी ते तीन दिवस असे जगलो, जसे काही आपण तिथे फक्त दोघेच आहोत. कुण्या लेखकाने खरेच लिहिले आहे की, माणूस खऱ्या प्रेमात भान विसरतो. नाहीतर बघ ना तिथे इतकी लोकांची वर्दळ होती की माणूस शोधून सापडत नसे आणि आपण दोघे काही क्षणांसाठी व्हायचो एकमेकांपासून दूर... पण त्या गर्दीत परत एकमेकांच्या भेटीस यायचो. तुला आठवते का आपण कार्यक्रम संपल्यानंतर ती तुझी बॅग आणायला घरी गेलो तेव्हा आपसूकच माझा पाय तुझ्या मागेमागे वळला. माझ्या हातात असलेली ती बकेट ती तशीच हातात राहिली आणि तू घरातून बाहेर येताना मला बघितलं आणि म्हणाली तुम्ही इकडे कसे... तर मी तेव्हा म्हणालो पाणी संपलं ते न्यायला आलो होतो. नंतर आठवलं की मी तर शाख वाढीत होतो पण तुला कळलं की मी तुझ्याकडे आलो आहे म्हणून तूच म्हणाली मला विसरणार तर नाही ना हो. असे म्हणताच तुझे डोळे पाणावले होते आणि माझे तर खूपच.
दुःख देतो हो की नाही गं हा विरह पण तुझ्या त्या उत्तराने मी खूप आनंदी झालो जेव्हा तू म्हणालीस की, कायमचे आठवणीत रहाल तुम्ही. तेव्हा मला तुला सांगायचे होते की माझ्या सरणावर जाईपर्यंत तूच स्मरणात राहशील. तू मला तर फक्त एका महिन्यात कशी गं विसरलीस... आधी रोज न विसरता कॉल करायचीस... तुला माहीत असायचं की कॉलेजमध्ये असतो दिवसा तेव्हाच तू कॉल करायचीस आणि मग सुरू व्हायच्या त्या न संपणाऱ्या गप्पा आणि कधी मग तुझं ते मला अहो म्हणून लाडाने बोलणं असंच बोलत असताना तू म्हणाली फोन ठेऊ का आता कुणीतरी आलंय... या एका वाक्याने तू जे मला विसरलीस ते अजूनही आठवलेलं नाहीस.
मी तुला त्या दिवशीच लग्नाची मागणी घालणार होतो गं पण तू म्हणालीस कुणीतरी आलं आणि इकडे माझं काळीज धडधडायला लागलं तेव्हा कळालं नाही की,"तुझ्या घरी कुणी आलं होतं की तुझ्या आयुष्यात..." पण आता कळालं की ते येणारं कुणीतरी नक्की तुझ्या आयुष्यात आलं असावं... म्हणून तर तू माझा कॉल आला की फोन बंद करतेस. अगं वेडे फक्त एकदा मला म्हणाली असतीस की मी यानंतर तुमच्याशी बोलू शकत नाही तरीही मला चाललं असतं आणि मी तसंच तुझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करत राहिलो असतो. पण तू काही न सांगताच माझ्या आयुष्यातून निघून गेलीस अगदी त्या प्रेमाला टाईमपास समजणाऱ्या मुलींप्रमाणे आणि 'मी झालो लोकांसाठी एक वेडा प्रेमकवी'...
पण खरं सांगू का... आता माझा ना 'विश्वास' शब्दावरूनच विश्वास उडाला गं. अगदी विश्वासाने सांगतो मी की, प्रेम हे धोक्याचेच एक नाव आहे...