पुरानी गली
पुरानी गली


“हाय”
“हाय....तु....इथे?”
“हो थोडं काम होत ...कालच आलोय”
“अच्छा...”आता काय बोलावं ती विचार करत कसनुस हसली.
“बाकी काय?? कशी आहेस?”
“कशी दिसतीये तुला?” तिने वेगळ्याच सुरात विचारलं
“बदल दिसतायेत!!”
“म्हणजे??”
“अग चश्मा नाहीये ना....म्हणुन म्हणालो”
“अच्छा... ऑपरेशन केल...चश्मा घालवायचं”
“पण मस्त दिसायचा तुला चश्मा....मला तर तु चश्म्यातच खुप आवडायचीस”
हे बोलताना तो अडखळला जरा.
“म्हणुनच काढलाय तो चश्मा” ती पुटपुटली.
“काही म्हणालीस?”
“अं नाही......मी निघते ...लेट होतयं क्लिनिक ला जायचयं”
“अंतरा......कॉफी घेऊयात? नेहमीच्या कॅफेमधे?”
“नाही....मी कॉफी घेत नाही ..अाणि लेट होतयं मला”
“अंतरा प्लीज.......बोलायच होत जरा, खुप वेळ नाही घेणार,प्लीज”
“अक्षय ...आता का? अन् का...य बोला...यचं आहे???” तिचा कंठ दाटुन आला.,मनातली आंदोलनं पापण्यांजवळ बंड करत होती.
“हो मला माहितीये खुप उशीर झालायं....पण तरीही बोलायचं आहे,प्लीज प्लीज!”
“मला नाही बोलायचं....लेट होतयं!”
“एकदा ऐक प्लीज,माफी मागायची आहे....खुप काही बोलायचं आहे. उशीरा सुचलय हे शहाणपण..प्लीज!”तो तिची मनधरणी करतच होता.
“माझ्या मनात ना तेव्हा काही होतं ना आता....मी नाही थांबु शकतं”
“प्लीज.....मनु,प्लीज!”
कित्येक वर्षात हेच ऐकायला ती आसुसली होती...”ठीके,चल” ती विरघळलीचं.
“माझ्या गाडीतुन जाऊयात?”
“नाही.....असही तुला लक्षात येणार नाही..... नक्की कुठ थांबायच ते.”तो रूक्षपणे बोलली.
“म्हणजे?”
“बदल झालेत खुप ....रस्ते...गल्ली...दुकानं...सगळ बदलयं म्हणुन म्हणाले,!”
“अच्छा”
“तु थांब मी आले गाडी घेऊन”
ती वळाली...हा नुसता पाहत राहिला, लांब केस, अबोली रंगाचा ड्रेस.....अजुनही पैंजण घालते....सावळी झालीये जराशी....पण तरीही तितकीच गोडं दिसते.....त्याला दोन वेण्या घातलेली ति आठवतं होती!
हाॅनच्या आवाजाने तो भानावर आला.
“बस” ती काच खाली घेत बोलली.
“एक सांगु???”
“हमम”
“शहराचं माहित नाही पण तु खुप बदलली आहेस”
“का?? असं का वाटतयं तुला?”
“साधी सायकल यायची नाही तुला,म्हणायचीस गाडीवर ड्रायवर ठेवेल....आणि आता एवढी मोठी गाडी घेऊन फिरतेस.”
“हम...वेळ बदलते सगळच....” ती रेडियो आॅन करता करता म्हणाली.
“अहाहा ....काय मस्त गाण लागलयं......दिन बन गया यार!”
“तु ऐकतोस अजुनसुद्धा ही गाणी?????”
“तु लावलेल्या चांगल्या सवयी आहेत मला अजुनही...!”त्यानं बोलल्यावर जिभ चावली हे तिच्या नजरेतुन सुटलं नाही.
ती मंद हसली,बॅकग्राउंडला त्याचं आवडतं गाण वाजतं होतं”मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है!”
तो गुणगुणत होता.....ती स्वत:ला समजावत होती.
“ए तो कोपर्यावरचा दादा अजुनही असतो का गं???”
“कोण? फालुदावाला दादा??”
“हो..हो तोच!”
“पुढच्या सिग्नलवर लेफ्टसाइड ला बघ..”थंडगार” नावाच आईसक्रीम पार्लर आहे, ते त्याचं आहे”
“ग्रेट यार.....आणि कॅफे?”
“कॅफे तसचं आहे...रंग चेंज केलाय...बाकी सगळं अगदी तसचं आहे!”
“तु जातेस अजुनही???”
“हमम ..कधीकधी जाते”
“किती वर्ष झाली ना यार.....”
“दहा” ती त्याच बोलणं तोडत म्हणाली.
“ए अगं इकडे कुठं??? कॅफे त्या गल्लीत आहे ना??””
“हो..हो....गाडी नाही जाऊ शकतं तिथे ...सो इथे पार्क करून मग जावं लागत चालत...!”
“ओह...ठीके...चल!”
गाडी पार्क करून कॅफेमधे जाईपर्यंत तो काहीच बोलला नाही,फक्त त्या गल्लीतली प्रत्येक गोष्ट निरखत होता ...जणु काहीतरी शोधत होता....बहुतेक भुतकाळ...त्यांच्या आठवणी .....कदाचित जुनी अंतरा !”
“काय डाॅ.बाई आज कशी काय वाट चुकलात???? होती कुठ एवढे दिवसं??”
“विसरलास ना बाळुकाका....सेमिनार साठी दिल्ली ला गेले होते ..तरी विचार कुठं होते म्हणुन??”
“अरे हा...बरं तु बसं.. आल्याचा चहा पाठवतो...पण साहेबांना काय पाठवु??”
ह्या वाक्यासरशी अक्षय भानावर आला “साहेब काय काका?? ओळखलं नाही का मला...?”
“काका...अक्षय ...परवाच परत आलाय ....त्याला काॅफी पाठवा ...” ती संवाद पुढे वाढु नये म्हणुन म्हणाली .
काकांनाही ते समजलं बहुदा....त्याची जुजबी चौकशी करून ते पोराला आॅर्डर सांगायला आत गेले.
“तु चहा केव्हापासुन घ्यायला लागलीस?”
“आठवतं नाही...”
“दहा वर्ष खुप असतात नाही???”
तुझ्यासाठी असतील खुप...माझ्यासाठी नाही”
“म्हणजे?”
“वर्ष..तारखा बदलत राहिल्या...शरीर.. रूप ..रंग सगळ बदललं...पण कुठे तरी ना अक्षय अंतरा ह्या गल्लीत माझ्या मनात होते...आजही आहेत ....अल्लड वय....पहिलं प्रेम ...सगळच आजही तसचं आहे...तु दहा वर्षांनंतर आलास ...मी दहा वर्ष तेच जगतीये जे तु सोडुन गेलास....ही गल्ली ह्या आठवणी तश्याच आहेत ..माझ्यासाठी दहा वर्ष कॅलेंडर बदलय फक्त..” ती मनातलं सगळचं बोलत होती .
“आय एम् साॅरी” तो हताशपणे म्हणाला.
ती नुसतीच बघत राहिली....
“मागे आलो होतो तेव्हा मानस म्हणाला तु लेह ला गेलीयेस...त्याच्याही आधी आलो तेव्हाही तु शहराबाहेरच....का टाळतं होतीस इतकं??ह्यावेळी न सांगता आलो तेव्हा कुठे भेटलीस”
“मगं काय करायचं होतं? भेटायचं होत तुला ??? काय साध्य होणार होतं त्याने??”
“ माहित नाही पण......”
“पण काय??”
“मला माफी मागायची होती तुझी!”
“का?? कशाबद्दल??”
“मी जे वागलो त्यासाठी...नातं तोडलं...USला गेलो.....परीक्षा महत्वाची होती ...पण मी तुला ऐन परीक्षेत त्रास दिला...निकालानंतरही कसलाच विचार न करता देशाबाहेर गेलो....तुला हर्ट केलं....संधीच दिली नाही बोलायची...बसं तोडल सगळं...म्हणुन मागायची होती ..माफी ...आय मीन मागायची...आहे”तो शब्द जुळवतं होता.
तिला वाटलं खुप भांडाव ...जाब विचारावा...अगदी सगळच परत मागावं.....पण ती गप्प पाहिली...हे उकरून आता काय मिळणार ह्या विचाराने, जिथे हक्क नाही तिथे भांडण नको ह्या विचाराने....ती गप्प राहिली....
तो पुन्हा पुन्हा साॅरी म्हणत होता.....
ती आठवतं होती....
शाळेतलं प्रेम .....पहिल प्रेम.......ती नाकासमोर चालणारी साधीशी मुलगी....
त्याला ही आवडायची ...सगळ्या शाळेला माहित होतं.....हिचा नकार....मग त्याचं मागे मागे फिरणं....मग तिलाही आवडायला लागला तो.......तो वर्गात तिला पहायचा...पहातचं बसायचा....सुरवातीला नजरेनं बोलणं ...मग वहीच्या मागच्या पानावर गप्पा रंगायच्या.....ती त्यातही शुद्ध लेखनाच्या चुका शोधायची.....
ती हुशार ...पहिल्या तीनात ...हा कसाबसा काठावर पास ...पण दहावीला फक्त हिच्यासाठी झटला...दोघेही शाळेत दुसरे आले....तेव्हाच तिने नक्की केलं हाच हवा आयुष्यभर.......हेच प्रेम ..हाच तो परीकथेतला राजकुमार.....
पुढे ज्युनिअर काॅलेज एकच....सतत सोबत.....पहिली डेट ह्याच कॅफेमधे....तेव्हा बहुतेक हे एकमेव कॅफे होतं....त्यादिवसापासुन आजतागायत ती इथे येणं थांबवु शकली नाही,त्यादिवशी त्यानं रस्त्यावर पडलेल पांढरं बुचाच फुलं तिला दिलं...ते तिनं आजही जपुन ठेवलयं डायरीतं....त्याचं दिवशीच्या पानावर.....त्याचा दरवळ तिला आजही जाणवतो.
“अंतरा........अंतरा..”
“हं.......बोलं.......”
“अग काय मी किती वेळ एकटाच बोलतोय? कुठे हरवलीस?”
“काही नाही ...बोल .” आठवणींचा असर ....ती अचानक मवाळ झाली...तिलाच कळेना हा टोन कसा काय आला ते .
“खरचं साॅरी अंतरा ...१२ वी होती गं खुप महत्वाचं वर्ष.....अनुष्कासाठी तुला सोडताना मी काहीच विचारात घेतलं नाही ...काहीच नाही गं ...साॅरी ...एकदाही विचार केला नाही ..हे सगळं माझ्यासोबत झालं तर ?? असं अर्ध्यातुन साथ सोडल्यावर काय होईल ??मी चुकलो.....”
“अक्षय...”ती त्याला थांबवत म्हणाली....
“काय मिळणार हे सगळं उगाळुन ...तु गेलास ....ती सुंदर होती ....मी टिपिकल होते...हो झाल जरा नुकसान सीइटी रिपीट केली आयुष्यात पहिल्यांदा मी हरले पण..कदाचित हेच होणं नशिबात होतं..कारण त्यानंतर मी मागे वळुन पाहिलचं नाही.....सोड ना...” ति कसंबसं बोलतं होती ....कापरा आवाज लपवत..हुंदका दाबत....
“सुंदर??? ती ?? हममम...होती ना सुंदर ...पण तुझ्या इतकी नव्हती ...सगळं समजलं पण वेळ निघुन गेल्यावर.”तो पुटपुटला.
ती मनाशी काहीतरी ठरवुन बोलली “अक्षय ...वडापाव खाणार सावंतकडचा???”
“काय?? आत्ता?? अन् तुझ क्लिनिक?” तो कन्फ्युज होऊन तिच्याकडे पहात होता .
“सुट्टी क्लिनिकला .......आणि तुमच्या कडे काय वेळ पाहुन वडापाव खातात ???” तिच्या डोळ्यात वेगळेच भाव होते.
“अग तसं नाही ....”
“चल रे”
ते दोघही हसत ...खळखळुन हसत होते...ती संध्याकाळ ते तसचं जगले ...जसे पुर्वी वागायचे...
कित्येक वर्षात ती असं हसली नव्हती ....तो असा भटकला नव्हता.
“उस पुरानी गली मे जश्न हो रहा था,
सालोंबाद किसीका पुराना इश्क जो लौटा था”
ती मनातचं ह्या नुकत्या जन्माला आलेल्या शायरीवर खुश झाली.
“कायं ग एकटीच हसतेस???”
“काही नाही...असचं”
तिला माहित होतं हे क्षणभंगुर आहे....तरीही तिला हे करायचं होतं ...कदाचित त्याच्या चेहर्यावर हसु यावं म्हणुन..
“निघायचं!??” तो घड्याळ पहात म्हणाला.
“हममम...पण एक राहिलयं???”
“काय???”
“थंडगार मधला फालुदा “ती डोळे मिचकावत म्हणाली
“एवढ्या थंडीत???”
“पहिल्यांदा खातोय का आपण???चल ...”
गाडी थंडगार च्या दिशेने निघाली.
फालुदा खाताना बरचं काही विरघळतं होतं.....तीच्या मनातले प्रश्न...त्याच्या मनातलं गिल्ट....तिच्या आयुष्यावरचं त्याच गारूड हळुहळु उतरतं होतं....त्याला ती पुन्हा हवीहवीशी वाटतं होती.!
“गाडी चालवशील ?? आईसक्रीम पार्लर मधुन निघताना तिने विचारलं.
“हो...तुमच्यासाठी कायपण...”तो हसत हसत म्हणाला.
“अंतरा ....थॅंक्यु?”
“हे काय मधेच??? कशासाठी ?”
“मला वाटलं होतं ..तु बोलणारसुद्धा नाहीस....पण तु तर ...”
“अगदी तसचं वागले....जसं पुर्वी वागायचे....हेचं म्हणायचं होतं ना तुला”
“हो...अनपेक्षित होतं सगळं ...तुझं एवढ्या लवकरं नाॅर्मल होणं.”तो शब्द जुळवतं होता....
“मलाही अनपेक्षित होतं...असो...निघुयात का??? खुप वेळ झालाय आता.”
“ऐक ना .....मला वाटतं...की...आपण पुन्हा एकत्र....आय मीन एक चान्स देऊयात का आपल्या नात्याला....???”हे बोलुन त्याने निश्वास टाकला.
“एक मिनिट....पुढे नको बोलु तु काही ....आधी ऐक माझं...खरं तर मलाही प्रश्न पडला होता मी का असं वागतीये...एवढा वेळ आपण का एकत्र आहोत? ह्याला काही अर्थ आहे का वगैरे वगैरे..पण मग विचार आला..तु तो माणुस आहेस ज्याचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे,तु माझं पहिलं प्रेम ...गेलेली वर्ष परत येणार नाहीत..पण माझ्या ह्या वागण्याने तुझी घुसमट कमी होणार असेल तर काय हरकत आहे ना पुन्हा तसं वागायला....एक संध्याकाळ तुला द्यायला....मग सगळे प्रश्न ..कडु अनुभव बाजुला सारून तशीच वागले...जसं तुला अपेक्षित होतं.....पण म्हणुन मी दहा वर्ष मागे नाही येऊ शकतं....अक्षय आपण समांतर आहोत...एकत्र येण्याचा अट्टाहास करण्यात काहीच तथ्य नाहीये...हे समजायला मला दहा वर्ष लागली.”
“तु एवढी प्रॅक्टीकलं केव्हा झालीस?” हे विचारताना तो विचारात पडला होता ...ही तिचं अंतरा का जी कधीकाळी परीकथेत जगायची...
“प्रॅक्टिकल.....धीट ...सगळच झाले.....हे बदल मात्र आपोआप घडले.”
“एक रिक्वेस्ट करू तुला??”
“काय?”
“मिस् अंतरा वैद्य गाणं म्हणणार ? माझ्यासाठी ...प्लीज?”
“गाणं वगैरे नाही रे....मी केव्हाच सोडलयं गाण.....आता जमणार नाही.”
“प्लीज...प्लीज.....”
“तु विकतं घेतलाय कारे प्लीज हा शब्द??आल्यापासुन १०० वेळा तरी म्हटला असशील...”
“घेतलाय विकत.....पण म्हण ना काहीतरी ...प्लीज”
“नाही रे.......”
“प्लीज ...”तो हात जोडत म्हणाला.
“ए हात वगैरे नको जोडु...नौंटकी.....म्हणते मी गाणं....”
“हममम.....”
“कोणतं म्हणु???????”
“कोणतही म्हण....”
“बरं.....म्हणते हा”
“माना के हम यार नही ....लो तय है की प्यार नही ......फिर भी नजरे ना तुम मिलाना ...दिल का एतबार नही”
तिच्याही नकळत तो ते गाणं रेकाॅर्ड करतो.
“खुश का मि.महाजन??”
“हो...खुप खुप खुश”
“अक्षय....उस पुरानी गली मे मैंने इश्क संभाल के रखा है....मला ते तसच जपुन ठेवायचं आहे...अल्लड..अवखळ अक्षय अंतरा...त्या गल्लीत जपुन ठेवलेत मी .....त्यांची गोष्ट तिथेच संपलीये..आता ती पुन्हा सुरू करण्याचा विचारही आणु नकोस मनात......तो प्रवाह होता..एकत्र वाहणारा....आपण त्या प्रवाहाचे दोन किनारे आहोत....समांतर ..त्यांच प्रेम आपल्यातुन वाहतोय...पण आपण आता त्या प्रवाहाचा भाग नाही होऊ शकतं....आपल्या गोष्टीचं हॅप्पी एन्डिंग झालयं......मी बाहेर पडलीये त्यातुन बाहेर पडलीये .आता तु भुतकाळात अडकु नकोस.”
“पुन्हा भेटशील??”
“असाच अचानक समोर आलास तर नक्की भेटेन”
“बाय.....मी मिस करेन तुला”
“बाय.....काळजी घे”
“हमम” डोळ्यातलं पाणी तिला दिसु नये म्हणुन पाठ वळवुन तो निघाला.
बर्याच वर्षांपुर्वी तो असाच पाठ फिरवुन गेला होता...त्याला आज जाणीव झाली त्याने काय गमावलयं याची .....
४ तासात ३६० अंशात आयुष्य फिरलं...एक माफी मागताना शब्द सुचत नव्हते...तिने कसलाच त्रागा न करता माफ केलं....मोकळं केलं.....तेव्हाही त्रागा नव्हता ...आजही नव्हता....बर्याच वर्षांनी तो रडत होता...
खुप वर्षांनी ती हसत घरी निघाली होती.!!!!
त्याच्या गाडीत तिचं गाणं वाजतं होत....
“फुल जो बंद है पन्नोंमे उसको तुम धुल बना देना....बात छिडे जो मेरी कही तो उसको भुल बता देना...
माना के हम यार नही.......लो तय है के प्यार नही”