Asmita Satkar

Romance

5.0  

Asmita Satkar

Romance

पौर्णिमा

पौर्णिमा

4 mins
1.7K


आकाशात तो पूर्ण चंद्र ज्याच मला वेड आहे ....

थंड हवा अन् पुन्हा तोच नदी किनारा .

..वाळुमधे डबलस्टॅन्डवर लावलेली तुझी गाडी ..

दुर कधी चंद्राकडे तर कधी तुझ्याकडे पाहत असलेली मी ,अन् माझ्याकडे पाहुन मंद हसणारा तु!

गप्पांचा विषय अर्थात नाहीच ..निरव शांतता...फक्त वारयाचा अन् जमीन पायाने टोकरताना वाजणार्या पैंजणाचा आवाज..छुनछुन..छुनछुन...!!

तशी मी तुझ्या जवळच उभी त्यामुळे वार्याने उडणारे केस तुझ्या चेहर्यावर जरा विसावत होते म्हणुन बांधायला केसांकडे हात नेला तस तु पटकन म्हणालास 'अग राहु देत मोकळ्याने उडण्यात जी मजा आहे ना ती बांधल्यावर गुरफटण्यात नाही'

अरे पण तुला छळतायेत म्हणुन बांधत होते....

तस मोठ्याने हसत तु म्हणालास "'छळत नाही ग .माझ्याशी खेळतायेत केस तुझे'"

तुझ्या या बोलण्यावर मी हसतच नदीतल्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे पाहत बसले कारण आताशा मला तुझ्या या रोमॅन्टिक बोलण्याची सवय होऊन गेलीये....!!

कितीतरी पोर्णिमा या नदीकिनारी अशाच गेल्यात ...

पण आज हवेत काहीतरी वेगळ जाणवल...तु अलगद कमरेतुन हात घालत मला जवळ खेचलस...माझा अंग चोरण्याचा अधुरासा प्रयत्न अन् अंगावर अलेवा शहारा पाहुन तु म्हणालास"किती घाबरतेस,,अंगावर काटा आला बघ !!"

मी तिरपा कटाक्ष टाकत मान तुझ्याविना खांद्यावर टेकवली,,

मी कितीतरी वेळ शांतता..थोडासा वार्याने सळसळणार्या पानांचा आवाज..वाढलेली थंडी ...अन् तुझ्या स्पदनांचा आवाज!!!!

गहिर्या या शांततेत पुन्हा आपला संवाद चालु होतो...

माझ भाजीत मीठ जास्त पडल म्हणुन हळहळणं..अन् त्याच खारट भाजीच तु केलेल कौतुक..अश्या एक ना अनेक गोष्टी मग पुन्हा तीच शांतता....

तुझ्या सोबत असताना शब्द नाही स्पर्श बोलतात...डोळे बोलतात..अगदी शहारेही बोलतात!!!

किती काय काय बदलत गेल बघ..नजर ठहरणार नाही एवढ मोठ्ठ नदीच पात्र पलीकडच्या काठावरची घर मोजता येइल एवढ लहान झाल...पण आपल दर पौर्णिमेला इथे येण बदलल नाही ...आजही तुझ्या खिशात शुभ्र कुंद्याच्या फुलांनी विसावण सोडल नाही ...शहरात सगळीकडे गर्दी वाढली पण या नदीकिनारी मात्र अजुनही तेवढीच शांतता असते..मी हे बोलत असतानाच तु मला घाटावरच्या पायरयांकडे नेतोस...हटकुन माझ्यापासुन लांब बसतोस..ठाऊक आहे मला आता तु कुंद्याच एक एकफुल जोडुन I love you अस लिहणार ..ते मी नीटस वाचतही नाही तोच फुल उडुनही जातात..उडणार्या त्या चांदण्यांना पकडण्याचा वेडा अट्हास ना तु करतो ना मी !!!

मग पुन्हा खळखळुन हसत आपल "ये राते ये मौसम नदी का किनारा ..ये चंचल हवाये"गुणगुणत गाडी जवळ पोहचलो 

तु गाडी स्टार्ट केल्यावर मी साडी सावरत गाडीवर बसायला जरा वेलच लावला ...तस तु म्हणालास.."प्रेयसीची बायको होउनही आता ४०वर्ष झाली पण तुझ गाडीवर बसताना लाजण ...धांदल काही कमी झाली नाही ...उलट वयानुसार वाढलीच की !!!

यावर मी फक्त हसले ...अन् गाडी घराच्या रस्त्याकडे वळाली....

दारावरची बेल वाजवली ..सुनेन दार उघडल ..

मी घरात शिरताच खुर्चीवर विसावले....तु अजुनही खालीच होतास ..

डोक्यावरचा पदर जरा नीट करत होते तोच आपले चिरंजीव पुढ्यात उभे...."काय रे केव्हा आलास ऑफिस वरून??"

"मी आलोय केव्हाच ..पण तु कुठे गेली होतीस?"

"नदीकिनारी ..आज पौर्णिमा नाही का ..मग तिकडेच ..."वाक्य पुर्ण करण्या आधीच चिरंजीव बोलले"आई कधी थांबवणार आहेस तु हे सगळ,,का वागतेस अशी???"

"काय वागते...अन् काय थांबवु...स्पष्ट बोल"

"हे अस दर पौर्णिमेला नदीकिनारी जाण"..मुलगा नजर चुकवत बोलला

"का??का थांबवु.जो पर्यत मला जमतय मी जाणारच..."मी निर्धारान बोलले...

तस तो मवाळ होत बोलला .."आई बाबा होते तो पर्यत ठीक होत ग...पण आता अस एकटीन लांब जात नको ग जाऊ""

"आई यांना काळजी वाटते म्हणुन बोलतायेत हे नका जात जाऊ प्लीज!!""सुन मुलाची बाजु सावरत बोलली....

"कळते मला तुमची काळजी ..माहित आहे तो निघुन गेलाय....पण फक्त शरीराने ...तो आजही माझ्याबरोबर असतो ..नदीकिनारी भेटतो ..कुंद्याच्या फुलांनी I love youलिहतो.

..मला जवळ घेतो...आता पण पहा मित्रांसोबत किती मोठ्याने हसतोय"""

हे ऐकताच सुनेन रडत मला मिठी मारली म्हणाली "आई वेड लागेल हो तुम्हाला ..बाबा खरच नाहीयेत ,,,"""

"अंग वेडी तर मी ४०-४२ वर्षांपुर्वीच झाले होत् आमच्या पहिल्या भेटीत...पौर्णिमाच होती त्या दिवशी पण आणि आजसुद्धा ..!!

फरक इतकाच तेव्हा तो होता अन् आज त्याच्या आठवणी....

त्याने तेव्हा भरभरून जगायला शिकवल...प्रेम करायला शिकवल.म्हणुन तो नसतानाही मी त्याच्यावर एवढ प्रेम करू शकते .

.तो गेलाय पण जगण्याची प्रेम करण्याची पुष्कळ कारण देऊन गेलाय...म्हणुनच मी नदीकिनारी जाते ..पौर्णिमेचा चंद्र न्याहळत बसते त्यातुनच मला ऊर्जा मिळते जगण्याची ...नव्याने जुन्या क्षणांच्या ..त्याच्या प्रेमात पडण्याची...!!!"

या नंतर घरात कितीतरी वेळ शांतता होती 

पण मला तुझा आवाज स्पष्ट ऐकू येत होता ..."""अशीच बोलत रहा ..मला ऐकावस वाटत..तुला बोलता याव म्हणुन मी अबोल राहतो ...तुला ऐकण्यात जी गंम्मत आहे ती माझ्या बोलण्यात नाही""

यावर मी नेहमी सारख हसत तुझ्या बोलण्याला डोळ्यातुन होकार भरत आत निघुन गेले....

पुढच्या पौर्णिमेची वाट पाहत तु हॉल मधल्या भिंतीवर फोटोत जाऊन निवांत बसला होतास.

घर माझ्या पैंजणाच्या छुनछुन आवाजाने गुंजत होत.(तुझ्या इच्छेखातर आजही मी पैंजन घालते).....अन् माझ्या कानात फक्त तुझा आवाज...

कारण आपला संवाद कधीच संपणार नाहीये...मी असे पर्यत दर पौर्णिमेला नदीकिनारी शब्दांच्यापल्याडचा हा संवाद असाच चालु राहणार.......!!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance