नास्तिक
नास्तिक


"अरे आज चक्क तु मंदिरात???"
"का मी येऊ नये असं लिहिलंय का कुठे??"
"नाही रे तसं नाही ...पण तुझ आणि देवाचं जमत नाही म्हणून मी आपलं विचारलं...."
"अहो आप्पा जमतं तर माझं आजही नाही .."
"मग रे??" त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच आप्पांनी प्रश्न विचारला.
"बायको घेऊन आली म्हणून...."
"हे बरंय बघं ... शेवटी तुझ्या सारख्या नास्तिकाने बायको मुळे का होईना चढली मंदिराची पायरी.."आप्पा हसत हसत म्हणाले.
"आप्पा मी नास्तिक मुळीच नाही पण आस्तिक ही नाही .....माझा मुर्ती पुजेला विरोध.. अवास्तव धर्माच्या नावावर केलेल्या क्रृतीला विरोध.. भक्ती तर मलाही आहे पण ह्या मुर्ती विषयी नाही.."
"तुझं ना मला काही कळत नाही बघं"
"आप्पा आता ह्यात न कळण्यासारख काय आहे हो???
बरं आस्तिकता नास्तिकता जाऊ दे,
आता मी तुम्हाला मंदिरात येण्याचं खरं खरं कारण सांगु का ??"
"हो ,हो सांग की !"काहीश्या अधीरतेने आप्पा उद्गारले."
"माझी बायको अगदी कर्मठ वातावरणात वाढली... यज्ञयाग करणं म्हणजे पुण्य असे संस्कार तिच्यावर झाले, सकाळची आन्हिकं, संध्या, धुपदीप, रामरक्षा, परवचा हे बघत, ऐकत ती वाढली,
साहजिकच लग्नानंतर माझ्या घरात तिचं देवघर आलं.
तिच्या देवपुजेला माझा विरोध नव्हता पण समर्थन ही नव्हतं.....
पण एका रविवारी तिला पुजा करतात पाहिलं अन् माझ्यातला भक्त जागा झाला."तो अगदी भारावुन बोलत होता.
"अरे आत्ताच म्हणालास ना की देवावर विश्वास नाही"
"अहो आप्पा धीर धरा की ,,,मी भक्त म्हटलं देवभक्त नाही"""
"बरं बरं सांग पुढे"आप्पानां सुद्धा उत्सुकता होती ह्याच्या मंदिरात येण्यामागचं गुपित ऐकण्याची.
"हा तरं मी सांगत होतो रविवारची पुजा....
तर मी तिला पाहिलं अन् भानचं हरवलं हो माझं....
एकतर नवीन लग्न म्हणजे आधीच मोहरलेले दिवस त्यात ही पुजा करताना काय सुरेख दिसत होती .. लाजवाब!!
नुकतीच न्हालेली.... तल्लीन होऊन एक एक देव ताम्हणात ठेवून जलाभिषेक चालला होता....
मग तितक्याच तन्मयतेने सगळे देव देव्हाऱ्यात ठेऊन यथासांग पुजा करत होती ती...
तुम्हाला सांगतो आप्पा मुग्ध होणं म्हणजे काय हे अनुभवलं ....
त्याक्षणी तिचे ते अत्तरी एहसास.... तेजस्वी मुद्रा,,,,, चेहर्यावर चैतन्य.... तिच्या एका एका हालचाली वर मी घायाळ होत होतो....
प्रेमात पडण्याचा क्षण म्हणजे तोच क्षणं.... आणि आप्पा ह्या सगळ्यात शारीरिक आकर्षण वगैरे अजिबात ही वाटतं नव्हतं हा....
एक वेगळी ऊर्जा जाणवली... दिव्या भोवती तयार होतं ना अगदी तसचं तेजस्वी वलय तिच्याभोवती होत ....
मी इतका भारावुन गेलो की नकळत तिच्याकडे पाहत हात जोडले ..
आस्तिकता नास्तिकता ह्यांच्या पलीकडचं काहीतरी मला खेचत होती...मी खेचलो गेलो .. नतमस्तक झालो.... भक्त झालो त्या निष्पाप भाबड्या चर्येचा ... निस्सीम भक्त झालो.... कारण शरीराच्या ही पलीकडचं असं एक वेगळं आकर्षण जाणवलं मला तिच्या विषयी... आणि मी भक्तिमय झालो.....
त्यानंतर आजतागायत तिला पुजा करताना पाहण्याची एकही संधी सोडत नाही.. म्हणून आज ही मंदिराची वारी....
आप्पा मला अगदी दरवेळी तसंच किंबहुना त्याहून ही जास्तच वाटतं ...
त्यावेळी मी आस्तिक ही नसतो अन् नास्तिक ही एक अगम्य अशी भावना मला जाणवतं राहते.. खेचत राहते ....
मग आम्ही दोघेही नतमस्तक होतो...ती देवासमोर अन् मी तिच्यासमोर !!!!!
"आश्चर्य आहे.... तुझ्या सारख्या पुरोगामी नास्तिक विज्ञानवादी माणसाचं असं बोलणं... आश्चर्य च आहे बुवा!"असं म्हणत आप्पा काठी टेकत निघुन जातात....
खरं तर आप्पांना त्याच बोलणं कितपत समजलं होतं काय माहित.
त्यांच्या जाण्याची दखलही ह्याने घेतली नव्हती
देवासमोर नतमस्तक झालेल्या बायको कडे पाहुन हा नकळत हात जोडत होता..
पुन्हा कसलीशी अगम्य ओढ त्याला नतमस्तक करत होती !!!!!