Pooja Storymirror

Thriller

4.9  

Pooja Storymirror

Thriller

रहस्यमयी पाटण

रहस्यमयी पाटण

15 mins
9.4K


टाळ्यांच्या आवाजात मी जरा फ्लैश बैक मध्ये शिरलो.

ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटानं, सारा आसमंत गजबजून गेला होता. सुरवातीला जेव्हा गाडी घराकडे निघाली तेव्हा तर वातावरण एकदम स्वच्छ होतं, मग अवघ्या 10 कीमी. च्या प्रवासातच वातावरणात कसा बदल झाला असावा, हा प्रश्न माझ्या मनाला पडला. निघालो तेव्हा गाडीचा एसी ऑन असल्यानं मिरा पेंगायला लागली होती. मिरा अर्थात माझी पत्नी,नुकतच आमचं लग्न झालं होतं आणि त्यामुळेच आई-बाबांच्या प्रोत्साहनाने आमचा दोघांचा रोज सैरसपाटा सुरू होता. सकाळी घरून निघायचं सायंकाळ पर्यंत परतायचं, हा आमचा रूटीन..... पण आज का कुणास ठाऊक, बाबांनी मुक्कामाची ताकिद दिली होती. कारण आम्हाला उशीर होणार हे बाबांनी कदाचित अगोदरच ताडलं होतं. आजचा आमचा टूर शेजारच्या पाटण या जिल्ह्यात होता. "पाटण" डोंगराळ भागातील निसर्गरम्य ठिकाण.... डोंगर, दऱ्या, नैसर्गिक धबधबे, एक भलंमोठ्ठ सरोवर, कितीतरी मनमोहक दृश्य पाटणच्या सौंदर्यात भर घालत होते. मिराने या साऱ्यांचा आज मनसोक्त आनंद लुटला होता. धबधब्या खाली भिजतांना मिरा खूपच मोहक वाटत होती, मी थोडी स्तुती करताच, ती बळेबळेच नाक मुरडत माझ्या कुशीत शिरली होती. त्या वेळी मला स्वर्गात फेरफटका मारल्याचा आभास झाला होता. कसं असतं ना दांपत्य जीवन......!

            असो, आम्ही दिवसभराची सैर आटोपून हॉटेलमध्ये जाणार होतो. पण मिराने घरी जाण्याची जिद्द केली. प्रेयशी साठी चंद्र तारे तोडून आणणारे भारतीय आपण, मग मी पत्नीची इतकीही जिद्द मानू नये. आणि तसं ही प्रवास स्वतःच्या गाडीनेच तर करायचा होता. त्यामुळे मी बाबांची ताकिद विसरून घरी निघायला तयार झालो. आवरसावर करत आम्हाला रात्रीचे साडेआठ वाजले होते. अजून पुढे साधारण 4 तास, म्हणजे रात्री 12-1 च्या दरम्यान घरी पोहचणं शक्य होतं. जायला उशीर होईल म्हणून मी गाडी एका ढाब्यावर थांबवली, आणि जेवणाची ऑर्डर दिली. मिरा जेवणाची वाट पहात बसली तोवर मी हात धुवायला वास बेसीन कडे गेलो. आमच्या टेबलापासून चौथ्या टेबलावर कळकट कापडं घातलेला एक इसम बसला होता. तो मिरा कडे निरखून पहात होता, मिरा नजर चुकवून इकडे तिकडे बघत होती. तो इसम टेबलावरून उठून आमच्या टेबलाकडे येऊ लागला, एव्हाना मी ही हात धुवून परतलो होतो. तितक्यात अचानक लाईट गेली. मी मिराच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती किंचाळली. अचानक काय झालं म्हणून ढाब्यावरच्या स्टापने टॉर्च लाईट कंदिलाची शोधाशोध सुरू केली. ढाब्यावरच एक महिला कामावर होती, ती हातात कंदिल घेऊन आमच्या दिशेनं येत होती. केस मोकळे दात किंचित पुढे आलेले, तिला बघून मिरा पुन्हा किंचाळली. तिनं आमच्या पुढ्यात कंदिल ठेवला, केसांचा आंबाडा बांधत विचारणा केली काय झालं ? बाई साहेब..... तितक्यात लाईट ही आली. ती स्त्री केस बांधून समोर उभी होती, कडकट कपड्यातली व्यक्ती आपल्या जागेवर बसून आम्हा दोघांकडे बघत होता. इतर ग्राहक ही बघू लागले. मी मिराला सांत्वना देऊन खूर्चीत विसावलो तिचा हात हातात घेत विचारलं.... काय झालं मिरा?

ती किंचित खजील झाली, काही नाही म्हणून तिने वेळ मारून नेली. जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. ढाब्यावरचा प्रकार आणि दिवसभरचा थकवा, यामुळे की काय मिरा पेंगायला लागली होती. पेंगता पेंगता ती केव्हा झोपी गेली, तीचं तिलाच कळलं नाही. विरंगुळा म्हणून मी एफ एम सुरु केलं, एफ एम वर रात्रीस खेळ चाले या दूर चांदण्यांचा,संपेना कधीही हा खेळ सावल्यांचा...... हे गीत सुरू होत. क्षणभर वाटलं बंद करावं, उगाच मिरा दचकली तर ! पण मग सुरूच असू दिलं. कारण मिरा गाढ झोपली होती. वाहनांची आवाजाही एकदम बंद होती. बाहेरच्या वातावरणातील बदला मुळे मी एसी बंद केला होता. हळूहळू पावसाचे थेंब सुरू झाले, विजा कडकडायला लागल्या. मी गाडी हळूहळू चालवत होतो. तितक्यात धडाम असा आवाज झाला, गाडीचे हेड लाईट बंद झाले तसे मी गच्च ब्रेक मारले. गाडी जागेवर थांबली, मिरा खडबडून जागी झाली.

काय झालं सिद्धार्थ ? मिराचा प्रश्न....

काही नाही गं, का कुणास ठाऊक लाईट बंद झालेत ऑन होईनात.

किती लांब आलोत आपण? तिचा दुसरा प्रश्न....

10 किमी. अजून अर्ध्या पाटण घाटात आहोत.

काय ! ती दचकली.

आणि हे वातावरण अचानक कसे बदलले? तिचा पुढचा प्रश्न.

कुणास ठाऊक. मी संक्षिप्त उत्तर दिलं.

आता काय करायचं रे?

बघू कुठली गाडी आली तर तिच्या उजेडात घाट पार करुया,मग पुढच्या पुढे पाहू.

आम्ही काही मिनीटं वाट पाहिली, पण कोणतंच वाहन येत नसल्याने, विजेच्या प्रकाशात हळूहळू पुढे जायचं ठरवलं.

मिराने दुजोरा दिला. मी गाडी सुरु करून हळूहळू पुढे चालवायला सुरवात केली, साधारण 200 मीटर वर एका वळणावर एक भला मोठा वृक्ष रस्ता रोखून पडला होता. डावीकडे एक वळण होतं. बहुतेक वृक्ष रस्त्याच्या कडेला होता, अंधारात अंदाज घेता येत नव्हता. मी डावीकडून गाडी पुढे काढली. पण हे काय ! सकाळी आलो तेव्हा तर रस्ता चमचमत होता आता खरबडीत कसा? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मिरा शांत बसून होती, कदाचित मला प्रश्न विचारून ती व्यवधान आणू इच्छित नसावी. गाडी थोडी पुढे जाताच मी कचकन ब्रेक दाबले..... हे काय एक म्हातारा बाबा साधारण सत्तरितला असावा हातात कंदिल, अंगावर घोंगडे घेऊन काठी टेकत रस्ता ओलांडत होता. मी जवळ जवळ ओरडलोच पण त्यानं ऐकलं नाही, कदाचित गाडीचे काच बंद असल्यानं ऐकायला आलं नसावं. त्याने आता रस्त्याच्या कडेकडेनं चालायला सुरवात केली. त्याची पाठमोरी आकृती एकदम भयावह वाटत होती.

मी मिराला म्हटलं ......

रस्ता चुकल्या सारखा वाटतोय, बाबाला विचारवं का?

ती काहीच बोलली नाही, कदाचित भिली असावी. म्हणून मी गाडी म्हाताऱ्या बाबाजवळ जाऊन थांबवली. गाडीचा काच खाली करून बाबाला विचारता झालो.

बाबा हा रस्ता कुणीकडे जातो?

म्हाताऱ्यानं कंदिलाचा उजेड माझ्याकडे केला, पहिल्यांदा डोळे मोठे करून मोठ्याने हसला. माझ्या काळजात धस्स झालं.

आलास तू.....

खूप उशीर केलास, आता कायमचा राहणार ना? आणि पुन्हा हसायला लागला.

आता मात्र माझ्या मनात कापरं भरलं होतं. तरी हिंमत करून मी बाबाला पुन्हा तोच प्रश्न केला.

बाबा हा रस्ता कुठे जातो?

त्यानं मिराकडे रोखून तिरक्या नजरेनं पहात उत्तर दिलं, कुठं जातो.

तेच तर मी तुला विचारतोय? मी म्हणालो.

तेच मी सांगतोय, रस्ता कुठे जातो. रस्ते कुठेच जात नसतात बाबा रस्ते आपल्याला पोहचव असतात.

कुणाला गंतव्यावर, कुणाला स्मशानात.....

आणि परत हसायला लागला.

परत काही न बोलताच आड वाटधरुन झाडाझुडपात शिरला.

मी वैतागून खिडकी बंद केली आणि गाडी पुढे चालवायला लागलो, मिरा अजूनही शांतच होती एफ एम बंद झालं होतं. मिरा कसलं तरी गाणं गुणगुणत होती. मला तिचा राग आला अशा परिस्थितीत गाणं गातेय. मी जरा वैतागून म्हणालो.... मिरा!

चालत रहा,

थांबू नकोस,

आणि थांबवू ही नकोस शिवा!

तिचा स्वर रुक्ष झाला होता, आणि माझं नावं सिद्धार्थ असून ही मला शिवा म्हणून संबोधत होती

अगोदरच त्या म्हाताऱ्याचे विचित्र उत्तरं,

आता हिचं विचित्र वागणं

माझा चेहरा घामानं डबडबला......

रात्री बे रात्री स्मशानातून हिंडणारा सिद्धार्थ आज चक्क भितीनं थरथरत होता. आणि पाली, झुरळाला घाबरणारी मिरा एकदम शांत निश्चल....

काही अंतर पार केल्यावर समोर एक दगडी पूल होता. आणि थोडं सपाट मैदान ही मी गाडी त्या मैदानातून वळवून माघारी जाण्याचा मनोमन निश्चय केला. गाडी पुलावरून पुढे जाताच छपाककककक....

काही तरी पाण्यात पडल्याचा आवाज आला, मी मागे वळून पाहिलं. दगडी पूल पाण्यात कोसळला होता, आता परत फिरणं संभव नव्हतं.

मी तसाच पुढे निघालो, पण हे काय ! समोर वीज चमकल्याने उजेडच होत नाहीये. मी ब्रेक दाबले, पाऊसही थांबला होता मी खाली उतरलो. गाडी एका भल्या मोठ्या दगडी छता खाली उभी होती.

मी मोबाईल ऑन केला, मोबाईलला रेंज नव्हती. मी टार्च ऑन करणार तितक्यात माझ्या हातावर एक जोरदार प्रहार झाला. हातातला मोबाईल एकीकडे व मी दुसरीकडे जाऊन पडलो. मी सावरून उभा राहिलो. मोबाईल तुकड्या तुकड्यात जमिनीवर विखूरला होता. कारण शोधता शोधता फक्त बॅटरी हाताला लागली होती. मिरा अजूनही गाडीतच आहे, असा माझा समज होता. तो मी गाडीचा बॉडीलाईट ऑन केल्यावर दूर झाला. मी भांबावलो मिरा मिरा ओरडू लागलो. पायाखालून जमीन निघून गेली. पण काहीच उत्तर नाही, उलट माझेच प्रतिध्वनी मला ऐकायला येत होते. मी अगदी रडवेला झालो, जवळच एक दगड पडला होता त्यावर हताश होऊन बसलो. कुठून तरी घुबडाचा चित्कार कानावर पडत होता. मिरा दिसत नव्हती, विजांचं चमकणे बंद झाले होते. काळ्याकुट्ट ढगांमुळे अंधार मी म्हणत होता. अचानक पुन्हा एक प्रहार... आता मात्र मी सावध होतो. हळूच बाजूला झुकलो. तो एक वटवाघूळांचा थवा होता. थवा जसा उडत आला, त्यावरून आत गुफा असावी असा मी अंदाज बांधला.

मी येऊन गाडीत बसलो. गाडी स्टार्ट केली. अरे वा ! लाईट ऑन झाले होते. लाईट ऑन होताच असंख्य वटवाघूळं घुबडं फडफडत बाहेर पळाली. बरा मी गाडीत होतो अन्यथा या हमल्यात रक्तरंजित होणं निश्चित होतं.मी गाडी थोडी मागे घेतली लाईट ऑन ठेऊन मोबाईल शोधला जुळवाजुळव करून गाडी नीट लॉक केली. पुन्हा बाहेर आलो, तितक्यात पुन्हा तेच गित कानावर पडले, जे मिरा थोड्या वेळापूर्वी गात होती. मी मोबाईलची टॉर्च लावली व आवाजाच्या दिशेने चालू लागलो. मोबाईल पुरेसा उजेड देत होता. मी एका छोटया दरवाजातून आत शिरलो. प्रशस्त हॉल सारखी ती जागां, भिंतीवर कोरीव प्रणय चित्र रेखाटलेले होते. चित्रावरुन असं जाणवत होतं की या चित्राचा चित्रकार किंवा चित्र काढायला लावणारा रसिक आपली इच्छापूर्ती चित्र बघूनच पूर्ण करत असावा. गाण्याचा आवाज निरंतर येत होता पण गाणारं कुणीच दिसत नव्हतं. हॉल एकदम रिकामा होता. हॉलच्या डाव्या कोपऱ्यात एक दगडी रांजण पडला होता. त्यावर दगडीच झाकण होतं. मी झाकण बाजूला सारून मोबाईल उजेडासाठी आत घुसवला, तसा मोबाईल माझ्या हातून सटकला व आत रांजणात पडला. पुन्हा घोर अंधार..... आता माझं बाहेर जाणं ही असंभव होतं. पण सुदैव मोबाईल आता विखूरला नव्हता तर चक्क प्रकाशमय होता. रांजण खूप खोल भासत होता. मी पूर्ण झाकण उघडले आतून गाण्याचा स्पष्ट आवाज येत होता आणि प्रकाशही....

माझ्या पाठीमागे करकरकचकच आवाज होऊ लागला, अंधारात काय होतय मला कळेना. पण पुढच्या क्षणी जिथे आवाज झाला तिथे जमिनीतून प्रकाश किरण वर आले मी जवळ जाऊन पाहिलं तो माझ्या मोबाईलचाच प्रकाश होता. ते एक तळघर होतं, आणि तिथेच त्याच्या पायऱ्याही.....

गाणं बंद झालं होतं मला मोबाईल आणायला आत जाणं भाग होतं. मी आत उतरायला सुरवात केली. तसा माझ्या कानावर आवाज आला आलास शिवा ! खूप उशीर केलास? मला रस्त्यात भेटलेल्या म्हाताऱ्याचं वाक्य आठवलं. पण आता आवाज एका स्त्रीचा होता. आवाजाच्या दिशेनं बघितलं तर, ती मिरा होती. केस मोकळे कपाळी कुंकवाचं मळवट भरलेलं. पण आवाज मिराचा नक्कीच नव्हता. काय झालं असावं मिराला..... मला एकीकडे मिरा सापडल्याचा आनंद होता. तर दुसरीकडे भूलभुलैया चित्रपटाची आठवण होत अंगावर काटा आला होता.

ये शिवा ये !

जयमाला तुझी आतुरतेनं वाट बघतेय....

मी जवळ जाऊन तिला गदगदा हलवत म्हटलं काय झालं मिरा ?

अशी का वागतेय.

मिरा ! नको मिरा नकोस म्हणू शिवा जयमाला म्हण......

आणि मला घट्ट मिठी मारून ती धसाधसा रडू लागली.

तुझी तब्बेत बरिय ना? मी प्रश्न केला.

मी बरीय, पण तू कसा रे सारंच विसरलास.

काय विसरलो? मी

म्हणजे तुला काहीच आठवत नाही.

आणि तिनं सांगायला सुरवात केली....

     हे गर्भगृह बघतोयस ना? बघ आणि आठवण्याचा प्रयत्न कर. राजा क्रूरकर्मा पाटणचा शेवटचा आणि निपुत्रीक राजा. पाटणच्या डावीकडे राजा धिरेंद्रनाथ याचं एक सुंदर आणि वैभव संपन्न राज्य होतं. राजाला एकमात्र कन्या होती, राजकुमारी "जयमाला" जयमाला सुंदर तर होतीच पण गुणांची खाणही होती. घोडस्वारी,धनुर्विद्या,तलवारबाजी सोबत राजकुमारी एक कवयित्री सुद्धा होती. मैत्रिणींसोबत जंगल विहार करणे. मिळालं तर एखादं सावज हेरणे. तळ्याकाठी तासंतास बसून सुकल्या पानांवर बोरूच्या लेखणी ने कविता करणे. कंटाळा आला तर नाचत बागळत महालाकडे धाव घेणे. हा तिचा नित्य क्रम. याच क्रमात तिनं लिहलेल्या कितीतरी रचना सुकल्या पानांपर्यंतच मर्यादित राहिल्या होत्या. सुकलेल्या पानावरच्या कविता कधी कुणाच्या मनात घर करून गेल्या कळलंच नाही. एके दिवशी जयमाला तळ्या काठच्या बागेत फेरफटका मारत असतांना मंजूळ सुरात एक गीत तिच्या कानावर पडले. गिताचे बोल ओळखीचे वाटत होते,पण स्वर मात्र अनोळखी होता. जयमाला विचलित झाली. कोण बरं गात असावं आणि ते ही इतकं सुंदर.....

जयमाला सुराच्या दिशेनं अंदाज घेत जाऊ लागली. पण सख्यांनी अडवलं कारण इकडे येऊन बराच वेळ झाला होता. आणि महालाकडे परत फिरणं आवश्यक होतं.जयमाला परत आली खरी पण मनात मात्र ते गीत फिरत होतं. अचानक तिच्या ध्यानात आलं , अरे ही तर आपलीच कविता.....

कोन बरं गात असावं! आता तर ती अत्याधिकच विचलीत झाली. सारी रात्री डोळ्याला डोळा लागला नाही.

सकाळी उठून ती रोजच्या पेक्षा आज लवकरच तळ्याकाठी निघाली. लिहलेल्या पानांची शोधाशोध केली, पण सारं व्यर्थ एक ही पान मिळालं नाही.आणि आज काही ऐकायला ही आले नाही. तिचं मन खिन्न झालं.तिनं बोरू घेऊन नवी रचना लिहायला सुरवात केली सुंदर अशा दोन ओळी लिहल्या ही.... तितक्यात तिच्या कानावर तेच सूर आले पण आजची रचना मात्र वेगळी होती. जयमाला हातातली रचना तशीच अर्धवट सोडून पुन्हा त्या सुरदासाच्या शोधात बावरी झाली. खूप शोधाशोध केली. ती सुरांच्या दिशेने निघाली की सुरांची दिशा अचानक बदलत असे. दिवसामागून दिवस जात होते जयमाला रोजच नवनवे गीत ऐकत होती. हळूहळू जयमालाला त्या अदृश्य पुरूषांच्या प्रेमात पडल्याचा आभास होऊ लागला. सख्यांनी छेड काढताच ती लाजू लागली. तिच्या प्रेमाच्या चर्चा स्वराज्या सह इतर राज्यात ही पसरू लागल्या. तिचं लिखाणावरही लक्ष लागेना. शेवटी लिहलेल्या दोन ओळी तशाच वाळलेल्या पत्त्यासारख्या उडत्या झाल्या त्यांना कधी पुर्णत्व आलेच नाही. पण एके दिवशी मध्यरात्री मात्र कमाल झाली, जयमालाला तिचंच अपूर्ण गीत ऐकायला मिळालं. अंतरा जरी जयमालाचा असला तरी गायकाने एक सुंदर मुखडा जोडून धृपद पूर्ण केले होते. आणि उर्वरित गीत ही लिहले होते.आणि आज तेच गीत गात होता.

जयमाला कुणालाही न सांगता तळ्याकाठी निघाली. जसजशी आवाजाच्या दिशेने जाऊ लागली तसतसा आवाज स्पष्ट होत होता. तिने सुराच्या शोधात आपल्या राज्याची सीमा केव्हाच पार केली होती. आता आवाज जास्तच स्पष्ट येऊ लागला, चांदणी रात्र असल्याने कुणाला बघू शकणे सहज शक्य होतं. परंतु त्या साठी अधिकाधिक जवळ जाणं आवश्यक होतं.

जयमाला न आवाज करता पुढे चालू लागली, समोर एका दगडी आसनावर एक रक्तवर्ण बलशाली पुरूष पाठमोरा बसून गात होता. जयमाला आल्याची त्याला अजूनही चाहूल लागली नव्हती. जयमाला पुढे होऊन त्याला स्पर्श करणार, तितक्यात तो पुरूष हाती खंजीर घेऊन जयमालाच्या पुढ्यात आक्रमक पवित्र घेऊन उभा ठाकला. जयमाला तितक्याच स्पूर्तीने गुढग्यावर बसून नतमस्तक झाली.भारदस्त शरीर , बोलके डोळे, डोक्यावर पागोटे आणि पागोट्याच्याच शेल्याने चेहरा झाकलेला. जयमालाला निहत्ती बघताच, तो हातातील खंजीर जयमालाच्या हातात ठेवून पाठमोरा होऊन चालता झाला. आजही जयमालाच्या हाती शून्यच आला. एव्हाना राजकुमारी वनाकडे गेल्याची बातमी राजाच्या कानी आल्यानं त्याने तिच्या मागावर सैनिकांची एक तुकडी पाठवली होती. राजकुमारी बसली तिथवर सैनिक येऊन पोहचले होते. राजकुमारी जयमाला उठून उभी राहिली. मनोमन त्या पुरूषला पती मानून, त्याने दिलेला खंजीर कमरेला खोवला आणि घोड्यावर विराजमान होऊन महालाकडे सुसाट निघाली.

          राजकुमारी जयमाला त्या दिवशी परतली खरी पण सदा चंचल हसतमुख असणारी जयमाला नेहमी दुःखी राहू लागली. नित्यक्रम सुरु असला तरी तो उत्साह मात्र पुन्हा दिसलाच नाही. अगदी तसंच जसं कोणतच गीत तिला ऐकायला मिळालं नाही. जयमाला अधून मधून जाऊन आपल्या भावी पतीला शोधत असे. वर्ष झालं तरी तिचं मन लागेना, राजा धिरेंद्रनाथ चिंतातूर होऊन अंथरूणाला खिळले होते. जयमालाच्या वाढत्या वयामुळे ते सदाच दुःखी राहू लागले. राजाच्या या परिस्थितीला सारी प्रजा जयमालालाच जबाबदार धरत होती.वडिलांची नाजूक स्थिती पाहून जयमालाने स्वयंवर पद्धतीने विवाहाला मान्यता दिली. राजा आनंदी झाला. राजकुमारी जयमालानं ऐकलेलं तिचंच अपूर्ण गीत पूर्ण करण्याची स्वयंवराची अट ठरली. गावोगावी राज्योराज्यी दवंड्या देण्यात आल्या. कारण ते गीत फक्त राजकुमारी आणि त्या इसमालाच माहीत होतं. पंधरा दिवस महिना झाला पण कुठून काहीच खबर आली नाही. राजासह सारी जनता हताश झाली, पण अचानक एके दिवशी शेजारचे राज्य पाटणहून राजा क्रूरकर्मा कडून स्वयंवर पूर्ण करण्याचा लखोटा आला. दिवस तारीख जागा निश्चित करण्यात आली. राजा धिरेंद्रनाथांना सहपरिवार आमंत्रित करण्यात आले.लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली, संपूर्ण राजधानी सजवण्यात आली होती. राजकुमार क्रूरकर्मा आपल्या वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पवयातच राजा झाला होता. राजमहालात मृत्यूशय्येवर पडलेल्या आई खेरिज, राजाचं आपलं म्हणून कुणीही नव्हतं. हा मंत्र्यांचा जमावडा मात्र गरजेपेक्षा जास्त दिसत होता. सगळीकडे चहलपहल होती. ठरल्या प्रमाणे राजकुमारी जयमाला आणि राजकुमार क्रूरकर्मा दोघांचे आसन समोरा समोर लावण्यात आले. क्रूरकर्मा येऊन स्थानापन्न झाले. सारी प्रजा स्तब्ध झाली. राजाने इशारा करताच गुलाब फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या वरून जयमालाटे आगमन झाले. जयमालाने समोर पाहिले तेच बलशाली शरीर, तीच कांती तिच्या ओठावर स्मित झळकले. पण डोळ्यात मात्र ती चमक जाणवत नसल्यानं दुसऱ्याच क्षणी ओठावरलं स्मित लोप पावलं. विवाहाच्या घोषणा,राजाचा जयजयकाराने सारा आसमंत गजबजून गेला. राजाने हात वर केला, पुन्हा निरव शांतता पसरली. पुरोहिताने राजकुमारी जयमालाला स्वयंवरातील अटी प्रमाणे पहिल्या ओळी गाण्याची सूचना केली.

जयमालाने अर्धवट राहिलेल्या तिच्याच शेवटच्या गिताच्या दोन ओळी गायल्या. तिच्या ओळी पूर्ण होताच राजा क्रूरकर्माने पुढच्या दोन ओळी त्याच लयात गावून पूर्ण केल्या. जयमालाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, त्याच गिताच्या ओळी आज जयमालाने ऐकल्या होत्या. आता राजा क्रूरकर्माच तिने मनोमन मानलेला वर होता, हे सिद्ध झालं. ढोल नगाडे सनई चौघड्यांच्या जल्लोषात विवाह संपन्न झाला. काही काळ मोठ्या आनंदाने पार पडला. परंतु विघ्न आले ते मधुचंद्राच्या रात्री……… जयमालाने क्रूरकर्मा समोर संपूर्ण गीत ऐकण्याचा लाडिक हट्ट धरला. परंतु क्रूरकर्माने तिचा हट्ट पुरवण्यास साफ मनाई केली. महाराज असं का वागताय हे जयमालाला कळत नव्हतं. तीही थोडी हट्टी झाली, गीत पूर्ण ऐकूनच समर्पण करण्याचा तिनं निर्णय घेतला. त्या दिवसापासून राजा राणीतला संवाद ही बंद झाला.

एकेदिवशी राणी अंघोळीनंतर महालासमोर केस सुकवत बसली होती. अचानक तेच गीत त्याच सुरात तिच्या कानावर पडले. पण आवाज येतोय कुठून काहीच पत्ता लागत नव्हता. राणीला वाटले, महाराज एकांतात गीत गाण्यात आनंद प्राप्त करत असतील. तिने पुन्हा राजांना भेटण्याचा निरोप दासीकरवी पोहचता केला. या भेटित राजाने पाठमोरे बसून गर्भगृहात गीत गाण्याचे ठरले. ठरल्या प्रमाणे गर्भगृह सजवण्यात आले, मध्यभागी शेजशय्या मनमोहक फुलांनी सजवली होती. काही अंतरावर एक दगडी आसन व्याघ्रासन अंथरुन सजवण्यात आलं होतं. महाराज अगोदरच गर्भगृहात दगडी आसनावर विराजमान झाले होते. हे तेच आसन होतं जे जयमालाने राजांच्या पहिल्या भेटीत पाहिले होते. राणी जयमालाने आत प्रवेश करताच गर्भगृह बंद करण्यात आले. गाणे सुरु झाले विना संगिताने ही गाण्याने जयमालाला थिरकायला भाग पाडले. जयमाला बेधुंद होऊन नाचू लागली.राजे एकाग्र होऊन गात होते. आज जयमालाला नाचता नाचताच डोळ्यांतली ती चमक ही दिसत होती, जी तिनं पहिल्या भेटीत पाहिली होती. जयमालाही गीत गायला साथ देत होती आणि महाराज ही थिरकत थिरकत जयमाला सोबत नृत्य करू लागले. कुणी जर हा प्रसंग पाहिला असता तर पाच सात मिनीटा साठी स्तब्धच झाला असता. गाणे संपून दोघं शेजशय्येवर केव्हा पोहचले कळलंच नाही. आणि जयमालाचा मधुचंद्र पार पडला. दोघं तृप्त होऊन बाजूला झाले. तसा कडाडता ध्वनी कानावर पडला....

शिवा !    

शिवा ! शिवा !शिवा! भिंतीना टकरलेला आवाज घुमत होता.

जयमाला वस्त्र सांभाळत उभी राहिली. समोर बघते तर काय, अंधाऱ्या कोपऱ्यातून राजा क्रूरकर्मा समोर आले.

जयमाला संभ्रमात पडली, राजा क्रूरकर्मा समोर आहेत तर आपण कुणाला सर्वस्व प्रदान केलं? हुबेहूब राजा सारखा दिसणारा हा तेजस्वी पुरूष कोण?

आपण पहिल्यांदा ऐकलेलं गीत आणि आजच्या गितात साम्य कसं?

डोळ्यांची चमक ?

आणि महाराजांनी त्यांना शिवा म्हणून का संबोधलं असावं ?

असे कितीतरी प्रश्न......

        राजाचा आवाज ऐकताच टपटप टपटप निवडक सैनिकांनी गर्भगृहात प्रवेश केला. राजाचा इशारा मिळताच अंथरूणा

पूर्ववत पडलेल्या शिवाला उचलून दगडी आसना जवळ आणण्यात आलं, आणि चर्रर्रर्रर्र्...... क्षणाचा ही विलंब न लावता त्याचा शिरच्छेद करण्यात आला. सारा गर्भगृह रंक्ताने माखला गेला. जयमालाला प्रतिकार करायला ही वेळ मिळाला नाही. जयमालाची स्मृती लोप पावली, ती तिथेच गळून पडली. एका सैनिकाने जवळच पडलेल्या संदूकीतुन लोखंडी बेड्या व साखळ्या काढून, अचेत जयमालाच्या हातापायत व गळ्यात अडकवल्या. बेड्या अशा चमकत होत्या जणू त्याचा वापर निरंतर होत असावा. बेड्या अडकवून राजासह सारे सैनिक गर्भगृहातून बाहेर पडले आणि गर्भगृह कायमचे बंद झाले.

डोळ्यांची चमक, गिताचे बोल, सूर आणि जयमालाची तरबेज बुद्धीने शिवा हाच जयमालाने मनोमन मानलेला वर होता हे जरी सिद्ध झालं असलं.......

तरी,

राजाने कवितेच्या ओळी कशा पूर्ण केल्या?

जंगलात पाहिलेलं आसन गर्भगृहातच का ठेवण्यात आलं?

आणि राजाने धोक्याने जयमालाशी विवाह का केला? हे सारं अनुत्तरितच होतं. इतकं करूनही राजाला जयमालाशी सहवास करताच आला नाही. या साऱ्या गोष्टींचं रहस्य पाटणच्या त्या गर्भगृहात जणू बंद झालं होतं. कालांतराने राजा क्रूरकर्माचा देहांत झाला आणि पाटणचा राजा निपुत्रिकच राहिला. पाटणची प्रजा पाटण ही राजधानी सोडून डोंगरमाथ्यावर वस्ती करून राहू लागली. आज त्याच वस्तीने पाटण जिल्ह्याचे रूप घेतले आहे. मूळ पाटणचे ऐतिहासिक अवषेश दऱ्या खोऱ्यात झाडाझुडपात गडप झाले. बरेच दिवस भूतप्रेताच्या कथा तिथे प्रचलित राहिल्या. कुणी तिकडे फिरकतच नव्हतं. पुरातत्व विभागाने एकदा पहल केली होती खरी. पण स्थानिकांच्या विरोधामुळे पाटण पुन्हा काळोखात गडप झालं. मिराची कहानी बंद झाली तशी बाहेर प्रचंड वीज कडाडली.गर्भगृहाला छोटं खिंडार पडलं, बाहेच्या धबधब्याचा आवाज आत येऊ लागला. वटवाघुळांचा थवा पुन्हा आत आल्याचा आवाज झाला.मिराच्या तोंडून पुन्हा तेच गित झरू लागलं. मी साथ देऊ लागलो, नाचू लागलो, गाऊ लागलो. मोबाईलचा उजेड हलका मंद झाला होता. आम्ही गात नाचत जवळच्याच एका दगडी शय्येवर सहवासरत झालो, जसे जयमाला व शिवा झाले होते. आमचा ही मधुचंद्र त्याच गर्भगृहात संपन्न झाला होता. सकाळ होई पर्यंत आम्ही तिथेच पडून होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सायंकाळ पर्यंत घरी पोहचलो. ठीक नऊ महिन्याने आमच्याकडे कडे पुत्र रत्न प्राप्त झाले, मिराने त्याचं नाव शिवकर्मा ठेवलं. का ठेवलं ? माहित नाही आणि मी विचारं ही नाही तिला हे सारं कसं माहीत हेही कधी विचारलं नाही.कारण माझी गृहस्थी चांगली सुरू होती. मग मी का रहस्यमयी प्रश्न विचारून चक्रिवादळ निर्माण करून घ्यावं.

आज या घटनेला 30-35 वर्षे पूर्ण झाले होते. माझ्या आजूबाजला टाळ्यांचा गडगडाट होत होता. मी फ्लैशबॅक मधून बाहेर आलो. आज आमचा पुत्र शिवकर्मा ने पाटणच्या कलेक्टर पदाचे सुत्र हाती घेतले होते. त्याचाच हा समारोह होता. मिराच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहत होते. मिराचे डोळे पाटणला योग्य वारस दिल्याच्या आनंदाने तर अश्रू ढाळत नाहियेत ना ? असं मला वाटू लागलं, पण ते ही एक रहस्यच !........


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller