राणी अब्बक देवी (पुस्तक परीक्षण)
राणी अब्बक देवी (पुस्तक परीक्षण)
पुस्तक : राणी अब्बकदेवी
प्रकार : ऐतिहासिक कादंबरी
लेखिका : सुरेखा शहा
प्रकाशक श्री. चंद्रमोहन शहा यांच्याकडून भेट रुपात पाच-सहा पुस्तकांचे पार्सल घरी आले आणि 2020 ची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली. खजिना हाती लागल्याचा भास झाला आणि मग रीतसर बुक शेल्फमधे सर्वात आधी या पुस्तकांना सजवत घरातील इतरही पुस्तके त्यांच्या सोबत विराजमान झाली.बस आता वाट पाहत होते ते सलग बैठकीत पुस्तकं वाचण्याचा योग कधी येतो याची! पण काही योग आपल्याला आवर्जून सवड काढून, जुळवून आणावे लागतात असे काहीसे झाले यावेळी वाचनाचे! आता ही प्रस्तावना आटोपती घेत मी आधी मुद्यावर येते आणि मला आनंद देवून गेलेल्या पुस्तकाबद्दल सांगते. मिळालेल्या पुस्तकातून मी वाचलेल्या पहिल्या पुस्तकांबद्दल ओळख करुन देणारे थोडे लिहिते...
मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेली 'राणी अब्बकदेवी' ही सुरेखा शहा लिखित ऐतिहासिक कादंबरी तिच्या नावावरुन व त्याला साजेशा अशा मुखपृष्ठावरुन वाचण्यास भूरळ पाडणारी आहे. दीडशे पानांची ही कादंबरी वाचताना तहानभूक हरपून आपल्याला पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या काळात मनाने कधी घेवून जाते कळत नाही.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने 2012 साली भारतीय आरमाराने आपल्या एका युद्धनौकेस राणी अब्बकदेवी हे नाव देऊन राणीच्या शौर्याचा उचित सन्मान केला आहे व भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ प्रशस्तीपत्रक काढले आहे. ही आणि अशा प्रकारची राणीबद्दलची माहिती देत 'अब्बक राणीची' ओळख करुन दिल्याने एक प्रकारची वातावरण निर्मिती होते आणि कादंबरी वाचनाची गोडी वाढत जाते. राणीची थोरवी सांगताना दिलेले अनेक संदर्भ, अब्बक राणीच्या पराक्रमाची व महानतेची, देशभक्तीची वाचकांना महती सांगून जातात.
कर्नाटक सरकारने ऊळ्ळाल या तिच्या राजधानीत हातात तलवार उपसलेला राणीचा अश्वारुढ पुतळा चौकात स्थापन केला आहे. पुतळ्याखालच्या चौथर्यावर लिहिले आहे:
वीरराणी अब्बक. फर्स्ट फ्रीडम फायटर. परकीयांशी झुंज देणारी ती पहिलीच भारतीय राणी होती.
2000 सालापासून कर्नाटक सरकार दरवर्षी 12 आणि 13 फेब्रुवारीला अब्बकदेवी महोत्सव साजरा करते त्यावेळी संगीत, नाटक, यक्षगान लोकनृत्ये, लोकगीते व्याख्याने अशा विविध माध्यमातून राणीचे संस्मरण केले जाते. जैन धर्मातील चौटा राजघराण्यात होऊन गेलेल्या ह्या अब्बक राणीच्या पूर्वजांची माहिती देत, त्यांनी तीनशे वर्षे आधी बांधून ठेवलेल्या सुंदर मंदिरांचे व निसर्गाचे वर्णन करून कादंबरी मुख्य टप्प्यावर येते. लहान्या अब्बकला तिचे नाव अब्बक का ठेवले? सांगताना तिचे मामा राजा तिरुमलराय यांनी तिला सांगितले की, "अब्ब म्हणजे जल (पाणी). अब्बक राणी हे नाव तर एखाद्या पदवीसारखे आहे. सर्व प्राण्यांचे, सृष्टीचे पालनपोषण करणारे जल आहे त्याची देवता म्हणजे अब्ब. शिवाय अब्बक म्हणजे आई."
तिच्या मामाने म्हणजे राजा तिरुमलराय यांनीच अब्बकला राणीपद दिले होते. आपली बहिण मोठी अब्बकदेवी (हिरीय) हिला त्यांनी स्वत:ला मुलगा नसल्याने तिची हुशार, चुणचुणीत मुलगी वयाच्या पाचव्या वर्षीच मागितली. त्यांनी तिचे पालनपोषण करताना नेहमी, "तुझ्या आईप्रमाणे तुझेही नाव दुसरी अब्बकदेवी (किरीय) ठेवले आहे असे नमूद करताना, तुलाही देशासाठी, प्रजेच्या हितासाठी मोठी होऊन माझे राज्य सांभाळायचे व पोर्तुगीजांना इथून घालवून देण्याचा लढा चालू ठेवायचा आहे" याचे बाळकडू लहान वयापासूनच पाजले होते.
मातृसत्ताक कुटुंबात वाढलेली राणी अब्बक आईप्रमाणेच शूर व पराक्रमी होतीच शिवाय देशाच्या हिताच्या विरोधात गेलेल्या आपल्या पतीविरुद्ध जाण्यास दोघींनी माघार घेतली नाही हे वाचून त्या दोन्ही अब्बक राणीबद्दल अभिमान वाटतो. खास नमूद कराव्यात अशा आणखी दोन गोष्टी या अब्बक राणीबद्दल -
* त्या काळात स्वत:च्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन तिने घटस्फोट घेतला व लग्नात दिलेले जडजवाहर, दागिने तिने परत पाठविले. हे एक क्रांतिकारक अनाकलनीय असे उदाहरण होते. त्या प्रदेशांत मुखत्वेकरून मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती. रूढी-परंपरांचे जोखड झुगारून देवून तिने सर्वांना अचंबित केले.
* तिच्या सैन्यात अठरापगड जातीचे सैनिक होते. जैन असूनही धर्माचा अभिनिवेश नव्हता. तिने हिंदू मंदिर, जैन मंदिर व मशिदी बांधून दिल्या. त्या काळात आंतरजातीय विवाहास परवानगी देवून तिने नवीन पायंडा पाडला. त्या निवड्याचं ताम्रपत्र धर्मस्थळ येथील म्युझियममध्ये आहे. पुस्तकात फोटो आहे.
* जनतेच्या कल्याणाची काळजी होती म्हणून तिने शेती, पाणी पुरवठ्यासाठी धरणे व कालवे बांधले.
1544 साली जन्म झालेल्या व 17 व्या वर्षी राज्याभिषेक होवून 1582 पर्यंतचा काळ जिच्या कर्तृत्वाने गाजला त्या अब्बकदेवीचा 1623 मधे, पोर्तुगीजांशी लढताना वीरमरण येवून शेवट झाला परंतू त्याक्षणी देखील पतीच्या गद्दारीने आपण पकडले गेलो याचे भय न वाटता राणीने कैदेतल्या एका दिवसाच्या शेवटच्या रात्रीत बंड पुकारले आणि पहाऱ्यावर असलेल्या भारतीय सैनिकांमधे देशभक्ती जागवून स्वत:ची व बंदी केलेल्या तिच्या दोनशे सैनिकांची सुटका करुन घेत स्वत:कडे वळवून घेतलेल्या इतर सैनिकांच्या मदतीने लढा दिला.उद्या आपल्याला पौर्तुगीज ठार मारतील त्यापेक्षा लढून प्रयत्न करणारी राणी शेवटच्या क्षणीही एखाद्या वीरांगणे प्रमाणे लढत राहिली हे वाचून एकिकडे अभिमानाने ऊर भरून येतो आणि दुसरीकडे डोळे पाणावतात. ह्या मूळ कथानकाभोवती शौर्याने रंगलेली ही कादंबरी अनेक वेळा राणीचे साहस,तिचे देशप्रेम,धाडसी वृत्ती, दुरदृष्टी पाहून आपल्याला अचंबित करुन जाते.
कर्नाटकातील तुळूनाड प्रदेशातील मंगळूर जवळच्या ऊळळाल शहराची ही राणी होती. पाचशे वर्षांपूर्वी होवून गेलेली तरीही तिचे विचार, व्यापाराची धोरणे सारे अगदी ह्या काळातही लागू पडतील अशीच होती हे वाचून तिच्या बद्दलचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे वाटत राहते. पोर्तुगीजांशी 19 वेळा लढाया करुन त्यांना पराभूत करणाऱ्या या राणीची कीर्ती संपूर्ण युरोप व अरबस्थानात झाली होती. तिला तिकडे मसाल्याची राणी, अग्निबाणाची राणी, बुक्क देवी, अभयादेवी या आणि अशा अनेक नावांनी ओळखले जायचे. देशभक्ती, वीररस, साहस, पराक्रम, ऐतिहासिक काळ याची आवड असलेल्यांसाठी ही कादंबरी एक मेजवानी आहे.