Sarita Sawant Bhosale

Others Inspirational

4.6  

Sarita Sawant Bhosale

Others Inspirational

रूढी,परंपरा आणि तिचं सौभाग्य

रूढी,परंपरा आणि तिचं सौभाग्य

5 mins
2.0K


काही दिवसांपूर्वी एका बारशाच्या समारंभाला जाण्याचा योग आला. समारंभ चांगलाच मोठा होता. मुलीचं बारसं होतं आणि त्यांची इच्छा होती की मुलगी झाली तर बारसं मोठंच घालायचं. त्यानुसार बारसं जोरदार होतं.


तिथे पोहोचले, पाहुणचार वगैरे झाला. बारसं सुरू व्हायला अजून अवकाश होता म्हणून सर्व बायका बसलेल्या तिथे जाऊन बसले. तेवढ्यात कोणीतरी बाई आल्या. छान कपाळावर रेखीव चंद्रकोर, छोटंसं पण गळ्यात देखणं मंगळसूत्र, सुंदर हिरवी साडी या सगळ्यांनी चेहऱ्यावर आलेलं एक वेगळं तेज आणि त्यांचा प्रसन्न चेहरा कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. ती व्यक्ती येताच तिच्याबद्दल बायका कुजबुज करायला लागल्या हे माझ्या लक्षात आलं.


एकजण बोलली,"ही कशाला आली इथे? शुभ-अशुभ काही कळतं की नाही? अशा कार्यक्रमांत हीचं काय काम? सौभाग्यवती येतात अशा ठिकाणी."

तोच दुसरं कोणीतरी बोललं, "दुसरं लग्न केलं वाटतं हिने, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली दिसते."

लगेच तिसरीने सूर ओढला, "बाई! कसं काय वाटत नाही हिला. आता या वयात काय दुसरं लग्न करायची गरज, मुलंच लग्नाला आलीत आता त्यांना तरी कसं पटलं हे? काय आजकाल सगळं बिघडलंय बाई कोणी कसंही वागतं."


मला काही संदर्भ लागत नव्हता त्यांच्या बोलण्याचा म्हणून सहज विचारलं की काय झालं, तेव्हा कळलं की त्या व्यक्तीच्या नवऱ्याचं एक वर्षापूर्वी निधन झालं. काहीजणी बोलल्या अजून त्या विधवाच आहेत पण काहीजणी बोलत होत्या त्यांनी दुसरं लग्न केलं.


मी विचार करत होते का कोणाच्या आयुष्यात एवढं डोकावून पाहा, जो तो आपल्याला योग्य वाटतं तो मार्ग स्वीकारतो आणि जगतो. पण आपल्या समाजाला सवयच नाही आजारच झाला आहे असे वाटते... असे विषय चघळून चोथा करायची. विशेष म्हणजे बायकांची ही कुजबुज त्या कोणी बाई होत्या त्यांच्या कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. पण त्या शांत होत्या आणि कार्यक्रमात व्यस्त होत्या किंवा स्वतःला त्यात गुंतवलं असावं त्यांनी. बारसं छान पार पडलं, सगळे जेवले आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम चालू होता तेव्हा सगळ्याजणी काहीशा प्रश्नार्थक नजरेने त्या बाईंकडे पाहत होत्या. आता त्या बाईच उठल्या आणि बोलू लागल्या. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्या सज्ज झाल्या.


सुरुवातीलाच त्यांनी सगळ्यांचा गैरसमज दूर केला. त्या म्हणाल्या की, मी दुसरं लग्न नाही केलेलं. माझे पती एका वर्षापूर्वी गेले आणि एक पोकळी आयुष्यात निर्माण झाली ती कायमचीच. त्यांची जागा मी कोणा दुसऱ्याला देऊ शकत नाही आणि ती मी देणारही नाही. मला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आता या दोघांसाठीच मी जगते. त्यांना सुखात बघणं एवढंच माझं आयुष्य राहिलंय आता. जेव्हा हे गेले त्यानंतर एक दिवस माझी मुलगी माझ्याजवळ हे मंगळसूत्र आणि टिकली घेऊन आली, आणि म्हणाली,"आई हे तू घाल आजपासून. आमच्यासाठी आता आई-बाबा तूच आहेस. तुझं रिकामं कपाळ आणि गळा बघून सारखी जाणीव होते की बाबा नाहीत आणि खूप दुःख होत गं. तू आमच्यासाठी मंगळसूत्र घालून, टिकली लावून बाबांना जिवंत ठेव. आम्हाला बरं वाटेल. पुढे आयुष्य जगायला उभारी मिळेल तुला आणि आम्हालापण. नको करुस या जगाचा विचार, कारण हे जग आपलं दुःख समजून घ्यायला आणि वाटून घ्यायला नाही येणार. या परिस्थितीतून आपल्यालाच मिळून बाहेर पडायचंय. आमच्यासाठी आणि तू स्वतःसाठी बाबा होते तेव्हा जशी होतीस तशीच आताही राहा. बाबांनासुद्धा हेच आवडेल. तू दुःखी असलेलं त्यांनाही नाही आवडणार. तुझं सौभाग्य तुझ्यासोबत सदैव ठेव." माझ्या मुलीच्या बोलण्याचा विचार मी केला आणि मला तिचं म्हणणं पटलं आणि त्या क्षणी मी विचार केला की उरलेलं आयुष्य मुलांसाठी आई आणि बाबा दोन्ही बनून घालवायचं. त्यासाठी त्यांना बाबा गेल्याची जाणीव होऊ द्यायची नाही. नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहायचं... जसं माझ्या पतींनाही आवडायचं, आणि त्या दिवसापासून मी मंगळसूत्र, टिकली लावायला सुरुवात केली. त्याने मी माझ्या जोडीदाराला आणि माझ्या मुलांच्या बाबांना जिवंत ठेवलंय. दुःखात अश्रू गाळत बसण्यापेक्षा असं राहून सुखाचे चार क्षण मी माझ्या मुलांना देऊ शकते या समाधानाने रात्री झोप तरी लागते, नाहीतर पतीच्या निधनानंतर जगणं फार कठीण आहे या समाजात. माझं सौभाग्य गेलं म्हणून नेहमी अश्रूच गाळावे का मी, मला हसण्याचा, समारंभात सहभागी होण्याचा अधिकार नाही का? एक विधूर म्हणून पुरुष कोणती ओळख घेऊन फिरतो सांगा तुम्हीच? त्याची बायको अल्पकाळी जाते म्हणून आपण त्याला अशुभ ठरवतो का? पण स्त्रियांच्याच बाबतीत हे सगळं का? इतर वेळी आपण बोलतो जन्माला येतानाच मृत्यूही घेऊन आलेला असतो माणूस... मग अशाचवेळी ते सगळं कुठे जातं, का स्त्रीला कारणीभूत ठरवलं जातं कोणाच्या मृत्यूसाठीपण? जिजाऊ, झाशीच्या राणीपासून ते आता हिमा दासपर्यंत स्त्रीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं तरी आपला समाज मात्र शुभ, अशुभ या चक्रातच अजून अडकून पडलाय. विधवा असली तरी ती एक स्त्री आहे आणि माणूस आहे आणि तिला तसंच वागवलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे हे कदाचित पन्नासाव्या शतकातही उमगणार नाही आपल्या समाजाला... आणि या सगळ्यासाठी एक स्त्रीच जबाबदार असणार हीच खेदाची बाब आहे. अशा या बुरसटलेल्या आणि मागासलेल्या समाजापायी मी माझ्या मुलांना दुःखी ठेऊ शकत नाही. मी सुखात राहणं आणि मुलांना आनंदात ठेवणं हा माझा हक्क आहे, तो माझ्याकडून कोणी हिरावू शकत नाही. अशा रूढी, परंपरा याने जिवंत स्त्रीच्या गळ्याभोवतीच फास लागलेला आहे हे कधी कळणार तुम्हाला? खरी बदलायची गरज मला नाही तर तुम्हाला आहे."


सगळीकडे निःशब्द शांतता पसरलेली... त्या बाई हसतमुखाने एवढं बोलून निघूनही गेल्या, मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्या दिसेनाशा होईपर्यंत पाहतच राहिलेले. बाकी सगळ्याजणी माना खाली घालून निघून गेल्या. माहीत नाही इतरजणींना त्यांच्या बोलण्याचा अर्थ कितपत उमगला, कितपत पटलं पण बोलल्या ते सगळं खरं होत. विधवा म्हणून स्त्रीला हवा तो सन्मान आणि तिला तिचं जगण्याचं स्वातंत्र्य देणं तिचा हक्क आहे आणि याची सुरुवात स्त्रीपासूनच व्हायला हवी.


मलाही एक प्रश्न पडलाय की ज्या बायका त्या बाईंना नावं ठेवत होत्या त्यासुध्दा कधीतरी त्यांच्या जागी येतील किंवा त्यांच्या लेकी-सुनांवर अशी वेळ आलीच तर त्या त्यांना दुःखातून सावरायचा प्रयत्न करतील की अशीच दूषणे देतील, हिणवतील? आपल्याला कोणाच्या दुःखावर फुंकर घालायला जमत नसेल तर निदान त्यांना पुन्हा दुःखाच्या दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न तरी करू नये. त्यांना त्यांच्या मार्गाने आनंदी आयुष्य जगू द्यावं. एकदा एक प्रश्न आपल्या मनाला विचारावा की, स्त्रीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणून ती जिवंत असतानाच तिचं स्वेच्छेने आनंदाने जगणं हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का?


Rate this content
Log in