रंग महत्त्वाचा नाही...
रंग महत्त्वाचा नाही...


चिमणराव आणि कावेरीबाई यांना दोन जुळ्या मुली झाल्या, एक अगदी गोरीपान, अन् एक गव्हाळ त्यामुळे त्यांना लाडाने चिऊ-माऊ बोलायचे सर्व... सासूबाई जुन्या विचारांच्या... वंशाला दिवा हवाच... चिऊ-माऊ थोड्या मोठ्या झाल्या आणि गोड बातमी आली, लगेच नवस बोलल्या... देव पावला, मुलगा झाला, पण रंग अगदी काळा जणू कावळा..
लोकं चिडवत असत, चिऊ-माऊचा भाऊ काऊ... त्याला खूप वाईट वाटायचं, तो आईजवळ जाऊन रडायचा, आईने समजावून सांगितलं, "बाळा, देवासारखा देव विठोबा तो काळा.. अन रंगात काय आहे? रंग कोणताही असो, कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे..... बाह्यरंग गोरा असून काय उपयोग?? मनामधील काळ्या-सावळ्या विचारांचे सावट काढता आले पाहिजे, आपली ओळख ही कर्तृत्वावर मिळवायची असते....!!!"
आज एक कर्तृत्ववान पोलिस ऑफीसर म्हणून त्याचा सत्कार झाल्यावर, आईच्या फोटोसमोर उभा राहून तिच्या आठवणीत तिचा काऊ रडत होता.....